विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
ब्रिगेडिअर सावंत गेले काही दिवस सुरू असलेल्या म्युच्युअल फंडांच्या जाहिराती सतत पाहात होते. सर्वच वयोगटांतली मंडळी आता म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताहेत हे त्यांना लक्षातही आलं होतं. मॉर्निग वॉकच्या वेळेस भेटणाऱ्या तरुणांची चर्चाही शेअर बाजारावरच होते आणि आताशा पार्कमध्ये येणारे फक्त नानाच नव्हे तर नानीदेखील गुंतवणूक व उर्वरित आयुष्य यावर अधिक चर्चा करताना त्यांना परिस्थिती बदलल्याची जाणीव झाली होती. एरवी लष्करात दाखल झाले त्याही वेळेस राष्ट्रप्रेमाच्या पॅशनबरोबरच पेन्शन हे इतर आकर्षणांपैकी एक महत्त्वाचे आकर्षण होते. पण अलीकडे निवृत्तीनंतर मुलाने उच्च शिक्षणासाठी विदेशी जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा काळजाचा ठोका चुकला होता क्षणभर. जान्हवी आणि केदार या दोन्ही मुलांसोबत गुंतवणूक सल्लागार असलेल्या त्यांच्या भाच्याला अनंतला भेटायलाच हवं असं ठरवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जीवन विमा तर काढलाच पाहिजे असं खूप आधीपासून डोक्यात होतं म्हणून सावंतांनी संवादाची सुरुवातही तशीच केली. तर मुलगा म्हणाला परतावा किती आहे हे पाहायला पाहिजे. त्यावर अनंतने विम्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आधी समजून घ्या आणि मग वय पाहून विम्याचे संरक्षण निश्चित करू असा सल्ला दिला. चर्चेदरम्यान सावंत कुटुंबाला असं लक्षात आलं की, विमा निवडताना प्राधान्यक्रम आयुष्यातील घात- अपघात- विकार लक्षात घ्यायचे असतात; त्यात जोखमीचे नियोजन महत्त्वाचे असते. इथूनच मग गुंतवणूकविषयक त्यांचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात झाली.

या संवादादरम्यान प्रत्येकाचे वय, त्या त्या वयातील आजारपणांची शक्यता, जोखीम स्वीकारण्याची असलेली क्षमता (जी वाढत्या वयानुसार अनेकदा कमी होत जाते) व आजूबाजूला बदलणारी अर्थव्यवस्था यांची सांगड गुंतवणुकीत कशी घातली जाते ते पटवून दिले. गोखले आजोबांना शेअर बाजाराकडे लक्ष ठेवण्याची व त्यानुसार कृती करण्याची लावून घेतलेली सवय स्वित्र्झलडची सफर घडवून आणण्यास कशी फायदेशीर ठरली आणि त्याच वेळेस बाजार तेजीत असतानाही त्याचा फायदाच न घेतल्याने जोशी आजोबांना त्याचा फारसा व वेळीच फायदा कसा झाला नाही, तेही त्याने सांगितले. ‘प्लान फॉर वर्स्ट’ म्हणजे सर्व वाईटच घडणार असं समजून नियोजन कसं करायचं ते समजावून सांगितलं. त्यात दीर्घकालीन आणि कमी कालावधीची उद्दिष्टं कशी असावीत, त्याची समीकरणंच समजावली. तरी ब्रिगेडिअर व त्यांच्या पत्नीला समजावून सांगताना त्याचा कस लागत होता. त्याच वेळेस समोर जेवणाची ताटं आली आणि मग तोच धागा पकडून अनंत म्हणाला, गुंतवणूक ही चौरस आहारासारखी असावी, ताटात सारं काही असलं पाहिजे. कबरेदकं, प्रथिनं महत्त्वाची. त्याचबरोबर कोशिंबीर, लोणचं, भाजी, ताक प्रत्येकाच्या कॅलरीज ठरलेल्या. आपण किती काम करतो किंवा किती काम करणार त्यानुसार कॅलरीज घ्यायच्या तसंच आहे, गुंतवणुकीचं. आपलं वय, परिस्थिती घरची, आर्थिक आणि शारीरिक व भविष्यातील उद्दिष्टे ते पाहून त्यानुसार ठरवायचं. जोखमीची तयारी ठेवायची, त्याचेही नियोजन हवेच. एकच एक जेवण आपण आयुष्यभर नाही जेवत. त्यात सतत बदल असतो, कधी कंटाळा आला म्हणून तर कधी चवबदलासाठी. कधी आपण आजारपणानुसारही डॉक्टरच्या सल्ल्याने आहारात बदल करतो, तसंच गुंतवणुकीचंही आहे. या उदाहरणाची मात्रा नेमकी लागू झाली. त्यावर सर्वच जण एका स्वरात म्हणाले,

सही है!

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investment
First published on: 27-07-2018 at 01:10 IST