आपल्याला माहीत असलेली रामकथा आपल्याला लौकरच एका अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला मिळणार आहे, ती सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या रामायणावरील चित्रमालिकेतून…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामायण आणि महाभारत ही दोन्ही महाकाव्ये भारतीय मनात खोलवर रुजलेली आहेत. एवढी की, या दोन्ही महाकाव्यांचे कथासूत्र प्रत्येक भारतीयाला पक्के ठाऊक असतेच. पण फक्त प्रत्येक भारतीयालाच का, तर खरे तर आग्नेय आशियातील प्रत्येक देशामध्ये रामायण आणि महाभारत तेथील नागरिकांनाही ठाऊक आहे. कधी तो देश थायलंड असतो, कधी व्हिएतनाम, श्रीलंका तर कधी इंडोनेशिया; एवढाच काय तो फरक! पण रामकथा माहीत नाही, असा माणूस सापडणे आशियातील या भागामध्ये तरी तसे कठीणच आहे! शेकडो वर्षांच्या कालखंडामध्ये रामकथा गायली गेली आणि तिला वेगवेगळे संदर्भही प्राप्त होत गेले. त्यातील मध्यसूत्र तसेच आहे. पण तिच्या काही वेगवेगळ्या आवृत्त्याही तयार झाल्या. तुलसी रामायण, अध्यात्म रामायण अशा या आवृत्त्याही लोकमानसांत खोलवर रुजल्या. काही जण याकडे महाकाव्य म्हणून पाहतात, तर काही जण आध्यात्मिक ग्रंथ म्हणून. मध्ययुगामध्ये तर आध्यात्मिक ग्रंथांमध्ये अध्यायागणिक एक चित्र देण्याची परंपरा आली आणि रामायणाला दृश्यरूपही मिळाले. आजवर सर्वाधिक चित्रित झालेल्या विषयांमध्ये रामायणाचा सहज समावेश होतो. आता तर त्याचे काही साचेही तयार झाले आहेत. म्हणजे भरतभेट असे शब्द उच्चारले तरीही रामाची गळाभेट घेणाऱ्या भरताचे एक साचेबद्ध चित्र नजरेसमोर येते.. त्यामुळेच प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत रामायणावर चित्रमालिका करीत आहेत, असे कळले त्याच वेळेस कुतूहल जागे झाले होते. आता रामायणावरील वेगळी चित्रे पाहायला मिळतील, असे वाटले होते.
या रामायण मालिकेत कामत यांनी एकूण २७ चित्रे चितारली आहेत. कामत एखाद्या विषयाला हात घालतात तेव्हा विषय नेहमीचाच असला तरी विविध अंगांनी आपल्याला तो विषय ते केवळ दृश्यरूपात पाहायलाच लावतात असे नाही तर विचारही करायला लावतात, असा आजवरचा अनुभव होता. त्यामुळे या प्रदर्शनाविषयी अधिक उत्सुकता ताणली गेली होती. सुरुवातीच्या काही चित्रांमधूनच अपेक्षा पूर्णत्वास जाताना दिसू लागली. ही चित्रमालिका पाहताना असे लक्षात आले की, काही विषय वेगळे आहेत, रामायण म्हटले की काही ठरावीक प्रसंग मनावर कोरले गेलेले असतात, ते इथे दिसत नाहीत. त्याबाबत विचारता वासुदेव कामत म्हणतात, लोकांनी केले तेच मी चितारले तर त्यात वेगळेपण ते काय असणार? शिवाय मी ज्या नजरेने रामायण पाहतो त्या पद्धतीनेही एकदा रसिकांनी विचार करून पाहावा, असे मला वाटले. त्यामुळे रामायणाच्या संदर्भात जे प्रसंग माझ्या मनावर एक प्रभाव टाकून गेले आणि त्यांनी मला विचार करायला लावले, अशा प्रसंगांची निवडच मी या चित्रमालिकेसाठी केली! म्हणजे रामायणाच्या पाश्र्वभूमीला कथा घडलेली असते ती दशरथाचा बाण लागून गतप्राण झालेल्या श्रावणबाळाची. त्याचे आई-वडील शाप देतात की, पुत्रवियोगाने त्याला मरण येईल. त्या वेळेस दशरथाच्या मनातील विचार नेमके काय असतील, याने मला अस्वस्थता यायची, असे सांगून कामत पुढे म्हणतात, तोपर्यंत दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी अनंत पूजापाठ केलेले असतात. आणि पुत्रयोग नाही म्हणून तो दु:खी असतो. असा दशरथ पुत्रवियोगाने मृत्यू हा शाप ऐकून आनंदित होतो का, कारण पुत्रवियोगाने मृत्यू होण्यासाठी पुत्रयोग तर यावा लागेलच ना! मग एकाच वेळेस पुत्र होण्याचा आनंद आणि त्याच्या वियोगाने मृत्यू होणार म्हणून दु:ख असे दशरथाच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला चित्रकार म्हणून टिपता येतील का, असा प्रश्न पडला आणि मग ते आव्हान म्हणून स्वीकारले!
