दिवाळी २०१४
केवळ हातात पैसा आहे म्हणून आणि आपली आवडती सेलिब्रिटी करते म्हणून कॉस्मेटिक सर्जरी करण्यापूर्वी सारासार विचार करणं गरजेचं आहे.

‘ब्यु टी सर्जरी’ किंवा ‘कॉस्मेटिक सर्जरी’ या गोंडस नावाभोवती असलेलं वलय आजच्या घडीला केवळ तरुणांना आकर्षित करत आहे. या आकर्षणामागची कारणं सांगताना प्रसिद्ध ‘प्लॅस्टिक सर्जन’ डॉ. अनिल टिब्रावाला सांगतात, ‘आज प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोर एक ‘बॉडी इमेज’ असते, त्यांना विशिष्ट प्रकारची शरीरयष्टी, लुक हवा असतो. गावातला शेतकरीसुद्धा आपण रुबाबदार दिसावं, अशी इच्छा मनात धरून असतो.’ हॉलीवूड असो किंवा बॉलीवूड, नवीन असोत किंवा जुने कलाकार प्रत्येकाचे ठरावीक कालावधीनंतरचे फोटो नीट तपासले, तर या ‘परफेक्ट बॉडी इमेज’ संकल्पनेमागचं वास्तव लक्षात येतं. सेलिब्रिटीजमुळे आणि माध्यमांच्या भडिमारांमुळे आज डोळे हवे तर दीपिकासारखे, केस हवे तर कतरिनासारखे, बॉडी हवी तर सलमानसारखी असे किती तरी मापदंड समाजात रुजू होत आहेत आणि त्याच्यामागे धावण्याची तरुणांची तयारीही आहे. परदेशात तर हे खूळ इतकं आहे की, एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे दिसण्यासाठी किंवा बार्बी, सुपरहिरोसारखं शरीर मिळवण्यासाठी कोटय़वधी रुपये कॉस्मेटिक सर्जरीवर खर्च केले जातात. मध्यंतरी युक्रेन देशातील अनेक तरुणी प्रसिद्ध ‘बार्बी’ डॉलची हुबेहूब प्रतिकृती असल्याचं सोशल मीडियावर गाजत होते. त्यांपैकी एकीने बार्बीसारखी कंबर मिळवण्यासाठी लायपोसक्शन करून पोटातली संपूर्ण चरबी तर काढलीच, पण त्याचसोबत पुन्हा वजन वाढू नये, म्हणून आतडय़ांचा आकारही कमी केला होता. हे उदाहरण परदेशातलं असलं तरी एकुणात किती बरोबर आहे, याबद्दल बोलताना डॉक्टर टिब्रावाला सांगतात, ‘आज आपल्या जीवनशैलीबद्दल लोक जागरूक झाले आहेत. जिमिंग, डायटिंग यावर ते पाण्यासारखा पैसा घालायला तयार आहेत. त्यांच्या हातात पैसाही खेळतो आहे. डोळ्याखालचा त्वचेचा जाड थर नको असेल किंवा मानेचा लटकलेला भाग काढून टाकायचा असेल, तर त्यासाठी पैसे मोजायची त्यांची तयारी असते. दिवसरात्र जिममध्ये घाम गाळूनही कमी न होणारी चरबी जर लायपोसक्शनमुळे काही वेळातच कमी होणार असेल तर हे कोणाला नको आहे?’ या भाषेत ते लोकांची मानसिकता मांडतात.
आज एकूणच डॉक्टर, शस्त्रक्रिया याबाबतची लोकांच्या मनातली भीती गेली असल्याचं सांगताना डॉ. टिब्रावाला म्हणतात, ‘एके काळी शस्त्रक्रिया खरंच गरज असेल तेव्हाच केली जाई. शिवाय त्या वेळी लोकांमध्ये शस्त्रक्रियेबाबत भीती होती. पण आज अत्याधुनिक मशीन्सच्या माध्यमातून दर सेकंदाला तुमचा रक्तदाब, शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासलं जातं. अँटी-बायोटिक्स आणि स्वच्छ ऑपरेशन थिएटरमुळे रोगांचा संसर्ग होण्याचा धोकाही टळला आहे. शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यामुळे आता ही भीती ना रुग्णाच्या मनात राहिलेली आहे ना डॉक्टरच्या मनात.’
