मला उदरात घेऊन आई याच रस्त्यावरून जा-येई
एका रम्य संध्याकाळी माझा जन्म झाला
मी कॅथॉलिक ख्रिश्चन
याच रस्त्यावरून मला जवळच्या चर्चमध्ये नेले
मला नाव दिले..
नंतर याच रस्त्यावरून योग्य वेळी
मी शाळा-कॉलेजात गेलो
माझी विश्वविद्यालयाची पदवी पाहून
आईवडील आनंदात बुडून गेले
आता मला नोकरी लागली-
भरपूर पगार, त्यामुळे सुखी जीवन
आई म्हणाली, ‘बाळ.. आता मुलगी पाहा’
मुलगी मी पाहिलीच होती
याच रस्त्यावरून एके सकाळी चर्चला गेलो
माझं लग्न झालं, संध्याकाळी पत्नी आली
कालचक्राप्रमाणे मला मुलं झाली
त्याच रस्त्यावरून माझी मुलं शाळा-कॉलेजात गेली
नंतर नोकरीनिमित्त परदेशात स्थायिक झाली
मी अजूनही याच रस्त्यावरून फिरत होतो
आता निवृत्त झालो होतो
मित्रांबरोबर फिरणे, मौजमजा चालू होती
मात्र घरी परतताच तोच रस्ता..
काळ असाच वेगानं निघून गेला
ज्या रस्त्यावर मी रॉबिनहूडसारखा चालत होतो
त्याच रस्त्याची आता भीती वाटू लागली
मी पडेन अशी धाकधूक..
आता घरातच फिरू लागलो, नंतर तेही थांबलं
शरीर साथ देईना
आता घराच्या खिडकीतून त्याच रस्त्याकडे पाहतो
ज्या रस्त्यावर माझं आयुष्य गेलं, जो रस्ता माझा सोबती
ज्या रस्त्याने माझा जन्म ते निवृत्ती असा प्रवास पाहिला
तोच तो रस्ता.. पण आता भीती वाटते
आणि एक दिवस याच रस्त्यावरून
मला खांद्यावर वा हातगाडीतून स्मशानाकडे नेणार
माझा प्रवास कुठून कुठे झाला?
सवाल एवढाच.. जीवन असं असूनही
माणूस प्रसिद्धी, पैसा, संपत्ती याच्या मागे का?
अब्राहाम

कालबाह्य़

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
School girl missing, Nanded city area,
पुणे : नांदेड सिटीतून शाळकरी मुलगी बेपत्ता, पोलीस आयुक्त रस्त्यावर, मुलगी सुखरूप रांजणगावमध्ये सापडली
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा

भाकरीच्या अपेक्षेने ती
सतत असते शोधात
दोन पैशांच्या
कळत्या वयापासूनचा
हा तिचा नित्यक्रमच
असंख्य घुंगरांना एकवटून
ती अहोरात्र आली लढत
माय, भाऊ, बहीण अशा
रक्तातल्या कित्येकांशी
पायाच्या टाचंत कळ नाचतांना
त्याहीपेक्षा नाचणं झाल्यावर..
हल्ली ती जॉब अटेंड करते
मोबाइलवर
तिचं झगडणं लँडलाइनच्या
काळापासून
मी फक्त करतो विचार
तीच दु:ख का होत नाही
कालबाह्य़
टेलिग्रामच्या पद्धतीसारखं!
चाफेश्वर गांगवे

मुलींची कविता

पुरातन वडाच्या पारंब्यावर हिंदोळणाऱ्या मुलींनी
नाकारलाय वटसावित्रीच्या पूजेचा मान यमाच्या रेडय़ाला ओलीस ठेवून
नि जन्मोजन्मीच्या जोडीदारापेक्षा नव्याच पुरुषांच्या निवडीचा पर्याय
शोधलाय, मुलींनी संगणकाच्या पटलावर मेल मॉडेल्सची साइट पाहताना,

