कव्हरस्टोरी
रणबीर कपूरला फक्त हीरो म्हणणं हे त्याच्यावर अन्याय करणारं. सिनेमा स्टार हे वर्णन तर त्याच्याबरोबरच आणखी किती तरी जणांचं करता येईल. निव्वळ अभिनेता म्हटलं तर तो अगदीच बापडा वाटतो. देखणा म्हणावं तर तसे किती तरी जण आहेत. क्यूट, हॉट, रोमँटिक, स्ट्राँग, बबली, लव्हेबल, बॅलन्स्ड, टॅलेंटेड, बिनधास्त, कूल, मॅच्युअर, दीवाना, बडे बाप का बेटा.. ही सगळी विशेषणं लावली तरी त्यापलीकडेही काही तरी उरतंच. असं काय आहे रणबीर कपूरमध्ये?
सहा वर्षांपूर्वी त्या स्वप्नाळू डोळ्यांच्या, तगडय़ा ‘हीरो’ला ‘साँवरिया’मध्ये पाहिले तेव्हाच तो आवडला होता. तेव्हा हा ‘सुपरस्टार मटेरिअल’ आहे की नाही याच्या चच्रेत कुणाला गम्य नव्हते. कारण चित्रपट जोरदार आपटला होता. िहदी चित्रपटातील डायलॉगबाजीला शोभतील अशा ‘बडे बाप की औलाद’च्या चर्चा मात्र झडल्या होत्या. पदार्पणातच त्याच्या चित्रपटाला थेट ‘किंग खान’शी स्पर्धा करावी लागली होती आणि त्यात त्याने खानसमोर सपशेल आपटी खाल्ली होती. कारणे काहीही असोत, पण हे अपयश चित्रपटाला येऊनही त्याच्यातला हीरो मात्र अपयशी ठरला नव्हता. तो स्वप्नाळू डोळ्यांचा हीरो पाहून ‘चांगला दिसतो की! कामही छान करतो’ वगरे प्रतिक्रिया उमटायला लागल्या. तरुणांना त्याचे कमावलेले शरीर भावले, ‘अ‍ॅटिटय़ूड’ भावला, तर तरुणी या ‘टॉवेल डान्स’ करणाऱ्या नव्या हीरोच्या प्रेमात पडल्या. हे प्रेम चित्रपटागणिक वाढत गेले. क्यूट, हॉट, रोमँटिक, स्ट्राँग, बबली, लव्हेबल, बॅलन्स्ड, टॅलेंटेड, बिनधास्त, कूल, मॅच्युअर अशी विशेषणे त्याचे सर्व थरांतले चाहते त्याला देत राहिले.
रणबीर कपूर.. आज सहा वर्षांनंतर आणि चौदा चित्रपटांनंतर सगळ्या खानांना मागे टाकत सुपरहीरो बनण्याच्या मार्गावर आहे. तो चांगला दिसतो, चांगला अभिनय करतो, चांगला नाचतो, चांगले शरीर कमावलेले आहे. पहिल्या चित्रपटापासूनच त्याच्यातले हे गुण दिसले होते. म्हणजे ‘हीरो मटेरिअल’ तर तो होताच, पण आज तो सर्वाधिक चच्रेत असलेला, प्रत्येक गोष्टीत (पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्याही) सगळ्यात जास्त भाव खाऊन जाणारा आणि टीकाकारांपासून फॅन्सपर्यंत सगळ्यांचा लाडका होऊन बसला आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये अमुक एका ‘क्लास’ची मंडळी आहेत असे नाही. त्याला पाहिल्यावर मुलींच्या तोंडून अगदी उत्फुल्ल चीत्कार बाहेर पडतात, पण मुलांनाही तो तितकाच आवडतो. त्यांच्या आई-वडिलांनाही तो भावतो. आवडता हीरो म्हणून सगळ्या घराचे रणबीरच्या नावावर एकमत होते. रणबीरने केलेली कुठलीही गोष्ट बातमी होते. पापारात्झी तर त्याच्या मागावर असतातच. काय आहे ही रणबीर नावाची जादू? आणि ती का आहे?