या सर्व शस्त्रक्रिया समाजात मूळ धरू लागण्यामागे प्रसारमाध्यमे हा घटकही महत्त्वाचा असल्याचं ते सांगतात. ‘आज खेडेगावातील एखाद्या माणसाला शस्त्रक्रिया करून घायची आहे आणि त्याच्याकडे पैसेही आहेत, तर त्याला त्यासाठीची संबंधित माहिती प्रसारमाध्यमांमधून मिळत असते.’ सेलिब्रिटीसुद्धा कायमच सुंदर दिसण्यासाठी आणि प्रत्येक वेळी ‘फोटोरेडी’ राहण्यासाठी या सर्जरीचा मार्ग अवलंबतात. आपण या सर्जरी केल्याचं ते मान्य करत नाहीत, पण त्यांचा आधीच्या आणि नंतरच्या दिसण्यातला फरक बघून ते समजतच.
एके काळी चेहऱ्यावर मेकअप करणाऱ्यांकडे कुत्सित नजरेने पाहिलं जात असे. पण आता मात्र या सर्जरींबाबत समाजात वाढतं कुतूहल आहे. मुख्य म्हणजे समोरच्याच्या सुंदर दिसण्याच्या धडपडीवर हसण्यापेक्षा त्याचं कौतुक करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. ‘पूर्वी लोकांना या सर्जरी पटत नसत. पण आता आज एखाद्याने अशी सर्जरी केल्याचं लक्षात आलं तर कुजबुज केली जात नाही. उलट त्याच्या व्यक्तिमत्त्वात दिसणारा फरक बघून या सर्जरीचा मार्ग अवलंबणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे’, डॉक्टर अनिल सांगतात.

दाट केसांची आणि गोरेपणाची क्रेझ
आपले केस दाट आणि काळेभोर असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसंच गोरी, तुकतुकीत त्वचा म्हणजेच खरं सौंदर्य ही संकल्पना रूढ आहे. त्यासाठी खटपट करणाऱ्यांची संख्या कमी नाही. याबाबत सांगताना डॉक्टर पूजा गुंजीकर सांगतात, ‘दाट केस मिळवणं आणि त्वचा गोरी करणं यासाठी कित्येक रुग्ण आमच्याकडे येतात. पण तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सवर केसांचा दाटपणा ठरलेला असतो. तितकेच केस शस्त्रक्रियेनंतर मिळू शकतात. गोरेपणा मिळवण्याची ट्रीटमेंट घेतल्यावरसुद्धा गोरेपणाच्या ज्या शेड्स ठरलेल्या आहेत, त्यापैकी तुमच्या मूळ रंगाच्या जास्तीत जास्त दोन शेड जास्त गोरी त्वचा तुम्हाला मिळते. त्यापलीकडे गोरेपणा मिळण्याची शक्यता नसते. तसंच ही ट्रीटमेंट घेतल्यावर योग्य काळजी घेतली नाही, उन्हात बाहेर पडलं तर चेहरा पुन्हा काळपट होण्याची शक्यता असते. सेलिब्रिटीजच्या बाबतीत हा गोरेपणा आणि एकूणच सुंदर दिसण्याची धडपड त्यांच्या जीवनशैलीचा आणि व्यवसायाचा भाग असल्याने ते ही काळजी घेतात. पण सामान्य माणसाच्या बाबतीत तसं होतंच असं नाही.’

कॉस्मेटिक सर्जरीजमध्ये दोन प्रकार आहेत. एक थेट प्लास्टिक सर्जरी, ज्यामध्ये शस्त्रक्रियेच्या माध्यमातून शरीरातील एखादा भाग किंवा अवयव दुरुस्त केला जातो, तर दुसरी बोटॉक्स ट्रीटमेंट, ज्यात चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करून त्वचा खेचली जाते. सेलिब्रिटीजच्या एकूण जीवनशैलीकडे पाहता त्यांचा कल बोटॉक्स ट्रीटमेंट्सकडे असल्याचं डॉक्टर अनिल सांगतात. ‘सेलिब्रिटीजना थांबायला, वाट पाहायला वेळ नसतो. कित्येकदा ते दवाखान्यामध्ये येऊन तासभराची ट्रीटमेंट घेतात आणि पुन्हा शूटिंगला जातात. अशा वेळी बोटॉक्स ट्रीटमेंट त्यांच्या मदतीस येते.’ बोटॉक्स ट्रीटमेंटनंतर रुग्णालयात थांबण्याची गरज नसल्याचं डॉक्टर अनिल टिब्रावाला सांगतात.
