News Flash

मी, ती आणि मामा

जबरदस्त कंटाळा आला होता. कॉलेजचे दिवस संपले होते. परीक्षा देऊन जवळपास दोन महिने उलटले होते. रिझल्टची वाट बघत घरी खितपत पडलेलो असायचो.

| July 25, 2014 01:07 am

जबरदस्त कंटाळा आला होता. कॉलेजचे दिवस संपले होते. परीक्षा देऊन जवळपास दोन महिने उलटले होते. रिझल्टची वाट बघत घरी खितपत पडलेलो असायचो. जून महिना उजाडला होता. माझ्या बॅचची मित्रमंडळी त्यांच्या आयुष्याचा मार्ग निवडून मोकळी झाली होती. सॉरी, बिझी झाली होती. शाळेतले मित्र सगळे इंजिनीअर व्हायला निघाले होते. त्यांच्याही परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या आणि ते कुठे कुठे ‘आय.व्ही.’ला पळाले होते. ज्युनिअर लोकांचंही कॉलेज सुरू झालं होतं. कोणाकडेच घालवण्यासाठी वेळ नव्हता. पाऊससुद्धा पडत नव्हता. वेळ मलासुद्धा घालवायचा नव्हताच, पण तो सत्कारणी लावायचा म्हणजे नेमकं काय करायचं, हा प्रश्न रोज सकाळी उठताना आणि रात्री झोपताना मला बुचकळ्यात टाकायचा.
अशाच एका उनाड दिवशी मी आमच्या कॉलनीमागच्या लिंक रोडवर फेरी मारायला बाहेर पडलो. संध्याकाळी खरेदीला निघालेली, कामावरून, क्लासवरून, कॉलेजवरून परतणारी बरीच माणसं दिसत होती. त्यांत बरेच अनोळखी चेहरे घोळक्याने किंवा जोडीने जाताना दिसत होते. त्यांतले काही चेहरे पाहून ते अनोळखी होते याचं वाईट वाटत होतं. पण उपाय नव्हता. डोळ्याच्या कोपऱ्यातून शक्य त्यांना आणि शक्य तेवढं सभ्यपणे न्याहाळत मी सावकाश चालत होतो. भरभर चालण्यासाठी उत्साह तरी कुठून आणायचा माणसाने!
चालत चालत मी फ्लायओव्हर गाठला. हा फ्लायओव्हर तसा नवा आहे. याचं उद्घाटन करण्यासाठी पुढाऱ्यांना बरेच महिने वेळ मिळत नव्हता म्हणून तयार झाल्यानंतरसुद्धा हा बरेच महिने तसाच पडून होता. मात्र त्याचा वापर होत नव्हता असं मात्र नाही. इथं वारा छान वाहतो. लोक वारा खायला आपल्या मित्रां-‘ना’ नाही तर मैत्रिणी-‘ला’ घेऊन इथं यायचे. बघता बघता या फ्लायओव्हरला एखाद्या पार्काचं रूप प्राप्त झालं. सकाळी सकाळी इथे येऊन पाहिलं तर मॉर्निग वॉक आणि जॉगिंग करणारे बरेच लोक नजरेस पडायचे. शेवटी फ्लायओव्हरच्या आसपास राहणाऱ्या जागरूक नागरिकांनी तक्रारी केल्या आणि घाईघाईत कधी तरी उद्घाटन करून एकदाचा हा फ्लायओव्हर सुरू झाला. पण तरी इथे येणाऱ्या घोळक्यांना आणि युगुलांना खीळ बसली नाही. फ्लायओव्हरच्या दुतर्फा, रस्त्याच्या कडेला टेकून लोक कट्टा करायला लागले. काही जणांसाठी हा मैत्रीचा कट्टा, काही जणांसाठी प्रेमाचा. पण प्रेमाला निर्धास्तपणे निसर्गाच्या अगदी जवळच्या रूपात व्यक्त करणारी मंडळी लोकांच्या डोळ्यांत खुपतात. म्हणूनच कदाचित त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणायला फिरतीवर असलेले पोलीसमामा अधूनमधून त्यांना हाकलून लावत असतात, कधी कधी एखादं युगूल जास्तच जवळीक साधत असलं तर त्यांना दमदाटी करतात, नाही तर उचलून घेऊन जातात. त्या दिवशीही तेच चालू होतं. मी