रणबीर कपूर सुपरस्टार आहे की नाही, ही चर्चा आता करण्यात अर्थ नाही. त्याच्या नावावर आज चित्रपटगृहांत गर्दी होते हे खरे. तरीही त्याची लोकप्रियता ठरावीक साच्यात अडकलेली नाही. ग्रामीण आणि शहरी भागात तो सारखा ‘चालतो’. नव्या पिढीतील नायकांपकी तो खऱ्या अर्थाने एकमेव आश्वासक कलाकार आहे, याबद्दलही कुणाचे दुमत नाही. व्यावसायिक यशाचे आडाखे बांधत चित्रपट करणाऱ्यांना तो हवासा वाटतो तसा कलात्मक बाज जपणाऱ्यांनाही तो आपल्या चित्रपटात असावा असे वाटते. नव्या पिढीची नस ओळखलेला, या पिढीचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारा, तरीही जुन्या पिढीला भावेल असा हीरो रणबीरच्या रूपाने मिळाला आहे. ही किमया त्याने कशी साधलीय हे शोधणे रंजक ठरेल.
प्लॅनिंगमध्येही उस्फूर्तता
रणबीर कपूरच्या निवडीतून, वागण्यातून, बोलण्यातून त्याचा ‘राइट अ‍ॅटिटय़ूड’ जाणवत राहतो. तो आपल्या चुका प्रांजळपणाने मान्य करतो आणि निर्णयांबाबत, वागण्याबाबत ठाम असतो. कोण काय म्हणेल याची फिकीर तो कधीच करत नाही, पण म्हणून तो बेसावध असतो असे मुळीच नाही. म्हणून तर आपले पहिले अफेअर सातवीत असताना सुरू झाले असे तो बिनधास्त सांगतो. चित्रपटातील नायिकांबरोबर आपले नाव जोडले जाते हे त्याला आवडत नाही, पण त्यावरून तो अजिबात त्रागा करत नाही. ‘असे होणारच’, असे वर समजूतदारपणे मान्य करतो. त्याबद्दल मीडियाला किंवा कुणा दुसऱ्याला दोष देत नाही.
आपला राइट अ‍ॅटिटय़ूड लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्याचे ‘कॉन्शस एफर्ट’ चालले आहेत, हे जाणवत राहते. त्याचे व्यक्तिमत्त्व तसे रांगडे. पंजाबी चण आणि ठेवण त्यातून प्रकर्षांने दिसते. पण खरे तर रणबीरसाठी ‘रांगडा’पेक्षा ‘उमदा’ हा शब्द योग्य ठरेल. तो हवाहवासा वाटतो या उमदेपणामुळे. शिवाय त्याच्या व्यक्तिमत्त्वातून एक प्रांजळपणा, सच्चेपणा दिसतो. हा प्रांजळपणा आलाय तो उत्स्फूर्ततेमुळे. पण ही उत्स्फूर्तता त्याच्या ‘लाइफ प्लॅन’चा भाग असल्यासारखी वाटते. हा आराखडा असूनही साचेबद्ध वाटत नाही, उत्स्फूर्त वाटतो आणि अगदी हेच नेमके आजच्या पिढीचे वैशिष्टय़ आहे. आजची पिढी या ‘प्लॅन्ड उत्स्फूर्तते’च्या प्रेमात असते. म्हणजे आजच्या पिढीला साचेबद्ध जगणे अमान्य आहे. त्यांना सतत काही तरी ‘एक्सायटिंग’ हवे असते. त्याच वेळी या आजच्या पिढीला कुठलीही गोष्ट अनप्लॅन्ड असलेली खपत नाही. पण प्लॅनिंगमध्ये उत्स्फूर्तताही हवीच असते, कारण त्यामुळेच जगण्याची एक्साइटमेंट वाढते. तोचतोचपणा, साचेबद्धपणा आजकाल कुणालाच नको असतो. रणबीरने आतापर्यंतच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आणि त्याच्या करिअरमध्ये हे नेमके वैशिष्टय़ जपले आहे. त्याच्या पडद्यामागच्या आयुष्यातूनही ते सतत दिसत असते.