राजा दशरथाला मिळालेल्या त्या शापवचनाचा प्रसंग तर अनेकांना ठाऊक असतो, पण त्यामागे असाही एक चित्रविचार असू शकतो हे आपल्याला कामतांची चित्रे पाहताना दृश्यरूपात प्रकर्षांने जाणवते. मग फक्त हे एवढेच चित्र नाही तर अहिल्योद्धारणाच्या प्रसंगातील चित्राबाबतीतही असाच अनुभव येतो. यात अहिल्या शिळारूपात पडून राहिली याचा अर्थ कामत असा लावतात की, ती शिळेच्या मागे शिळेप्रमाणे निश्चल पडून राहिली, समाजासमोर आली नाही. तिचा शीलभंग झालेला असल्याने त्यांनी भंगलेल्या शिलाखंडाच्या मागे दाखविले आहे. तिला सन्मानाने समाजासमोर आणण्याचे काम श्रीराम करतो. या प्रसंगाचा अन्वयार्थ लावताना कामत आजच्या परिस्थितीचाही आपण विचार करावा, असे सुचवतात. ते म्हणतात, आज समाजामध्ये बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. अशा बलात्कारित स्त्रियांनाही समाजाने सन्मानाने जीवन जगण्यास मदत करावी हीदेखील आजची गरजच आहे! किंबहुना या विचारांमुळेच प्रसंग रामायणातीलच असला तरी चित्र आपल्याला प्रसंगाकडे पाहण्याची एक वेगळी नजर देते.
कामत म्हणतात.. आजवर केवळ सर्वानी रामाचे वर्णन मर्यादापुरुषोत्तम म्हणून केले.. मी मात्र त्याच्यातील माणूस शोधण्याचा प्रयत्न केला. खरे तर रामायण तसे बालपणापासून मनात होते. मुंबईला बोरिवली येथे बालपण गेले. तेव्हा काजूपाडय़ात अनेकदा रामलीला पाहायचो, तेव्हापासून रामायण डोक्यात होते..
रामाच्या बालपणातील एक चित्र तर.. चेहऱ्यावर स्मितरेषा उमटवणारे आहे. रामाचे आणि चंद्राचे नाते तर तसे घनिष्ठच! नावच रामचंद्र. द्वितीयेची चंद्रकोर दर्शनानंतर लहान मुलाचे मुख पाहावे म्हणतात.. इथे तर खुद्द ते बालकच रामचंद्र! मग काय होत असावे? कामत यांचे हे चित्र केवळ भावणारे असेच आहे. घंगाळ्यामध्ये असलेल्या शांत पाण्यात तो लहानगा राम चंद्रदर्शन घेतो आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरील तेजाचे दर्शन इतर भावंडे घेताहेत.. असा हा प्रसंग कामत यांनी चितारला आहे! यात चित्रकाराला सुचलेली कल्पनाच नाटय़मय आहे!
असे वेगळे कल्पनादर्शन अनेक चित्रांमध्ये पाहायला मिळते. एका चित्रात मारुतीची शेपटी हातात घेऊन तिलाच वंदन करणारा भरत पाहायला मिळतो. वनवास संपवून आलेला राम भाऊ भरताला मारुतीचा परिचय करून देतोय असा हा प्रसंग आहे. भरतामध्ये असलेला विनय कामत वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात.. मारुती हा खरे तर वानर.. शेपटी हा त्याच्या शरीराचा म्हटले तर सर्वात कमी महत्त्वाचा असा भाग. पण त्याला रामाचे सख्य लाभल्याने त्या शेपटीलाही भाग्य लाभले आणि म्हणून त्या कमी महत्त्वाच्या शेपटीलाही वंदन असा भाव या चित्रात कामत यांनी जागवला आहे!
