lp10दिवाळी २०१४
अमिन सयानी, ज्येष्ठ रेडिओ निवेदक

ऑल इंडिया रेडिओने अमिताभ बच्चन यांना निवेदकाच्या परीक्षेत नापास केलं होतं, हे आता सर्वाना माहीत आहे. मात्र ही गोष्ट खुद्द अमिताभ बच्चन यांनीच एका मुलाखतीत मला सांगितली होती आणि तेव्हा माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं. कारणही तसंच होतं, ऑल इंडिया रेडिओने अमिताभ यांच्या किती तरी आधी मलाही नापास केलं होतं. गेली ६०-६५ वष्रे रेडिओवर हजारो कार्यक्रम करणाऱ्या अमिन सयानी यांच्या बाबतीत असं कसं घडू शकेल, असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल. मात्र तसं झालं खरं. इंग्लिश आणि गुजरातीमध्ये शिक्षण झाल्याने माझ्या िहदी उच्चारांवर या दोन्ही भाषांचा प्रभाव होता. साहजिक, माझे मोठे बंधू हमीद यांच्या पावलावर पाऊल टाकून रेडिओवर निवेदक होण्यासाठी मी दाखल झालो, तेव्हा िहदी निवेदक म्हणून मला नाकारण्यात आलं, मात्र इंग्रजी निवेदक म्हणून काम मिळालं. (िहदी निवेदक या नात्याने नाकारलं गेल्याने माझ्यात न्यूनगंड निर्माण झाला होता आणि तो तब्बल १५ वर्षे मनात घर करून होता.) त्या वेळी िहदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ सुरू होता. तरीही तत्कालीन केंद्रीय नभोवाणी मंत्री डॉ. बी. व्ही. केसकर यांनी त्या गीतांना आकाशवाणीवर बंदी घातली आणि केवळ शास्त्रीय संगीताचं प्रसारण करण्याचे निर्देश दिले. या निर्णयाचा लाभ घेतला तो रेडिओ सिलोनने. या केंद्राने आपली वाणिज्य सेवा सुरू करीत िहदी चित्रपटगीतांच्या कार्यक्रमांचा धडाका लावला आणि त्यातून जन्म झाला तो बिनाका गीतमालेचा. या गीतमालेचं निवेदन करण्याची संधी मला मिळाली आणि अल्पावधीत मी जगभरात लोकप्रिय झालो. १९५२ मध्ये सुरू झालेल्या या गीतमालेच्या श्रोत्यांची संख्या १९६०च्या अखेरीपर्यंत आशिया, पूर्व आफ्रिका आणि जगातील अन्य भागांत मिळून तब्बल २१ कोटींवर पोहोचली होती, यातच सारं काही आलं. अर्थात, यामागे माझे अथक परिश्रम होते, हे मी विनम्रपणे सांगू इच्छितो. रेडिओवर कोणताही कार्यक्रम सादर करताना एकेक सेकंद महत्त्वाचा असतो, तसंच तयार संहितेशिवाय कोणताही कार्यक्रम करू नये हा कटाक्ष मी पाळला. रेडिओ निवेदकाने म्हणजे आजच्या भाषेत ‘आरजे’ने ‘सत्य, सरळ, स्पष्ट, सभ्य, सुंदर आणि स्वाभाविक’ बोलावं, असा नियम मी स्वत:ला घालून दिला होता आणि तो आजही मी पाळत आहे. गीतमालेव्यतिरिक्त ‘एस. कुमार्स का फिल्मी मुकदमा, सॅरिडॉन के साथी, बोर्नव्हिटा क्वीझ कॉन्टेस्ट, शालिमार सुपरलॅक जोडी, मराठा दरबार’ आदी अनेक कार्यक्रम सिलोनवर मी केले, कालांतराने आकाशवाणीने वाणिज्य सेवा सुरू केली आणि तेथेही मी असंख्य कार्यक्रमांची निर्मिती केली.
काळाच्या ओघात खासगी एफएम सुरू झालं. या मंडळींची बोलण्याची पद्धत अनोखी होती. त्याबाबत उत्सुकता चाळवल्याने मी
त्या-त्या केंद्र संचालकांना फोन करून विचारलं, एवढय़ा कमी कालावधीत ही मंडळी स्क्रिप्टची तयारी कशी करतात? त्यावर त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की, ‘नो स्क्रिप्ट’ हेच आमचं धोरण आहे. मला या प्रकाराची गंमत वाटली. मात्र स्क्रिप्ट नसल्याचे तोटेही असतात, हे मी त्यांना सांगितलं. वायफळ बोलणं तसंच प्रसंगी अश्लीलतेकडे झुकणारी विधानं करणं, हे प्रकार यामुळे होऊ शकतात. तरीही या सर्व नव्या मंडळींची कामगिरी पुढे-पुढे सुधारत गेली. ते वेळोवेळी माझं मार्गदर्शन घेत गेले, मी या सर्वाचा अमिनभाई झालो. कार्यक्रमाची पूर्वतयारी करत चला, कोणत्याही भाषेत बोला, मात्र शुद्ध बोला, सहज-सोपं बोला, असा संदेश मी त्यांना दिला व देतो. रेडिओच्या या नव्या रूपाशीही मी एकरूप झालो आहे. रेडिओ सिटी या केंद्रावर ‘संगीत के सितारों की महफिल’ हा माझा कार्यक्रम श्रोत्यांना खूप आवडला, सध्या ‘सितारों की जवानियाँ’ हा माझा कार्यक्रम तेथे सुरू आहे. वयाच्या ८२व्या वर्षीही मी ‘आरजे’ या नात्याने कार्यरत आहे, ते जगभरातील श्रोत्यांच्या प्रेमाच्या पाठबळावरच!