उत्सवांच्या उत्साही वातावरणात यंदा कोर्टाने या वेळी आवाजाच्या संदर्भात काही र्निबध घालून दिले होते. पण, आवाजाची मर्यादा, वेळ, स्पीकर्सची संख्या अशा नियमांना पुण्यातल्या मंडळांनी गुंडाळून ठेवले. ध्वनिप्रदूषण या मुद्दय़ाचा विचार करत कोर्टाने आवाजाची मर्यादा ६५ डेसिबलइतकी ठेवली होती. पण, गणेशोत्सवात आवाजाचा हा नियम धुडकावला गेला. उत्सवादरम्यान आणि अखेरीसही आवाजाची मर्यादा पाळली गेली नाही. पुण्यात साधारण दोन हजारांपेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत. त्यामुळे आवाजावर ताबा ठेवण्यासाठी कोर्टाने आदेश दिले होते. पण, या आदेशाचे मंडळांकडून पालन केले गेले नाही. पुण्यातल्या मिरवणुकीत आवाजाचे दोन प्रकार होते. एक म्हणजे स्पीकरच्या भिंती लावून मिरवणुकी निघाल्या होत्या. तर दुसरं म्हणजे ढोल पथकं, ढोल ताशे, पारंपरिक वाद्ये यांचा मिरवणुकीत समावेश होता. दोन्हीकडे तितकंच ध्वनिप्रदूषण होत होतं. डीजे, मोठमोठाले स्पीकरपेक्षा पारंपरिक वाद्यांचा आवाज कमी होतो हा समजही विसर्जनाच्या मिरवणुकीत खोटा ठरला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आवाजाच्या मर्यादेबरोबरच कोर्टाने वेळेचंही बंधन ठेवलं होतं. रात्री १२ नंतर आवाज बंद असं सांगण्यात आलं होतं. १२ नंतर अनेक मंडळांच्या डीजे, स्पीकरचे आवाज कमी होत बंद झाले. पारंपरिक वाद्यांचा जल्लोष मात्र रात्रभर सुरू राहिला. पारंपरिक वाद्यांना परवानगी आहे असा सार्वत्रिक समज पसरवला गेला. या संपूर्ण आवाजाचा सामान्य नागरिक ते पोलीस असा सगळ्यांना त्रास होत होता. तरी पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसली नाही. हा सगळा कारभार पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या हातात असल्याचं चित्र बघायला मिळालं. यात फटाक्यांच्या आवाजाचाही मुद्दा महत्त्वाचा आहे. हजारोंच्या माळा एकामागून एक अशा सुरूच होत्या. यामुळे ध्वनी आणि हवाप्रदूषण झालं होतं. काही मिरवणुकींमध्ये फोकस लाइट्स सोडले जात होते. तेही डोळ्यांना इजा पोहोचवणारे होते. वास्तविक, साधारणपणे स्पीकर्सच्या दोन ते पाच भिंतींची परवानगी असते. पण, मिरवणुकींमध्ये वीस, पंचवीस, पन्नास अशा भिंती दिसत होत्या. आवाजाच्या आदेशाप्रमाणे स्पीकर्सच्या संख्येबाबतचा नियमही मंडळांनी गुंडाळून ठेवला.
या वर्षी ध्वनिप्रदूषणाची सुरुवात झाली ती दहीहंडी या उत्सवापासून. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उत्सवामार्फत पक्षांचं शक्तिप्रदर्शन होत होतं. त्यामुळे त्या वेळीही आवाजाची मर्यादा ओलांडली गेली होती. साधारण, पन्नास-शंभर मीटपर्यंत असलेल्या नागरिकांनाही त्या आवाजाचा त्रास होत होता. यावरून आवाजाची तीव्रता लक्षात येईल. त्याही वेळी पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करताना दिसले नव्हते. रात्री दहापर्यंतच परवानगी असून त्यानंतरही आवाजाची तीव्रता तितकीच होती. दहीहंडी, गणेशोत्सव या दोन्ही उत्सवातलं ध्वनिप्रदूषण बघता आता नवरात्रीतही इतकंच ध्वनिप्रदूषण होणार का अशी धास्ती आहे.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noise pollution in ganesh festival
First published on: 12-09-2014 at 01:34 IST