अतिथी नावाचा एक नवीन सिनेमा मराठीत येतोय. त्याचं वैशिष्टय़ म्हणजे मराठी चित्रपटांमध्ये प्रथमच एकत्रित सीक्वेल काढण्याचा नवाच ट्रेण्ड या सिनेमाच्या माध्यमातून होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी चित्रपटांमध्ये ‘लय भारी’सारखा सर्वाधिक बजेटचा चित्रपट आला हे त्याचे वेगळेपण होते. त्याचबरोबर ‘रेगे’, ‘यलो’ असे आशय-विषयदृष्टय़ा वेगळे आणि चांगले चित्रपटही आले. सप्टेंबर महिन्यात अनेक वैविध्यपूर्ण विषयांचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मराठी चित्रपटांना मुख्यत्वे विनोदाची मोठी परंपरा आहे. त्यामुळे निखळ विनोदी, धमाल विनोदी, शाब्दिक कोटय़ा, तिरकस विनोद असे विनोदाचे नानाविध प्रकारचे कथानकांचे चित्रपट मराठीत मोठय़ा प्रमाणावर आले आहेत, येत आहेत. मराठी चित्रपटांची विनोदाची ही परंपरा आगामी काळात ‘अतिथी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रथमच मराठी चित्रपटांमध्ये एकत्रित सीक्वेल काढण्याचा नवाच ट्रेण्ड ‘अतिथी’द्वारे केला जाणार आहे.
यासंदर्भात चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आशीष पुजारी म्हणाले की, सीक्वेल एकत्रित करायचा असा विचार कथा-पटकथेचे लेखन सुरू असताना अजिबात नव्हता. परंतु, पटकथा लेखन पूर्ण झाल्यानंतर एका प्रमुख व्यक्तिरेखेचा आलेख आणि त्याच्या अवतीभवतीचे वातावरण, त्या प्रमुख व्यक्तिरेखेची गोष्ट लोकांना परिपूर्ण पद्धतीने सांगायची असेल तर पावणेदोन तासांच्या एका चित्रपटात ती बसविणे कठीण होऊन बसले. म्हणून निर्मात्यांशी चर्चा करून सीक्वेल तयार करायचा असे ठरले. त्यानुसार पुन्हा पटकथेची बांधणी करून कामाला सुरुवात केली असे पुजारी यांनी नमूद केले.
परंतु, सीक्वेल करायचा असा विचार केला असला तरी एक सबंध अधिक लांबीचा चित्रपट आम्ही चित्रित केला आणि त्याचे दोन भाग होतील अशाच पद्धतीने त्याचे संकलन आणि पोस्ट प्रॉडक्शन करता येईल अशा पद्धतीने रचना केली आहे. ‘अतिथी’ हा चित्रपट सलगपणे चित्रित करून पूर्ण करण्यात आला असून पहिल्या भागाचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या भागाचे सध्या डबिंगचे काम सुरू आहे, असे आशीष पुजारी यांनी सांगितले.
दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आणि त्यातही एकत्रित सीक्वेल करण्याचे आव्हान याबाबत बोलताना पुजारी म्हणाले की, दिग्दर्शक म्हणून चित्रपट पहिला असला तरी एक अभिनेता म्हणून आणि एक लेखक-दिग्दर्शक म्हणून लघुपट, मालिका, नाटक, एकांकिका यातून काम केले आहे, लिखाणही केले असून चित्रपट निर्मितीची प्रक्रिया समजावून घेतली आहे, अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावर एक गोष्ट एका चित्रपटामध्ये सांगता येऊ शकत नाही असे जाणवले तेव्हा दुसऱ्या भागाद्वारे ती परिपूर्ण पद्धतीने मांडण्याचा विचार मनात आला आणि मराठीत आतापर्यंत तरी अशा प्रकारे सीक्वेल आले नसल्याने निश्चितपणे हे एक आव्हान होते आणि ते मी आणि आमच्या टीमने पेलले आहे, असे पुजारी यांनी नमूद केले.
अतिथी ही आत्माराम पूर्णे आणि त्यांचे कुटुंबीय यांची गोष्ट आहे. अलीकडे मराठी चित्रपटातून बहुतांशी शाब्दिक कोटय़ांवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु, ‘अतिथी’ हा प्रासंगिक विनोदांचा अंतर्भाव असलेला ‘ब्लॅक कॉमेडी’ प्रकारचा विनोदी चित्रपट आहे. आत्माराम पूर्णे ही मध्यवर्ती भूमिका ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांनी साकारली आहे. मुंबईच्या चाळीत राहणारे पूर्णे कुटुंबीय एका गावात राहायला जाते. तिथे आत्माराम पूर्णे हॉटेल व्यवसाय सुरू करतात. ते गाव, ती जागा, हॉटेल आणि तिथे येणारे पाहुणे यांचा पूर्णे यांच्या आयुष्याशी असलेला अन्योन्य संबंध आणि त्यावर बेतलेला विनोद असा थोडक्यात आशय आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
विनोदी चित्रपट असला तरी निव्वळ हसण्यावारी न्यावा असा हा चित्रपट नक्कीच नाही. तर त्यातून चांगला ‘कंटेण्ट’ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये ‘अतिथी’ चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्माते अशोक मोकरिया, गिरीश कुमार यांचा मानस आहे. ज्याप्रमाणे ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित केल्यानंतर तीन-चार आठवडय़ांनंतर दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला होता, त्याचप्रमाणे ‘अतिथी’चे दोन भाग प्रदर्शित करण्याची शक्यता पुजारी यांनी व्यक्त केली.
बऱ्याच कालावधीनंतर विजय चव्हाण संपूर्णतया नव्या कथानकामध्ये आत्माराम पूर्णे ही प्रमुख भूमिका साकारणार असून संजीवनी जाधव, किशोर नांदलस्कर, मिलिंद शिंदे, विजय मोहिते, किशोर चौघुले यांच्याही भूमिका आहेत. तर प्रज्ञा चैतन्य, जाई देशमुख, सेवा मोरे, रोहित चव्हाण, तेजपाल वाघ, अनिल नगरकर अशी कलावंतांची नवी फळी या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

मराठीतील सर्व आगामी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movie atithi
First published on: 12-09-2014 at 01:11 IST