05 July 2020

News Flash

अरण्यपर्यटनाचा आनंद…

भटकंतीची आवड असणाऱ्यांना निसर्ग आणि जंगलाची ओढ उपजतच असते. या दोन्ही गोष्टी त्यांना कायम खुणावत असतात.

| May 30, 2014 01:16 am

भटकंतीची आवड असणाऱ्यांना निसर्ग आणि जंगलाची ओढ उपजतच असते. या दोन्ही गोष्टी त्यांना कायम खुणावत असतात. आजच्या धावपळीच्या जीवनात या सर्वाचा आनंद घ्यायला फुरसत आहे कोणाला हे वाक्य बऱ्याचदा कानावर पडत असतं. पण आवड असणारा बरोबर वेळ काढतो आणि निघतो भटकंतीवर. खरं तर वेळात वेळ काढून जीवनाचा आनंद कसा घ्यायचा, यासाठी पर्यटन कसे उपयोगी आहे हा विचार समाजात अलीकडे चांगला रुजायला लागला आहे. अनेक वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी खेडय़ाकडे चला अशी हाक दिली होती. आजच्या वनपर्यटनाचीही तीच हाक आहे. निसर्गाशी संवाद साधून, वनांमध्ये उपलब्ध सोयीसुविधांचा अभ्यास करून तेथील भूमिपुत्रांचं जीवन समजून घेणं हेच तर खरं वनपर्यटनाचं महत्त्वाचं अंग आहे हे अधोरेखित करणारं हे पुस्तक.
वनपर्यटन ही संकल्पना तशी आपल्याला नवी नाही. अगदी पुरातन काळापासून ही संकल्पना अस्तित्वात आहे. फक्त बदलत्या काळानुसार पर्यटनाचे प्रकार बदलले. पूर्वीसारख्या साचेबद्ध पर्यटनाला फाटा दिला गेला. आणि या शाखेला पर्यटनाचा विशेष मान मिळाल्याने आज वनपर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व आले.
समाजातील जिज्ञासू-अभ्यासू आणि मुख्य म्हणजे पर्यटनाची आवड असणाऱ्या वाचकांना वनपर्यटनाच्या विविध पैलूंची माहिती मिळावी यासाठी अरुण मळेकर यांनी अरण्यवाटा हे पुस्तक लिहिलं. गेल्या २० वर्षांत निरनिराळ्या ठिकाणी प्रसिद्ध झालेला त्यांचा हा लेखसंग्रह त्यांनी अलीकडेच पुस्तकरूपात प्रकाशित केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात नोकरी करताना कामाच्या रूपात त्यांना जो प्रवास करावा लागला, देशातील रानवाटा तुडवताना जी भटकंती केली आणि त्यासाठी आवश्यक ते वाचन केले या सर्वाचा हे पुस्तक लिहिताना उपयोग झाल्याचं ते आवर्जून सांगतात.
वनपर्यटनाच्या या अनोख्या शाखेची माहिती देताना लेखकाने मानवी जीवनात रानावनांचं स्थान, वनक्षेत्राविषयीचं समाजातील अज्ञान, उदासीनता, निसर्गचR अव्याहत सुरू राहण्यासाठी आवश्यक असलेल्या पशू-पक्ष्यांची, वनश्रींची घटती संख्या, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाच्या पडद्याआडून सुरू असलेली जंगलतोड, त्यामुळे भकास होत चाललेले परिसर. ही दुर्दशा काही प्रमाणात टाळण्यासाठी निसर्गवाचनाला पर्याय नाही हा मुद्दा लेखकाने आवर्जून मांडला आहे.
सुखाच्या शोधासाठी आपली भटकंती सुरू असते. पण अजूनही ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ याचा प्रत्यय यायला बराच अवधी आहे. सुखाच्या या प्रतीक्षेत मग एकमेव आधार वाटतो तो या निसर्गरूपी आईचा. मग आपल्या या आईसाठी आणि पर्यायाने स्वत:साठी जरा तरी वेळ द्या, थोडीशी उसंत काढा मोकळा श्वास घेण्यासाठी असं लेखक या पुस्तकातून आवाहन करतो. पुस्तक वाचल्यावर मळेकरांनी त्यांच्या लेखनाच्या रूपाने आपल्याला एक वाटाडय़ा दिला आहे, त्याचबरोबर शाश्वत आनंद कसा शोधायचा याचा मंत्रही दिला आहे.
