lp39काही वर्षांपूर्वी चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या चारोळ्यांनी तत्कालीन तरुणाईला वेड लावले होते. हायकू या छोटेखानी कविताओळींपेक्षा थोडा वेगळा असा हा काव्य प्रकार कवी मोशाज् ऊर्फ अभिजित सहस्रबुद्धे यांनी हाताळला आहे. प्रेम याविषयी मनात जे जे काही येईल ते त्यांनी या चारोळ्यांमधून प्रभावीपणे मांडले आहे; पण या रचना करताना त्यांनी मोशाज् हे टोपणनाव का घेतले आहे याविषयी या संग्रहात स्पष्टीकरण नाही.
प्रेम
कवी मोशाज् (अभिजित सहस्रबुद्धे)
मूल्य- ५० रुपये
पृष्ठे- १०४

lp40वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेखाचे आयुष्य एक दिवसाचे असते; पण वर्षभराचे असे सगळे लेख एकत्र केले, की एक संग्रह तयार होतो. ‘थेंबे थेंबे तळे साचे’सारखे आहे हे. माधवी कुंटे यांनी आपल्या वर्तमानपत्रातल्या सदराचे ‘प्रकाशफुले’ हे पुस्तक केले आहे. रोज सकाळी वर्तमानपत्र उघडले की, नकारात्मक बातम्या समोर येतात. त्या नकारात्मक सुरावरच आपला दिवस सुरू करावा लागतो. अशा वेळी वाचकांनी सकारात्मक ऊर्जा देणारा काही तरी मजकूर आणि त्याला जोडणाऱ्या काव्याच्या ओळी असाव्यात, या भूमिकेतून लेखिका माधवी कुंटे यांनी जे सदर लिहिले त्याचेच हे पुस्तक केले आहे.
प्रकाशफुले
माधवी कुंटे; प्रकाशक – जे. के. मीडिया; मूल्य- १२० रुपये

lp41सुविचार हा असा प्रकार आहे, की जो कुणी कुणाला द्यायला बिचकत नाही आणि घेणारा घेतो, पण जराही अंगाला लावून घेत नाही; पण तरीही सुविचारांची काय गरज आहे, असेही कुणीही म्हणत नाही, कारण ते अनुभवातून जमा झालेले संचित असते. पुढच्याला ठेच लागल्यावर मागच्याने शहाणा होणे अपेक्षित असल्यामुळे ही सुविचारांची देवघेव सुखेनैव चालते. संजय वाळके यांनी अशा सुविचारांचे संकलन केले आहे आणि प्रत्येक विचाराचे स्पष्टीकरणही दिले आहे.
सुविचार यात्रा
संजय वाळके; प्रकाशक- श्री प्रिंटर्स, अकोला; मूल्य – २० रुपये.

lp42इंग्रजी ही परक्यांची भाषा, असे म्हणून कुणीही कितीही झटकली तरीही आज इंग्रजी भाषेशिवाय आज कोणाचे काही चालत नाही. इंग्रजी न येणारा उगाचच न्यूनगंडाला बळी पडतो, आर्थिक पातळीवर मागे पडतो, अनेक फायद्यांपासून वंचित राहतो. हे सगळे टाळण्यासाठी आजकाल मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घातले जाते; पण जी मुले इंग्रजी माध्यमात शिकत नाहीत, मराठी माध्यमात शिकतात, त्यांना सहजसोप्या पद्धतीने इंग्रजी यावे यासाठी तयार केली गेलेली ही पुस्तिका उपयुक्त आहे.
अक्षरमंत्रा
दीपक आनंदराव लाड; मीनल प्रकाशन; मूल्य- १०० रुपये; पृष्ठे- १४०

lp43माहिया हा पंजाबी काव्य प्रकार आहे, जपानी हायकूशी नाते सांगणारा; पण हायकू नव्हे असा हा पंजाबी लोकगीतातला काव्य प्रकार आहे. ‘माहिया’ या शब्दाचा एक अर्थ म्हशी राखणारा असा आहे. त्याशिवाय माही म्हणजे मासा. माही म्हणजे प्रेयसी असाही अर्थ आहे. पंजाबी गुराखी म्हशी चारायला सोडल्यावर एकत्र जमून किंवा नदीकाठी एकेकटे बसून ही तीन तीन ओळींची गाणी किंवा कविता गुणगुणतात. माहिया गीतांची तुलना कुमाँऊ प्रदेशातील भगतौलशी केली जाते. त्यांना टप्पा असेही म्हटले जाते. हिंदीतूनही माहिया रचना केली जाते. कवी घनश्याम बेंद्रे यांनी मराठीतून माहियांची रचना करून मराठी प्रेक्षकांना माहिया या काव्य प्रकाराची ओळख करून दिली आहे. ‘पानात बसे जो पक्षी, फक्त स्वरांनी जो, काढीत असे नक्षी’ किंवा ‘जर प्रीत करायाची, तर ठेव तयारी विरहात झुरायाची’ अशा या तीन तीन ओळींच्या रचना वाचनीय आहेत.
माहिया
कवी घनश्याम धेंडे
शब्दगुंजन प्रकाशन
मूल्य- ५० रुपये
पृष्ठे- ११२
प्रतिनिधी response.lokprabha@expressindia.com