काही सहली अगदी छोटय़ा छोटय़ा असतात, पण बरोबर सगळी आवडती मंडळी, गप्पागोष्टी, दंगा आणि जोडीला नयनरम्य निसर्ग यामुळे त्या अविस्मरणीय होऊन जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मामा आणि मामीच्या डोक्यात आलं आणि त्यांनी जाहीर केलं, ‘‘चला आपण सगळे मस्त शॉर्ट ट्रिप काढू..’’ सगळ्यांनाच हवाबदलाची गरज होती आणि ट्रिपचं नाव काढाल आणि कोणाहीकडून नकार येणार हे अशक्यच होतं!! सगळ्यांकडून होकार आला. सगळे म्हणजे, जास्ती नाही.. फक्त १३ जण. काका, मामा, मावशी आणि भावंडं अशी इतके लोक असल्यावर फुलऑन मजा येणार होती. बरेच दिवसांनी आम्ही सगळे एकत्र बाहेर जाणार होतो. ही ट्रिप म्हणजे नुसता दंगा-धुडगूस असणार हे नक्की होतं. ट्रिपची जय्यत तयारी चालू झाली. ठिकाण ठरलं नव्हतं तरीही मुलांची तयारीला लगेच सुरुवात झालेली. पण प्रश्न होता कुठे जायचं! कोठे तरी जायचं हे नक्की पण कोठे जायचं यावरून भरपूर गोंधळ होता. समुद्रावर जायचं हे नक्की झाल्यामुळे बाकीच्या पर्यायांवर फुली होती. पण कोणता बीच हे ठरत नव्हतं. मामांना गोव्याला जायचं होतं, बाबांना जवळच कोठे तरी अलिबागजवळ.. प्रत्येकाची मतं वेगवेगळी, त्यामुळे खूपच वेळ गेला. शेवटी एकमताने कर्दे हे ठिकाण नक्की झालं.. दापोलीजवळचं कर्दे!!!
आधी कोणीही कर्दे पाहिलं नव्हतं. त्यामुळे नवीन ठिकाण म्हणून अधिक चर्चा न होता एकमत झालं. तीन दिवसांची ट्रिप. कर्देचा समुद्रकिनारा पाहायला मी तर एकदम आतुरलेले. तसे सगळे समुद्रकिनारे सारखेच पण तरीही प्रत्येक ठिकाणाचं काही न काही वैशिष्टय़ असतंच. कर्देच्या किनाऱ्यामध्ये काय खास हे पाहायचं होतं.. आणि त्यात इतके लोक जाणार होतो म्हणजे फक्त मजाच.
कर्दे तसं फार लांब नाही, पण अलिबाग, नागावपेक्षा लांबच!! म्हणजे प्रवास तसा जास्त नव्हता. पण इतके सगळे लोक होते, त्यामुळे प्रवासात कंटाळा येणार नव्हता. मला लांबचा प्रवास कधी कधी भयंकर कंटाळवाणा वाटतो. पण कर्देला जायची मी आतुरतेने वाट पाहत होते. पाहता पाहता जायचा दिवस आला. वेगवेगळ्या ठिकाणांवरून येणारे सगळे सकाळी ६ वाजता दशभुजा गणपतीपाशी चक्क वेळेवर आले. एका गाडीत आम्ही मुलं आणि उरलेल्या दोन गाडीत मोठी मंडळी. मुलं एकदम खूशच! बरोबर कोणी मोठे नाही. हवा तसा दंगा, गाणी. मोठय़ांची अजिबात लुडबुड नाही, सूचनाही नाही आणि हवं तसं वागायला आम्ही मोकळे. ट्रिपची खरी मस्त सुरुवात झाली होती.
पुणे हळूहळू मागे पडायला लागलेलं. वडापाव खाल्ल्याशिवाय कोणत्याही ट्रिपची सुरुवातच झाल्यासारखी वाटतच नाही. त्यामुळे आई आणि मामीचा पोहे करून घ्यायचा बेत आम्ही शिताफीने टाळला होता. ट्रिपला जे मिळेल ते खायचं हे आमचं सूत्र होतं. आई आणि मामीने ते ऐकलं म्हणून वडापाव मिळाला, नाही तर पोह्य़ावर ट्रिप सुरू करावी लागली असती!
ट्रिपची सुरुवात तर एकदम मस्त झालेली. आजूबाजूला हिरवंगार होतं. मध्ये मध्ये खंडय़ा दर्शन देत होता. पाहता पाहता ताम्हिणी घाट आला. न थांबता जाणं म्हणजे वेडेपणाच होता. फोटोसेशन झालं. सगळ्या चहाबाजांचा टपरीवर थांबायचा मोह न टाळता चहा ढोसून पुढच्या प्रवासाला निघालो. अर्थात चहाबरोबर भजी होतीच. बाकी दोन गाडय़ांमध्ये काय सुरू होतं माहीत नाही, पण आमचा दंगा गाणी जोरात सुरू होती.
