त्रिपुरा, नागालॅण्ड आणि मेघालय या तीन राज्यांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व अशा यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्त्वाची वक्तव्ये केली, ‘वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य दिशेला सर्वाधिक महत्त्व असते. कारण समृद्धी तिथून येते म्हणतात. तो देवाचा कोपरा असतो. आता देशाच्या समृद्धीला अधिक बळकटी येईल.’ पंतप्रधानांबरोबर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही त्यांना दुजोरा देत दुसरे वक्तव्य केले ते म्हणजे, ‘या विजयामुळे पश्चिम बंगाल आणि केरळ या दोन कम्युनिस्टशासित राज्यांमध्ये लढणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना प्रचंड मानसिक बळ मिळाले आहे.’ ही दोन्ही वक्तव्ये भाजपासाठी या विजयाला असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करतात आणि त्याचबरोबर पुढील दिशाही स्पष्ट करतात. त्रिपुरामध्ये तर एकही आमदार नसण्यापासून झालेली भाजपाची सुरुवात आणि आताची विजयाची घटिका यामध्ये महदंतर आहे. ते भाजपाने आता अवघ्या काही वर्षांत लांघले आहे, असे कुणालाही वाटले तरी वास्तव मात्र खूपच वेगळे आहे. या साऱ्याची सुरुवात ९०च्या दशकामध्ये झाली, ज्या वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ईशान्य भारतावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. १९९५च्या सुमारास सुनील देवधर नावाचा युवक पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून संघाच्या पठडीत सांगायचे तर पूर्वाचलात दाखल झाला, त्या वेळेस या विजयाचे बीजारोपण करण्यास सुरुवात झाली होती. आताच्या विजयानंतरही देवधर यांचे मोल भाजपाने मान्य केले आहे. या निवडणुकांच्या मोच्रेबांधणीमध्येही देवधर यांनीच अहम भूमिका बजावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाच्या दृष्टीने ही लढाई केवळ राजकीय नव्हती. तर ती गेली २५ वर्षांहून अधिक काळ या ईशान्य भारतात सुरू असलेली धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक अशी लढाई होती. आजही बहुतांश भाग हा ख्रिश्चनबहुल असून तिथे आजवर कम्युनिस्ट आणि काँग्रेस दोघांचेही प्राबल्य राहिले आहे. प्रथमच या दोघांचेही येथील गड उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपाने केले आहे.  कम्युनिस्टांसाठी हा मोठाच हादरा आणि त्याचबरोबर धडाही आहे. इथली ही लढाई प्रामुख्याने वैचारिक, तशीच ख्रिश्चन धर्मीयांना जवळचे असलेले कम्युनिस्ट आणि काँग्रेस विरुद्ध िहदुत्ववादी भाजपा अशी आहे, असेच आजवर भाजपाविरोधकांकडून भासविण्यात आले होते. त्याच भांडवलावर आजपर्यंत अनेक विजयही मिळवले. पण आता मात्र समीकरणे बदलली आहेत. देशातील ७० टक्के जनता ज्या राज्यांमध्ये राहाते अशा सर्वाधिक राज्यांवर भाजपाची सत्ता आहे. सत्ता अनेक ठिकाणची समीकरणे वेळोवेळी बदलत आली आहे, हा आजवरचा इतिहास आहे. मात्र काँग्रेस आणि कम्युनिस्ट दोघांनीही या खेपेस भाजपाला कमी लेखण्याची चूक केली, तीच त्यांना भोवली.

