28 May 2020

News Flash

मलेशियात ‘मायबोली’

मलेशिया.. भारतापासून खूप दूर. इथे कसली आली आहे मायबोली? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल ना? बरोबर आहे, कारण आजकाल भारतातूनच जी संस्कृती, जी भाषा लोप

| April 3, 2015 01:10 am

lp62मलेशिया.. भारतापासून खूप दूर. इथे कसली आली आहे मायबोली? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल ना? बरोबर आहे, कारण आजकाल भारतातूनच जी संस्कृती, जी भाषा लोप पावते आहे ती दूर परदेशात काय असणार? नवऱ्याच्या पावलावर पाउल ठेवून आपले सगळे नातेवाईक मित्रमैत्रिणी सोडून आम्ही बायका परदेशात येतो. सुरुवातीला कामाच्या व्यापात दिवस निघून जातात, पण नंतर एकटं वाटू लागतं. अशात कोणी मराठी बोलणारी मैत्रीण मिळाली कि बस!!!!! अशाच आमच्यासारख्या मराठी बायका घेऊन स्वाती कुरुन्द्वारकर हिने व्हॉटस् अप ग्रुप बनवला. सुरुवातीला पाच बायका घेऊन हा ग्रुप सुरू झाला. हळूहळू एकमेकांच्या ओळखीने यात नवीन मैत्रिणी सामील झाल्या. मग काय दिवसभर गप्पा टप्पा. ओळखी आणि जोक्स फॉरवर्डिग सुरू झाले. मग ठरवलं कि एक दिवस भेटूया सगळ्या जणी. मग ‘कुकरी शो’ ह्य माध्यमातून पहिली भेट घडली. ‘कुकरी शो’मध्ये लहान मुलांना आवडणारे आणि स्वास्थ्यवर्धक रुचिकर पदार्थाचे डेमो देण्यात आले. ह्यत कोणी कोकमाचा कोळ वापरून विभिन्न मोड आलेले कडधान्य वापरून पाणीपुरी बनवण्याची कृती सादर केली. कोणी ‘मक्याचे कबाब’ बनवायला शिकवले, तर कोणी रागीच्या शेवयापासून उपमा अशी पाककृती सादर केली, तर कोणी फळ वापरून श्रीखंड कसे बनवतात हे शिकवले. या आधी प्रत्येकाने स्वत:ची ओळख करून दिली. पहिल्या कार्यक्रमातून भेटी झाल्यामुळे सर्वाना खूप छान वाटले. कुठे जुन्या ओळखी निघाल्या तर कुठे कोणीतरी आपल्याच माहेरची मैत्रीण निघाली. कोणी एकाच शहरातल्या कोणी एकाच शाळेतल्या.. ह्य भेटीमुळे सर्वामध्ये एक जिव्हाळा कायम झाला.

