विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
संरक्षण खात्यांतर्गत लष्करी व्यवहार खाते निर्माण झाल्यानंतर देशाच्या तिन्ही सेनादलांचे पहिले संरक्षणप्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ- सीडीएस) म्हणून सूत्रे हाती घेतलेले जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका आणि त्यांच्या कर्मचारी वर्गातील ११ अधिकारी यांचे अपघाती निधन हे दुर्देवी आणि देशासाठी मोठाच धक्का आहे. लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघातात देशाने संरक्षणप्रमुखच गमावणे ही खेदाची बाब आहे. एका बाजूला चीनच्या सातत्याने कुरबुरी सुरू असताना आणि पलीकडच्या बाजूस चीन- रशियासोबत पाकिस्तान संधान बांधून असताना अशा प्रकारे जनरल रावत यांच्यासारखा ‘आक्रमक संरक्षक’ अशी मानसिकता असलेला सेनादलप्रमुख ही देशाची निकड होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आक्रमकताच संरक्षक असते’, असे जनरल रावत नेहमी म्हणायचे. त्यांच्या वागण्यातही तीच आक्रमकता नेहमी दिसायची. अनेकदा त्यांनी त्यामुळे वादही अनावश्यक ओढवून घेतले. भाजपा सरकारने आणलेली नागरिकत्व कायदा सुधारणा हा निव्वळ राजकीय मुद्दा होता, त्यांनी त्यात पडण्याची काहीच गरज नव्हती किंवा हवाई दलाची भूमिका ही साहाय्यकाची असते हे विधान करण्याची गरज नव्हती. मात्र हे मुद्दे बाजूला ठेवले तर त्यांचे दोन गुण अतिशय कामी आले. पहिला म्हणजे त्यांच्याकडे नेहमीच प्रत्येक विषयाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी होती. ‘उपाययोजना सांगणारा’ असा त्यांचा दुसरा परिचय होता. समस्या अनेक जण मांडतात, मात्र उपाय सांगणारे तसे कमीच असतात. त्यांनी सुचविलेल्या उपायांमध्ये अनेकदा नवोन्मेषण असायचे. सैन्यदलातही असा अधिकारी गरजेचा असतो.

त्यांच्या आक्रमकतेचा पहिला प्रत्यय आला तो अरुणाचल प्रदेशात चीनची आक्रमकता १९८७ साली हाताळताना आणि अगदी अलीकडच्या उदाहरणांबाबत सांगायचे तर म्यानमारमधील पहिल्या सर्जिकल स्ट्राइकच्या वेळेस. ती कल्पनाच त्यांची होती. सैन्यदलामध्ये इतर देशाच्या सीमेत घुसून एखादी कारवाई करण्यासाठी मंजुरी मिळवणे ही अतिशय कर्मकठीण अशी गोष्ट असते. त्यातही देशाच्या पातळीवर सर्वोच्च स्थानी असलेल्या राजकीय नेतृत्वाच्या गळी सर्जिकल स्ट्राइकची कल्पना उतरणे हे अधिकच कठीण. पण ते सारे जनरल रावत यांनी अतिशय खुबीने आणि यशस्वीपणे केले. बालाकोटच्या हल्ल्याच्या वेळेस ते लष्करप्रमुखच होते. अगदी अलीकडे म्हणजे गलवान प्रकरणानंतर चीनशी झालेल्या चर्चेमध्ये भारताचे वर्चस्व राहिले. कारण भारतीय सैन्याने खुश्कीच्या मार्गाने कारवाई करत कैलास पर्वतरांग ताब्यात घेतली. या हालचालीमुळे चीनची अधिकच पंचाईत झाली. या कारवायांच्या यशस्वितेमध्ये जनरल रावत यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले.

आता तर सारे जग बदलले आहे. आणि साहजिकच आहे, की संरक्षण दलांनाही त्याला सामोरे जावे लागणार. त्यामुळे दलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांची नेमकी मांडणी राजकीय नेतृत्वासमोर करून त्यासाठी होकार मिळविणे हा महत्त्वाचा भाग होता. ते कार्यही जनरल रावत यशस्वीरीत्या पार पाडत होते. भारतीय सैन्यदलाचा प्रवास आता एकात्मिक युद्धगटाच्या दिशेने होणे अपेक्षित होते. सर्व सैन्यदले एकत्र येऊन थिएटर कमांड अस्तित्वात येणे हे सैन्यदलांसाठी मोठेच स्थित्यंतर असणार आहे. जनरल रावत असताना हे घडले असते तर ते तुलनेने अधिक सोपे गेले असते. त्यामुळे सर्वाधिक गरज असतानाच्या काळातच त्यांचे असे अकाली निघून जाणे, त्यातही अपघाती मृत्यू ही सैन्यदलांसाठीची मोठी जखम असणार आहे. सर्व सैन्यदले आता अत्याधुनिक होण्याच्या मार्गावर आहेत. या स्थित्यंतराच्या कालखंडात त्यांची उणीव निश्चितच जाणवणारी असेल. भारताने एक आक्रमक मोहरा या अपघातात गमावला. अतुलनीय अशा या आक्रमक संरक्षकास भावपूर्ण श्रद्धांजली!

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cds bipin rawat dies in chopper crash mathitartha dd
First published on: 10-12-2021 at 18:16 IST