पुन्हा सिंधूपर्व!

सिंधू हे नाव उच्चारताच एक संस्कृती डोळ्यासमोर तरळते.

बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू

ऑलिम्पिक रौप्यपदक कमावणाऱ्या बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने चीन सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. या जेतेपदाने सिंधूच्या कारकीर्दीतील एक मोठे वर्तुळ पूर्ण झाले आहे. क्रीडाविश्वातील सर्वोच्च स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या सिंधूसाठी एका स्पर्धेचं जेतेपद इतकं खास का, याचा वेध.

सिंधू हे नाव उच्चारताच एक संस्कृती डोळ्यासमोर तरळते. विशाल प्रवाह असणाऱ्या सिंधू नदीच्या पात्रात वसलेली संस्कृती. नागरीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा मान या सिंधू संस्कृतीला जातो. खळाळत्या, रोरावत जाणाऱ्या सिंधू नदीचा उल्लेख आपल्या राष्ट्रगीतातही आहे. बहरणं, विकास, प्रगती ही सगळं प्रारूपं सिंधू नदीशी संलग्न आहेत. आंध्र प्रदेशातल्या हैदराबादमधल्या सिंधूने स्वत:च्या उदाहरणाने एक वेगळीच संस्कृती निर्माण केली आहे. खेळाचा वारसा आईवडिलांकडून मिळालेल्या सिंधूने गेल्या सहा वर्षांत मिळवलेले यश स्पृहणीय आहे. प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध प्रशिक्षण घेणाऱ्या सिंधूने वयानुरूप येणारा अल्लडपणा बाजूला सारत परिपक्व खेळाडू आणि माणूस असल्याचे सिद्ध केले.

प्रकाश पदुकोण आणि पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतर बॅडमिंटन विश्वातलं वलयांकित नाव आणि ब्रँड म्हणजे सायना नेहवाल. सातत्यपूर्ण प्रदर्शन, तंदुरुस्ती आणि चीन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढय़ प्रतिस्पध्र्याना नमवण्याची हातोटी या बळावर सायनाने स्वत:च्या नावाची छाप उमटवली. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासह सायना हे नाव घराघरात पोहचले. लाघवी स्वभाव, आईवडिलांच्या आज्ञेत असणारी गुणी मुलगी ही सायनाची प्रतिमा देशवासीयांच्या मनात पक्की ठसली.

सायनाचा झंझावात असतानाच गोपीचंद यांची आणखी एका शिष्या अर्थात सिंधूने खेळायला सुरुवात केली होती. निसर्गाची देणगी असलेली उंची आणि ताकद, काटक शरीर, उत्तम तंदुरुस्ती आणि चिवटपणे झुंज देण्याची तयारी यामुळे सिंधूने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या खेळाडूंचा दबदबा कायम असतो. एकापेक्षा एक सरस खेळाडू घडवण्याची फॅक्टरी म्हणजे चीन. अद्भुत तंदुरुस्ती, यंत्रवत सातत्य, भात्यात विविधांगी फटके यामुळे चीनच्या खेळाडूंना नमवणे कठीण असते. चीनच्या खेळाडूंना हरवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कौशल्यात त्यांच्यापुढे राहणे आवश्यक असते. यासाठी त्यांच्या खेळाबरोबरच स्वत:च्या खेळाचा चोख अभ्यास लागतो. आपली शक्तिस्थाने आणि कच्चे दुवे काय याची जाणीव लागते. सिंधूने हा अवघड गड सर केला.

सायनाच्या वाटचालीतही चीनच्या खेळाडूंनी नेहमीच अडथळा निर्माण केला. चीनची ही अभेद्य भिंत बाजूला सारत जेतेपदापर्यंत वाटचाल करणे सायनासमोरचे खडतर आव्हान होते. चीनच्या खेळाडूंमुळेच अनेकदा सायनाला जेतेपदापासून वंचित राहावे लागले आहे. सिंधूने चीनचा बागुलबुवा मानगुटीवर बसूच दिला नाही. त्यांना हरवू शकतो हा विश्वास सिंधूच्या खेळाने दिला. बॅडमिंटन विश्वातल्या या सत्ताकेंद्राला हादरा देण्यामागे सिंधूइतकीच तपश्चर्या प्रशिक्षक गोपीचंद यांची आहे.