अनेक अंगांनी हा विजय म्हणूनच भाजपासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो.  गुजरातच्या निवडणुकांमध्ये भाजपा काठावर उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरोधात देशभर वातावरण तयार होते की काय असे वाटू लागले होते. आता २०१९ची लोकसभा निवडणूक मोदी आणि भाजपा दोघांसाठीही सोपी राहिलेली नाही, अशा चर्चा- वाद यांना उधाण आले होते. गुजरातने मोदी-शहा जोडगोळीला जमिनीवर आणण्याचे काम केले, असेही अर्थ काढले गेले. त्यात तथ्य होतेच. पण म्हणून त्यामुळे ईशान्येत भाजपाला यश मिळणार नाही, हा ठोकताळा चुकीचाच होता. गेल्या अनेक वर्षांत निवडणुका आणि मतदारांचे ठोकताळेही बदलले आहेत, याचाच विसर कम्युनिस्ट आणि काँग्रेसला पडला असावा. काँग्रेसच्या बाबतीत बोलायचे तर ही निवडणूक त्यांनी फारशी गांभीर्याने घेतलेलीच नव्हती. तर कम्युनिस्टांना जुनेच ठोकताळे पुन्हा काम करतील, असे वाटले.  त्या धुंदीत त्यांचे गर्वहरण झाले. आजवर कोणताही सक्षम पर्याय त्रिपुरामध्ये उपलब्ध नव्हता त्यामुळेच कम्युनिस्टांचे आलबेल होते, असा निष्कर्ष त्यामुळेच काढता येतो. भाजपाचा पर्याय सक्षम असल्याचे जाणवल्यानंतर मतदारांनी धर्म-सांस्कृतिकता-वैचारिक विरोध बाजूला ठेवत भाजपाला पसंती दिली आहे.  चर्चने भाजपाविरोधासाठी जारी केलेले फर्मानही नागरिकांनी फेकून दिले आहे. कारण लोकांच्या दृष्टीने विकास महत्त्वाचा असतो आणि विकासाची दारे त्रिपुरामध्ये अगदीच किलकिली होती. किंबहुना देशात सातवा वेतन आयोग लागू असतानाही केवळ चौथ्या वेतन आयोगाद्वारेच वेतन घेणाऱ्या राज्यवासीयांच्या दृष्टीने विकासाची दारे बंद होती, अशा वेळेस इंटरनेटयुगात विकासाच्या वारूवर आरूढ झालेल्या भाजपाची भुरळ न पडती, तरच नवल होते. पण हा साधा मुद्दाही कम्युनिस्टांच्या लक्षात आला नाही.

या निवडणुकीमध्ये काँग्रेसची अवस्था तर िरगणाबाहेर फेकल्या गेलेल्या स्पर्धकासारखी झाली आहे. हा स्पध्रेचा तट्ट गुजरातच्या निवडणूक निकालांपूर्वी ज्या अवस्थेत होता, त्याच अवस्थेवर आल्यासारखी स्थिती आहे. मात्र भाजपाच्या दृष्टीने विजय सर्वात महत्त्वाचा आहे, कारण गेल्या अनेक वर्षांत थेट आमनेसामने कम्युनिस्टांना पराजित करण्याचे पाहिलेले त्यांचे स्वप्न सुमारे पावशतकानंतर प्रत्यक्षात आले. मेघालय आणि नागालॅण्डमधील विजय त्रिपुराइतका व्यापक नसला तरी त्याचेही स्वतंत्र महत्त्व आहेच आहे. कारण या दोन्ही राज्यांमध्ये मिळालेला प्रतिसाद हा भाजपासाठी तेवढाच अभूतपूर्व आहे. आणि या साऱ्याचा ईशान्य भारताच्या संदर्भात विचार करताना म्हणूनच भाजपाचा हा प्रवेश महत्त्वाचा ठरतो. इथे विजयासाठी आवश्यक त्या सर्व क्लृप्त्या भाजपाने वापरल्या. त्यात नाराज काँग्रेसींना भाजपामध्ये प्रवेश देण्यापासून ते ईशान्येतील सर्व लहान-मोठय़ा स्थानिक पक्षांसोबत जुळवून घेत निवडणूक िरगणात उतरण्यापर्यंत. केवळ त्या सर्व मेहनतीमुळेच या विजयाचा मार्ग त्यांच्यासाठी खुला झाला. नागालॅण्डमध्ये कधी नव्हे त्या मिळालेल्या १२ जागा हे या पाश्र्वभूमीवर मोठेच यश ठरते. कारण या १२ जागा ८८ टक्के ख्रिश्चनबहुल इलाख्यातून आल्या आहेत.

