11 July 2020

News Flash

आवाज की दुनिया : लोकांचं मनोरंजन ही माझी सामाजिक जबाबदारी – डॉ. रिषी कपूर

दिवाळी २०१४ रेडिओ स्टेशन बाहेरून वाटायला जरी बोगद्यासारखं वाटत असलं तरी असतं ते अलिबाबाची गुहा,’ मुंबई लोकलचा ‘मोटरमन’ आरजे रिषी कपूर अगदी उत्साहाने सांगत होता.

| November 26, 2014 01:19 am

lp10दिवाळी २०१४
रेडिओ स्टेशन बाहेरून वाटायला जरी बोगद्यासारखं वाटत असलं तरी असतं ते अलिबाबाची गुहा,’ मुंबई लोकलचा ‘मोटरमन’ आरजे रिषी कपूर अगदी उत्साहाने सांगत होता. सुरुवातीला मी या क्षेत्रात नसताना रेडिओ ऐकायचो तेव्हा मला वाटायचे की रेडिओ स्टेशन म्हणजे एक स्टुडिओ असेल. तिथे आरजे खूप सीडीज घेऊन बसलेला असेल पण आरजे बनलो तेव्हा कळलं की, रेडिओ स्टेशन म्हणजे फक्त आरजे नसतो तर ते एक कॉर्पोरेट ऑफिस असतं. मार्केटिंग, रिसर्च, सेल्स असे सगळे विभाग इथेही असतात. आवाज फक्त एकाचाच असला तरी या आवाजाची दिशा ठरवायला मात्र हजार डोकी एकाच वेळी काम करत असतात.
९३.५ रेड एफ.एम. ऐकणाऱ्यांना ‘मुंबई लोकल’चा ‘हिरोवाला नाम’ असलेला रिषी कपूर माहीत नसणं तसं कठीणच. संध्याकाळी पाच वाजता हा पठ्ठा अख्ख्या मुंबईला त्याच्या ‘मुंबई लोकल’ची सैर घडवून आणतो. मस्ती, चेष्टा मस्करी, हलकाफुलका मूड, विनोद आणि खूप सारी धमाल यांचं इंजिन लावून ही मुंबई लोकल अगदी सुसाट धावते. अशा या लोकलचा ‘मोटरमन’ ऑफ एअरसुद्धा तितकाच उत्साही असतो. प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवतं की हा रिषी कपूर तर उंच, दांडगा, डोळ्यात मिस्कील भाव असलेला एकदम ‘पंजाबी पुत्तर’ आहे. पण..
भेटल्यावर पहिलाच प्रश्न, ‘डेंटिस्ट असूनही आरजे? काय कारण?’ यावर हसून तो विचारतो, ‘डॉक्टरवाला जवाब दू या आरजेवाला?’ त्याच्यातला आरजे असा सुरुवातीलाच डोकावतो. हसून तो स्वत:च म्हणतो, ‘असं लहानपणापासून काही ठरवलं नव्हतं आरजे बनण्याचं. उलट लहानपणापासून मला डॉक्टरच बनायचं होतं. घरीसुद्धा तसंच वातावरण होतं, पण जेव्हा मी मेडिकलची इंटर्नशिप करत होतो तेव्हा साधारण २००५ साली रेडिओची खूप बूम होती. त्या वेळी मलाही वाटायचं की मी पण रेडिओ जॉकी बनावं. जेव्हा मी रेडिओ ऐकायचो तेव्हा मनात विचार यायचा की, ही जी माणसं आत्ता बोलताहेत त्यांच्यापेक्षा कदाचित मी चांगलं बोलू शकेन. त्या वेळी एक रेडिओ स्टेशन दरवर्षी ‘आर.जे. हंट’ नावाची स्पर्धा आयोजित करायचं. त्यात मी भाग घेतला. स्पध्रेच्या एकेक पायऱ्या पार करीत मी पूर्ण जिंकलो. त्यांनी मला नोकरीची संधी दिली. त्या वेळी मला मेडिकल स्टायपेंड मिळायचा १४०० रुपये आणि ते मला वीस हजारांची नोकरी देत होते.’ खोडकर हसत तो म्हणतो, ‘एका तरुण मुलाला एवढी मोठी हनुमान उडी मारायची संधी मिळाल्यावर तो काय करणार! पण खरंच मला स्वत:ला वाटलं की हे मी करू शकतो. आपल्या देशात वैद्यकीय क्षेत्राकडे ‘इज्जतवाली’ नोकरी म्हणून पाहिलं जातं. माझ्या घरातल्यांनी तर मला मूर्खात काढलं. ‘तू डॉक्टरकी सोडून रेडिओवर अनाउन्समेंट करण्याचं काम करणार? वेडा आहेस का तू? माझी आज्जी आजही मला रेडिओ अनाउन्सर म्हणते. तिला ‘जॉकी’ हा शब्द माहीत नाही. त्यामुळे कोणी विचारलं तर ती सांगते की, आमचा रिषी रेडिओमध्ये अनाउन्सर आहे. शेवटी मी घरी सगळ्यांना ठामपणे सांगितलं की मी आर.जे. बनणारच.’