पडद्यावरही त्याची ही ‘प्लॅन्ड उत्स्फूर्तता’ त्याच्या चित्रपटांच्या निवडीतून दिसते. याआधीच्या सुपरस्टार्सनी एक ठरावीक इमेज जपल्याचे दिसते. म्हणजे अगदी दिलीपकुमारपासून शाहरुख खानपर्यंत सगळे जण लोकप्रिय भूमिकांना कुठे तरी बळी पडल्याचे दिसते. त्यांची ती ठरावीक भूमिका अगदी ‘पेटंट’ असते. हमखास यश देणारी आणि लोकप्रिय होणारी. अमिताभ बच्चनच्या बाबतीत तर त्याची अँग्री यंग मॅनची इमेज किती वेळा जपली गेली याची मोजदाद नाही. आत्ता कुठे या वयात अमिताभ बच्चन यांना त्यांच्यातील अभिनेत्याला कसाला लावणाऱ्या, कारकीर्द खऱ्या अर्थाने विविधरंगाने फुलवणाऱ्या भूमिका मिळायला लागल्या आहेत, पण करिअरच्या सर्वोच्च बिंदूवर असताना मात्र त्या इमेजच्या आहारी जाण्याचा मोह त्यांच्यासारख्या हुशार कलावंतालाही आवरला नव्हता.रणबीरच्या बाबतीत आतापर्यंत तरी हे झालेले नाही. कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून त्याने भूमिकांचे वैविध्य जपले. त्याला तशा वेगवेगळ्या भूमिका चालून आल्या हे त्याचे भाग्य म्हणायचे की त्याचे आडाखे, हे मात्र शोधावे लागेल. आतापर्यंत तो एकाच इमेजमध्ये अडकलाय ती म्हणजे लोकांच्या मनातील लोकप्रिय ‘हीरो’ची. ही भूमिका तो पडद्यावर आणि पडद्यामागेही छान निभावतो आहे. ही इमेज जपण्याचा तो अगदी मनापासून प्रयत्न करतो आहे. पण हा प्रयत्न कुठेच ओढूनताणून केल्यासारखा चाहत्यांना जाणवत नाही, हीच त्याची चतुराई.
संजय लीला भन्साळीसारख्या बडय़ा बॅनरच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर रणबीर पडद्यावरच्या कुठल्याही भूमिकेच्या चौकटीत अद्याप अडकलेला नाही की कुठल्या बॅनरमध्ये किंवा कुणाच्या लागेबांध्यांमध्ये अडकलेला नाही. ‘सावरियाँ’च्या अपयशानंतरही त्याला ‘यशराज’च्या बडय़ा बॅनरचा ‘बचना ऐ हसीनों’ मिळाला. असे बडे बॅनर मिळण्यामागे त्याची पूर्वपुण्याई (आणि पूर्वजांची पुण्याई) होती यात शंका नाही. पण पहिल्या चित्रपटातून आणि  योग्य अ‍ॅटिटय़ूडमधून त्याने स्वत:बद्दल आश्वासकता निर्माण केली होती. त्याचा  हा दुसरा चित्रपट हिट झाला. त्यानंतर याच मसाल्याचे अनेक चित्रपट सांगून आले. पण त्याने ते स्वीकारण्याची घाई केली नाही. २००७ या वर्षांत पदार्पण,  दुसऱ्याच वर्षांत एक हिट आणि तिसऱ्या वर्षांत त्याने आपल्यातला कसदार अभिनेता दाखवणारे आणि ‘प्लॅन्ड उत्स्फूर्तता’ दाखवणारे तीन वैविध्यपूर्ण चित्रपट केले. या वर्षांनंतर रणबीर कपूर या नावाची खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाली. नुसताच स्टारपुत्र म्हणून हा वलयांकित नसून हा ‘लंबी रेस का घोडा’ ठरणार असे आश्वासन या वर्षांने दिले. २००९ मध्ये रणबीरचे ‘अजब प्रेम की गजब कहानी’,  ‘वेक अप सिद’ आणि ‘रॉकेटसिंग- सेल्समन ऑफ द इयर’ हे तीन वेगळे आणि चांगले चित्रपट आले. यातला रॉकेटसिंग तर कुठलीही व्यावसायिक यशस्वितेची गणिते न मानणारा होता. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा असला चित्रपट करणे म्हणजे धाडसच म्हणावे लागेल. ते धाडस रणबीरने केले. त्यातून तो चित्रपट समीक्षकांचा लाडका बनला.