ही प्रक्रिया सुरू असताना सिंधूचे वय लक्षात घेणेही अत्यावश्यक आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या जगाची सिंधू प्रतिनिधी आहे. सिंधूच्या वयाची मुलेमुली कॉलेज लाइफ एन्जॉय करीत होती. मात्र सिंधूने बॅडमिंटनमध्ये स्वत:ला सिद्ध केले. गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सहा ते सात तास सराव, व्यायामशाळा, शास्त्रोक्त आहार असे लष्करी खाक्याचे आयुष्य सिंधू अनेक वर्षे जगते आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी सातत्याने प्रवास करावा लागतो. वेगळा देश, वेगळी माणसे, वेगळे वातावरण यांच्याशी जुळवून घेत खेळणे मोठेच आव्हान आहे. परंतु सिंधूने हे शिवधनुष्य समर्थपणे पेलले आहे.

तिची २१ व्या वर्षी स्पर्धाच्या निमित्ताने वीसहून अधिक देशांची सफर झाली आहे. असंख्य प्रकारची प्रलोभने समोर असताना स्वत:ला बंदिस्त पद्धतीच्या लाइफस्टाइलमध्ये बांधून घेणे प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखे आहे. आईवडील राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू असल्याने सिंधूसाठी काय आवश्यक आहे याची जाण तिच्या पालकांना आहे. तिने फक्त खेळावे, बाकी सगळ्याची जबाबदारी आमची अशी भूमिका तिच्या पालकांनी घेतल्यामुळे सिंधूचा आलेख प्रगतीचाच राहिला. सिंधूच्या कारकिर्दीसाठी तिच्या आईने सरकारी नोकरीही सोडली. वडिलांनी नोकरी सांभाळून तिच्यासाठी वेळ काढला. असा भक्कम पाठिंबा असल्यामुळेच सिंधू घडू शकली.

सायना नेहवाललाही हुलकावणी दिलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदके सिंधूच्या नावावर आहेत. जागतिक अजिंक्यपद स्पर्धा बॅडमिंटन विश्वातील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडू स्पर्धेत सहभागी होतात. प्राथमिक फेरीची लढतही कठीण असते. या स्पर्धेत खेळण्याच्या कौशल्याबरोबरच मोठय़ा व्यासपीठाचे दडपण हाताळण्याचे कसब आवश्यक असते. २०१३ आणि २०१४ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक पटकावत सिंधूने दडपण हाताळता येते ही परीक्षाही पार केली. २०१४ मध्येच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदक नावावर करीत सिंधूने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. लंडन ऑलिम्पिकसाठी सिंधू पात्र ठरू शकली नाही. मात्र चार वर्षांत ती पदकाची दावेदार होती. यावरूनच चार वर्षांच्या कालावधीत तिने घेतलेली भरारी लक्षात यावी.

ऑलिम्पिकसाठी पात्र होणेही अवघड असते. जागतिक क्रमवारीत विशिष्ट स्थान टिकवणे अत्यावश्यक असते. ते सिंधूने टिकवले आणि रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. सायना नेहवालची ही दुसरी ऑलिम्पिकवारी होती. लंडन ते रिओ यादरम्यान सायना ब्रँड प्रस्थापित झाला होता. तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. मात्र गुडघ्याच्या दुखापतीने सायनाचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. सिंधूने प्रत्येक लढतीत शानदार खेळाचे प्रदर्शन केले. शरीरवेधी स्मॅश, खणखणीत परतीचे फटके, नेटजवळचे सुरेख फटके, ड्रॉप आणि क्रॉसकोर्ट यांचा खुबीने उपयोग करीत अंतिम फेरी गाठली.

