News Flash

स्मरण : मंडेला भेटतात तेव्हा..

लेखक दक्षिण आफ्रिकेला गेले असताना भारतरत्न तसंच नोबेल पारितोषिकाचे मानकरी नेल्सन मंडेला यांच्या भेटीचा त्यांना योग आला, त्याचा हा थोडक्यात वृत्तांत.

| November 21, 2014 01:27 am

लेखक दक्षिण आफ्रिकेला गेले असताना भारतरत्न तसंच नोबेल पारितोषिकाचे मानकरी नेल्सन मंडेला यांच्या भेटीचा त्यांना योग आला, त्याचा हा थोडक्यात वृत्तांत.

ते वर्ष होते १९९५. दक्षिण आफ्रिकेचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतात आले होते आणि त्यांना कमी खर्चातील घरे आणि सार्वजनिक स्वच्छतागृह दाखवण्यात आली. यात हुडको आणि सुलभ इंटरनॅशनलच्या कामाबरोबरच दिल्लीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि सुप्रसिद्ध शौचालय प्रदर्शन यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. दक्षिण आफ्रिकेत अशा सुविधा निर्माण व्हाव्या यासाठी त्या सरकारने या तज्ज्ञांना भेटीचे निमंत्रण दिले.

हुडकोचे तसंच सुलभ इंटरनॅशनलचे अधिकारी असे आम्ही सगळे दक्षिण आफ्रिकेला गेलो. प्रिटोरिया ही दक्षिण आफ्रिकेची व्यवस्थापकीय राजधानी. तेथील काम झाल्यावर अन्य शहरांना भेट देण्याचा कार्यक्रम होता. प्रिटोरियामध्येच आमची एके दिवशी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची भेट ठरली होती. सकाळी साडेसातला अध्यक्षांच्या निवासस्थानी भेट होती. आम्ही तिथे जाण्यासाठी हॉटेलच्या लॉबीत तयार होऊन बसलो होतो. इतक्यात निरोप आला की काही अपरिहार्य कारणांमुळे अध्यक्षांची नियोजित भेट रद्द करण्यात आली आहे पण शिष्टमंडळाने हॉटेलच्या लॉबीतच बसून राहावे. अध्यक्ष स्वत: हॉटेलवर येणार आहेत.

माझ्या मनात विचार आला एवढा मोठा माणूस, तो कसचा आपल्याला भेटायला हॉटेलवर स्वत: येणार? पण वाट बघण्यावाचून पर्यायही नव्हता. आणि अचानक हॉटेलच्या लॉबीत अनपेक्षित धावपळ, हालचाल सुरू झाल्याचे लक्षात आले आणि काय होते आहे याचा खुलासा होण्यापूर्वीच अध्यक्ष मंडेला स्वत: हॉटेलमध्ये प्रवेशकरते झाले. भारतातील राजकारण्यांचा अनुभव घेतलेल्या आम्हाला हा मोठा धक्काच होता.

अध्यक्ष मंडेला यांनी आमच्या कामाची माहिती घेतली. वाखाणणी केली आणि असे आश्वासन दिले की त्यांना दक्षिण आफ्रिका सरकारकडून सर्व प्रकारचे साहाय्य मिळेल आणि सोबतच्या सरकारी अधिकाऱ्यांना तसे करण्याची सूचनाही दिली. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की आधीची भेट रद्द करण्यासाठी तसेच कारण होते आणि ते म्हणजे एक विशेष महत्त्वाची व्यक्ती काल संध्याकाळी विमानाने रवाना होणार होती, पण तांत्रिक कारणामुळे उड्डाण रद्द करावे लागले आणि राजकीय शिष्टाचारानुसार त्यांना विमानतळावर त्या व्यक्तीला रवाना करण्यासाठी जावे लागले. बोलण्याच्या ओघात त्यांनी ती व्यक्ती म्हणजे राणी एलिझाबेथ होती असेही सांगितले.

ही लहानशी भेट संपली आणि आम्ही पुढील शहराला जाण्यासाठी विमानतळाकडे रवाना झालो. विमानतळावर चेकइन वगैरे सोपस्कार करून तयार होतेच, तेवढय़ात पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टिमवर अनाउन्समेंट झाली की, भारतीय शिष्टमंडळाच्या सदस्यांनी विमानतळ डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये जावे. बुचकळ्यात पडलेले शिष्टमंडळाचे आम्ही सगळे सदस्य आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे असा विचार करत डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये पोचलो.

तेथे आम्हाला सांगण्यात आले की अध्यक्ष मंडेलांच्या प्रतिनिधीला आमची भेट घ्यायची आहे. अध्यक्षांची प्रतिनिधी एक महिला होती. ती प्रत्येकाच्या हातात एक पार्सल ठेवत म्हणाली की अध्यक्ष मंडेलांनी तुमच्यासाठी एक भेटवस्तू पाठवली आहे. तिचे आभार मानत आणि एवढा मोठा मनुष्य आपली आठवण ठेवत भेटवस्तू पाठवतो याचा अचंबा करत आम्ही ते पार्सल उघडले आणि बघतो तर आत मंडेलांचे आत्मचरित्र होते. त्यावर सुरुवातीलाच नेल्सन मंडेलांची स्वाक्षरी होती.

भारताचे एक साधे शिष्टमंडळ, पण अध्यक्ष स्वत: आठवण ठेवून हॉटेलवर भेटायला येतात काय आणि त्यावर कडी म्हणजे स्वाक्षरी असलेले आपले आत्मचरित्र पाठवतात काय, सगळेच जगावेगळे. अत्युच्चपदी थोरही बिघडतो या वचनाच्या विपरीत.
(लेखक सुलभ इंटरनॅशनल या सेवाभावी संस्थेचे मुख्य वास्तुविशारद आहेत.)
शब्दांकन – अरुण केळकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2014 1:27 am

Web Title: nelson mandela 2
Next Stories
1 वेगळं :ऑस्कर-रीवाच्या शोकांतिकेच्या निमित्तानं..
2 क्रीडा : मोटारस्पोर्ट्समध्ये मराठी झेंडा!
3 स्वास्थ्य : स्वास्थ्याकरिता ऋतुचर्या : डिसेंबर महिना
Just Now!
X