मी मोठा स्टार म्हणून मोठय़ा बॅनरचेच चित्रपट करणार असा पोकळ अभिनिवेश त्याच्या वृत्तीत दिसत नाही. तसेच बरोबर कोण नायिका आहे यात त्याला फारसे गम्य नसते. ‘चित्रपट स्वीकारताना मी स्क्रिप्टला महत्त्व देतो. तो कुणी केला आहे किंवा माझ्याबरोबर कोण हिरोइन त्यात असणार आहे याला माझ्या लेखी फार महत्त्व नसते. कारण कथा आणि भूमिका हा चित्रपटाचा आत्मा असल्याचे मी मानतो’, रणबीर सांगतो. त्याच्याबरोबर काम करणाऱ्या नायिकांमध्येही या अ‍ॅटिटय़ूडमुळे वैविध्य आढळते. नवख्या अभिनेत्रींपासून ते प्रस्थापित ग्लॅमरस अभिनेत्रींपर्यंत सगळ्यांबरोबर तो तितकेच मन लावून काम करतो. कोंकणा सेन शर्मा ते कतरिना कैफ असा त्याच्या नायिकांचा ग्राफ आहे. तो या सगळ्यांबरोबर छान वाटतो, शोभून दिसतो.
संपन्न वारसा
रणबीर कपूरला मिळालेला संपन्न वारसा हे त्याच्या आताच्या बेधडक तरीही विचारपूर्वक सावध वृत्तीमागचे कारण असावे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांचा संपन्न कलेचा वारसा त्याच्यापाशी आहे. तसा दुसऱ्या अर्थाने भौतिकार्थानेही तो संपन्न आहे. मोठे नाव, बक्कळ पसा, इभ्रत सगळेच रणबीरकडे घराणेशाहीने चालत आलेले. यामुळे कधीही पशासाठी किंवा मरातब मिळवण्यासाठी एस्टॅब्लिश होण्याची आवश्यकता त्याला वाटली नसावी. मान-मरातब आणि आíथक संपन्नता होतीच. ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर पहिल्या चित्रपटापासून होती. त्यामुळे चित्रपटाची निवड असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींची वाच्यता असो, परिस्थितीपुढे लाचार होऊन निर्णय घेण्याची वेळ रणबीरवर कधीच आली नाही. व्यावसायिक गणिते जमवण्यासाठी कुठले अयोग्य निर्णय घेण्याची गरजही त्याला या संपन्न वारशामुळे आली नसावी. त्यामुळे रणबीरने निवडले ते सगळे जोखून, पारखून. तो वागलाही बिनधास्त तरीही पॉलिटिकली करेक्ट. त्याच्याशी बोलताना त्याचा हा ‘राइट’नेस वारंवार जाणवत राहतो. त्याचे पॉलिटिकली करेक्ट वागणेही ओघवते आणि सरळ वाटत राहते. त्याच्या यशस्वितेचे फंडे त्याच्या चित्रपटांप्रमाणेच वेगळे आहेत, आकर्षक आहेत, पण चतुर आहेत. त्याच्यातला ‘राइटनेस’ दाखवणारे आहेत.