ऑलिम्पिकपूर्वीचे निम्मे वर्ष सिंधू कोर्टवर उतरू शकली नाही. याचे कारण पायाला झालेली दुखापत. वावरासाठी मूलभूत असणाऱ्या पायालाच दुखापत झाल्याने सिंधू पुनरागमनानंतर पूर्वीच्या कौशल्याने खेळू शकेल का, याबद्दल साशंकता होती. मात्र तिने पुनरागमनाची घाई केली नाही. सहा महिन्यांनी दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर तिने खेळायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काही स्पर्धामध्ये तिला झटपट गाशा गुंडाळावा लागला. मात्र तिने कसून सराव सुरूच ठेवला. याचा फायदा तिला ऑलिम्पिकमध्ये झाला. सामन्यादरम्यान एकाग्रता भंग झाल्यामुळे सिंधूला फटका बसत असे. ऑलिम्पिकदरम्यान सिंधूने या कच्च्या दुव्याला परावर्तित केले. फार पुढचा विचार करण्याऐवजी एकेका गुणावर भर देत खेळण्याचे धोरण सिंधूने अमलात आणले. अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या स्पेनच्या कॅरोलिन मारिनने सरशी साधली. मात्र सिंधूने कडवी टक्कर दिली. कॅरोलिनला सहज जिंकू दिले नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी ती पहिलीवहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. समकालीन खेळाडूकडून प्रेरणा घेत सिंधूने सायनाच्या पदकाचा रंग बदलत एक पाऊल पुढे टाकले.

या पदकाने सिंधूचं आयुष्यच पालटलं. देशभरातून कौतुकाचा वर्षांव झाला. केंद्र सरकार, असंख्य राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी सत्कार कार्यक्रमांचा सपाटाच लावला. भारतात आगमन झाल्यापासून पुढचे दोन महिने सिंधू सत्कार कार्यक्रमांमध्ये व्यस्त झाली. २१व्या वर्षी ऑलिम्पिक पदकासह ब्रँड सिंधू नावारूपास आला. असंख्य जाहिरातदारांनी सिंधूला करारबद्ध केलं. असंख्य उपक्रमांची सदिच्छादूत म्हणून तिची निवड झाली. तिच्या हस्ते लाँचिंग, उद्घाटनं सुरू झाली. हे सगळं सुखावणारं होतं, मात्र एक शल्य तिच्या मनात होतं. ऑलिम्पिक पदक पटकावलं. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन पदके नावावर आहेत. मात्र बॅडमिंटन विश्वातल्या सुपरसीरिज अर्थात सर्वोच्च श्रेणीच्या स्पर्धेचे एकही जेतेपद आपल्याकडे नाही याची खंत होती.

बॅडमिंटनमध्ये स्पर्धाची चार श्रेणीनिहाय वर्गवारी होते. सुपरसीरिज, ग्रां.प्रि. गोल्ड, ग्रां.प्रि. इंटरनॅशनल चॅलेंज/फ्युचर सीरिज अशी संरचना असते. सुपरसीरिज स्पर्धामध्ये जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडूच सहभागी होऊ शकतात. सिंधू सातत्याने या सुपरसीरिज स्पर्धामध्ये खेळत असे. मात्र इतक्या वर्षांत तिला या स्पर्धाच्या जेतेपदापर्यंत पोहचता आले नाही. ऑलिम्पिक पदकानंतर हे रितेपण आणखी जाणवू लागले. ऑलिम्पिकनंतर देशात उसळलेल्या प्रशंसा लाटेनंतर सिंधूने पुनरागमन केले. मात्र अपुऱ्या सरावामुळे दोन स्पर्धामध्ये सिंधूला प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. या अपयशामुळे सुपरसीरिज स्पर्धेचे जेतेपद आणखीनच खुणावू लागले. ऑलिम्पिक पदकाने डोक्यात हवा गेली आहे. याचा परिणाम खेळावर होऊ लागला अशी टीकाही होऊ लागली. मात्र त्याने विचलित न होता सिंधूने चीन सुपरसीरिज स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला.

