शहरी जनतेचा विशेषत: तरुणांचा रानाशी आणि निसर्गाशी संबंध अभावानेच येतो. विविध कारणांमुळे निसर्गाशी संबंध येत असला तरी गावातील बालपण, निसर्गाच्या सान्निध्यातील आठवणी याचा गोडवा निराळाच. हा गोडवा अनुभवता येतो ‘रानगोष्टी’ या पुस्तकातून. पेशाने डॉक्टर आणि मनाने निसर्गात रमणाऱ्या डॉ. राजा दांडेकर यांच्या हलक्याफुलक्या रानगोष्टी मनाला निसर्गसौंदर्याचा तजेला देणाऱ्या आहेत. ग्रामीण भागात रानाच्या साथीने घालवलेल्या बालपणीच्या आठवणी रंजक पद्धतीने मांडत दांडेकर यांनी वाचकांना थेट गावातील गमतीजमतींची सफर घडवून आणली आहे. दांडेकर यांचे पाळीव आणि जंगली दोन्ही प्रकारच्या प्राण्यांसोबतचे बालपणापासूनचे अनुभव आपल्याला प्राण्यांच्या सवयींविषयी, भावनांविषयी बरंच काही सांगून जातात. छोटय़ा गोष्टींतून त्यांचे गावरान आयुष्य उलगडत जाते. वाघ आणि त्याविषयी माणसांचे असलेले समज-गैरसमज दूर होतात. गाय, म्हैस, कुत्रा, तर कधी रानडुक्कर, वानर यांच्याबाबत आलेले अनुभव प्रत्येक कथेत मांडले आहेत. जंगलातल्या सान्निध्यातले गमतीदार खेळ त्यांची निसर्गाशी असलेली जवळीक स्पष्ट करते. दांडेकर महाविद्यालयीन शिक्षण घेताना शहरात आल्याने त्यांची गावाशी असलेली नाळ तुटते, मात्र त्यांच्या निसर्गभ्रमंतीत खंड पडत नाही. कधी गुहेत, घळीत, माळरानावर, झाडाच्या पारावर, मंदिरात अगदी गोठय़ातही त्यांची भ्रमंती सुरू राहते. लहानपणी जंगली प्राण्यांविषयी असणारी मनातील भीती विरून जाते, त्या जागी प्राण्यांविषयी आपलेपणाची भावना निर्माण होते. पुढे वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर रुग्णांवर उपचार करताना त्यांना लहानपणीची आजीबाईच्या बटव्यातील औषधे साथ देतात. दुर्धर आजारांवर रामबाण उपाय हे निसर्गातच असतात हे दांडेकर सिद्ध करतात. ग्रामीण भागात काम करताना ते जनावरांचे डॉक्टरही होऊन जातात. कुटुंबीय, ग्रामीण लोक यांच्याकडून कळलेल्या जनावरांच्या सवयी, त्यांचे औषधोपचार, जनावरांनी माणसाला दंश केल्यावर करायचे उपचार त्यांच्या वैद्यकीय कार्यात उपयोगी पडतात. ग्रामीण अनुभव साध्या सोप्या भाषेत लिहिल्याने कोणत्याही वयोगटाने विशेषत: विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचाव्यात.
रानगोष्टी, डॉ. राजा दांडेकर, प्रकाशक – उन्मेष प्रकाशन, पृष्ठे – १३१, किंमत –  रु. १५०
अश्विनी पारकर – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व पुस्तकाचं पान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review of rangoshti
First published on: 30-09-2016 at 01:12 IST