एकटाच चालत चालत फ्लाय ओव्हरच्या मध्यावर आलो होतो. इथे सगळ्यांत मस्त वू आणि सुस्त करून टाकणारा वारा वाहत होता. माझ्या जवळच एक युगूल बाईक कडेला लावून तिच्यावर टेकून बसलं होतं. दोघंही हवेत एकाच नळीने आळीपाळीने धूर सोडत बसले होते. दोन पोलीसमामा फटफटीवरून आले, थांबले, आणि त्यांनी या दोघांना हटकलं. युगूल भलतंच धीट होतं. मामांनी आवाज चढवला, काठी जमिनीवर आदळली आणि युगूल दचकून बाईकवर स्वार होऊन तिथून पसार झालं. मामा शिट्टय़ा वाजवत वाजवत पुढे निघाले. दुसऱ्यावर हसू नये, पण मला मजा वाटली आणि हसायलासुद्धा आलं. आपण एकटे असताना दुसरं कोणी दुकटं दिसलं, की हेवा वाटतो. आणि त्या दुकलीला मजा करता आली नाही, की होऊ नये असा आसुरी आनंद होतो. तसा तो मला झाला. मामांनी माझ्याकडे पाहिलं, ‘बघितली ना ही पैसेवाल्यांची मुलं? एवढूस्सा पोरगा आणि मला माज दाखवतो. एक ठेवून दिली असती ना तर इथल्या इथे ओली झाली असती. नसता ताप डोक्याला!’ आणि तत्सम काही तरी बडबडत ते फटफटीवर स्वार होऊन पुढे निघाले.
मी पुन्हा माझं लक्ष रुळांवर केंद्रित केलं. मी त्या ठिकाणी गेलो की त्या रुळांवरून धावणाऱ्या गाडय़ांकडेच बघत राहतो, एखाद्या लहान मुलासारखा. एका ट्रेनला सिग्नल लागला आणि ती तिथेच माझ्या नजरेच्या टप्प्यात येऊन थांबली. माणसांनी खचाखच भरलेल्या डब्यांच्या प्रत्येक दारातून, काही खिडक्यांतून पिंका बाहेर पडल्या. कुठून कागद किंवा पिशव्या फेकल्या गेल्या. मला राग आला, वरून जोरदार आवाज लावून त्या सगळ्यांना शिव्या घालाव्याशा वाटल्या. पण नेहमीप्रमाणे संकुचित वृत्तीने ग्रासलेल्या माझ्या मनानं मला आवरलं आणि मी तसाच थोडा वेळ ते दृश्य हताशपणे बघत उभा राहिलो. ट्रेन एकदाची सुटली, आणि मी नि:श्वास टाकत इकडे तिकडे नजर फिरवली. माझ्या डावीकडे, माझ्यापासून दोन पावलांच्या अंतरावर एक मुलगी येऊन उभी राहिली होती. मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा तीसुद्धा त्या ट्रेनकडे बघत होती. पण तिची नजर स्थिर होती. ट्रेनपाठोपाठ धावत नव्हती. मी तिच्याकडे पाहिल्यावर तिचीही नजर माझ्याकडे वळली. मी नजर पटकन खाली घेऊन पुढच्या ट्रेनची वाट पाहत उभा राहिलो. तरीही तिची मान माझ्या दिशेने थोडा वेळ वळलेली होती. खुन्नस देत असेल कदाचित, तिला न्याहाळल्याचा राग आला असेल. तिने मान पुन्हा समोरच्या दिशेने वळवल्याचं मला कळलं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझी छातीतली धडधड वाढलेली होती. मला आश्चर्य वाटलं नाही. हे नॉर्मल होतं. कुठल्या का भावनेने पाहिना, मुलगी आपल्याकडे पाहत्येय म्हटल्यावर धडधड वाढतेच. पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की ती मुळात माझ्या एवढय़ा जवळ येऊन का उभी राहिली होती. माझी काहीच तक्रार नव्हती म्हणा. पण कुतूहल भरमसाट होतं. मी शक्य तेवढा मनावर ताबा ठेवून नजर समोर स्थिरावण्याचा प्रयत्न करत होतो. पण डोळ्यांची बुब्बुळं आपोआप डावीकडे घरंगळत जात होती.