पहिल्या भेटीनंतर भरपूर बायका ‘मायबोली’मध्ये सहभागी झाल्या. आमचा दुसरा कार्यक्रम होता ‘मंगळागौरीचे खेळ’. यात सर्व महिलांनी एकत्र येऊन मंगळागौरीचे पारंपारिक गाणी, खेळ म्हटले. नऊवार साडय़ा, पारंपारिक दागिने, बांगडय़ा, गजरे माळून नटलेल्या स्त्रिया उत्साहाने मंगळागौर साजरी करायला आल्या. यात आम्ही उखाण्यांची स्पर्धा पण घेतली. आणि ह्य स्पर्धेच्या माध्यमातून कळले कि काही महिलांमध्ये लेखनकलेची केवढी क्षमता आहे. जवळ जवळ सर्वांनीच आपले आपणच उखाणे तयार केले होते. हमखास सर्वांना आपली पहिली मंगळागौर आठवली. काहीना तर मंगळागौर माहिती होती, पण त्या कधी खेळल्या नव्हत्या. माहेरची आठवण येऊन काही काळापुरते वातावरण हळवे झाले. उखाणा घेता घेता डोळ्यात अश्रू दाटून आले, कंठ गहिवरला. ‘मायबोली’च्या मैत्रिणी खूपच जवळच्या आणि हक्काच्या वाटू लागल्या. परदेशातल्या आपल्या मर्यादित वास्तव्यात आता ह्यच मैत्रिणींची आपल्याला साथ आहे आणि आपले हितगुज, कडू-गोड अनुभव, रोजच्या जीवनातल्या घडामोडी सांगायला सर्वांना एक हक्काचे स्थान मिळाले ते ‘मायबोली’च्या निमित्ताने.. मंगळागौरच्या पारंपारिक सणातून हा भावबंध घट्ट झाला.
आतापर्यंत एक गोष्ट आमच्या लक्षात आली होती ती म्हणजे रोजच्या कामाचे कितीही व्याप असले तरी आमच्यापैकी बऱ्याच महिला मिळेल तेवढय़ा वेळात आपले छंद जोपासत होत्या. आमच्या पैकी कुणीतरी खूपच सुग्रण स्वयंपाक करते तर कुणी खूप सुंदर पेंटिंग करते, कुणाला आकाशकंदिल बनवण्याची कला अवगत आहे तर कुणाला समाचार पत्राच्या कात्रणातून विविध शोभेच्या सुंदर वस्तू, दागिने, हेयर पिन, टोपल्या बनवता येतात, कुणाला आयुर्वेदिक उटणे बनवता येते तर कुणाला कुंदनच्या शोभिवंत रांगोळ्या तर कुणाला क्लेचा वापर करून गृहसजावटीच्या सुंदर वस्तू बनवण्याची कला अवगत आहे. अशा सर्वगुणसंपन्न मायबोली सख्यांनी एकत्र येऊन दिवाळीच्या निमित्त्याने ‘दिवाळी मेळावा’ भरवण्याचे ठरवले. ह्य मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. हा मेळावा आयोजित करणाऱ्या सर्व महिलाच होत्या. मेळाव्याची रूपरेषा, हॉल शोधणे, टेबलांची व्यवस्था करणे, प्रचार प्रसार करणे हे फक्त महिलांनीच केले. ह्यसाठी प्रत्येक मैत्रिण पुढे येऊन आपली जवाबदारी उचलत गेली आणि दिवाळी मेळाव्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात विभिन्न स्टॉल्स लावण्यात आले. वडापाव, मालवण कट्टा, भडंग, पाणीपुरी, मटण-सागुती, पावभाजी, काटोरी चाट, लस्सी, कोकम सरबत, चिवडा, लाडू, फालुदा, घरगुती केक आणि घरगुती आईस्क्रीम इत्यादी खाद्यपदार्थ आणि रांगोळ्या, दिवे, सुगंधी उटणे, आकाशकंदील, पेपरमेशच्या वस्तू, कलेच्या वस्तू, पेंटींग, स्वनिर्मित दागिने इत्यादी इतर स्टॉल्स लावण्यात आले. लहान मुलांनी पाणी, सरबत, कोकम सरबत ह्यचे स्टॉल्स लावले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मायबोलीची प्रत्येक स्त्री खपली आणि आमचा मायबोली परिवार थोडा अजून वाढला.