आर. जे. म्हणून काम करण्याचा पहिला अनुभव तो सांगतो, ‘प्रचंड घाबरलेलो! स्टुडिओमध्ये जाताना मला तिथला माणूस म्हणाला ‘लाखो लोक तुला आता ऐकणार आहेत. जर तू बेस्ट नसशील तर आम्हाला तुझी गरज नाही.’ २१ वर्षांचा होतो मी तेव्हा. पोटात गोळा आलेला. खूप नव्‍‌र्हस झालेलो. हातपाय कापत होते. पण जेव्हा शो करून स्टुडिओबाहेर आलो तेव्हा वाटलं, काय उगाच लहान मुलांना घाबरवतात. तिथे तर घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं. पण एका दृष्टीने ते बरोबरही असतं म्हणा. कारण तुमची एक छोटीशी चूक ऑन एअर लाखो पटींनी वाढलेली असते. त्यामुळे शो करताना त्याची काळजी घेणं गरजेचं असतं.’
‘आवाजाची काळजीसुद्धा महत्त्वाची आहे ना इथे. कारण तोच महत्त्वाचा अ‍ॅसेट असतो ना इथे.’ या मुद्दय़ावर मला मधेच अडवत रिषी कपूरने गुगलीच टाकली. ‘बिलकूल नाही. तो निकष नसतोच मुळी. आर. जे. कभी भी अपने आवाज से ज्यादा अपने सोच के लिए पहचाना जाता है. तो किती वेडा आहे, किती बेभान आहे, खूप ताण असलेल्या प्रसंगी तो कसा विचार करतो या गोष्टी बऱ्याच महत्त्वाच्या असतात. मला वाटतं या क्षेत्राचा ना एक खूप मोठा तोटा आहे. आम्हाला उदास होण्याची संधीच मिळत नाही. किंबहुना तसं राहणं परवडतच नाही. समजा तुमचं आता ब्रेकअप झालं फोनवर आणि पुढच्याच क्षणी तुम्हाला काही तरी मजेशीर बोलायचंय. खूप कठीण असतं असं लगेच मूड बदलणं. ते सगळ्यांना जमतंच असं नाही. त्यामुळे आर. जे. बनण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्वत:वर हसता आलं पाहिजे आणि कोणत्याही ताणाच्या प्रसंगी तोल ढळू न देता कार्यक्रम पुढे नेता आला पाहिजे.’ पण अशी सगळी तारेवरची कसरत कशी जमते तुम्हाला? या प्रश्नावर त्याची प्रतिक्रिया अगदी मिश्कील असते. ‘महिन्याच्या शेवटी जो चेक हातात येतो ना तो पाहिला की सगळी कसरत जमते.’ पण या मिश्कीलपणामागेही काही तरी वास्तव आहेच. तो सांगतो, ‘उत्तराखंडमधल्या पुरात माझी आई अडकलेली. तिचा काहीही पत्ता लागत नव्हता. पण त्या दिवसातसुद्धा मी शो करायचो. मला वाटतं की दु:खी व्हायच्या वेळी माणसाने दु:खी व्हावं आणि आनंदाच्या वेळी आनंदी. दु:खी असतानाही आनंदी भाव आणणं हे माझ्या दृष्टीने नैसíगक नाहीये. पण माझं क्षेत्रच असं आहे आणि मी ते स्वीकारलंय.’ ‘तुझ्या कार्यक्रमाबद्दल सांग ना’ या म्हणण्यावर रिषी बोलता झाला. ‘रेडिओ स्टेशनमध्ये वेगवेगळे विभाग असतात. एक टीम कार्यक्रम आखण्याचं काम करते. कार्यक्रमाची रूपरेषा ठरल्यावर मग प्रत्येक आर. जे.च्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असा कार्यक्रम त्याला दिला जातो. दिवसाचे भाग पाडले तर सकाळचा स्लॉट सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्याच्यासाठी जी रूपरेषा ठरवलेली असते ती तशीच राहते. आर. जे.