आज आपलं जगणं कमालीचं गतिमान झालं आहे. त्याचा परिणाम अपरिहार्यपणे कुटुंबव्यवस्थेवर, मुलांवर होतो आहे. पण जगणं सोपं आहे, असा विचार करत आपण आयुष्याकडे बघायला लागलो की सगळेचं संदर्भ बदलतात.

आज अचानक डोळ्यांसमोर माझी मंगळागौर आली. माझ्या लग्नाला पाच र्वष झाली होती. व्रताचं उद्यापन करायचं होतं. बऱ्याच वशेळ्या जमल्या होत्या. काही वशेळय़ा अगदीच ओल्या हळदीच्या, पण बऱ्याच जणींच्या कडेवर आता मजेत मिरवणारं बाळ आलेलं होतं. रात्रभर खेळ खेळून दमल्यावर पहाटेला सगळ्या जणी दमून बसलो होतो. उखाण्याची वेळ झाली होती. जमलेल्या बायकांत कुजबुज सुरू झाली. मुलींना नाव घ्यायचा आग्रह होऊ लागला. घरीदारी नवऱ्याला नावानं हाक मारणाऱ्या मुलीही आता नाव घ्यायला लाजताहेत, हे पाहून एका आजीबाईंनीच सुरुवात केली. त्यांच्या मैत्रिणींची टीम लांबलचक उखाणे घेत होती. फारसं स्त्री स्वातंत्र्य न अनुभवलेल्या त्या स्त्रियांचं आपापल्या नवऱ्याशी असलेलं वरवर कोरडं वाटणारं, पण आतून पिकलेल्या रसाळ फळाप्रमाणे रसरसून ओथंबणारं, अत्यंत खासगी अगदी त्या दोघांचं असं सहजीवन या आज्यांनी आपल्या काव्यप्रतिभेतून इतकं छान मांडलं, की आता तरुण मुलींची भीड चेपली. त्याही आपापल्या परीनं लाजत मुरकत, पाठ केलेले किंवा ऐन वेळी जुळवलेले उखाणे घेऊ लागल्या. सर्वत्र पतिदेवो भव असाच सूर भरून गेला आणि एक वशेळी उठली. ती नाव घेऊ लागली, ‘‘..चं नाव घ्यायला आहे कुठे वेळ, सोनुल्याचाच सुरू असतो सारा दिवस खेळ.’’ क्षणात नवरदेवांचं कौतुक ओसरून नातवंडांच्या, तान्हा लेकरांच्या कौतुकानं वातावरण भरून गेलं. आज्या, आया, मावश्या, आत्या, सासू, सुना अशी सर्वच नात्यांची वीण थोडी सैलावली. त्या क्षणी सगळ्या जणी फक्त आया बनून गेल्या होत्या. बालगोपालांच्या लीलांत रमलेल्या आम्ही साऱ्या जणी गोकुळात रमलो आणि तिथंच जमेल तेवढय़ा लवंडलो. आपापल्या बाळात कृष्णरूप पाहात सगळ्या वशेळ्या बघता बघता गाढ झोपल्या. माझाही डोळा लागला.
आता चाळीस-पंचेचाळीस वर्षांनंतर वैवाहिक जीवनात अतोनात बदल झाले आहेत. दैनंदिन जगण्याचा वेग अगदी भेलकांडून गेल्यासारखं वाटावं इतपत गतिमान झाला आहे. बाजारीकरणानं सर्वत्र आपलं बस्तान असं बसवलं आहे की, तरुणांना भरपूर पैसा कमावण्यासाठी दिवसाचा वेळ पुरेनासा झाला आहे. हाती आलेला भरपूर पैसा खर्चून सुख विकत घेता येतं हा भ्रम आहे, हे वास्तव जाहिरातबाजीच्या युगानं तरुणांना विसरायला लावलं. त्याचा परिणाम असा झाला, की सुखासीनता वाढली. घरीदारी कष्ट कमी करावे लागत असले तरी राबणं संपलं नाही. खिशात जास्त पैसे खुळखुळू लागले, तसतसं अनेक प्रकारांनी होणारं शोषण वाढतच गेलं. उत्साहानं, उमेदीनं सळसळणाऱ्या तरुणांच्या वाटय़ाला एक नवीनच सुशिक्षित गुलामगिरी आली.
त्रिकोणी, फार तर चौकोनी कुटुंबात वाढणारी मुलं, त्यांचे आईबाबा, आजी-आजोबा सारेच एकाकी पडत गेले. ‘माझं’ स्वातंत्र्य, ‘माझी’ स्पेस या नव्या पाश्चिमात्य कल्पना इथं रुजल्या आणि कर्तव्याचं, एकनिष्ठेचं बीजच जणू नाहीसं झालं. मूल्याधिष्ठित जगणं घराघरांतूनही हरवलं. राजकीय व्यवस्थेत तर आज त्याचा मागमूसही राहिला नाही.
