‘मध्यमवर्ग’ नावाचा एक सिनेमा येतोय. त्याचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे करमणूकप्रधान विनोदी सिनेमांची लाट ओसरलेली असतानाही प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन हे उद्दिष्ट ठेवून हा सिनेमा तयार केला आहे.

आगळेवेगळे विषय आणि ‘ऑफबीट’ मांडणी, सशक्त पटकथा आणि उत्तम अभिनय असे अनेक मराठी चित्रपट आले आहेत, येत आहेत. तरीसुद्धा निव्वळ आणि निखळ करमणूक हा कोणत्याही चित्रपटाचा ‘यूएसपी’ कायम असतोच. या वर्षांत ज्याला तद्दन कमर्शिअल म्हणता येतील असा बिगबजेट ‘लय भारी’ प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला.
मराठी चित्रपटांना असलेली विनोदाची परंपरा या वर्षी काही प्रमाणात खंडित झाली असे म्हणता येईल. निखळ विनोदी चित्रपटांची लाट टीव्हीवरील स्टॅण्डअप कॉमेडीच्या भरण्यामुळे कमी झाली आहे असेही जाणवते. निखळ करमणूक आणि जाता जाता हलकेच संदेश देण्याचा ‘यूएसपी’ असलेला ‘मध्यमवर्ग’ या नावाचा मराठी चित्रपट १२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय.
या चित्रपटाचे दिग्दर्शक हॅरी फर्नाडिस यांच्याशी गप्पा केल्या तेव्हा या चित्रपटाची वैशिष्टय़े त्यांनी मांडली. १९८०-९० च्या दशकात कनिष्ठ मध्यमवर्ग असलेला वर्ग आता उच्च मध्यमवर्गीय झाला आहे ही गोष्ट खरी आहे; परंतु आजही मध्यमवर्ग मोठय़ा प्रमाणात आहे हे नाकारून चालणार नाही. कष्ट करून आपण आणि आपले कुटुंब सुखात नांदविण्याचा प्रयत्न हा वर्ग करत असतो. पैशाची चणचण कायम असली तरी छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून पैशाविना आयुष्यात आनंद वेचण्याचा प्रयत्न शहरातील मराठी मध्यमवर्ग करत असतो. मुंबईसारख्या महानगरांत राहण्याबरोबरच राज्यातील अनेक छोटय़ा शहरांमध्येही मोठय़ा प्रमाणावर मध्यमवर्ग राहतो आहे. म्हणूनच या वर्गाला ‘अपील’ होईल त्याचबरोबर निखळ करमणूक म्हणूनही सर्वाना आवडू शकेल असा ‘कमर्शिअल एलिमेण्ट’ असलेला चित्रपट हॅरी फर्नाडिस यांनी दिग्दर्शित केला आहे.
चित्रपटाचे शीर्षकच ‘मध्यमवर्ग’ असे ठेवल्याबाबत विचारले असता फर्नाडिस म्हणाले की, होळी-गणपती किंवा अन्य कुठल्या तरी उत्सवासाठी सात-आठ आडदांड पोरं वर्गणी मागायला येतात आणि गरीब बिचारा मध्यमवर्गीय माणूस ते म्हणतील तेवढी वर्गणी भरतो आणि परवडत नसतानाही ती भरतो आणि गप्प बसतो. बघ्याची भूमिका घेणे आणि ‘मला काय त्याचे?’ हा दृष्टिकोन बाळगून नेहमी वागणे हाही मध्यमवर्गीय खाक्या आहेच. म्हणूनच ठरविले तर हा मध्यमवर्ग काय काय करू शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न आम्ही चित्रपटातून केला आहे आणि आकर्षक ठरणारे ‘मध्यमवर्ग’ हेच शीर्षक चित्रपटाला दिले आहे. या चित्रपटाच्या जाहिरातींमधून चित्रपटाचे शीर्षक जाडजूड कॅलिग्राफीमधून दिसते. आणखी एक ‘गिमिक’ चित्रपटकर्त्यांनी केली आहे ती म्हणजे मध्यमवर्ग ‘द मिडल क्लास’ अशी टॅगलाइन या चित्रपटाच्या शीर्षकाला जोडली आहे.
अंबरनाथ येथे काही महिन्यांपूर्वीच एका महिला कंडक्टरला गुंडांने मारहाण करून तिचा गणवेश फाडला होता आणि तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांशी बोलताना या कंडक्टर महिलेने घटना घडत असताना आपल्यावर अत्याचार करणाऱ्या गुंडापेक्षाही बसमधील असंख्य प्रवासी आणि रस्त्यावरचे बघे यांचीच अधिक भीती वाटत होती, असे सांगितले होते. ही घटना नमूद करून दिग्दर्शक हॅरी फर्नाडिस म्हणाले की, हे उदाहरण एवढय़ासाठीच दिले की, ही घटना घडली त्यापूर्वीच आम्ही या चित्रपटात अशाच प्रकारचा एक प्रसंग चित्रित केला आहे. बघ्याची भूमिका घेणारा मध्यमवर्ग चित्रपटात दिसतो; पण एकजुटीने उभे राहायचे आणि अन्यायाविरोधात उभे ठाकायचे ठरविले तर परिस्थिती बदलेल हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे केल्याचे फर्नाडिस सांगतात.
आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अभिनेता रवी किशन याने या चित्रपटात प्रथमच प्रमुख भूमिका साकारली आहे. रवी किशन आणि सिद्धार्थ जाधव असे दोन नायक हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, अनंत जोग, कश्मिरा कुलकर्णी, हेमांगी काझ, किशोर नांदलस्कर, वसंत आजर्लेकर, रमेश वाणी, अनिल गवस, अ‍ॅलन फर्नाडिस, तन्वी मेहता आदी कलावंतांच्या या चित्रपटात भूमिका असून वसंत आंजर्लेकर हे चित्रपटाचे सूत्रधार आहेत.
‘टिपिकल’ कमर्शिअल आणि करमणूकप्रधान सिनेमा हाच खरे तर ‘मध्यमवर्ग’ या चित्रपटाचा ‘यूएसपी’ ठरणार असून मराठी चित्रपटसृष्टीला अशा सिनेमांचीही गरज आहेच, हेही लक्षात घ्यायला हवे. दिग्दर्शक हॅरी फर्नाडिस हे नाव मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांसाठी दिग्दर्शक म्हणून नवीन असले तरी यापूर्वी त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे, अशोक हांडे यांच्यासोबत साहाय्यक म्हणून अनेक चित्रपट, स्टेज शो केले आहेत. विशेष म्हणजे हॅरी फर्नाडिस हे सात सुपरडुपरहिट भोजपुरी चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!