तरीही राइट अ‍ॅटिटय़ूड
तरुणपणाच्या जोशात वाहवत जाणारे अनेक असतात. यश पचवता न येऊन वाया गेलेले अनेक स्टार िहदी चित्रपटसृष्टीने पाहिले आहेत. त्यावर अनेक कहाण्या लिहिल्या गेल्या आहेत, चित्रपटही आले आहेत. ‘ये जवानी है दीवानी’ असे म्हणत रणबीर चित्रपट करतो, पण खऱ्या आयुष्यात मात्र जवानीचा दीवानेपणा व्यवस्थित हँडल करतो. त्याच्या कारकिर्दीतला दुसराच चित्रपट – ‘बचना ऐ हसीनों’. या चित्रीकरणादरम्यानच तो सहनायिका दीपिका पदुकोणच्या प्रेमात पडला. या प्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली. चित्रपटाच्या प्रसिद्धीला त्याने फायदा झालाच, पण दोघांनीही आपले प्रेम लपवून ठेवण्याचा आटापिटा केला नाही हे विशेष. ‘बीइंग इन रिलेशनशिप’ यात काही ‘बिग डील’ राहिले नाही, हा नव्या पिढीचा विचार त्याच्या वागण्यातून उघड दिसला, पण आपल्या प्रेमाबद्दल उघडपणाने बोलताना त्याने व्यावसायिकता कधी सोडली नाही. कारण जशी या दोघांच्या प्रेमाची चर्चा झाली तशी नंतरच्या ‘ब्रेक-अप’चीही. दोघांमधले नाते संपूनही त्यांनी ‘ये जवानी है दीवानी’ हा चित्रपट केला आणि तो यशस्वीही झाला. यातूनच त्याची पक्की व्यावसायिकता दिसते. हाच रणबीरचा राइट अ‍ॅटिटय़ूड. आता नुकतेच स्पेनमधले त्याचे कतरिना कैफबरोबरचे फोटो प्रसिद्ध झाले आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, पण या चर्चेला त्याने वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू दिलेली नाही की व्यावसायिक निर्णयात. ‘मी स्टार आहे. त्यामुळे लोकांना माझ्याबाबत जाणण्याची उत्सुकता असणार. मीसुद्धा पूर्वी अशा स्टारसंदर्भातल्या बातम्या आवडीने वाचल्या आहेत. मीडियाला याबाबत दोष देण्यात अर्थ नाही; पण ते माझे वैयक्तिक आयुष्य आहे,’ असे रणबीर या चच्रेला उत्तर देताना म्हणतो. यातून त्याचा बिनधास्त तरीही राइट अ‍ॅटिटय़ूड दिसतो.
राइट चॉइस
रणबीरमध्ये एक चतुर अभिनेता दडलेला आहे, हे त्याच्या चित्रपटांच्या निवडीवरून लक्षात येते. भूमिकांचे वैविध्य त्याने कायम ठेवले आहे. तो चतुरस्र अभिनेता ठरण्यामागे त्याची ही चतुर निवड हेही कारण अगदी महत्त्वाचे आहे. ‘व्यावसायिक गणिते बघत मी चित्रपट स्वीकारत नाही’, असे तो सांगतो खरा. पण अशा उत्स्फूर्ततेवर आधारित चित्रपटांबरोबर तो इतरही काही चित्रपट करतो, ज्यातून त्याची ‘लोकप्रिय’तेची इमेज जपली जात असते. भूमिकांचे वैविध्यही त्याला या निवडीतून मिळते. साचेबद्धतेचा शिक्का बसत नाही आणि हरहुन्नरी कलाकार म्हणून वर्णी लागते. ‘रॉकेटसिंग’सारख्या चित्रपटातून समीक्षकांची वाहवा मिळवणारा रणबीर ‘अंजाना अंजानी’सुद्धा करतो आणि ‘बर्फी’सारख्या संवेदनशील चित्रपटाबरोबर व्यावसायिक ‘बेशरम’ही लाइनीत असतो. वर्षभरातील सगळ्यात यशस्वी अभिनेत्याचे टाग्रेट तो गेली तीन वष्रे सातत्याने मिळवतो आहे.
राइट बिझनेसनीती
रणबीर कपूर हे नाव आतापर्यंत कुठल्याही व्यावसायिक वाद-विवादात अडकलेले नाही. तीनही खानांशी त्याची तगडी स्पर्धा असूनही तो कधीही त्यांच्याबरोबर स्वत:ची तुलना करत नाही. ‘ते सीनिअर आहेत. मी इंडस्ट्रीत येऊन आता फक्त सहा वष्रे होताहेत. अजून मला लांबचा पल्ला गाठायचाय,’ असे तो प्रांजळपणाने सांगतो. या प्रांजळपणात व्यावसायिकता असते, ती नकारात्मक अर्थाने नाही. बडे बॅनर, छोटे बॅनर असा फरक त्याच्या लेखी गौण आहे, कारण तो ‘चांगले’ कथानक असलेले चित्रपट स्वीकारतो. वर्षभरात प्रदíशत होणारे त्याचे चित्रपट बघता कुठलाही शिक्का आपल्यावर बसणार नाही, याची काळजी तो घेत असल्याचे दिसते. ‘राजनीती’सारख्या चित्रपटात भूमिकेची लांबी तो बघत नाही तर महत्त्व बघतो, स्कोप बघतो. मल्टिस्टारर चित्रपटाचे त्याला वावडे नाही हे त्यातून दिसते. पण पुढच्याच वर्षी ‘रॉकस्टार’सारखा चित्रपट करून तो संपूर्ण चित्रपट एकटय़ाच्या खांद्यावर तोलण्याचे आव्हान स्वीकारतो. यातून त्याची चोखंदळ निवड आणि त्यामागची ‘व्यवसायनीती’ प्रकर्षांने दिसते.