हे वास्तव नेमकेपणानं ध्यानात आल्यावर शिबिरात आलेल्या पालकांनी इथं सर्व पालकांचा मिळून एक छोटासा कृतिशील (विधायक) समाज साकारायला सुरुवात केली. जीवनाकडे पहायचा चष्माच मी त्यांना हळूहळू बदलायला लावला. त्या प्रत्येकानं आज घडीच्या व्यवस्थेला नावं ठेवत समाजावर, सरकारवर सारं खापर फोडणं बंद केलं. अपराधी म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्या हाताची उरलेली चार बोटं आपल्याकडेच निर्देश करत असतात नं? कुणालाही दोष देण्याचं टाळून स्वत:तच बदल केले पाहिजेत हे त्यांनी शिबिरात स्वानुभवानंच पटत गेलं. प्रत्येकाला इतर कुटुंबांसोबत एक आगळंवेगळं निवांतपण अनुभवायला मिळाल्यानं ते खुशालले. निवांत मनानंच अधिक आनंदात जगणं शक्य असतं, हे त्यांना उमगलं.
त्यांनी स्वत:त, स्वत:च्या जीवनशैलीत अगदी छोटे, छोटे बदल केले. रविवारी सुटी असते. तेव्हा रविवारची सकाळ कुटुंबासोबतच घालवायची आणि तीही इथं शिबिरातच हा त्यांनी जणू नियमच केला. एका समविचारी माणसांच्या समाजात सतत वागलं, वावरलं, की वैचारिक देवाणघेवाण आपोआपच घडते. जगणं सोपंच असतं, मात्र आपण ते सोपं ठेवावं लागतं, हे त्यांना समजलं. ‘माझं मूल अक्षरं उलटी लिहितं’, ‘माझं मूल चंचल, अस्थिर आहे’, ‘माझं मूल नीट जेवत नाही’, ‘माझं मूल हट्ट करतं’, ‘माझं मूल आक्रस्ताळेपणा करतं’ अशा नाना बाबी त्यांना सुरुवातीला चिंताग्रस्त करून टाकायच्या. पालकसभेत मुलांची, त्यांच्या मेंदूची आणि मनाची जडणघडण कशी हळूहळू होत असते, त्यामागचं विज्ञान त्यांना समजत गेलं आणि अपेक्षित बदल प्रत्यक्षात घडलेले त्यांना शिबिराच्या विविध उपक्रमांतून दिसत गेले.
यापैकी सर्वात महत्त्वाचा बदल होता ‘स्वीकाराचा’. आयुष्य सोपं व्हायचं म्हणजे आपलं जगणं सोपं करायचं. याचा अर्थ ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ असं म्हणत निष्क्रिय बनायचं हे नव्हे. तर ती एक पार वेगळी अगदी उलटच गोष्ट आहे. मला माझं जगणं अर्थपूर्ण बनवायचं आहे, असं हे तरुण पालक मला सांगत तेव्हा एकदा पालकसभेत मी त्यांना ‘डॉ. व्हिक्टर फ्रँकल’ यांच्या ‘द मॅन्स् सर्च फॉर मीनिंग’ या पुस्तकातला त्यांचा स्वत:चा अनुभव सांगितला. आयुष्य मुळात अर्थपूर्णच असतं. आपल्याला त्या, त्या क्षणातलं वास्तव कितीही दाहक वाटलं, तरी ते खरोखरच अगदी वरवरचं असतं. त्याखाली जीवनाचा प्रवाह अविरत, अखंडित, सुरळीत सुरू असतो. आपण आपली निराशा, दु:खं क्षणभर दुय्यम मानून अवतीभवती पाहिलं, तर जीवनाचं सौंदर्य अबाधित आहे, आपल्यासाठी ते पोषकच आहे, ते उपभोगायची (त्यातल्या दु:खासकट ते उपभोगलं पाहिजे.) संधी म्हणजेच जीवनाला समर्थपणे भिडण्याची, ते स्वीकारण्याची संधी आहे, हे डॉक्टर फ्रँकलनी फार छान सांगितलं आहे. अगदी नाझींच्या छळछावणीतले अमानुष अत्याचार सोसत, दर क्षणी समोर मृत्यूचं तांडव पाहातानाही डॉक्टर या हत्याकांडात कोण टिकून राहाताहेत, याचा अभ्यास करत होते. डॉक्टरांचं या पुस्तकातून दिसणारं जीवनाला समर्थपणे भिडणारं व्यक्तिमत्त्व म्हणजेच जीवनाचा अर्थ उमगल्यावर त्यावर प्रेम करणं, हे आपल्याला समजतं. त्या अभ्यासातून डॉक्टरांनी एक निष्कर्ष काढला. तुम्ही धट्टेकट्टे असा वा नसा; तरुण, म्हातारे कसेही असा; स्त्री असा की पुरुष, त्यानं काही फरक पडत नाही. या भयाण वास्तवात होरपळतानाही आनंदानं फटीतून दिसणारा सूर्योदय पाहाणारे, एकमेकांचा वाढदिवस गात, गात साजरा करणारे, भुकेनं व्याकूळ झालेल्या अवस्थेतही घासातला घास काढून देणारे, त्याही परिस्थितीत आपल्या बाळांचा जीव वाचवायची, त्यांना जमेल तसं रिझवायची धडपड करणारेच तेवढे तगून राहिले, छळछावणीतून बाहेर पडले. हे सर्व सांगितल्यावर मी पालकांना सांगितलं, ‘‘पहा, आपण किती तरी सुखरूप आहोत. उगाच भलत्या गोष्टींचा आपण बाऊ नाही करायचा. वास्तवातल्या काही बाबी सार्वत्रिक असतात, काही वैयक्तिक असतात, पण ते वास्तव आपलंच असतं नं सरतेशेवटी? ते ‘मम’ म्हणत स्वीकारूया.’’
