तुम जियो हजारों साल

व्यक्तींचे वाढदिवस हा आपल्याकडे संमिश्र प्रतिक्रियांचा विषय आहे.

16-lp-minal‘‘तुम जियो हजारों साल..’’ प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सहज ओठांवर येणारं गीत! आज आठवायचं कारण म्हणजे मागच्या आठवडय़ात कोल्हापूरच्या नसिमा हुरजूक यांच्या ‘हेल्पर्स ऑफ हॅँडिकॅप्ड’ या संस्थेच्या वर्धापनदिन समारंभात संस्थेच्या मुलांनी अत्यंत सुरेल वाद्यवृंदाच्या साथीने हे गीत तितक्याच सुरेलपणे सादर केलं, तेव्हापासून ते मनात रुंजी घालतंय.

तेव्हा ते गाणं ऐकताना आमच्या शाळेच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्याची आठवण झाली होती. आम्ही विद्यार्थी असताना आमच्या शाळेची पन्नास वर्षे पूर्ण झाली, हा आम्हा सर्वासाठीच नवलाईचा व अभिमानाचा विषय होता. ‘‘संस्थेच्या कारकिर्दीत पन्नास वष्रे म्हणजे काहीच नाही’’ असा तुच्छतेचा पापड मोडणारे महाभाग अवतीभवती असूनही तो समारंभ विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने फारच जल्लोशात पार पडला होता. आजही त्या स्मृतींनी हळवं व्हायला होतं.

संस्थेच्या आयुष्यात पन्नास वष्रे हा फार मोठा आकडा नसला तरी तो दुर्लक्षणीयही नाही. एवढी वर्षे संस्था चालवणे, वाढवणे हे निरलस कार्यकर्त्यांच्या बळावरच शक्य होते. असे रचनात्मक कार्य करण्यासाठी त्या मनोभूमिकेने काम करणारे कार्यकत्रे सातत्याने लाभणे हे एखाद्या संस्थेचे सौभाग्यच असते. तिचा प्रत्येक वर्धापन दिन हा तिच्या प्रगतीचा निर्देशांक ठरतो आणि त्याची मधुर परिणती अशा रौप्य, सुवर्ण किंवा त्याही पुढच्या महोत्सवी वर्षांत अनुभवता येतो.

संस्थेचा नियम व्यक्तींनाही जसाच्या तसा लागू होतो का?

व्यक्तींचे वाढदिवस हा आपल्याकडे संमिश्र प्रतिक्रियांचा विषय आहे. अगदी लहान मुलांना वाढदिवस म्हणजे मोठा समारंभच असतो. शाळकरी वयात मुले त्या दिवसासाठी महिन्यापूर्वीपासूनच ‘काउंट डाउन’ सुरू करतात. सर्व घरादाराला ती त्या काळात ‘त्या’ दिवसाचे रोजच्या रोज न चुकता स्मरण करून देतात. त्यांच्यासाठी खरेदी, आवडीचा मेन्यू, शाळेत वाटायच्या गिफ्ट्स, सगळं पुरेपूर ‘एन्जॉय’ करतात. आमच्याकडे वाढदिवसाला गोळ्या, चॉकलेट्स वाटणं पसंत नसे. त्या वयोगटातल्या मुलांना आवडतील व समजतील अशी लहानलहान पुस्तके वडील आणत असत. वर्गातल्या मुलांना ती पुस्तके वाटताना मान ताठ होत असे.

आमच्या परिचयाचे एक वयस्कर गृहस्थ होते. ते प्रत्येक वाढदिवसाला विचारत,  ‘ऌं५ी ॠ१६ल्ल ु८ ८ीं१२ १ीं१२?’ त्या प्रश्नाचा अर्थ तेव्हा कळत नसे. आज तो प्रश्न मनात आल्यावर वाटतं, इतक्या वर्षांनंतरसुद्धा त्या प्रश्नाची समर्पकता यत्किंचितही कमी झालेली नाही.