नंतर ‘बाल दिवस’ हा दिवस लक्षात घेऊन सलाड डेकोरेशन आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. ‘जज’ला घाम फोडणाऱ्या ह्य स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या आणि सलाड डेकोरेशन होते. फुल, पाने, तांदूळ, रेती वापरून रांगोळ्या काढण्यात आल्या. तसेच ‘बाल दिन’ हा दिवस लक्षात घेऊन सलाडमध्ये ओशन वर्ल्ड, सफारी, वर्ल्ड, थीम पार्क, खेळ उद्यन, थुई थुई नाचणारा मोर,आणि लहान बालगोपालांचा छोटा भीम, मलेशियाचे ट्विन्स टॉवर, फळभाज्यांची रांगोळी असा सर्व सरंजाम होता. इथे महिलांचा उत्साह खूप होता.
‘मायबोली’चा मकर संक्रांती हळदीकुंकू आणि बोर नहाण कार्यक्रम शनिवारी १७ जानेवारीला यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाला ७५ बायकांनी आपली उपस्थिती लावली असून साधारण ४७ लहान मुलांचे बोर नहाण करण्यात आले. सणवार असले म्हणजे त्या त्या सणाला अनुसरून आपण सगळा स्वयंपाक आप आपल्या घरी करतोच. पण आपल्या लोकांपासून लांब तो एकटय़ानी खातांना गोडाधोडाचा घास कुठे तरी घशात अडकतोच. म्हणून विचार केला कि जर करतोच आहोत तर सर्व शास्त्रोक्त पद्धतीने करायचे. एकत्र सणावाराच्या भोजनाचा स्वाद घ्यायचा. गुळाच्या पोळ्या, तिळाचे लाडू, कढी, खिचडी, भाजी, कोशिंबीर एवढा सगळा ‘भोगी’चा स्वयंपाक घरी केला. या कार्यक्रमाला सगळ्या लहान बालगोपालांचा आणि त्यांच्या पालकांचा भरगच्च प्रतिसाद मिळाला. ७५ महिलांचा हळदी-कुंकू अगदी उत्साहात आणि खेळीमेळीत पार पडलं. पाच जणींची पहिली संक्रांत पण आम्हीच केली.
परदेशात राहून या ‘मायबोली’ला अल्पावधीत खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे . जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सिंधुताई सपकाळ यांना पण मायबोलीने आमंत्रित केलं आहे. परदेशात राहून मायबोलीच्या निमिताने आपली संस्कृती जपायला मिळते याचा अभिमानच आहे.
असा हा आमचा मायबोली ग्रुप. महिलांनी महिलांसाठी चालवलेला. मायबोलीच्या निमित्ताने मागे राहिलेले माहेरपण आपल्याला परत मिळावे. लहानपण जगता यावे अश्या मैत्रिणी मिळाव्या, आपल्यातले कुठे तरी दडून बसलेले मिश्किल यौवन बाहेर निघावे, सुख-दु:खाचे चार क्षण वाटता यावे, एकमेकींच्या कलागुणांना वाव मिळावा, लपलेली कला बाहेर यावी आणि आपले गुण सर्वांना कळावे, आपले गायन, कलाकुसर, पाककृती, लिखाण, नृत्य, चित्रकला, रांगोळ्या, गृहसजावट, मेकअप करायची पद्धत, इत्यादी असंख्य गुण समोर यावे, सणवार साजरे करावे, लहान मुलांना पुढे येण्याची संधी मिळावी आणि नवऱ्याने कौतुकाने आपली प्रशंसा करावी, परदेशात राहून आपले देशीपण आपण जपले ह्यसाठी सासू-सासरे, आई-वडिलांना आपला अभिमान वाटावा हाच ‘मायबोली’चा प्रथम आणि एकमात्र उद्देश्य आहे.
गॉसीप, निंदा, भांडणे, गैरसमज, हेवेदावे, लावालाव्या, अहंकार आणि मानापमान जोपासत बसलेली स्त्री शेवटी एकटी पडते, सर्वांशी मिळून- मिसळून, झाल्या-गेल्या गोष्टीवर पाणी सोडून, मैत्रीभावाने राहणारी आणि स्वत:चा विकास करून दुसऱ्या मैत्रिणींना मदत करणारी स्त्री परदेशातही आपले एक छोटेखानी कुटुंब उभारू शकते ते सुद्धा रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त हे आमच्या ‘मायबोली’ने दाखवून दिलं आहे.
स्मिता गिरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2015 1:10 am

Web Title: malaysian mother tongue
टॅग Blog,Bloggers Katta
Next Stories
1 कैलासवासी पार्ले
2 पाऊस आणि पाऊस!!
3 मराठी शब्दच्छल
Just Now!
X