तिहेरी तलाक घटनाबाह्य़ ठरविण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा सर्वार्थाने अतिशय महत्त्वाचा आणि पथदर्शी आहे. हा निवाडा वाचताना निवाडा देणाऱ्या न्यायमूर्तीना करावी लागलेली तारेवरची कसरत आणि अनेक टोकदार भावना हाताळताना त्यांनी घेतलेली काळजी पाहिली की, थोडी चिंता वाटते. धर्माचा विषय आला की, तीव्र लोकभावना लक्षात घेऊन आपण कसे गडबडतो, तेही हा निवाडा पुरते स्पष्ट करणारा आहे. बरेचदा आपण वरवरच्या बाबींकडे अधिक लक्ष देतो आणि मुळाला जाऊन भिडणेच विसरतो, असेच आजवर अनेकदा लक्षात आले आहे. कधी तरी एकदा आपण धर्म नावाची बाबही मुळातून समजून घ्यायला हवी. धर्माशिवाय माणूस राहू शकतो का, या प्रश्नाचे उत्तर फारच थोडय़ा म्हणजे अत्यल्प टक्केवारीसाठी ‘हो’ असे आहे आणि बहुसंख्यांसाठी ते ‘नाही’ असे आहे. सर्वानीच बुद्धिवादी असणे आणि त्याप्रमाणे विवेकाने वागणे हे आदर्श असले तरी आदर्श व्यवस्था जगात कुठेच, कधीच अस्तित्वात नसते, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. मग हीच वस्तुस्थिती असेल तर आपण ती स्वीकारून पुढे जाण्याचा विचार का करत नाही, हा प्रश्नच आहे. धर्म मुळात माणसाला लागतो कशासाठी आणि केव्हा? या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात येते की, जगण्यासाठीचा एक मानसिक आधार म्हणून तो धर्माकडे पाहत असतो. दरखेपेस त्याला त्या धर्माच्या तत्त्वज्ञानामध्ये रस असतोच असे नाही. त्यामुळे सर्वच धर्मातील अनेकांना त्या त्या धर्माच्या तत्त्वज्ञानासंदर्भात काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरे त्यांना देता येतीलच असे ठामपणे सांगता येत नाही किंबहुना नाहीच देता येत. पण त्याकडे मानसिक आधार म्हणून ते पाहतात, हे निश्चित.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे असेल तर मग या धर्माची गरज त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात केव्हा भासते? जन्माच्या वेळेस म्हणजेच नामकरण सोहळा, लग्न (यात प्रत्यक्ष लग्न आणि काडीमोड म्हणजेच घटस्फोट किंवा तलाक यांचाही समावेश आहे.) आणि तिसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारसा हक्क. या तिन्ही ठिकाणी धर्म किंवा तुमची जात महत्त्वाची भूमिका बजावत असते. कायद्याच्या नजरेने पाहायचे तर हे तिन्ही मुद्दे हे धार्मिक कमी आणि नागरी हक्कांच्या संदर्भातील अधिक आहेत. त्यामुळे या तिन्ही मुद्दय़ांसाठी घटनात्मक बांधिलकी ही सर्वाधिक महत्त्वाची ठरते. त्यामुळेच समान नागरी कायद्याच्या दिशेने जाताना हे लक्षात घेतले पाहिजे की, या तिन्हींच्या संदर्भात सर्वच धर्मामध्ये असलेले भेद मिटवणे महत्त्वाचे असेल. म्हणजेच या तिन्हींच्या संदर्भात घटनेने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही आणि त्याच वेळेस समानता आहे हे पाहणे व समानता राखणे महत्त्वाचे ठरावे. त्यामुळे या तिन्हींच्या बाबतीत सर्वधर्मसमानता आणणारे घटनातत्त्व जे लागू आहेच त्याचा पुनरुच्चार करत ते अधोरेखित करतानाच धर्मविषयक सर्व कायदे मोडीत काढणे हाच आदर्श मार्ग असू शकतो. किमान धर्माच्या संदर्भातील कोणतेही कायदे या तिन्हींच्या संदर्भात कोणतीही ढवळाढवळ करू शकणार नाहीत, असा स्वतंत्र घटनात्मक मसुदा मंजूर करणे हे महत्त्वाचे पाऊल असू शकते.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Constitutional binding
First published on: 01-09-2017 at 01:05 IST