सावरियाँ.. सगळ्यांसाठीच
पहिल्या चित्रपटातून त्याची सगळ्यांचा लाडका अशी ‘सावरियाँ’ भूमिका होती. तीच भूमिका व्यावसायिक यशासाठी पडद्यामागे तो अजूनही जगतो आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लहानांपासून, मोठय़ांपर्यंत आणि शहरापासून गावापर्यंत, क्लासपासून मासपर्यंत सगळ्यांना तो मनापासून आवडतोय. त्याने स्वीकारलेले चित्रपट, त्यातील त्याच्या भूमिका, त्याचे पडद्याबाहेरचे जगणे आणि त्याबद्दल बोलणे या सगळ्यातून रणबीरचे त्याने पडद्यावर निभावलेल्या व्यक्तिरेखांव्यतिरिक्तचे व्यक्तिमत्त्व लोकांना भावते आहे. आपल्या देशात चित्रपट अभिनेते- अभिनेत्री हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो. लोक  त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात, त्यांना अक्षरश: डोक्यावर चढवतात आणि मंदिरात बसवतात. त्यांच्या मनात या चित्रपट ताऱ्यांची एक प्रतिमा असते. ती त्यांच्या पडद्यावरच्या भूमिकेबाहेरच्या वागण्यातूनही बनलेली असते. म्हणूनच आपला आवडता स्टार वैयक्तिक आयुष्यात काय करतो, कसा राहतो, कसा बोलतो याबाबत जाणून घ्यायची प्रचंड उत्सुकता सगळ्यांना असते. रणबीरने आपले खासगी आयुष्य लोकांपासून लपवण्याचा फार प्रयत्न केला नाही. ‘माझ्या लहानपणी घरात आई-वडिलांचं होणारं भांडण बघून मी दु:खी व्हायचो. त्यांच्या त्या वेळच्या ताणलेल्या नात्याचा मी छोटा साक्षीदार होतो. त्या भांडणांचा मनावर परिणाम होणारच.. वडिलांचा मला लहानपणी फार धाक होता..’ हे सगळे रणबीर स्वत: सांगतो. पण नंतर ‘आ अब लौट चले’च्या सेटवर वडील ऋषी कपूर यांना मदत करायला तो पुढे आला आणि त्यानंतर त्यांच्या नात्यात मोकळेपणा आला, नात्यातले बंध हलके झाले, हेदेखील तो नमूद करतो.
रणबीर अजूनही आई-वडिलांबरोबर एकाच घरात राहतो. ‘घरात माझ्या मत्रिणी येत असतात, पण एखादी माझ्या खोलीत जास्त रेंगाळते, थांबते तेव्हा मनात आई-बाबा आता काय विचारतील हे विचार येतातच..’ रणबीरच्या या अशा कैफियतींमधून त्याचे खासगी आयुष्य उलगडते आणि त्यातून एक सच्चा माणूस, प्रांजळ कलाकार पुढे येतो. मनातली त्याची लाडकी इमेज आणखी घट्ट होते. लहानापासून मोठय़ांपर्यंत हा प्रांजळ मनाचा अभिनेता सगळ्यांना आवडायला लागतो. सगळ्यांसाठीच ‘सावरियाँ’ होण्याची ती अवघड पायरी तो सहज सर करतो.
