सामाजिक आशयाच्या चित्रपट मांडणीचे अनेक प्रकार आहेत. कधी कधी ते केवळ आणि केवळ त्यातील आक्रोश मांडतात, तर कधी उपहासाच्या मार्गाने विषयाची व्याप्ती दाखवतात. अर्थात पद्धत कोणतीही असो तो चित्रपट असायला लागतो. माहीतीपटाचा बाज त्यात टाळायाचे भान असायला हवे. प्रसाद नामजोशीच्या ‘रंगा पतंगा’ने हे भान चांगलेच जपले आहे. मनोरंजनाचे माध्यमातून तिरकसपणे भाष्य करतानाच चित्रपटाची भाषा सांभाळत दिग्दर्शकाने एक चांगला प्रयतन्त केला आहे. पण त्याचबरोबर असा चित्रपट करताना त्यातील आशयाला धक्का लावणाºया गोष्टी टाळायच्या असतात ह्याचे भानदेखील जपावे लागते. रंगा पतंगामध्ये काही ठिकाणी मात्र हे भान पुरतेच विसरले आहे की काय असे वाटत राहते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुष्काळी भागातील एका गरीब शेतकºयाची हरवलेली बैलजोडी आणि ती शोधण्यासाठीचा त्याची धडपड असा आजवर कधीही न हाताळला गेलेला विषय चित्रपटासाठी निवडणे हे नाविन्य म्हणावे लागेल. ते आव्हान सिनेमाकत्र्यांनी अगदी बरोबर पेलंल आहे असं म्हणावं लागेल. विषयाची तीव्रता थेट पोहचावी यासाठी निवडलेली चित्रिकरणाची ठिकाणं, सिनेमॅटोग्राफीच केलेली कमाल हे सार नक्कीच वेगळं आणि नावाजण्यासारखे आहे. ही सारी शोधयात्रा रटाळ होऊ नये म्हणूनन योजलेले काही प्रसंग तर अगदीच अफलातून आहेत. मात्र त्याचवेळी ते नेमकं भाष्यदेखील करतात. सिनेमाकत्र्याला जे काही मांडायचे आहे ते त्याने अशा अनेक प्रसंगातून चपखलपणे दाखवले आहे. एमएटीसारखी दुचाकी, गावातील पाटलाचा आणि ज्योतिषीचा बेरकेपणा, धार्मिक वादाची छुपी किनार, विदर्भातील खेड्यातील अठराविशे दारिद्रय, दुष्काळाची दाहकता असे अनेक घटक वास्तवावर अगदी नेमकं भाष्य करतात. हे दिग्दर्शिय कौशल्य म्हणावे लागेल.

काही प्रसंग अगदी जाणीवपूर्वक योजले असून त्यात चित्रिकरणाची कमाल दाखवली आहे. माळरानावर बैल शोधायला गेल्यावर दिसलेली दुस-या बैलांची हाडे दुष्काळाची दाहकता दाखवतात. विदर्भातील रखरखाट दाखवणारा चौकातील रस्त्यांचा लाँग शॉट, आटलेल्या नदीवरचा लांबसडक पूल, असे जाणीवपूर्वक घेतलेले प्रसंग परिणामकारक ठरतात. केवळ चित्रिकरणातच नाही तर संवादातूनदेखील एकंदरीतच त्या विभागातील समाजाची मानसिकता उलगडत जाते. चारा छावणीतील प्रसंग उपहासात्मक पद्धतीने चांगलेच रंगले आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे सारं चित्रपटाच्या भाषेतून प्रभावीपणे येत राहते. मात्र मध्यंतरानंतर हा विषय अचानक ज्या पद्धतीने प्रसिद्धी माध्यमांच्या हातात दिला आहे तेथे काहीशी गल्लत झाली आहे.

प्रसिद्धी माध्यमांवरील भाष्य (विशेषत: इलेक्ट्रॉनिक), विषयाचा विपर्यास करण्याची त्यांची पद्धत, बातमीची चिरफाड करताना बदलणारा फोकस हे सारे नक्कीच टिकेला पात्र आहे. पण त्या भरात नेमका मूळ विषय काहीसा बाजूला पडतो की काय असे वाटू लागते. आणि हे सारं फिल्मी होत जाते. शेतक-याची शोधकथा माध्यमांच्या ताब्यात जाताना चित्रपट देखील माध्यमांच्या ताब्यात जातो. हा सारा भाग ब-याच पातळीवर घसरत देखील जातो. कधी कधी केविलवाणा वाटतो.