समोरून दोन-तीन ट्रेन्स जाताना मी पाहिल्या. दर वेळी ट्रेन आली की ती स्वत:ची मान झुकवताना मला दिसायची. ट्रेन भरधाव निघून गेली, रुळांवरून धावताना होणारा आवाज कमी कमी होत बंद झाला, की ती डोकं वर काढायची. मला तिच्याशी बोलायचं होतं. कदाचित ती त्याच भावनेने तिथे येऊन उभी राहत असेल. कदाचित तिच्या मनात त्याच कल्पना येत असतील ज्या ट्रेन्सना बघून माझ्या मनात यायच्या. मी या विचारात गुंतलेला असताना आमच्या मागे फटफटीचा हॉर्न जोरात वाजला. पोलीसमामा परतले होते.
‘काय रे? तुला काय वेगळं सांगायला हवं का? आं?’
‘काका, मी काय केलं?’
‘काय चाललंय तुम्हा दोघांचं?’
‘आमचं?’ मी चमकून तिच्याकडे पाहिलं, तीसुद्धा गडबडलेली दिसत होती. ‘नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.’
‘नावं काय तुमची? घरं-दारं नाहीत तुम्हाला? शाळा-कॉलेज नाहीत? हे काय वय आहे असले धंदे करण्याचं? आपले आई-बाबा आपल्यासाठी किती कष्टं घेतात आणि आपण त्यांना काय देतो? आता तुम्हाला पकडून चौकीवर घेऊन जातो थांबा.. बरं वाटेल ना आई बाबांना? अभिमान वाटेल ना?’ पोलीसमामा भलतेच मूडमध्ये आले होते. मला आजपर्यंत पडलेला प्रश्न आहे हा. पोलीस बाकीच्यांना नेहमी हटकतात, हिसका दाखवतात, इंगा दाखवतात. मी त्यांच्या तावडीत सापडलो की मात्र सल्लासत्र सुरू होतं त्यांचं. एकदा बाईकवरून हेल्मेट न घालता जात असताना मला पकडलं होतं. तेव्हा त्यावरून मला लेक्चर दिलंच. पण माझी शरीरयष्टी पाहून, ‘जीमला जातोस की नाही? काही खातोस की नाही?’ इत्यादी प्रश्न आणि ‘वजन कसं वाढवावं’ यावरूनही मला काही मौलिक सल्ले देण्यात आले.

मला आजपर्यंत पडलेला प्रश्न आहे हा. पोलीस बाकीच्यांना नेहमी हटकतात, हिसका दाखवतात, इंगा दाखवतात. मी त्यांच्या तावडीत सापडलो की मात्र सल्लासत्र सुरू 
होतं त्यांचं.

जे भाव माणसांमध्ये सापडायला हवेत ते आपल्याला निर्जीव वस्तूंमध्ये शोधावे लागतात. याहून वाईट अजून काय आहे रे?’

सध्याच्या केसमध्ये त्यांचं सल्लासत्र संपून चौकशीसत्र सुरू झालं होतं. त्या मुलीने परोपरीने सांगून पाहिलं की ती मला ओळखत नाही. पण मामांचा विश्वासच बसेना. त्यांनी कडक आवाजात फर्मावलं,
‘नावं सांगा तुमची.’
‘रोहिणी पित्रे.’
‘तू रे?’
‘दिनेश विचारे.’
‘कुठे राहता दोघं?’
मुलगी बावचळली. ‘सर प्लीज माझं ऐका तुम्ही..’ गयावया करायला लागली.
‘अगं रोहिणी तू का घाबरत्येस एवढी? थांब जरा मला बोलू दे,’ माझा स्वत:वर विश्वासच बसेना. मी तिच्या नजरेला नजर भिडवून अगदी सहज, जुनी ओळख असल्यासारखं बोलत होतो.
‘काका, ही माझी मावसबहीण आहे. इथे मुंबईत नसते. तिच्या वडिलांची सतत बदली होत असते. त्यामुळे ती सतत कुठेना कुठे तरी फिरत असते. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत आलीये. तिला हा नवा फ्लाय ओव्हर दाखवत होतो.’
‘बहिणीला? इथे?’ मामांची शंका रास्त होती.