या पुस्तकात आपल्या महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, गुजरात या राज्यांमधील वनसंपदा, निसर्गरम्य ठिकाणांची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मळेकरांच्या लेखनातील साहित्यिक मूल्यांमुळे ही सर्व माहिती केवळ माहिती न राहता वाचनीय झाली आहे. निरनिराळ्या प्रांतांमधील निसर्गरम्य ठिकाणं, वनश्रीने वेढलेली ठिकाणं याचं वर्णन मळेकरांनी स्वत:च्या भाषालंकाराने मढवलं असल्यामुळे त्या ठिकाणांविषयीची उत्सुकता चाळवली जाऊन आपणही कधीतरी या ठिकाणांना भेट द्यावी असं न राहवून वाटून जातं. शिवाय या सर्व स्थळांची माहिती सरकारच्या विविध पर्यटन विभागांमार्फत कशी मिळू शकते, राहण्याची, भोजनाची सोय कशी होऊ शकते यासंबंधीचे पत्ते, फोन नंबर्स, मोबाइल नंबर्स, ई-मेल आयडीज सर्वकाही दिले असल्यामुळे तुम्ही उद्या जरी उठून मनात आलं की जावं पर्यटनाला तर तुमच्याजवळ सर्व माहिती आहे. कुठलं पर्यटन स्थळ हे राष्ट्रीय उद्यान आहे, कुठलं अभयारण्य, कुठे व्याघ्र प्रकल्प आहे, ते कोणत्या राज्यात आहे, ते पाहण्यासाठी वर्षांतला कुठला रुतू चांगला राहील, तेथे पोहोचण्यासाठी रेल्वे, बसस्थानक वा विमानतळ कोणतं, त्या त्या स्थळाचं वैशिष्टय़ कोणतं, आरक्षणासाठी कुठे संपर्क साधायचा याची परिपूर्ण माहिती पुस्तकात दिली आहे.
काही नवख्या पर्यटकांसाठी वनपर्यटनातील निसर्गनियम कोणते याचीही माहिती लेखनाने पुस्तकाच्या अखेरच्या पृष्ठावर दिली असल्याने तेही सहजगत्या पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील.
पर्यटनाला जाताना आपापल्या आवडीनुरूप अनेक गोष्टी आपण बरोबर घेऊन जातो. परंतु नियोजित स्थळी पोहोचताना अधिक उपयुक्त ठरेल असे नकाशे बरोबर नेण्याबाबत मात्र बहुतांशी पर्यटकांची उदासीनता दिसते. किंवा ते त्याबाबत फारसे अभ्यासू वा जिज्ञासू आढळून येत नाहीत. खरं तर नकाशावाचन हे पर्यटनाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं ठरतं. योग्य नकाशावाचनाने पर्यटकाला मार्गदर्शन तर होतंच, शिवाय श्रम, वेळ आणि पैशाचीही बचत होते हे लेखकाने आवर्जून सांगितलं आहे. विशेषत: शेकडो किलोमीटर विशाल क्षेत्राचं वनपर्यटन करताना त्या परिक्षेत्राचा नकाशा हाच महत्त्वाचा सोबती ठरतो. भरत वद्देवार यांची मुखपृष्ठ संकल्पना आणि उमेश घाणेकर यांची मांडणी व सजावट पुस्तकातील विषयाला साजेशीच आहे.
संपूर्ण पुस्तकातून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील पर्यटन स्थळांची सफर तर घडतेच, पण त्यातला एक भाग विशेष लक्ष वेधून घेतो तो म्हणजे, सर्पाच्या दुनियेतील अवलिया-चंद्रकांत कंग्राळकर यांची माहिती. समाजाने दखल न घेतलेल्या काही माणसांच्या कामाची पद्धत ही त्यांचा जगावेगळा छंद कशी होऊन जाते, याचं सुरेख वर्णन या भागात आहे. ठाण्याच्या चंद्रकांत कंग्राळकरांनी सर्प-अजगरांशी दोस्ती करून जगावेगळा छंद कसा जोपासला आहे, हा छंद जोपासता जोपासता त्यांना सर्पदंशाने कसे जिवावर बेतलं, याचं उत्कट वर्णन आणि या सर्पमित्राची धडाडी या लेखातून समजते.
लेखक : अरुण मळेकर
प्रकाशक : मैत्रेय प्रकाशन
पृष्ठे : १४८
मूल्य : रु. १५०/-.