मामा, काका, सगळेच तसे खादाड. वाटेत जे मिळेल ते खाणं चालू होतं. पण जेवायची आठवण यायला लागली आणि दापोलीला एक चांगलं हॉटेल बघून जेवायला थांबलो. जेवण मस्त होतं!

आता कोठेही न थांबता थेट कर्दे गाठायचं होतं. कर्दे गावाजवळ आलो तशी समुद्राची गाज जाणवू लागली. वाटेतील गाव तसं छोटंसंच होतं. छोटी छोटी टुमदार घरं. प्रसन्न वाटत होतं एकदम. वातावरण बदललं होतं. आता कर्देला कधी पोचणार अशा विचारांनी मी खूश झाले होते आणि प्रवासाचा सगळा शीण कुठच्या कुठे पळून गेलेला. म्हणजे तसा शिणवठा आलाच नव्हता पण कर्देला कधी एकदा पोचतो असं झालेलं मला!
वाट पाहायच्या आधीच आम्ही कर्देजवळ आलो होतो. हॉटेलपर्यंत पोचायचा रस्ता अजिबात चांगला नव्हता. मात्र हॉटेलपाशी पोचलो. समोर अथांग समुद्र आणि शांत किनारा. क्षणभर पाहतच राहिले, लाटा उसळण्याचा आवाज काय तो त्या शांततेचा भंग करीत होता. सुंदर, भारी आणि मस्त इतकेच काय ते डोक्यात सुरू होतं.
किनाऱ्याला लागूनच मस्त हॉटेल असल्यामुळे वाटेल तेव्हा समुद्रावर जाता येणार होतं. सगळंच स्वप्नवत होतं! नजर जाईल तेथपर्यंत पसरलेला तो निळाशार अथांग समुद्र तासन्तास पाहत बसू शकले असते. पांढऱ्याशुभ्र रेतीचा गालिचाच अंथरलेला होता. किनाऱ्यावर कचऱ्याला वावच नव्हता. शांत समुद्र मस्त वाटत होता, पण एकदा का त्याने रौद्र रूप घेतलं की थरकाप उडतो. मनाच्या कोपऱ्यात लाटांचा आवाज साठून राहिला. नंतर किती तरी वेळ लाटांचा आवाज माझ्या कानात घुमत होता.
हॉटेलपाशी पोहोचल्यावर लगेचच खरं तर थेट समुद्रात जायचं होतं पण आईच्या हुकमामुळे आधी हॉटेलवर गेलो. रूममध्ये जरा विश्रांती घेतली आणि लगेचच समुद्रावर जायला निघालो. किनाऱ्यावर मनसोक्त हिंडलो, वाळूचे किल्लेही केले, शंख-शिंपले गोळा केले. आता पाण्यात जाण्याचा मोह आवरणं केवळ अशक्यच होतं. मनसोक्त हिंडून झालं, पाण्यात भिजून झालं. हॉटेलवर जाऊन फक्कड चहाबरोबर सगळ्यांच्या गप्पा रंगल्या.
दुसऱ्या दिवशीचा प्लॅन ठरला. जवळचं शंकराचं मंदिर, हर्णे बंदर, मच्छी मार्केट आणि डॉल्फिन सफारी.
पहाटे पहाटेच लाटांच्या आवाजांनी जाग आली. उठल्यावर खिडकीतून उगवणारा सूर्य पाहिला आणि एकदम ताजीतवानी झाले. कसली मस्त सुरुवात झालेली दिवसाची. पटापट आवरून आणि आम्ही मंदिरात निघालो. दर्शन झालं आणि पुढे मच्छी मार्केट पाहायला हर्णे बंदराकडे निघालो. पण झाला की गोंधळ. फक्त मुलं असलेली आमची गाडी पुढे होती आणि दोन गाडय़ा आरामात मागून येत होत्या. त्यात आम्ही रस्ता चुकलो. म्हणजे चूक आमचीच होती. गप्पा मारता मारता कुठे जातोय याकडेही लक्ष नव्हतं आणि आम्ही रस्ता चुकलो.