‘हो, कारण हा माझा फेव्हरेट स्पॉट आहे. इथे येऊन तासन्तास एकटं उभं राहायला मला आवडतं.’
‘मघाशी कुठे होती ही?’
‘माझ्याबरोबरच होती. फक्त मध्ये जरा इथल्या जवळच्या मॅकडीमध्ये जाऊन आली.’
‘मॅकडी? काही पार्सल आणलंस का?’
बापरे.. आता ‘हो’ म्हटलं की पार्सल दाखवा म्हणणार मामा.
‘नाही, मी वॉशरूम यूज करायला गेले होते.’
मामांचं समाधान झालं नव्हतं. त्यांनी फटफटीवर बसलेल्या दुसऱ्या मामांकडे पाहिलं. दुसऱ्या मामांनी माझा पत्ता विचारला. मी न चाचरता सांगितला. तिचे बाबा काय करतात विचारलं. तिने चाचरत काही तरी थाप मारली.
‘हा भाऊ ना तुझा?’
‘अं.. हो.’
‘मग मघाशी ओळखत नाही का म्हणालीस?’
‘घाबरते हो ती खूप. लहानपणापासून घाबरते. पोस्टमनला बघूनसुद्धा फाटायची तिची लहानपणी. अगं तू थरथरतेस काय एवढी? वेडी आहेस का?’ मला तीच संधी साधून तिला जवळ घ्यावं असं मनात आलं होतं, पण मी आवरलं स्वत:ला.
‘बरं. निघा इथून. थांबू नका जास्त वेळ.’
‘थांबू द्या ना काका. हे देऊळ दिसतंय ना, अंधार पडला की त्याच्यावरचं लाइटिंग दाखवायचंय मला तिला.’
पोलीसमामांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही चेहऱ्यावर शंका स्पष्ट दिसत होती.
‘नक्की भाऊ-बहीण आहात?’
‘हो अहो. हवं तर खात्री करा माझ्या घरी येऊन.’
‘नाही ते आम्ही येऊच-’ आता माझी फाटली, ‘-पण तुम्ही चांगल्या घरातले दिसता. इथे घुटमळू नका जास्त वेळ. आम्ही थोडय़ा वेळाने येऊच परत. तेव्हा दिसता कामा नये तुम्ही इथे. कळलं?’
‘हो-हो’ मी उसनं अवसान आणून म्हटलं. तिने नुसतीच मान डोलावली.
मामांनी, ‘आम्हालाही काळजी वाटते. तुमच्याएवढीच आम्हालाही मुलं आहेत इ. इ.’ भाषण ठोकलं आणि ते चालू पडले. ते निघून गेल्यावर ती मुलगी माझ्याकडे पाहून हसली आणि स्वत:हूनच बोलायला लागली. आभार प्रदर्शनाचे उपचार झाल्यावर आम्ही एकमेकांना आपापली खरी नावं सांगितली. मग ती पुन्हा रुळांकडे बघायला लागली. मला जाणवलं की बोलता बोलता तिने आमच्यामधलं दोन पावलांचं अंतर ओलांडलं होतं.
‘तुझा खरंच फेव्हरेट स्पॉट आहे हा?’
‘हो. पण देवळामुळे नाही. मी ट्रेन्स पाहायला येतो.’
‘माझासुद्धा फेव्हरेट स्पॉट आहे हा.’
‘ट्रेन्स?’
‘ट्रॅक्स!! मला ट्रेन्सचं विशेष कौतुक नाही वाटत.’
‘ट्रॅक्स? तू रूळ पाहायला येतेस?’
‘हो.’
‘ओके.’
‘तुला ट्रेन्स का आवडतात?’
मी थोडा वेळ विचार केला, आणि मी स्वत:शी जे कारण कधी व्यक्त केलं नव्हतं ते मी तिला इतक्या सहजपणे सांगताना स्वत:वरच आश्चर्याने खूश झालो होतो.