शेरास सव्वाशेर प्रतिस्पर्धी प्रत्येक फेरीत सिंधूसमोर होते. मात्र उत्तम तंदुरुस्ती, कोर्टवरचा सर्वागीण वावर आणि सर्वसमावेशक खेळ यामुळे सिंधूने अंतिम फेरीपर्यंत आगेकूच केली. अंतिम लढतीत चीनची सन यु हिचे आव्हान समोर होते. एकेका गुणासाठी मुकाबला रंगला. मात्र सरस खेळाच्या बळावर सिंधूने बाजी मारली. १९८६ पासून चीन सुपरसीरिज स्पर्धेचे आयोजन होते आहे. ३० वर्षांच्या इतिहासात महिला एकेरी प्रकारात केवळ दोन बिगरचीनच्या खेळाडूंनी जेतेपदावर नाव कोरले आहे. एक आहे सायना नेहवाल आणि दुसरी आहे पी.व्ही.सिंधू.

पुरुषांमध्ये केवळ एका भारतीय खेळाडूला जेतेपद पटकावता आले आहे. २०१४ मध्ये किदम्बी श्रीकांतने जेतेपदाची कमाई केली होती. ऑलिम्पिक पदक पटकावता येते पण संरचनेचा नियमित भाग असलेल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावता येत नाही ही बोचरी टीका सिंधूला त्रास देत होती. मात्र चीन स्पर्धेच्या जेतेपदासह सिंधूने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. चीनमध्ये चीनच्या खेळाडूला नमवत सिंधूने पटकावलेले जेतेपद भारतीय बॅडमिंटनसाठी प्रचंड आशादायी आहे. क्रिकेटेतर खेळांमध्ये वलयांकित खेळाडूचा मान सायनाने बॅडमिंटनमध्ये पटकावला. दुखापतींमुळे सायनाच्या खेळावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सिंधूच्या रूपात एक नवा तारा भारतीय क्रीडाविश्वाला गवसला आहे. आपण केवळ एका स्पर्धेचा चमत्कार नाही हेही सिंधूने दाखवून दिले आहे.

सायना आणि सिंधूनंतर भारतीय महिला बॅडमिंटनमध्ये मोठी पोकळी आहे. सिंधूच्या यशाने युवा महिला भारतीय बॅडमिंटनपटूंना प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. सायनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सत्ताकेंद्र निर्माण झाले होते. आता सिंधूने भारताची पताका डौलाने फडकावत ठेवली आहे. प्रत्येक स्पर्धेत सिंधूचा अडथळा पार करणे प्रतिस्पध्र्यासाठी खडतर आव्हान आहे. जेतेपदासाठी, यशासाठी कोणताही शॉर्टकट चालत नाही, उलट मार्गात असंख्य अडथळे येतात. सिंधूची वाटचालही सोपी नव्हती. मात्र बॅडमिंटनप्रति अत्युच्च निष्ठा, प्रशिक्षक आणि पालकांच्या रूपात मिळालेला भक्कम पाठिंबा यामुळे सिंधूने नवे यशोशिखर गाठले आहे.

या जेतेपदामुळे जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असणाऱ्या सिंधूला बढती मिळू शकते. अव्वल आठमध्ये आगेकूच केल्यास वर्षअखेरीस बीडब्ल्यूएफ फायनल्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान सिंधूला मिळू शकतो. भारतीय महिला बॅडमिंटनपटूंमध्ये फक्त सायनाच या स्पर्धेत सहभागी झाली आहे. सिंधूच्या निमित्ताने भारताचा झेंडा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत फडकू शकतो. प्रसिद्धी, पैशाने हुरळून न जाता खेळावरच लक्ष केंद्रित करण्याचे अवघड लक्ष्य सिंधूने पार केले आहे. सिंधू आताही फक्त २१ वर्षांची आहे. अजून सात ते आठ वर्षे ती खेळू शकते. आता गरज आहे जेतेपद आणि यशात घोटीव सातत्य आणण्याची.
पराग फाटक – @paragsphatak
response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Badminton player p v sindhu