आदिम काळापासून पुरुषांच्या मनात स्त्रीरूपाचे कोडे होतेच. सृजनशक्ती हीच तिची खरी शक्ती आहे, असे त्याला वाटत होते. यातूनच पहिली देवता आकारास आली असावी, असा पुरातत्त्वतज्ज्ञ आणि मनुष्यवंशशास्त्रज्ञांचा कयास आहे. ती देवता स्त्रीरूपी असणे तेवढेच साहजिक होते. मग तो देश प्राचीन भारत असो किंवा मग प्राचीन ग्रीस अथवा रोम. तिथे सुरुवातीच्या काळात लोकप्रिय ठरलेल्या देवता या स्त्रीरूपातीलच होत्या. सुरुवातीच्या काळातील देवी या जीवनदायिनी जलदेवता, प्रजननाचे प्रतिक किंवा मग मुलांचे रक्षण करणाऱ्या तरी आहेत. कधी त्या भारतात हरिती म्हणून येतात तर पíशयन संस्कृतीत अनाहिता म्हणून. त्यांचे हे रूप जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या त्या देशांतील नागरीकरणाच्या टप्प्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती कृषी संस्कृतीने. कृषी संस्कृतीच्या सृजनाशी असलेल्या थेट नातेसंबंधांमुळे हे सृजनोत्सव कृषी संस्कृतीला जोडले गेले. आपल्याकडे साजरा होणारा शक्तीचा नवरात्रौत्सव हा देखील त्यातीलच एक. काळानुसार अर्थ बदलत गेले. या भारतीय सण-उत्सवांचा संशोधकांच्या नजरेतून शोध घेण्याचा ‘लोकप्रभा’चा प्रयत्न असून यंदा पाचव्या वर्षी याच मार्गावर आम्ही आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

नवरात्रौत्सव अनेक जाती-जमाती साजऱ्या करतात. त्यामुळे हा उत्सव फक्त शाक्तांशी संबंधित नाही.   एरवी हे जग म्हणजे माया आणि ब्रह्म असे सांगितले जाते. जाणून घ्यायचे ते शुद्ध ब्रह्म. मायेचे आवरण दूर सारले की, त्या बrयापर्यंत पोहोचता येते असे सांगितले जाते, पण हा शाक्त पंथ माया ही मिथ्यारूप नसून ती सृजनशील आहे, असे मानतो. कदाचित म्हणूनच अवैदिक व वैदिक या दोन्ही परंपरांना शाक्त पंथ सामावून घेतो. शाक्त पंथ, ६४ योगिनी, प्रात:स्मरणीय पंचकन्या, मुळात भारतातील महिषासुरमर्दिनीची प्रतिमा आली कुठून, अशा अनेकानेक विषयांचा तज्ज्ञांनी केलेला वेगळा विचार या अंकात वाचायला मिळेल.

या शोधयात्रेमधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देवीला मानणाऱ्या शाक्त पंथामध्ये जातिभेद नाही किंवा शूद्र अथवा स्त्री हा भेदही नाही, किंबहुना स्त्रीला महत्त्व देणारा असा हा संप्रदाय आहे. त्यात पुरुष साधकास स्त्रीत्व जाणल्याशिवाय देवीच्या पूजेचा अधिकार प्राप्त होत नाही. अर्थात या स्त्रीत्व जाणण्याचा, २१ व्या शतकाच्या संदर्भात नव्याने विचार व्हायला हवा. तसे झाल्यास आताशा समाजात शक्तिरूपीनी स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये झालेली वाढ रोखण्यास मदतच होईल!

तमाम महिलावर्गाला शक्तिरूप होण्याचे सामथ्र्य आणि ते शक्तिरूप समजून घेण्याची जाण पुरुषांना या सृजनोत्सवात प्राप्त होवो!

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri utsav special
First published on: 30-09-2016 at 01:32 IST