ला त्या कार्यक्रमानुसार स्वत:ला त्यात बसवून घ्यावे लागते. त्यासाठी आम्ही आणि टीम बसून त्या गोष्टींवर चर्चा करतो. त्यामुळे समजा मी ‘मॉìनग नंबर वन’ शो केला तर तो मी ‘मॉìनग नंबर वन’ म्हणूनच करणार त्यात ‘मुंबई लोकल’ तुम्हाला दिसणार नाही. आर. जे.ला लवचीक तर असावंच लागतं. सकाळी मी असेन तर मला ऐकणारे लोक कामावर, कॉलेजला जाणारे आहेत तेव्हा बोलणं ताजंतवानं, उत्साही, माहितीपूर्ण हवं. दुपारी ते बदलतात. त्यामध्ये गृहिणी, तरुण, तरुणी यांचा समावेश होतो. त्यामुळे थोडंसं रेंगाळलेला सौम्य असा कार्यक्रम. तर संध्याकाळी रेडिओ ऐकणारे कामावरून दमून परतत असतात. त्यांना माहिती तर द्यायची असते, पण थोडय़ा लाइट मूडमध्ये. मग त्यात चेष्टामस्करी येते. विनोदी ढंग येतो. रात्रीच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा वेगळा बाज.’
अशा या ‘आवाज की दुनिया’चे हिरो असलेले तुम्ही आर. जे. ‘व्हच्र्युअल दुनिये’त म्हणजे सोशल नेटवìकग साइट्सवरही बरेच सक्रिय दिसता. तुमच्या लोकप्रियतेला या गोष्टी बरीच मदत करत असतील नाही..! यावर रिषी कपूर एखादं गुपित सांगितल्यासारखं हळू आवाजात म्हणतो, ‘तुला खरं सांगू का मला अजिबात आवडत नाही या साइट्सवर अ‍ॅक्टिव्ह राहणं. जमतच नाही मला. पण माझे चॅनेलवाले माझी पाठच सोडत नाहीत त्यांच्यामुळे मी बऱ्यापैकी अ‍ॅक्टिव्ह असतो तिथे. या साइट्स आमची लोकप्रियता वाढवायला मदत करतात. आम्ही कसे दिसतो याबाबत लोकांना खूप उत्सुकता असते. आमच्या आवाजावरून त्यांनी मनात आमची एक ‘इमेज’ तयार केलेली असते. रणबीर कपूरसारखा देखणा, हृतिकसारखे सिक्स पॅक्स असं बरंच काही. या साइट्सवरून आमचा चेहरा त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तो पाहून काहीजण आश्चर्यचकित होतात तर काहींचा अगदीच भ्रमनिरास होतो. आता याला आम्ही तरी काय करणार.. खरंतर या साइट्स एकाच वेळी शापसुद्धा आहेत आणि वरदानसुद्धा. आवाजामागच्या चेहऱ्याचा सस्पेन्स कायम राहिला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आताच्या सर्वच गोष्टींच्या सुलभ उपलब्धतेमुळे तो सस्पेन्स ते गूढ निघून जातेय.मात्र त्याचवेळी मला माझ्या कार्यक्रमासाठी या साईट्सची बरीच मदत होते. लोक कार्यक्रमातील एखाद्या गोष्टीवर या साइट्सद्वारा लगेच प्रतिसाद देतात. काही जण खूप कौतुक करतात तर कुणाला काही गोष्टी खटकतात. त्याबद्दल राग व्यक्त केला जातो.’ पण अशा प्रतिक्रियांनी चिडचिड नाही होत? म्हणजे उगाचच टीका करणारे चुकीचे वागणारे लोकही असतात ना. ‘हो तर असतात ना. एकदा मी एका अभिनेत्रीबद्दल मस्करीत बोललेलो तर एक माणूस मला फोन करून त्यावर बरंच काही बोलला. मीही त्याला माझी बाजू समजावून सांगितली. कारण असा प्रतिसाद देताना कसं बोलायचं याचं मला रीतसर प्रशिक्षण मिळालेलं आहे.’