‘त्या स्वत:बरोबर एवढय़ा सगळ्या माणसांना घेऊन जातात. स्वत: पुढे जातातच, पण स्वत:बरोबर सगळ्यांना घेऊन जातात. आपलं ध्येय गाठताना ज्याला त्याला त्या त्याच्या-त्याच्या ध्येयापर्यंत पोचवतात. माणसांपेक्षा मला त्या जास्त जिवंत वाटतात. वाटेत कितीही अडथळे आले तरी त्या माणसांना सोडत नाहीत. कितीही माणसं येऊ देत, त्या सगळ्यांना सामावून घेतात. एखाद्या आदर्श नेत्याप्रमाणे, राजाप्रमाणे. पण माणसांना त्यांची काही किंमत नसते. काही आदर नसतो. ज्याच्या अस्तित्वाचा काहीच पुरावा नाही, अशा देवावर आपला जीव ओवाळून टाकतील, पण त्यांच्या प्रापंचिक आयुष्याची जी जीवनवाहिनी आहे, तिच्यावर प्लॅटफॉर्मवरून थुंकतील, आतमध्ये कचरा टाकतील.’
‘ओके एक तर मला प्रापंचिक का काय ते म्हणालास ते कळलं नाही, दुसरं म्हणजे असं काही नाही की कोणालाच आदर नसतो. काही माणसं ट्रेन प्लॅटफॉर्ममध्ये लागत असताना तिला हात लावून नमस्कार करताना दिसतात, ट्रेन सुटली की ‘गणपती बाप्पा मोरया’ ओरडतात. मला स्वत:ला जरी हा अनावश्यक वेडेपणा वाटत असला, तरी आदर नसतो असं तर आपण नाही म्हणू शकत. हो, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला नाही जमत त्या सगळ्यांना.. शेवटी माणसंच ना ती.’
‘तेच तर.. म्हणून तर राग येतो त्यांचा. असो. तुला ट्रॅक्स का आवडतात?’
‘कारण ट्रॅक्स स्वत: पुढे जात नाहीत. ते जिथल्या तिथेच राहतात. ते असतात म्हणून ट्रेन्स त्यांचं ध्येय गाठतात. ते मार्गदर्शक असतात. एखाद्या शिक्षकासारखे. एक बॅच येते, पुढे निघून जाते. दुसरी बॅच येते. पण शिक्षक न थकता, न कंटाळता, योग्य तीच दिशा त्यांना दाखवत राहतात. पण त्यांच्याबद्दल कोणालाच आदर वाटत नाही. कृतज्ञता वाटत नाही. ट्रॅक्सवरसुद्धा लोक थुंकतात, कचरा टाकतात, फक्त जरा जास्त प्रमाणात, इतकंच.’
‘हो गं. खरंच. पण असे योग्य ती दिशा दाखवणारे शिक्षक राहिल्येत कुठे?’
‘मग तू म्हणतोस तसे आदर्श नेते किंवा राजे राहिल्येत?’ मी गप्प झालो. ‘म्हणून तर मला ट्रॅक्स आवडतात. आणि तुला ट्रेन्स. जे भाव माणसांमध्ये सापडायला हवेत ते आपल्याला निर्जीव वस्तूंमध्ये शोधावे लागतात. याहून वाईट अजून काय आहे रे?’
‘खरंय.’
‘चल, मी निघते. तूसुद्धा निघ, नाही तर ते पोलीस खरंच तुझ्या घरी पोचतील. की पत्तासुद्धा खोटा दिला होतास?’
‘नाही खोटा सुचला नाही मला ऐन वेळी,’ मी हसत म्हटलं. पण पोलिसांची भीती आता नाहीशी झाली होती. ती जायला वळली, मी थांबवलं. ती पुन्हा वळली, प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं. तिचा नंबर मागायची हिम्मत होईना.
‘मला माहितिये की आपली फारशी ओळख नाहीये, पण’
‘सांग तुझा नंबर. मी मिस्ड कॉल देते.’
मी हसलो. मला माझा पोपट होणं अपेक्षित होतं. मुलगी जबरदस्त होती. नंबरची देवाणघेवाण होऊन मी चालू पडलो, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं, आणि आयुष्यात काय करायचं हे ठरवण्याचा मनातला आळस नाहीसा झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2014 1:07 am

Web Title: me she and uncle
टॅग : Lifestyle,Story
Next Stories
1 टेकरिव्ह्य़ू : नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन एलजी जीथ्री!
2 नांदी फ्युचरिस्टिक फॅशनची
3 ट्रॅव्हलॉग : …महासागराच्या साक्षीने !
Just Now!
X