अगदी पाकिस्तानी सीमेजवळ असला तरी उरी हा भारतातील प्रांत तसा शांतच असतो. किंबहुना सीमावर्ती भाग असूनही येथील जनता आणि भारतीय लष्कर यांच्यातील संबंध संपूर्ण काश्मीरमध्ये सर्वाधिक चांगले म्हणता येतील, असेच आहेत. पण रविवार, १८ सप्टेंबरच्या पहाटेस चार दहशतवाद्यांनी थेट उरी येथील मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यामध्ये १८ भारतीय जवान शहीद झाले आणि उरी हे गाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. खरेतर भारतीय जवान शहीद झाले असे म्हणण्यापेक्षा ते हकनाक बळी गेले असे म्हणणे अधिक योग्य ठरावे कारण पठाणकोट प्रकरणातून आपण कोणताही धडा शिकलो नाही, हेच या हल्ल्यातून सिद्ध झाले.  हा हल्ला हे आपले लष्करी आणि राष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवरील गुप्तवार्ता संकलनातील अपयशच म्हणायला हवे.  महत्त्वाचे म्हणजे पठाणकोट हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर ते अधिकच अधोरेखित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहाटेच्या वेळेस गस्तीगट बदलत असताना झालेला हल्ला; ती वेळ दहशतवाद्यांनी नेमकी साधल्याचे आणि सारे काही पूर्वनियोजितच असल्याचा मुद्दा पुरता स्पष्ट करणारा आहे.  आपण तो रोखू शकलो नाही हे आपले अपयश. शिवाय आजवर इतर कोणत्याही कारवाईत गमावलेल्या जवानांच्या संख्येपेक्षा ही संख्या खूपच अधिक आहे. बहुतांश दहशतवादी हल्ल्यांना स्थानिक मदत असतेच, असे आजवर अनेकदा झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये स्पष्ट झाले आहे. अर्थात, असे असले तरी २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील स्थानिक हात शोधण्यात अद्याप आपल्याला यश आलेले नाही. बहुतांश उरी हे लष्कराशी सलोख्याचे संबंध असलेले आहे, असे असले तरी त्यामध्ये असलेला अस्तनीतील निखारा हाही शोधावाच लागेल. कारण, पाकिस्तानातील मुझफ्फराबाद तुलनेने जवळ असले आणि भारत-पाक सीमा हाकेच्या अंतरावर असली तरी लगेचच घुसखोरी करून हल्ला केला जाणे हे दहशतवादी हल्ल्याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना अशक्य वाटते. ज्या नेमकेपणाने हल्ला झाला तो पाहता त्याआधी दहशतवाद्यांनी त्या संपूर्ण परिसराची पाहणी व्यवस्थित केलेली होती, त्यामुळे एवढा नेमका हल्ला शक्य झाला, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचाच अर्थ किमान एक- दोन दिवस आधी तरी दहशतवादी इथे आलेले असावेत किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कुणा तरी एका स्थानिकाने संपूर्ण माहिती व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचेल हे पाहिलेले असावे. म्हणूनच हा हल्ला म्हणजे आपले गुप्तवार्ता संकलनातील अपयश आहे, असेच म्हणावे लागते.

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uri attack
First published on: 23-09-2016 at 01:39 IST