मुलींना नकोय आता काचा-पाण्याचा पारंपरिक खेळ
किंवा अंगणातल्या तुळशीपाशी दिवेलागणीची प्रार्थना म्हणण्याचा प्रघातही
गुंतताहेत मुली आता निर्मला गर्ग नि तेजी ग्रोव्हरच्या बंडखोर शब्दांमध्ये
दगडी उंबरठय़ाची मर्यादा फेमिनिस्ट चळवळींच्या अहंकारासह ओलांडण्यासाठी,

मुलींनी पुरता ओळखलाय पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेचा दांभिकपणा
म्हणून स्वीकारलाय त्यांनी सरोगेट मदर होऊन जगण्याचा स्वेच्छामार्ग
नि देहाची वल्कलं बेडरूममधल्या शय्येवर उतरविण्यापूर्वीच
केलाय मुलींनी पुरुषाच्या सेक्शुअल हिपोक्रसीचा पर्दाफाश बेमालूमपणे,

मुलींना नकोय सीता-अहल्या-मंदोदरी-तारा-द्रौपदीचा पौराणिक वारसा
अथवा मातृदेवतांच्या गावकुसाबाहेरच्या दगडी मंदिरातल्या लैंगिक पूजाविधीचा मानही
ग्लोबलायझेशनच्या बदलत्या वर्तुळात फिरू लागल्याहेत मुली आताशा
मल्टिडायमेन्शनल सुपरवुमनच्या अस्तित्वाला फुटलेल्या पारंब्या दहादिशांना शोधत..!
विनय पाटील

ते दिवस असे होते…

कंदिलाचा उजेड
हळुवार काळजात उतरायचा,
गरिबीतही घर श्रीमंत वाटायचं
घरभर सोनेरी उजेड पसरायचा..
प्रत्येकाचा चेहरा
प्रत्येकाला आपलाच वाटायचा,
जो तो एकमेकाचं
सुख-दु:खाचं पुस्तक वाचायचा..
आई काचेची काजळी पुसायची
हाताला व्हायची जखम
ते दिवस असे होते की,
उजेडच व्हायचा मलम..
चेहऱ्यांवर उगीच गैरसमज मांडणारा
घराघरांत आता सीएफएलचा लखलखाट
खंत याची की, रात्र सरल्यावरही
संबंधांची होत नाही पहाट..
नजीमखान

आस

ही धूसर संध्याकाळ
या झरोक्यातून
अशी आत येते
अन्
माझ्या हातावरच्या
सुप्त चांदण्याला
रात्रीची आस लागते.
ज्योती देसाई

दु:खी माणसाचा चेहरा

मी विचारले,
‘‘कसा असतो दु:खी माणसाचा चेहरा..?’’

तो म्हणाला,
कसाही.
टँ हँ करून रडणाऱ्या अर्भकासारखा..
पाळण्यावर फिरणारे खेळणे पाहून हसणाऱ्या तान्ह्य़ासारखा..
पायरीवर बसून सवंगडय़ांचा खेळ पाहणाऱ्या मुलासारखा..
किंवा
शाळा सुटल्यावर एकटय़ानेच परतणाऱ्या
शाळकरी पोरासारखा..

सायंप्रहरी खडकावर बसून
एकटय़ानेच समुद्र पाहणाऱ्यासारखा..
स्मशानात चटचटत्या बापाच्या चितेकडे पाहून
गतकाळात हरवून गेलेल्या त्याच्या पोरासारखा..
धापा टाकत कामावरून पाळणाघरातील तान्ह्य़ाकडे
किंवा कामावर जाणाऱ्या
कुठल्याही माऊलीसारखा..

साध्या साध्या गोष्टीवरून खळखळून हसणाऱ्या माणसासारखा..
रस्त्यावरून जाताना सालीवरून घसरून पडतानाही
हसणाऱ्या माणसासारखा..

दु:खी माणसाचा चेहरा असतो
अगदी कुठल्याही
चेहऱ्यासारखाच.
राजकुमार कवठेकर