या आठवडय़ात यशराज फिल्मसचा परिणिती चोप्रा आणि रणवीर सिंग यांचा समावेश असलेला ‘किल-दिल’ हा सिनेमा आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट ‘लायर्स डाइस’ प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढील शुक्रवारी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी बॉलीवूडच्या बलाढय़ यशराज स्टुडिओ बॅनरचा ‘किल-दिल’ हा बिगबजेट सिनेमा प्रदर्शित होतोय. यशराज फिल्म्स बॅनरचे चित्रपट म्हणजे हमखास मनोरंजन असे प्रेक्षकांच्या मनात रुजले आहे, रुजविले आहे. या वर्षी यशराज फिल्म्सने ‘गुंडे’, ‘बेवफुकियाँ’, ‘मर्दानी’ आणि ‘दावत-ए-इश्क’ अशा मिक्सबॅग चित्रपटांची निर्मिती केली. दोन-तीन बिगबजेट, ‘लार्जर दॅन लाइफ’ गटातले चित्रपट, तर दोन मध्यम बजेटचे आणि वेगळ्या विषयांवरचे चित्रपट असे स्वरूप या वर्षी यशराज फिल्म्सने ठेवले. ‘किल-दिल’ हा या वर्षांतला यशराज फिल्म्सचा बिगबजेट चित्रपट आहे. ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करून अल्पावधीत ‘दिलों की धडकन’ बनलेली परिणिती चोप्रा आणि पहिल्याच चित्रपटात रणवीर सिंगसोबत परिणितीने काम केले आहे. रणवीर सिंग आणि परिणिती चोप्रा हे दोघेही यशराज फिल्म्स बॅनरच्या चित्रपटांमधून रुपेरी पडद्यावर झळकलेत. त्यामुळे ‘किल-दिल’ हा चित्रपट आदित्य चोप्रा, रणवीर सिंग आणि परिणिती चोप्रा यांच्यासाठी खूप जवळचा आणि महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’मध्ये रणवीर सिंग-अनुष्का शर्मा यांची जोडी मुख्यत्वे दाखवली असली तरी चित्रपटाच्या सुरुवातीला परिणितीचा प्रियकर सनी सिंग म्हणून रणवीर सिंगने भूमिका साकारली आहे. त्यामुळे त्या अर्थाने परिणितीचा पहिला ‘हिरो’ रणवीर सिंग हाच म्हटला पाहिजे. परिणितीचे मोजकेच पाच-सहा चित्रपट झळकले असले तरी पुरुष प्रेक्षकांव्यतिरिक्त स्त्री प्रेक्षकांकडूनही परिणितीला वाहवा मिळाली आहे. चित्रपट चालोत, न चालोत, पण परिणितीचा पडद्यावरील वावर सर्वच प्रेक्षकांना आवडला आहे. पहिल्या चित्रपटात परिणिती-रणवीर ही जोडी फक्त काही दृश्यांपुरती दिसली होती. ..रिकी बहल म्हणून रणवीर सिंगचेही कौतुक झाले. त्यानंतर प्रत्येक चित्रपटागणिक तो ‘स्टार’ बनला. परिणितीचा प्रत्ययकारी अभिनय आणि रणवीर सिंगचा ‘स्टारडम’ यांची जोडी ‘किल-दिल’ या चित्रपटात जमणार का, त्यांची ‘केमिस्ट्री’ या चित्रपटात जुळणार का याची उत्सुकता आहे. उत्तर भारतातील देव आणि तुतू हे दोघे नशीब काढण्याच्या शोधात भटकतात आणि भय्याजी म्हणजे गोविंदाला भेटतात. सुपारी घेऊन हत्या करणे हा देव-तुतू यांचा जगण्याचा मार्ग बनला आहे. भय्याजी त्यांना आणखी हत्या करण्यासाठी सज्ज करतो. दरम्यान देव म्हणजे रणवीर सिंग आणि दिशा म्हणजे परिणिती यांचे प्रेम जुळते आणि चित्रपटात कपट, लबाडी, प्रेम, आव्हाने, कुरघोडी करणे याची अहमहमिका लागते. दिशा ही बिनधास्त तरुणी परिणिती साकारत आहे. यशराज फिल्म्सचा बिगबजेट एण्टरटेनर म्हणून ‘किल-दिल’चे नाव घेता येईल.

सिनेमाचे मार्केटिंग, पब्लिसिटी यावरच हिंदी सिनेमा चालतो असे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु, बिगबजेट ‘किल-दिल’समोर एक राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट ‘लायर्स डाइस’ प्रदर्शित होणार आहे. नवाझुद्दीन सिद्दिकी आणि गीतांजली थापा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट स्थलांतरित कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन चितारणारा आहे. ‘किल-दिल’मध्ये ग्लॅमरच ग्लॅमर आणि ‘लायर्स डाइस’मध्ये ग्लॅमरचा संपूर्ण अभाव असे परस्परविरोधी जातकुळीतले चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होताहेत. ६१ व्या राष्ट्रीय चित्रपट पारितोषिकांमध्ये ‘लायर्स डाइस’ चित्रपटातील कमला या प्रमुख भूमिकेसाठी अभिनेत्री गीतांजली थापा यांना सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक, तसेच या चित्रपटाच्या छायालेखनासाठी राजीव रवी यांना सवरेत्कृष्ट छायालेखनाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे. हिमाचल प्रदेशमधील भारत-तिबेट सीमेवरील एका खेडय़ात राहणाऱ्या कमलाचा नवरा हारूद हा दिल्लीत बांधकामाच्या ठिकाणी कामगार म्हणून काम करू लागतो. तो परतत नाही, गायब होतो. त्याच्या शोधार्थ कमला आणि तिची छोटी मुलगी मान्या दिल्लीला जायला निघतात. वाटेत त्यांना नवाझुद्दीन भेटतो, दिल्लीपर्यंत तो त्यांची सोबत करतो, त्यांना मदत करतो. स्थलांतरित कामगारांचे जीवन, त्यांचे कुटुंबीय याचे दर्शन या सिनेमात घडविण्यात आले आहे. एका बाजूला गुंड-मारेकरी असलेले रणवीर सिंग-अली जफर आणि दुसऱ्या बाजूला परिस्थितीने पिचलेली गरीब कमला एकाच शुक्रवारी रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या स्तंभातून लिहीपर्यंत कदाचित राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘लायर्स डाइस’ या चित्रपटाबद्दल लोकांना पुसटशी कल्पनासुद्धा नसेल. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट २२ फेब्रुवारी २०१५ रोजी होणाऱ्या ८७ व्या अ‍ॅकॅडमी पुरस्कारांसाठी विदेशी चित्रपट गटामध्ये भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठविला जाणार आहे. २०१३ मध्ये झालेल्या मामि महोत्सवाबरोबरच सनडान्स महोत्सव, रॉटरडॅम महोत्सवातही दाखविण्यात आला आहे. पीव्हीआर डायरेक्टर्स रेअरने या गाजलेल्या चित्रपटाचे वितरण करण्याचे ठरविल्यामुळेच हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. एकीकडे तकलादू-खोटय़ा-काल्पनिक अतिरंजित व्यक्तिरेखा आणि दुसरीकडे स्थलांतरित कामगारांच्या खऱ्याखुऱ्या प्रश्नांना भिडणाऱ्या वास्तवातील व्यक्तिरेखा असा संघर्ष रुपेरी पडद्यावर होणार आहे.

मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kill dill and liars dice
First published on: 07-11-2014 at 01:10 IST