कुठे गेलो आम्हाला पत्ताही नव्हता. आम्ही हरवलोय हे लक्षात आल्यावर मग फोनवर फोन. पण त्यात रेंजचा प्रॉब्लेम. कसा तरी करून मामा, काका आणि बाबांनी आम्हाला शोधून काढलं आणि भेटल्यावर इतकी बोलणी ऐकावी लागली की बस्स. सगळ्यांनी मनसोक्त ओरडून घेतलं. बरेच दिवसांपासून ओरडायचं होतं त्यांना, आता मिळालेला चान्स तर कसा सोडतील?
मग मोठय़ांची एक गाडी पुढे एक मागे आणि मध्ये आम्ही असा प्रवास सुरू झाला. हण्र्याला समुद्रात डॉल्फिन बघायला जायचं होतं, पण फार सुरक्षित वाटलं नाही म्हणून तो कार्यक्रम रद्द केला.
हण्र्याच्या मच्छी बाजारात असंख्य प्रकारचे मासे होते. इतके वेगवेगळ्या प्रकारचे मासे मी तरी प्रथमच पाहत होते. वेगवेगळी नावं सांगितली लोकांनी, पण एकही माझ्या लक्षात राहिलं नाही. निघता निघता मस्त सूर्यास्त पाहायला मिळाला. समुद्र सोन्यासारखा चमकत होता आणि सूर्य समुद्रात कधी आणि कोठे गडप झाला कळंलच नाही. इतक्या निवांतपणे पुण्यात कधी सूर्यास्त पाहिलाच नव्हता. तेथे वेळच नसतो ना! ते मनमोहक दृश्य डोळ्यांत साठवून ठेवलं.
रात्री मस्त जेवणानंतर गाण्याच्या भेंडय़ा झाल्या. समुद्रावर गुडूप अंधार होता सगळीकडे. रात्रीचा समुद्र जरा भीतीदायकच वाटत होता. फक्त लाटांचा आवाज होता. बीचवर एक चक्कर मारून खाल्लेलं जिरवून आम्ही आधीच ठरवल्याप्रमाणे पत्ते आणि उनो खेळायला लागलो. आधी सगळे होते पण हळूहळू सगळे जायला लागले आणि फक्त आम्ही पाच भावंडेच राहिलेलो खेळायला! आम्ही सगळे जाण्याचीच वाट पाहत होतो. तेव्हा १० वाजून गेले होते. गप्पा आणि दंगा जोरजोरात चालू होता. आमचा आवाज आणि फक्त लाटांच्या उसळण्याचा आवाज शांतता भंग करीत होता. आम्ही किती तरी वेळ उनो खेळत होतो. मामी सांगून गेली, चला आता झोपायला. आम्ही हो म्हटलं, पण परत खेळणं चालू. एक वाजून गेला तरीही आमचं खेळणं आणि दंगा चालूच होता. मग शेवटी काका आला आणि तो ओरडलाच आम्हाला त्याच्याबरोबरच घेऊन गेला तेव्हा आमचा खेळ बंद झाला!
शेवटची रात्र होती कर्देमध्ये. परत एकत्र बाहेर कधी जाऊ ते माहीत नव्हतं. आम्हाला मनसोक्त मजा करून घ्यायची होती. कर्देमधली शेवटची रात्र म्हणून मध्यरात्री किनाऱ्यावर चक्करही टाकायची होती, पण काका आला आणि आमच्या मनसुब्यावर पाणी पडलं. आणि मन मारून उठलो आणि चूपचाप हॉटेलमध्ये गेलो आणि मी पडल्या पडल्या कधी झोपले मला कळलंही नाही. दुसऱ्या दिवशी ९ वाजेपर्यंत पुण्याला निघायचं असं ठरलं होतं. शेवटच्या दिवशीही लाटांच्या आवाजांनी जाग आली आणि परत समुद्राच्या पोटातून येणारा सूर्य पाहायला मिळाला. कर्देमध्ये अजून राहायचं होतं पण ते शक्य नव्हतं म्हणून आवराआवरी चालू केली. ठरल्याप्रमाणे सकाळी नऊला जड अंत:करणाने कर्देमधून निघालो. तिथून पाय निघत नव्हता..पण जावं तर लागणार होतंच.
सर्वाबरोबरच्या कर्देतल्या सुंदर आठवणी मी बरोबर घेऊन चालले होते. कर्देवरून निघालो खरं, पण मनाच्या एका कोपऱ्यात कर्देतल्या आठवणी, सुंदर किनारा आणि अथांग समुद्रातल्या लाटांचा आवाज दडवून ठेवला होता मी. निघता निघता कर्देच्या समुद्राला ‘परत भेटू’ असं सांगून गाडीत बसलो ते थेट पुण्याला यायला..

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karde sea beach
First published on: 11-07-2014 at 01:08 IST