अर्थात प्रभावी आणि चटपटीत संवाद हे या चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. हिंदी आणि मराठी मिश्रित संवादांनी एक वेगळेपणा आला आहे. ग्रामीण लहेजा जपणारे काही शब्द थेटपणे येतात. पण त्यांने प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येते. चित्रपटातील एकमेव गीत हे नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. गझल, कव्वाली अशा साºया अंगाने जाणारे हे हिंदी आणि मराठी मिश्रीत गीत अप्रतिम आहे. गेल्या काही वर्षात हिंदी मराठी मिक्स गीतांची चलती असली त्यात संवंगपणा अधिक असतो. त्या पाश्र्वभूमीवर हे गीत मात्र अगदी विषयाला धरुन आहे. संगीत आणि गायन या दोन्ही पातळ्यांवर परिणामकारक ठरते.

मकरंद अनासपुरेवर आजवर उथळ विनोदी असाच शिक्का अधिक बसला होता. पण या चित्रपटाने त्यांच्यातील सशक्त अभिनेत्याला चांगलाच वाव मिळाला आहे. किमान मेकअप, प्रत्यक्ष लोकेशन अशामुळे साराच माहोल जमून आला आहे. संदीप पाठक आणि नंदिता धुरी यांनी लाजवाब साथ दिली आहे. मकरंद आणि नंदिता अगदी वर्षानुवर्षे एखाद्या गावात राहणारं मुस्लिम जोडप वाटावं असेच आहेत.

सिनेमाकर्त्यांनी एक चांगला प्रयत्न केला आहे. विषयापासून काहीसं घसरण्याचा भाग सोडला तर मनोरंजन करणारा आणि त्याचबरोबर सामाजिक आशय मांडणारा असा चित्रपट पाहायला हरकत नाही.
——————-
कथासूत्र –
जुम्मन (मकंरद अनासपुरे) हा विदर्भातील एका दूरस्थ खेड्यातला गरीब शेतकरी. रंगा पतंगा ही त्याची बैलजोडी हरवते. त्याची तक्रार द्याायला तो पोलिसांकडे जातो, तर पोलिस त्याला वाटेला लावतात. मग तो पोपट (संदीप पाठक) या मित्रासोबत रंगा पतंगाचा शोध घ्यायला लागतो. त्यासाठी तो अनेकांची मदत घेतो. अनेक उपाय करतो. अखेरीस चारा छावणीत आल्यावर त्याची भेट प्रसिद्धीमाध्यमांशी होते आणि मग त्याच्या शोधाला वेगळेच वळण लागते.
——————–
निर्मिती संस्था – फ्लाईंग गॉड फिल्म्स,
विश्वास मीडिया अँड एंटरटेन्मेंट यांच्या सहयोगाने.
प्रस्तुतकर्ता – बिपीन शहा मोशन पिक्चर्स.
निर्माते – अमोल वसंत गोळे, राजेश डेम्पो, माधवी समीर शेट्टी.
सहनिर्माते – सुजाता अनंत नाईक, दिलीप गेनुबा  गोळे.
पटकथा, संवाद, दिग्दर्शन – प्रसाद नामजोशी
कथा – चिन्मय पाटणकर
छायाचित्रण – अमोल गोळे
गीत – इलाही जमादार
संगीत, पाश्र्वसंगीत – कौशल इनामदार
संकलन – सागर वंजारी
रंगभूषा – श्रीकांत देसाई
वेशभूषा – रश्मी रोडे
अ‍ॅनिमेशन – अभिजित दरीपकर
कलाकार – मकरंद अनासपूरे, संदीप पाठक, उमेश जगताप, नंदिता धुरी, सुहास पळशीकर, भारत गणेशपूरे,गौरी कोंगे, अभय महाजन, हार्दिक जोशी, आनंद केकान

मराठीतील सर्व सिने रिव्ह्यू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie review of ranga patanga
First published on: 01-04-2016 at 15:06 IST