सेलिब्रिटीजमध्ये नेहमीच्या कॉस्मेटिक सर्जरीजसोबतच उंची वाढवण्याची, सुंदर हास्य मिळवण्याची शस्त्रक्रिया, अंगावरील अनावश्यक केस काढण्याची ट्रीटमेंट यांनासुद्धा मागणी असल्याचे डॉक्टर सांगतात. ‘जन्मजात कोणीही ‘परफेक्ट’ बनून येत नाही. हास्याच्या बाबतीत तेच आहे. या शस्त्रक्रियेमध्ये तुमच्या चेहऱ्याच्या ठेवणीनुसार दात आणि हिरडय़ांचा आकार सुधारून तुमचं हसणं आकर्षक कसं होईल हे पाहिलं जातं.’
‘एके काळी छातीवरील केस आकर्षक मानले जायचे, पण सलमान खानच्या ‘शेव्ह्ड चेस्ट’ लुकनंतर तरुणांमध्ये छातीवरील अनावश्यक केस काढून टाकण्याची क्रेझ निर्माण झाली होती. अर्थात या शस्त्रक्रियांनासुद्धा मर्यादा आहेत’ डॉक्टर सांगतात, ‘तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी प्रत्येक सर्जरीला तिच्या मर्यादा आहेत. तरुणांना छातीवरील केसांपासून कायमस्वरूपी मुक्तता हवी असते. पण स्त्रियांचे आणि पुरुषांचे हार्मोन्स वेगवेगळे असतात. स्त्रियांना आठ-दहा सेशन्समध्ये या केसांपासून कायमस्वरूपी मुक्तता मिळते, पण पुरुषांमध्ये ते शक्य नसतं. त्याचबरोबर नाकाचा, ओठांचा किंवा डोळ्यांचा आकार दोन ते तीन सर्जरीजपेक्षा जास्त बदलणं शक्य नसतं. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.’ यातील काही सर्जरींना अशा प्रकारचं बंधन नसलं तरी डॉक्टर आणि रुग्णाने विचारविनिमय करून त्यातील मर्यादा ओळखल्या पाहिजेत असंही ते सांगतात. ‘तुम्ही तुमचे स्तन हवे तितके वाढवू शकता. पण शेवटी ते तुमच्या शरीरयष्टीला साजेसे असायला पाहिजेत. सेलिब्रिटीजना त्यांच्या व्यवसायाची गरज म्हणून मोठय़ा आकाराचे स्तन हवे असतात. पण जेव्हा एखादी गृहिणी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी येते, तेव्हा तिच्या शरीरयष्टीच्या तुलनेतच आकार दिला जातो.’
तरुण-तरुणींच्या क्रेझबद्दल डॉक्टर सांगतात, ‘कित्येकदा तरुण एखाद्या नटीचं किंवा नटाचं छायाचित्र आणून आम्हाला असं नाक, डोळे हवे असल्याचं सांगतात. अशा वेळी आम्ही त्यांना साफ नकार देतो. आम्ही त्यांच्या नाकाला हवा तसा आकार देऊ शकतो, पण हुबेहूब तसंच नाक बनवणं शक्य नसतं. तसंच आम्ही प्रत्येक रुग्णाला त्याचा चेहरा शस्त्रक्रियेनंतर कसा दिसेल हे फोटोशॉपसारख्या सॉफ्टवेअरमधून दाखवतो. पण शस्त्रक्रियेनंतर अगदी तसाच परिणाम साधता येईल, अशी अपेक्षा करणं साफ चुकीचं आहे. कारण सॉफ्टवेअरवर प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला हवं तितक्यांदा खोडून सुधारणा करता येते. पण शस्त्रक्रियेत थेट रुग्णाच्या जिवंत पेशींवर काम करायचं असतं. तिथे नंतर दुरुस्तीला वाव नसतो.’