पाच खंडांमधील मुशाफिरी
जयप्रकाश प्रधान आणि त्यांची पत्नी जयंती या दाम्पत्याने आजवर ६४ देश पालथे घातले. आपल्याकडील पर्यटन कंपन्या ज्या पद्धतीने व्यावसायिकदृष्टय़ा सहली आयोजित करतात आणि आपल्याला केवळ भोज्ज्याला शिवून आल्यासारखं वाटतं तशा पद्धतीने आखीव-रेखीव नियोजित पद्धतीने त्यांनी पर्यटन केले नाही. जयंती यांनी वेळोवेळी नेटवरून काही विशेष ऑफबीट पर्यटनस्थळं शोधून त्या त्या स्थळांना भेटी दिल्या. या दरम्यान तेथील समाजाची संस्कृती, जीवनशैली, सणवार, खाद्यसंस्कृती याची जवळून ओळख करून घेणं याकडे त्यांचा ओढा असतो. म्हणूनच त्यांची भटकंती ऑफबीट ठरते.
आजवर प्रधान दाम्पत्याने नॉर्वेमधील झुकासावो येथील आगळवेगळं बर्फाचं हॉटेल, तेथील बर्फाचीच टेबलं, खुच्र्या, पलंगावरील रेनडिअरच्या कातडय़ापासून बनवलेल्या गाद्या, तेथे अनुभवलेला नॉर्दन लाइट्सचा वर्षांव, पोलंडमधील कुटना व्होरा येथील हाडांनी, कवटय़ांनी सजवलेलं चर्च, झेक प्रजासत्ताक येथील भव्यदिव्य डोळ्यांची पारणं फेडणारी मिठाची खाण, या खाणीतील हिरेजडीत वाटणारं पण वस्तुत: मिठाच्या स्फटिकापासून बनवलेलं झुंबर, सर्वसामान्य आणि संवेदनशील मनाच्या लोकांच्या काळजाचा ठाव घेणारी पोलंडमधील ऑत्स्झविझची छळछावणी, अलास्कातील व्हाइटपास युक्रॅन रेल्वे, तेथील हाडं गोठवणाऱ्या थंडीतही निसर्गसौंदर्यात भर घालणारं देनाली पार्क, स्लेज डॉग रेस, अमेरिका, कॅनडातील ऑटममधील खुललेले निसर्गसौंदर्य, मेक्सिकोसारख्या अनवट देशातील तारामारा जमात, तिची जीवनशैली, त्यांचं गुहांमधील वास्तव्य, तेथील कॉपर कॅनियन व्हॅली, बाराव्या शतकातील बोरोबुदूर बौद्ध मंदिर, प्रबनन हे आशियातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आणि यासारख्याच इतर प्राचीन अवशेषांनी नटलेला सुंदर इंडोनेशिया, बाली बेटावरील भातशेती, व्हिएतनामने अमेरिकेबरोबर झालेल्या युद्धादरम्यान बांधलेले सुमारे २०० किलोमीटर लांबीचे बोगदे ( कुची टनेल्स), जगातील सर्वात मोठं असा मानाचा तुरा खोवलेलं सहारा वाळवंट, केनियातील चित्तथरारक सफारी, विस्तीर्ण पसरलेला व्हिक्टोरिया फॉल्स, याशिवाय अलास्कातील टोटेम फेल ही आदिवासी कला त्यांनी प्रत्यक्ष जवळून अनुभवली आणि या अनुभवांचं सुंदर वर्णन ऑफबीट भटकंतीत केलं आहे.
पुस्तकात या सर्व पर्यटन स्थळांची आकर्षक छायाचित्र आणि सर्व सफरींविषयी उपयुक्त माहितीही देण्यात आली आहे. पुस्तकात वर्णन केलेली माहिती ही बॅकपॅक संस्कृतीच्या पर्यटकांना वा हौशी पर्यटकांना निश्चितच उपयोगी ठरेल. त्याचबरोबर लेखकाला झिम्बाब्वेला आलेल्या दोन टोकांच्या अनुभवांचेही वर्णन केले आहेत. ज्यापासून प्रवासात अचानक अडचणी आल्या की काय करायला हवे याची माहिती वाचकांना नक्कीच उपयोगी ठरेल. अशी अनोखी अनएक्सप्लोअर पर्यटन स्थळं दाखविण्यासाठी परदेशातील ट्रॅफलगार, इनसाइट, ग्लोबस, कॉसमॉस यांसारख्या ट्रॅव्हल कंपन्या अतिशय सुंदर नियोजन करून आपल्याला फिरवून आणतात, याची माहितीही पुस्तकात आहे.
जयप्रकाश प्रधान हे हाडाचे पत्रकार असून अराउंड द वर्ल्ड, अनोखी सफर ही त्यांची दोन प्रवासवर्णनं यापूर्वीचं प्रसिद्ध झाली आहेत.
लेखक : जयप्रकाश प्रधान
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठे : २३२
मूल्य : रु. २४०/-.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2014 1:16 am

Web Title: marathi book
Just Now!
X