अलीकडच्या काळात सगळ्यांना मुक्तछंदातल्या कवितेची सवयच होऊन गेली आहे. कवीही मुक्तछंदातच लिहितात आणि वाचकांनाही त्यामुळे तेच अपेक्षित असते. पण अचानक एखादी गेय कविता समोर येते आणि कुणीतरी खूप जुन्या ओळखीचं भेटल्याचा आनंद होतो. तोच आनंद शुभदा नाईक आणि सुरेश नाईक यांच्या कविता वाचताना होतो. कारण या संग्रहातल्या त्यांच्या सगळ्या कविता गेय आहेत. त्यांना नाद आहे, लय आहे, त्यांची यमकं अतिशय सुंदर रीतीने जुळलेली आहेत. त्यामुळे त्या वाचायच्या नव्हेत तर गुणगुणायच्या कविता झालेल्या आहेत. सुरुवातीच्या भागात शुभदा नाईक यांच्या कविता आहेत तर नंतरच्या भागात सुरेश नाईक यांच्या कविता आहेत. शब्द शब्द जपुनी ठेव बकुळीच्या फुलापरी, माडांच्या दाटीतून वळणारी वाट हवी, भेटाया उत्सुकली भरतीची लाट हवी, मखमालिशा गाली खळी देवे खोवियली, झिलमिल बालगीत केश पापणी ल्यालेली अशा या शुभदा नाईक यांच्या कविता गुणगुणायला सोप्या आणि छान आहेत. तर एकटाच भिरभिरतो वाळूच्या सागरी, रणरणते वाळू पदी भगभगते आग वरी, अव्यक्त जे शब्दांतुनी डोळ्यांतुनी समजेल का, बोलू न शकलो तुला कधी, कविता तुला सांगेल का, किंवा लावला जरी न तू लागला तुझा लळा, मुकेपणीच सोसणे असह्य़ अंतरी कळा अशा सुरेश नाईक यांच्या कविताही गुणगुणायला छान आणि अर्थपूर्ण आहेत.
कविता दोघांची, शुभदा नाईक, सुरेश नाईक, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे- ७८, मूल्य- ९० रुपये
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व पुस्तकाचं पान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book kavita doganchi review
First published on: 01-04-2016 at 01:07 IST