यासाठी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये चांगला आणि योग्य संवाद होणंही गरजेचं असल्याचं डॉक्टर अनिल सांगतात. ‘रुग्णाच्या मनातली छबी आणि प्रत्यक्ष शस्त्रक्रियेनंतरचा परिणाम हे दोन्ही जुळणं महत्त्वाचं आहे. आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांना खूपदा मूळ नाकाला फारसा धक्का न लावता नाकाला छान आकार द्यायचा असतो. किंवा मूळ ओठ खूप छोटे असतात आणि मोठे ओठ हवे असतात. अशा वेळी एक डॉक्टर म्हणून शस्त्रक्रियेमधील बारकावे समजावून देऊन त्यांना योग्य परिणाम मिळवून देण्याची जबाबदारी डॉक्टरवर असते.’
पण हा सुसंवाद झाला नाही, तर त्याचे विपरीत परिणाम रुग्णांना भोगावे लागतात, असं डॉक्टर अनिल यांचं म्हणणं आहे. कारण अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया फसण्याच्या किंवा योग्य तो परिणाम न मिळण्याच्या शक्यतासुद्धा असतात. कित्येक सेलेब्रिटीजच्या फोटोजमध्ये अशा फसलेल्या शस्त्रक्रियांचे परिणाम स्पष्ट दिसून येतात. काही वर्षांपूर्वी एक आयटम गर्ल या शस्त्रक्रियांच्या इतकी आहारी गेली होती, की तिचे शस्त्रक्रियेपूर्वीचे फोटोच अधिक सुंदर दिसत होते. शस्त्रक्रिया करून अधिकाधिक सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी तिची कारकीर्द संपुष्टात आली. ‘मध्यंतरी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या आयब्रोजवर बोटॉक्स ट्रीटमेंट करून घेतली होती. पण ती फसल्याने तिच्या आयब्रोज प्रमाणापेक्षा जास्त वर झाल्या होत्या. नुकतंच एका अभिनेत्रीने तिच्या ओठावर करून घेतलेली बोटॉक्स ट्रिटमेंट फसल्याची खूप चर्चा झाली होती. अशा वेळी हा परिणाम पुढील सहा महिने सहन करणं किंवा पुन्हा डॉक्टरकडे जाऊन ती चूक सुधारून घेणं यशिवाय दुसरा मार्ग नसतो.’ असं सांगताना, यात दरवेळी केवळ डॉक्टर्सची चूक नसते, तर रुग्णाच्या अवास्तव मागण्यासुद्धा याला जबाबदार असतात असं डॉक्टर अनिल सांगतात. ‘आपल्या एखाद्या अवयवावर आधी दोन-तीनदा शस्त्रक्रिया करूनही त्याबाबत असमाधानी असलेले रुग्ण दुसऱ्या डॉक्टरकडे जातात आणि नव्याने शस्त्रक्रिया करायला सुचवतात. पण एकाच अवयवावर तीनपेक्षा जास्त शस्त्रक्रिया करणं शक्य नसतं, हे त्यांना पटवून देणं गरजेचं असतं.’
सेलिब्रिटीज मात्र व्यवसायाची गरज म्हणा किंवा स्पर्धेत टिकून राहण्याची धडपड म्हणा, आपल्याला हवा तो परिणाम मिळवण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. डॉक्टर सांगतात. ‘मायकल जॅक्सनसारख्या सेलिब्रिटीचं या शस्त्रक्रियांचं खूळ कुठपर्यंत गेलं होतं हे सगळ्यांना माहीत आहे. अशांची या शस्त्रक्रियांवर रग्गड पैसा खर्च करण्याची तयारी असते आणि ती मागणी पूर्ण करणाऱ्या डॉक्टर्सचीही कमतरता नाही. आपण नाही म्हटलं तर दुसरा कुणीतरी ही शस्त्रक्रिया करेलच, हे डॉक्टरना माहीत असतं, त्यामुळे मग ते तयार होतात,’ डॉक्टर सांगतात. आपल्याकडेसुद्धा दिवंगत अभिनेते देव आनंद यांनी तरुण दिसण्याच्या अट्टहासापायी केलेल्या शस्त्रक्रिया हे याचंच एक उदाहरण आहे. डॉक्टर सांगतात, ‘साधारणपणे कॉस्मेटिक सर्जरीचा खर्च, डॉक्टरची फी, रुग्णालयाचा खर्च, खोलीची किंमत हे सगळं मिळून एक-दोन लाखांपर्यंत असतो. पण सेलिब्रिटीजच्या बाबतीत हे गणित पूर्णपणे बदलतं.’