नोकरीचा विषय आलाच आहे तर मला सांग, तुला जास्त काय आवडतं? डेंटिस्ट असणं की आर.जे. असणं? खुलून हसत तो म्हणतो, मी दोन्हीही गोष्टी सारख्याच एन्जॉय करतो. ये दोनों मेरी दो बीवीयाँ हैं. आता त्यातली कोणती जास्त आवडते हे सांगणं कठीणच नाही का. तरी हल्ली आर.जे. या कामात माझे दिवसाचे नऊ ते दहा तास जातात. त्यामुळे मला माझी डेंटिस्ट्री वीकेंडलाच करता येते. पण तेही मी पैशांसाठी करीत नाही. लोकांना असं वाटतं की, आर.जे. म्हणजे काय, तर स्टुडिओत यायचं, चार तास बडबड करायची की झालं. आहे काय त्यात कठीण. ते अजिबातच तसं नसतं. सर्वप्रथम आम्हाला सगळी वर्तमानपत्रं अगदी चावून चावून वाचावी लागतात. कुठे काय चाललंय याची सगळी माहिती असावी लागते. सोशल नेटवìकग साइट्सवर काय ट्रेंड आहे, लोकांना तिथे काय आवडतंय, यू टय़ूबवर कोणत्या व्हिडीओला जास्त हिट्स मिळताहेत, याबाबत सतत अपडेटेड राहावं लागतं. लोकांच्या डोक्यात जे चाललंय तेच आम्ही बोललो तरच आम्ही लोकांची नस पकडू शकतो. टी.व्ही., वर्तमानपत्रं, इंटरनेट या सर्वाचाच फडशा आम्हाला रोज पाडावा लागतो. आता मध्यंतरी रस्त्यावर माऊथ ऑर्गन वाजवणाऱ्याचा व्हिडीओ मी पाहिला. त्याला आम्ही स्टुडिओत बोलावलं आणि त्याने वाजविलं. आता त्याला एका सिनेदिग्दर्शकाने काम दिलंय. आम्हाला आमचे कान आणि डोळे सतत उघडे आणि सतर्क ठेवावे लागतात. आम्ही केवळ चार तास नाही, तर दिवसाचे २४ तास आर.जे. असतो.’
या सगळ्यामुळे आर.जे. हा आता एक सेलिब्रिटी बनलाय हे मात्र खरंय ना? ‘काही अंशी खरंय ते. जेव्हा आम्ही कोणाला भेटतो तेव्हा काही अपवाद वगळता लोक आम्हाला पटकन ओळखत नाहीत, पण जेव्हा आम्ही नाव सांगतो तेव्हा मात्र ते म्हणतात, ‘अरे हो, आम्ही ऐकतो तुम्हाला.’ त्यामुळे सुदैवाने अजून गाडी खराब झाली म्हणून ट्रेनने प्रवास करता येणार नाही इतकं ‘सेलिब्रिटीपण’ आम्हाला मिळालेलं नाहीये.’
चांगले पैसे, ग्लॅमर हे सगळं या नोकरीत आहे, पण ते खरंच एवढं सगळं सहज मिळतं का, या प्रश्नावर रिषी सांगतो, ‘हे इतकं सहजसोपं असतं तर ते करण्यासाठी कोणी पैसे दिले असते का? मुळात आर.जे. बनल्यावर तुम्हाला काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचं भान असावं लागतं. म्हणजे बघ, मी एखाद्या नेत्याबद्दल मस्करी केली तर त्याचे कार्यकत्रे मला सोडणार नाहीत. मी एखाद्या मोठय़ा स्टारला नाराज केलं तर तो मला मुलाखत देणार नाही. मी कोणत्याही धर्माच्या बाबतीत काही बोलू शकत नाही. मग चेष्टा-मस्करी करायची कशी. स्वत:चीच खिल्ली किती वेळ उडवायची? आणि म्हणूनच या सगळ्या गाळण्यांमधून पार होऊन जो मनोरंजन करतो तो खरा चॅम्पियन असतो. त्यामुळे ज्यांना या क्षेत्रात यायचंय त्यांनी लक्षात ठेवायला हवं की, टी.व्ही.पेक्षाही जास्त रेडिओ ऐकला जातो. इथे माणसं कमी असतात, मात्र काम खूप जास्त असतं.’