पालकांनी हे सारं नीट समजून घेतलं. माझं मूल अमुक अक्षर उलटं लिहितं, म्हणून घाबरायचं कारण नाही. शिबिरातल्या वातावरणात मनसोक्त रेघोटय़ा मारताना, आकारांशी नाना प्रकारे खेळताना मुलं विसावली. बघता, बघता पालकांना ती इतर मुलांसारखीच आहेत, हे पटत गेलं, तसतशी मुलंही उलट आणि सुलट म्हणजे नेमकं कसं लिहायचं ते आपली आपणच शिकत गेली.
जीवनावरची निष्ठा आणि बांधीलकी याकडेही वैवाहिक जीवन साकारताना डोळसपणे पाह्यला हे पालक शिकले. दोन ‘स्व’तंत्र वाढलेल्या व्यक्ती विवाहानंतर एक अगदी एकरूप अवस्थेचं नातं जोडू पाहात असतात. प्रत्येकाला स्वत:चं असं एक विश्व असतं आणि स्वप्नही असतं हेच खरं. जीवनाला असलेला अर्थ हुडकताना शिबिरातल्या पती-पत्नींना आपण व्यक्तिस्वातंत्र्य किती द्यायचं आणि घ्यायचं हे जसं समवयस्कांसमवेत मोकळ्या वातावरणात वावरताना समजत गेलं, तसंच मिळालेलं स्वातंत्र्य स्वत:च्या विकासासाठी वापरायचं असतं, ही जाणीव त्यांना झाली. खरं तर या जोडप्यांना अधिकाधिक चांगलं बनण्याची प्रेरणा त्यांच्या इथल्या पीअर-प्रेशरमुळं मिळत गेली. आपली मुलं या वातावरणात अनेक सुंदर अनुभव घेताहेत, त्यासाठी सारी उस्तवार एक परकीच आजी करते आहे, त्यासाठी ती आपल्या सर्वाना आपापल्या गुणदोषांसकट स्वीकारते आहे. आजी, आजोबा आणि त्यांची दोन्ही मुलंही आपल्याला आपलं मानताहेत, हा अनुभव दर रविवारी त्यांना उत्तेजित करत गेला. त्यांच्या मनात कृतज्ञता जागी झाली. ती त्यांनी माझ्यापाशी करताच मी सांगितलं, ‘‘ही अशी कृतज्ञता जागी होणं हे खूप छान आहे. त्याची परतफेड करायचं मात्र मनातही आणू नका. मला काही द्यायची गरज नाही. ही उस्तवारी मी माझ्या आनंदासाठी करते आहे. तुम्हीदेखील इतरांच्या उस्तवारीतून असा आनंद मिळवायचा प्रयत्न करू लागा.’’ हा कानमंत्र पुरेसा होता.
मग ते आपापल्या जोडीदारासाठी, मुलांसाठी, घरातल्या इतर कुटुंबीयांसाठी सजगपणे अनेक गोष्टी करू लागले. घराघरांतले सासू-सुनांमधले विसंवाद विरून गेले. त्यामुळे घरात शांती नांदू लागली. फावल्या वेळेत इतर मित्रमंडळींच्या सहवासासाठी सहली घडू लागल्या. घरच्या गॅलरीत छोटीशी बाग फुलली. तिथं फुलपाखरं येऊ लागली. आता बागेत फुलपाखरांसाठी खाऊ म्हणून पानफुटी रुजवली गेली. रविवारी मुलं आवर्जून काळे पडलेले उमलू पाहाणारे कोष शिबिरात आणू लागली. हळूहळू कोष पाहूनच मुलं फुलपाखरांची जात ओळखू लागली. एकीकडं मुलं गाण्यात, रंगात रंगलेली असतानाच कधी कधी फुलपाखरू जन्मू लागलं. मुलांच्या अंगाखांद्यावर बागडू लागलं. जीवनचक्र मुलांच्या आईबाबांच्या जीवनात छान रुजलं. एक पोलीसवाले बाबा म्हणाले, ‘‘इतकी वर्षे फक्त गुन्हेगारांची नावंच डोक्यात असायची. आता त्यात दोस्तांची, मुलांची आणि फुलपाखरांची नावंही येऊ लागली. त्यामुळे कामातला ताणच मला जाणवेनासा झाला.’’