डॉक्टर अनिल टिब्रावाला यांच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे सध्या या शस्त्रक्रियांचे वेड किशोरवयीन मुलांपर्यंतसुद्धा पोहोचलं आहे. ‘हल्ली आमच्याकडे १५ वर्षांच्या मुली येतात, त्यांना त्यांच्या स्तनांचा आकार वाढवून हवा असतो. शाळेत एखादीचे मोठे स्तन पाहून किंवा एखाद्या मोठे स्तन असलेल्या सेलिब्रिटीचा प्रभाव असल्यामुळे हे खूळ त्यांच्या डोक्यात शिरलेलं असतं. ही बाब खरंच चिंताजनक आहे.’ कारण त्यांच्या मते केवळ मानसिकदृष्टय़ाच नाही तर शारीरिकदृष्टय़ासुद्धा शरीराची पूर्ण वाढ झाल्याशिवाय या शस्त्रक्रिया करणं धोकादायक आहे. ‘एखाद्या किशोरवयीन मुलाला काही शारीरिक वैगुण्यामुळे नाकाने श्वास घेणं शक्य नसेल तर नाकपुडीवर शस्त्रक्रिया करून तिचा आकार बदलणं, त्याला श्वास घेता येईल अशी परिस्थिती निर्माण करणं हे कुणीही समजू शकेल. पण केवळ सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी किशोर वयात शस्त्रक्रिया करून घेतल्या तर पुढे आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता असते,’ असं त्यांचं मत आहे.
किशोरवयीन मुलांबरोबरच प्रौढ व्यक्तीही या क्रेझला बळी पडत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. ते सांगतात, ‘कित्येकदा आमच्याकडे पन्नाशीपुढील असेही रुग्ण येतात ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. त्यांच्यावर बायपास सर्जरी झालेली असते. पण तरीही त्यांना सौंदर्यवर्धनाची एखादी शस्त्रक्रिया करून घ्यायची असते. गरोदर स्त्रियांनाही बाळंतपणानंतर वाढलेलं पोट लायपोसक्शनने लगेच कमी करून हवं असतं. अशा वेळी त्यांना असं करण्यातले धोके समजावून सांगावे लागतात,’ असं डॉक्टर अनिल सांगतात.
डॉक्टरांच्या मते एकदा शस्त्रक्रिया केली की आता चिंता करायची गरज नाही, असा समज रुग्णांमध्ये असतो आणि तो चुकीचा आहे. ‘लायपोसक्शन म्हणजेच शस्त्रक्रिया करून शरीरातली चरबी काढून टाकली की आता आपण कायमस्वरूपी बारीक राहू, असं बऱ्याच रुग्णांना वाटतं. पण मुळात या शस्त्रक्रियेची गरज त्यांना पडली, कारण त्यांचं वजनच अवाजवी होतं. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरसुद्धा त्यांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल केला नाही तर वजन पुन्हा वाढणार. त्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यावर तरी कमीत कमी त्यांनी आपल्या वजनाकडे गांभीर्याने पाहून योग्य आहार, व्यायामाचा मार्ग अवलंबला पाहिजे.’
थोडक्यात सांगायचं तर या शस्त्रक्रियांच्या किती आहारी जायचं याचं भान असणं आवश्यक आहे. केवळ हातात पैसा आहे म्हणून आणि आपली आवडती सेलिब्रिटी करते म्हणून कॉस्मेटिक सर्जरी करण्यापूर्वी सारासार विचार करणं फार गरजेचं आहे. अन्यथा वेळ टळून गेल्यावर काळाचं चक्र मागे फिरवून सगळं पूर्ववत करणं या शस्त्रक्रियांच्या बाबतीत तरी शक्य नाही.