कदाचित हेच कारण असावं; पण अनेक लोकांना वाढदिवस साजरा करणं आवडत नाही; वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारायलाही ते कांकू करतात. ‘‘वयाने वाढलो यात आपलं कर्तृत्व काय? तो काळाचा नियम आहे, त्यात आपली कर्तबगारी काहीच नाही.’’ असा युक्तिवाद करणारे असतात. मित्रपरिवाराने शुभेच्छा देऊन भंडावून सोडू नये म्हणून ते अज्ञातस्थळी निघून जातात. पण अशांची संख्या अल्प असावी. बहुतांश लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या की आनंद होतो, ते तो प्रकट करोत वा न करोत! म्हणूनच षष्टय़ब्दीपूर्ती, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन असे कौतुकसोहळे उत्साहाने आयोजित केले जातात.

अनेक जण स्वत:चा वाढदिवस साजरा करण्याच्या जगावेगळ्या पद्धती अवलंबतात. स्वयंसेवी संस्था, समाजोपयोगी काम करणाऱ्या संस्था यांना भेट देऊन तेथील सभासदांबरोबर, अनाथाश्रमातील मुलांबरोबर दिवस व्यतीत करून आपला जन्मदिन सत्कारणी लावणारे अनेक जण आहेत. स्वत:वर किंवा निर्थक पाटर्य़ासाठी पसे खर्च करण्याऐवजी समाजसेवी संस्थांना घसघशीत दान देण्याऱ्यांचीही अनेक उदाहरणे आहेत.

आपला वाढदिवस हा वर्षांतल्या इतर दिवसांसारखाच एक दिवस असतो. फक्त आपण त्या दिवशी या जगात प्रवेश केलेला असल्यामुळे आपल्यासाठी तो खास असतो. पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांचा जन्मदिन त्यांच्यापेक्षा इतरांसाठीच विशेष महत्त्वाचा असतो.  त्या व्यक्ती लौकिकार्थाने जरी ‘विशिष्ट दिवशी जन्माला आलेला एक जीव’ असतात तरी वास्तवात त्या संस्थारूप असतात. त्यांच्या केवळ सहवासाने अनेकांची आयुष्ये उजळून निघतात, श्रीमंत होतात. आणि हे सर्वागीण उन्नयन केवळ समवयस्कांच्याच बाबतीत होत नाही, तर सर्वच वयाच्या लोकांना त्यांची संगती परीसस्पर्शासारखी ठरते. लहान मुलांशी त्या बालभावाने वागतात, पण त्याचबरोबर त्यांच्या संगोपनासाठी काय महत्त्वाचे ते त्यांच्या आईवडिलांना जाणवून देतात. तरुणांच्या दिलाची धडकन त्यांना समजते, पण ती ऐकताऐकता त्यातून सुजाण व्यक्ती कशा घडतील, युवाशक्ती कशी आकाराला येईल याचा निरंतर विचार ते करतात. प्रौढांच्या बाबतीत मागील चुकांसकट त्यांना पदरात घेतात व त्या चुका टाळून पुढे जाण्यासाठी व जीवनाचे सार्थक होण्यासाठी त्यांच्याकडे अनेक दिशादर्शक कार्यक्रम असतात. त्यांच्या संपर्कात येणारा कुणीही त्यांच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकत नाही. एकाअर्थी ‘शरीर परमार्थाचे साधन’ अशा वृत्तीने या व्यक्ती जगात वावरत असतात. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे त्यांच्या मागील जन्मदिनापासून त्यांच्या या जन्मदिनापर्यंत आपण त्यांच्यापासून काय काय ग्रहण केले, आपली किती वाढ झाली, याचे अवलोकन करणेच असते.

आम्हा सर्व समविचारी स्नेह्यंच्या जीवनात अशा संस्थारूप व्यक्तीचा प्रवेश झाला आणि आमची आयुष्ये लखलखली. त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आम्हा सर्वाच्या प्रांजल भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणे, हा आम्हा सर्वाच्या जीवनातील ‘धन्य आनंद दिन’ आहे.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व प्रेमाचे प्रयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Live long