राम-सीता स्वयंवराचे चित्र पाहून तर गीतरामायणातील आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे.. या ओळी आठवाव्यात. ते दृश्यरूपात अनुभवायचे तर हे स्वयंवरचित्र पाहायलाच हवे. आकाशाएवढी रामाची उंची आणि तिचे पाय धरणीला टेकलेले म्हणून वरमालेसाठी उंची साधण्यासाठी टाचेवर उभी राहिलेली सीता असे हे चित्र आहे!
याशिवाय शबरी, नांगरणी करताना सापडलेल्या पेटीतील बालक असलेली सीता.. हे सर्व प्रसंग तर आपल्याला ठाऊक असतीलच ! पण चित्रे थोडी वेगळ्या नजरेने पाहावी लागतील हे मात्र रसिकांना विसरून चालणार नाही. म्हणजे नांगरणीच्या वेळेस सापडलेल्या सीतेबद्दल कामत म्हणतात.. जनकाची देहबोली वेगळी आहे. कोणत्याच कथेत जनकाच्या पत्नीचा उल्लेख येत नाही. सीतेसाठी तोच पिता अन् माताही. म्हणून त्याची देहबोली काहीशी आईप्रमाणे दाखविली आहे!
काही चित्रप्रसंगच मुळात वेगळे आहेत, आपण कधीही यापूर्वी दृश्यरूपात न पाहिलेले. यातील सर्वात प्रभावी आहे ते बालपणी शिवधनुष्याशी खेळणाऱ्या सीतेचे चित्र. यात वरती लटकवलेल्या धनुष्याच्या दोरीशी खेळणारी सीता पाहायला मिळते. ती खरे तर प्रत्यंचा जोडण्याचा प्रयत्न करते आहे.. ते पाहून जनकाच्या भेटीला आलेले ऋषी म्हणतात.. अरे, हिच्यासाठी स्वयंवराला पण लावणार तर तो हाच असावा की, शिवधनुष्याला प्रत्यंचा लावता यायला हवी! या मालिकेचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक चित्रामध्ये एक छोटुकली खारूताई दिसते! ही घडणाऱ्या रामायणाची साक्षीस्वरूप म्हणून येते. सेतू बांधण्याच्या वेळेस वाळू वाहणाऱ्या त्या खारीला वाटते की, आपल्या दगडावरही रामनाम हवे म्हणून एक छोटुकला दगड घेऊन मारुतीला विनंती करते, असे हे चित्र आहे. तिच्या मनातील ते भाव मारुतीच्या चेहऱ्यावर मिस्कीलतेने उतरले आहेत!
खरे तर या मालिकेची सुरुवात आणि शेवटही अशाच वेगळ्या चित्रांनी होतो. सुरुवातीच्या चित्रात मारुती ध्यानस्थ बसलेला आणि कामत पाठमोरे बसून राम- सीतेचे चित्रण करताहेत कॅनव्हॉसवर.. मारुतीने दाखविले आणि चित्रकाराला कळले तसे हे रामायण कॅनव्हॉसवर उतरले.. असे सांगण्याचा प्रयत्न तर कामत करीत नाहीत ना.. आणि अखेरच्या चित्रातही मारुती आहेच.. यात एका लहान मुलाला घेऊन मारुती रामकथा सांगतोय.. ही रामकथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते त्यात मारुतीच मध्यस्थ असतो. कारण लहान मुलांना आवडणाऱ्या देवांमध्ये त्याचा समावेश अटळ.. असेच सांगण्याचा हा कामतांचा प्रयत्न!
सध्या राम असे म्हटले की त्याभोवती राजकीय हल्लागुल्लाच अधिक होतो. बाजूचे वातावरणही तसेच आहे! या वातावरणात किल्मिष टाळून रामाचे माणूसपण समोर आणणारी ही चित्रे खरोखरच वेगळी ठरतात. फक्त त्यासाठी नेहमीचा राम बाजूला ठेवून जरा वेगळ्या नजरेने पाहायला हवे!
(हे प्रदर्शन २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबपर्यंत जहांगीरच्या श्रोतृगार दालनामध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत पाहता येईल.)

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramayan
First published on: 19-09-2014 at 01:36 IST