कोकणातील गणेशोत्सव अनन्यसाधारण आहे. पण इथला उत्सव सार्वजनिक स्वरूपात अतिशय कमी आणि घरगुती, कौटुंबिक स्वरूपात जास्त आहे. स्वाभाविकपणे त्याचं स्वरूप धार्मिक-सांस्कृतिक जास्त आहे. आकडेवारीच्या भाषेत बोलायचं तर रत्नागिरी जिल्ह्य़ात मिळून घरगुती पातळीवर सुमारे दीड लाखापेक्षा जास्त गणपतींची श्रद्धापूर्वक प्रतिष्ठापना होते, तर संपूर्ण जिल्ह्य़ात मिळून नोंदणीकृत सार्वजनिक गणपती मंडळांची संख्या आहे फक्त १०८. त्यापैकी रत्नागिरी शहरात अवघे २७ आणि त्यातले निम्म्याहून जास्त सार्वजनिक बांधकाम, भूमिअभिलेख, नगर परिषद, पोलीस दल यांसारख्या शासकीय विभागांचे. यातला आणखी गमतीचा भाग म्हणजे, या सर्व ठिकाणी सहभागी होणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांपैकी बहुतेकांच्या घरी गणपतीसह गौरीचा सण मोठय़ा श्रद्धेने साजरा केला जातो. त्यामुळे या घरच्या गौरी-गणपतीचं विसर्जन होईपर्यंत मंडळाच्या गणपती उत्सवाचं महत्त्व दुय्यमच राहतं आणि त्यानंतरही काही मंडळांचे गणपती गौरी-गणपतीपाठोपाठ दुसऱ्याच दिवशी विसर्जित होतात, तर अनंत चतुर्दशीला संपूर्ण जिल्ह्य़ात मिळून ५९ अणि रत्नागिरी शहरात फक्त सात सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होतं. या आकडेवारीमागे दडलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथल्या कमी लोकसंख्येचाही आहे. रत्नागिरी शहराच्या लोकसंख्येने अजूनही एक लाखाचा टप्पा ओलांडलेला नाही. पर्यायाने इथल्या कोणत्याही सार्वजनिक उपक्रमांचं प्रमाण मर्यादितच राहतं.

अशा प्रकारे एकूणच सार्वजनिक गणेशोत्सवाचं प्रस्थ कोकणात अत्यल्प असल्यामुळे त्यावर होणारा सर्व प्रकारचा खर्चही मर्यादितच राहतो. याचा अर्थ डीजे किंवा डॉल्बी सिस्टम इथे पोहोचलेलीच नाही, असा नव्हे, पण त्यामुळे होणारं ध्वनिप्रदूषण डेसिबलमध्ये मोजून चिंता करावी, अशी इथली परिस्थिती नाही. त्या तुलनेत मोठय़ा शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत फोफावलेली ढोल-लेझीम पथकांची संख्या मात्र इथेही वाढली आहे आणि त्याच्या जोडीला मुंबईतल्या चाकरमानींच्या प्रभावामुळे वाडय़ा-वस्त्यांवरच्या गणपती मिरवणुकांमध्येही बॅन्जो वाजायला लागले आहेत.
कोकणाच्या ग्रामीण भागातल्या वाडय़ा-वस्त्यांवर घरोघरी गणपतींची प्रतिष्ठापना कौटुंबिक स्वरूपात होत असली तरी संपूर्ण वाडीतल्या या घरोघरच्या गणपतींचं विसर्जन मात्र सामूहिकपणे मिरवणुकीने करण्याची पद्धत आहे. शहरांमध्येही वाडे-चाळी किंवा अलीकडच्या काळात झालेल्या अपार्टमेंट्समधले घरोघरचे गणपतीही अशाच प्रकारे सामूहिकपणे विसर्जित होतात. त्यामध्येही ढोल-ताशासारख्या पारंपरिक वाद्यांचाच जास्त वापर असतो. त्यामुळे कोकणचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असला तरी त्याचं सार्वजनिकीकरण अतिशय मर्यादित असल्यामुळे ध्वनिप्रदूषणासारखे दोष त्यामध्ये अजून फारसे निर्माण झालेले नाहीत.