मेघालयात खरे तर काँग्रेसला सर्वाधिक जागा आहेत. पण असे असतानाही गोव्यात ज्याप्रमाणे भाजपाने चपळाई करून सत्तास्थापनेचा दावा केला, तशीच चपळाई त्यांनी ईशान्येतही दाखवली. इथेही काँग्रेस कमी पडली. त्यामुळे कम्युनिस्ट आणि काँग्रेस म्हणतात त्याप्रमाणेच सगळाच काही पशांचा खेळ नाही. राजकारणातील निर्णयचातुर्यात भाजपा वरचढ ठरला यात शंकाच नाही. निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि सत्तास्थापनेचा दावा यात चाली महत्त्वाच्या ठरल्या त्या राम माधव यांच्या.

गुजरातच्या निकालांनंतर भाजपावर खूप मोठय़ा प्रमाणावर टीका झाली होती. त्याची धार कमी करण्याचे काम या विजयामुळे होईल. अर्थात या दोन्ही घटनांचा तसा एकमेकांशी थेट संबंध नाही. या दोन्ही निकालांमधील समान दुवा आहे तो जनतेच्या रोषाच्या. तरीही त्या टीकेला उत्तर मिळाले असे भाजपा म्हणून शकते, कारण आता त्यांच्या हाती चुकीचा असला तरी युक्तिवादाचा मुद्दा आहे. मात्र याहीपेक्षा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आता ते स्वत:ला राष्ट्रीय पक्ष म्हणवू शकतात. याहीपूर्वी ते म्हणायचे पण त्या म्हणण्याला धार नव्हती, कारण ईशान्येत त्यांना स्थानच नव्हते. आता येथे असलेला त्यांचा प्रभाव व प्रत्यक्ष राजकारणातील स्थान दोन्ही महत्त्वाचे आहे. म्हणूनच पंतप्रधान ईशान्येचा उल्लेख थेट देशाच्या समृद्धीशी करतात. याही दृष्टीने भाजपासाठी हा विजय अनन्यसाधारण ठरतो.

ईशान्येतील कमी प्रभाव हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट दोघांसाठीही चिंताजनकच आहे.  खरे तर २०१९ साठीची ही इशाऱ्याची खणखणणारी घंटाच आहे. आता भाजपाचे लक्ष हे केरळ आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांकडे असणार आहे, यात शंकाच नाही. ईशान्येतील विजय केरळ आणि बंगालमधील कार्यकर्त्यांसाठी मानसिक बळ देणारे आहेत, हे म्हणताना तीच दिशा स्पष्ट होते. अर्थात याचा अर्थ बाकीच्या निवडणुका म्हणजे भाजपाशासित राज्यांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुका या भाजपासाठी सोप्या आहेत, असे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल कारण आता केवळ राजकारण नव्हे तर मतदारही बदलला आहे, त्याला गृहीत धरले जाते आहे, असे लक्षात आले की, तो आपले सामथ्र्य दाखवतो. शिवाय गुजरातपासून त्रिपुरापर्यंत सर्वच निकालांनी हेही तेवढेच सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट केले आहे की, स्थानिक मतदारांचा रोष निवडणुकांचे निकाल स्पष्ट करतो. तो कौल मग पश्चिमेस असलेल्या गुजरातमधून येतो की, ईशान्येला असलेल्या त्रिपुरामधून याला मग फारसे महत्त्व उरत नाही.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tripura nagaland meghalaya assembly election 2018 bjp win
First published on: 09-03-2018 at 01:08 IST