इसवी सनपूर्व शतकामध्ये व्यापाराच्या किंवा मग कामाच्या निमित्ताने जगभर गेलेल्यांमध्ये गुजराती व्यापारी आणि महाराष्ट्रीयांचा समावेश होता, याचे पुरावेही पुरातत्त्व संशोधकांना सापडले आहेत. केवळ युरोपातच नव्हे तर आफ्रिकेशीही हा व्यापार जोडलेला होता. अटकेपार झेंडा रोवलेल्या या महाराष्ट्रीयांनी अमेरिकेच्या उदयानंतर मराठीचा झेंडा तिथेही रोवला. माहिती तंत्रज्ञानाची गंगा असलेल्या सिलिकॉन व्हॅलीवरही भारतीयांमध्ये मराठी तंत्रज्ञांचा समावेश नजरेत भरणारा आहे. जागतिकीकरणामुळे तर सर्वच अर्थव्यवस्थांचे दरवाजे खुले झाले आणि भरपूर गोष्टी ग्लोबल झाल्या. आता तर आपला गणपती बाप्पाही ग्लोबल झालेला दिसतो. जगभरात तो एलिफंट गॉड म्हणून केवळ ओळखला जायचा. आता तो केवळ तेवढय़ापुरताच मर्यादित नाही, त्याच्याशी या देशाची नाळ आणि संस्कृती जोडलेली आहे, हे दाखविण्याचे काम देशाबाहेर असलेल्या मराठी मंडळींनी करून दाखविले आहे, म्हणून विदेशातील या उत्सवात तेथील स्थानिक नागरिकही सहभागी होताना दिसतात, याची सुरुवात ग्लोबलायझेशनच्या पर्वाआधीच झाली आहे, हे विशेष.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पुलं नेहमी म्हणायचे की, जगाच्या पाठीवर मराठी माणूस कुठेही गेला की, तीन गोष्टी अवश्य करतो; मराठी मंडळ, नाटक आणि गणेशोत्सव. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी आता तिथे बृहन्महाराष्ट्र मंडळ (बीएमएम) नक्की सापडणार आणि गणपती बाप्पादेखील!
अवघ्या महाराष्ट्राचा हा लाडका उत्सव राज्याबाहेर आणि देशविदेशातही तेवढय़ाच धडाक्यात साजरा होतो. किंबहुना तो तिथे साजरा करताना तिथल्या मंडळींचा कसच लागतो. विदेशात तर मिरवणुकांवर ध्वनिप्रदूषणामुळे बंदी, सर्वानी एकत्र यायचे तर गणपतीची सुट्टी नसते. नाटक करणेही तेवढे सोपे नाही, विसर्जनावर बंदी, मग करणार काय अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. राज्यात हा उत्सव जोरदार साजरा करताना त्या उत्सवाबरोबरच बाप्पालाही ग्लोबल करणाऱ्या या देशविदेशातील मराठी मंडळींचा मात्र विसर पडतो. विदेशात पाचशे जणांसाठी नैवेद्य किंवा महाप्रसाद करायचा तोही मराठमोळा ही सोपी गोष्ट नाही, मात्र या साऱ्यांनी या समस्यांवर यशस्वीरीत्या मात केली असून त्याबद्दल या साऱ्यांचे कौतुक व्हायलाच हवे. म्हणूनच यंदा गणेश विशेषांकाचा दुसरा भाग बाप्पाला ग्लोबल करणाऱ्या या सर्व मराठी मंडळांना समर्पित करण्याचा निर्णय ‘लोकप्रभा’ने घेतला. मंडळाचा इतिहास व विद्यमान कार्यक्रम तेवढय़ाच उत्साहाने त्यांनी लिहून पाठवला. त्या निमित्ताने या ग्लोबल बाप्पाचे दस्तावेजीकरणही झाले. यात त्यांच्या अडचणींपासून ते या मातीच्या असलेल्या ओढीपायी सारे काही करण्याची असलेली ऊर्मीही जाणवल्याशिवाय राहात नाही. ई-मेलवरच्या आरत्यांसाठी तंत्रज्ञानाच्या घेतल्या जाणाऱ्या मदतीपासून ते मायबोलीच्या उभारलेल्या शाळांपर्यंत अनेक बाबी आपल्या ध्यानात येतात. मराठी टिकवण्याचे आणि भाषा टिकवण्याचे काम तिथेही तेवढय़ाच जोमाने होते आहे, हे लक्षात येते. काही मंडळे तर त्यांच्या प्रतीकात्मक पूजनातून पर्यावरण रक्षणाचा धडाही देऊन जातात. हा उत्सव ग्लोबल करण्याची ही ऊर्मी स्पृहणीय आहे.
ग्लोबल बाप्पा मोरया!

विनायक परब

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Global bappa morya
First published on: 18-09-2015 at 01:32 IST