या वयात या मौजमजेच्या गोष्टी करणं पालकांना सोपं गेलं, ते त्यांना आवडलं. इथल्या उपक्रमातलं नावीन्य त्यांच्या ठायीची नावीन्याची ओढ पुष्ट करत गेलं. उगीच आळसात दुपार घालवणं, संध्याकाळभर मॉलमध्ये भटकणं थांबलं. प्रत्येकानं स्वत:तल्या चिडचिडीचं कारण शोधून काढलं. तो रागीटपणा काढायला सुरुवातीला रागाला लगाम घालणं त्यांना गरजेचं वाटलं. मग त्यांनी जोडीदाराची आणि मुलांची मदत घेतली. उपजत निर्मळ असल्यानं मुलांनी खूपच मोलाची मदत केली. आईची चिडचिड घरकामाचा भार एकटीवर पडल्यामुळे होते, हे ध्यानात येताच मुलांनी खूप कामं स्वत:ची स्वत: करायला सुरुवात केली. घरातला पसारा आवरण्याचं काम संपलं. सर्व पुरुषही घरकामात जमेल तेवढी मदत करू लागले. या टप्प्यावर मी आयांना वेळ वाचवणं आणि तो सत्कारणी लावणं यातली खुबी शिकवली. एकाच वेळी हातानं चार कामं करू गेलं, की त्यांची चिडचिड व्हायची. मग त्यांनी हातानं कामं उरकताना एकीकडे गाणी ऐकण्याचं काम कानांना दिलं. नियोजनाचं काम मेंदूला दिलं. पोळ्या लाटता लाटताच एकीकडे लताबाईंच्या गाण्यात रमताना किशोरकुमार, महम्मद रफी, मन्ना डे आणि मुकेश यांचा आवाज त्यांना ओळखता येऊ लागला. हळूहळू एकेक आवाज आणि वाद्य वापरण्यातली संगीत दिग्दर्शकाची नेमकी निवड त्यांना समजू लागली. सारे मिळून ते ओरीगामीतही असेच रमले.
या सर्वाहून महत्त्वाची गोष्ट घडली, ती स्वीकाराच्या संदर्भात मोलाची ठरली. जोडीदारानं एखादी गंभीर चूक केली, तर त्याकडे कसं पाहायचं हे पालक शिकले. व्यसनाधीन नवऱ्याचा रागराग न करता त्याच्या व्यसनाधीनतेकडे आपलं आजवर दुर्लक्ष झालं. आता ती चूक निस्तरायला आपण सहानुभूतीनं, प्रेमानं त्याला मदत करायला पाहिजे, इतपत शहाणपण त्यांच्यात आलं होतं. अशा स्त्रियांनी जबाबदारीने पुढाकार घेऊन त्यांना व्यसनमुक्त करायचा चंग बांधला. शिबिरातल्या एका पालकानं तर आपल्या मेव्हण्याला व्यसनमुक्त करायला बहिणीला मदत केली. ‘ज्ञानेश्वरी’त माऊलीनं वाखाणलेला दैवी संपत्तीतला अपैशून्याचा गुण मला असा हरघडी पाह्यला मिळू लागला.
स्वत:च्या प्रेमाला अशी शिस्त लावण्यासाठी स्वत:चा खोटा अहंकार, खुळ्या कल्पना आणि थोडीफार आत्ममग्न, बेफिकीर वृत्ती सोडणाऱ्या या पालकांची मुलं हे सारं पाहात, पाहात मोठी झाली.
आज ती किशोरवयात आली आहेत. शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार, बेपर्वाई ती पचवताहेत. पीअर-प्रेशरनं ती व्यथित होतात. कुणी एखादा हळुवार मनाचा मुलगा त्या दडपणानं हादरूनही जातो, पण या निकोप समाजाचा आधार घेत त्यांचे आईबाबा अशा भेदरलेल्या मुलांना सावरताहेत. त्यांना मित्रमंडळींकडून मिळणारं प्रेम आणि आस्था इतर सर्व पालकांनाही मिळो, असं मला खूप वाटत राहातं.