आत्ताच्या रेडिओचं बाजारीकरण, पाश्चात्त्यीकरण झालंय असं तुला वाटतं का, यावर रिषीचं उत्तर आहे, ‘बाजारीकरण झालंय हे खरं. कारण स्पर्धा फार तीव्र झाली आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रेक्षक टी.व्ही. पाहण्यासाठी दरमहा पैसे देतात, मात्र रेडिओ हे माध्यम सर्वाना मोफत उपलब्ध आहे. तर मग रेडिओ स्टेशनवर होणारा खर्च, काम करणाऱ्यांचे पगार द्यायला जाहिरातींचा आधार हा घ्यावा लागतो. पाश्चात्त्यीकरणाबद्दल बोलायचं झालं तर सगळीकडे रॉक संगीत ऐकलं जातं म्हणून आम्ही रॉक नाही लावू शकत. आमच्या श्रोतृवर्गाला काय आवडतं तेच आम्ही त्यांना देणं अपेक्षित आहे आणि तेच देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुझा विश्वास बसणार नाही, पण मी आणि इथली माझी बहुतांश मित्रमंडळी िहदी गाणी अजिबात ऐकत नाहीत, पण म्हणून मी मला आवडणारी गाणी तर इथे लावू शकत नाही. त्यामुळे लोकांना काय आवडतं हे जास्त महत्त्वाचं असतं. ते शोधून काढण्यासाठी आमची एक टीम असते. ती वेगवेगळे सव्‍‌र्हे करते. चालू ट्रेंडचा अभ्यास करते आणि त्यानुसार आमच्या प्लेलिस्ट्स ठरवल्या जातात. खरं म्हटलं तर आधीपेक्षा पुष्कळ बदल झालाय. आमचे श्रोते बदलले आहेत. ते खूप स्मार्ट आहेत. त्यांना उगाच काहीही थापा मारून फसवू शकत नाही. ते फारच सतर्क असतात.’ ही सगळी मुलाखत देताना रिषी सर्दीने बेजार झालेला होता. माझा साहजिक प्रश्न होता, आवाजाची काळजी घेण्यासाठी तू आइस्क्रीम किंवा थंड खात नसशील ना? ‘आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स सगळं घेतो मी. ही आत्ताची अवस्था मी त्या दिवशी खाल्लेल्या आइस्क्रीममुळे झाली असावी. पण मी हे मात्र ऑन एअर अजिबात जाणवू देत नाही.’
तुला फावला वेळ तर फारसा मिळत नसेल, पण जर मिळाला तर तू काय.. प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच त्याचं उत्तर तयार होतं. ‘मी फावल्या वेळेत रेडिओ कधीच ऐकत नाही. नेव्हर.. आणि जरी ऐकला तर तो एक गृहपाठ म्हणून. फावल्या वेळेत मला कार रेसिंग बघायला आवडतं. ड्राइव्हला जायला आवडतं आणि पंजाबी असल्याने खाण्याचा शौक तर अंगभूतच आहे.’
जाता जाता शेवटचा प्रश्न. तुला काय वाटतं, तुझी सामाजिक जबाबदारी काय आहे? एक क्षणही न थांबता तो उत्तरतो, ‘लोकांचं मनोरंजन करणं. मुंबईमधलं आजचं जीवन हे दगदगीचं, ताणतणावाचं आहे. यात आनंदाचे, हास्याचे दोन क्षण मुंबईकरांना देऊन त्यांना सुखावत असेन तर ती माझी जबाबदारी निभावल्यासारखंच आहे. मी पक्का मुंबईकर आहे. माझी आई तर पंजाबीएवढंच उत्तम मराठी बोलते. मुंबई हे उत्सवी शहर आहे. मला मुंबईतलं हे मुंबईपण साजरं करायचं आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2014 1:19 am

Web Title: radio jockey 2
टॅग Diwali
Next Stories
1 आवाज की दुनिया : हॅलोऽऽऽ मी बाबूराव बोलतोय! – यशवंत कुलकर्णी
2 आवाज की दुनिया : आरजेंनी भडकपणा टाळायला हवा – डॉ. लव्हगुरू
3 आवाज की दुनिया : भागता घोडा, बहता पानी और.. – नसर खान
Just Now!
X