विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
कोविड-१९ ही केवळ महासाथ नाही तर आपल्या सर्वासाठीच तो अनेक अर्थानी एक वेगळा साक्षात्कार होता. इथे साक्षात्काराचा आध्यात्मिक अर्थ अपेक्षित नाही, तर साक्षात्कारातील केवळ प्रचीती किंवा प्रत्यय अपेक्षित आहे. एकादी गोष्ट प्रकर्षांने जाणवणे, तेवढय़ाच तीव्रतेने अनुभव येणे म्हणजे प्रचीती या अर्थाने. कोविडकाळात सुमारे तीन महिने जवळपास संपूर्ण जग बंदिस्त अवस्थेत होते. सारे काही ठप्प होते. या कालखंडाने आपल्याला खूप काही शिकवले, धडे दिले. त्यातील एक महत्त्वाचा धडा हा ऑनलाइनचा होता, कारण प्रत्यक्ष सर्वत्र बंदचे वातावरण असले तरी याच काळात सारे काही ऑनलाइन अशीच अवस्था होती. ऑनलाइन ही अनेक अर्थानी संधी आहे, असे आधीही सांगितले ग्ेाले होते. मात्र त्याचा प्रत्यय सर्वानाच देणारा असा हा कालखंड होता. या कालखंडाचा सर्वाधिक फटका ज्या क्षेत्रांना बसला त्यात शिक्षण क्षेत्र महत्त्वाचे आहे. शाळा- महाविद्यालये आणि विद्यापीठे ऑनलाइन आली.. मात्र शाळांसाठी ऑनलाइन हा फारसा चांगला पर्याय असू शकत नाही. त्यांना भविष्यात हायब्रीडच्या मार्गाने जावे लागेल. शाळा हा लहान मुलांसाठी एक सामाजिक अनुभव असतो. समाजाचे ते लहानसे रूप असते. त्यामुळेच प्रत्यक्ष शाळा ही त्यांची गरज आहे. मात्र उच्चशिक्षणासाठी ऑनलाइन हा उत्तम पर्याय असू शकतो, हेच कोविडकाळाने सिद्ध केले. त्याचा अंदाज पूर्वीही होता. मात्र ऑनलाइन आल्यानंतरही आपण आपली मानसिकता मात्र आधीचीच होती. वर्षांनुवर्षे उच्चशिक्षणाच्या मळलेल्या वाटेवरच आपली पावले पुन:पुन्हा जात होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या काळात जगात काय घडले हे पाहणे रोचक ठरावे. कोविडकाळात सारे काही बंदच असणार, किमान तीन-चार महिने तरी याचा अंदाज आल्यानंतर लगेचच जगातील ४० महत्त्वाची महाविद्यालये एकत्र आली आणि जगभरातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्यांचे काही ऑनलाइन अभ्यासक्रम मोफत खुले केले. शिक्षणात खंड पडू नये आणि विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा कालखंड वाया जाऊ नये यासाठीचा हा आटापिटा होता. जगभरात हे होत असताना आपण ऑनलाइनच्या विचारास सुरुवात केली होती. खरे तर २०१७ सालापासून भारत सरकारने स्वयम् हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले होते, मात्र मानसिकता जुनीच होती. त्यामुळे त्या पोर्टलच्या दिशेने विद्यार्थ्यांचा ओघ वळविण्यासाठी फारसे प्रयत्नच झाले नाहीत. शिवाय ऑनलाइनला विरोध करणारी आणि सरकारी मानसिकता अशा दोन अडचणी होत्याच. आता मात्र कोविडला दीड वर्षांचा कालखंड लोटत असताना सरकारलाही जाणीव झाली आहे की, उच्चशिक्षण इतरत्र ऑनलाइन होऊ शकते तर भारतात का नाही? अखेरीस गेल्याच आठवडय़ात केंद्र सरकारने यातील काही महत्त्वाचे अडथळे दूर केले. त्यामुळे आता या पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम विद्यार्थी केवळ इंग्रजीतूनच नव्हे तर अनेक भारतीय भाषांमधून पूर्ण करू शकतात आणि त्याचे काटेकोर मूल्यांकन झाल्यानंतर त्यांना मिळणारे श्रेयांकही त्यांच्या नियत पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात त्यांना फायदेशीर ठरू शकतात. त्या श्रेयांकांना आता ४० टक्क्यांचे मोल लाभले आहे.

भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाने हे लक्षात घेतले की, जगाशी बरोबरी साधण्यासाठी हे तंत्रज्ञान ही संधी आहे. तशीच संधी ऑनलाइनने दिली ग्रामीण विद्यार्थ्यांना. अन्यथा शहरातील प्राध्यापक किंवा आयआयटी अथवा आयआयएममधील प्राध्यापकांचे मार्गदर्शन त्यांना कसे लाभणार? मात्र स्वयम्ने त्यांना ही संधी दिली. आता शहर- गाव हा अडसर ऑनलाइनने दूर केला आहे. फक्त सरकारी निर्णय वेळेत व्हायला हवा होता, इतकेच! खरे तर सरकारने गेल्या आठवडय़ात घेतलेले निर्णय खूप आधीच होणे आवश्यक होते. तसे झाले असते तर कोविडकाळ वाया गेला नसता. अर्थात हेही नसे थोडके! देर आये, दुरुस्त आये!

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online school e learning school students mahitartha dd
First published on: 20-08-2021 at 16:40 IST