रॉकिंग स्टार ते सुपरस्टार
रॉकस्टार हा रणबीरच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट. या चित्रपटाचा सगळा डोलारा त्याच्या एकटय़ाच्या भूमिकेवर उभा होता. ती जबाबदारी त्याने अगदी ताकदीने पेलली. त्यातून त्याच्यातला कसदार अभिनेता, महत्त्वाकांक्षी नट दिसला. पुढे सुपरस्टारच्या शर्यतीत आपण आहोत, हे त्याने या चित्रपटातून थेट दाखवून दिले. कपूर घराण्याचा वारसा होता, परिस्थिती चांगली होती हे सगळे खरे, पण ही महत्त्वाकांक्षा कारकिर्दीच्या योग्य टप्प्यावर व्यक्त करणे महत्त्वाचे असते. ती वेळ रणबीरने बरोबर साधली. अभिनयाचा, चित्रपटांचा वारसा घेऊन येणारे अनेक जण असतात. स्टारपुत्र आणि कन्यांची फौजच आता दिसते. पण यातल्या फार थोडय़ा लोकांच्या वाटय़ाला हे स्टारपदाचे बिरुद येते. त्यातून रणबीर तर सुपरस्टार बनण्याच्या वाटेला लागला आहे.
यामागे त्याची मेहनत आणि वर उल्लेखलेला राइट अ‍ॅटिटय़ूड हा भाग निश्चितच आहे. ‘मी अभ्यासात हुशार कधीच नव्हतो. कसाबसा पास होत असे. शाळेत असताना अभिनयातही फार कच्चा होतो’, रणबीर स्वत: हे सांगतो. पुढे मुंबईच्या कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर चित्रपटात यायचा मार्ग ठरल्यामुळे त्याने थेट न्यूयॉर्क गाठले होते. तिथून चित्रपटाचे, अभिनयाचे धडे गिरवून तो परत आला. ‘चित्रपटाविषयीचे ज्ञान क्लासरूममध्ये बसून कमी, तर प्रत्यक्ष अनुभवातून जास्त मिळते.’ असे तो आता सांगतो. या प्रत्यक्ष शिकण्याच्या अनुभवासाठीच तो दोन वष्रे संजय लीला भन्साळींबरोबर असिस्टंट म्हणून काम करत होता. ‘ब्लॅक’ चित्रपटाच्या वेळी त्याने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करता करता, हरकाम्या म्हणूनही भूमिका निभावली, असे तो आता सांगतो. यातला खऱ्या -खोटय़ाचा भाग सोडला तरी स्टारपुत्र म्हणून थेट चित्रपटात हीरो म्हणून उतरणे त्याने टाळले हे महत्त्वाचे आहे. ‘पुढेमागे भन्साळी त्यांच्या चित्रपटात अभिनेता म्हणून संधी देतील या सुप्त हेतूने मी त्यांच्याबरोबर मनापासून काम केले, मेहनत घेतली’, रणबीर त्याच्या नेहमीच्या शैलीत हसत हसत डोळे मिचकावत हे आत्ता कबूल करतो. म्हणूनच त्याच्या त्या लाइफ प्लॅनचे कौतुक वाटत राहते.
अर्थात रणबीरच्या या सगळ्या वैशिष्टय़ांचा विचार करताना एक गोष्ट कुठेही विसरता येत नाही की रणबीर हा पक्का कपूर आहे. त्याचे वडील, काका, त्याचे आजोबा एवढंच नाही तर त्याचे पणजोबा हे सगळेच या क्षेत्रात पक्के मुरलेले. पृथ्वीराज कपूर यांच्याबद्दल तेव्हा सगळीकडे एक आदरयुक्त दरारा होता, तर राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर हे सगळेच त्यांच्या त्यांच्या काळातले लोकांचे लाडके हीरो. कपूर घराण्यातल्या  या सगळ्यांवरच लोकांनी भरभरून प्रेम केलं. त्यांनीही सगळ्या स्तरांतला प्रेक्षकवर्ग आपलासा केला. म्हणजेच लोकप्रियतेचे गमक कपूर खानदानाला उमगलं आहे. लोकप्रिय होणं आणि ती लोकप्रियता पेलणं या दोन्ही गोष्टी रणबीरला जणू वारशानेच मिळाल्या आहेत. तोच वारसा आता रणबीर चालवतोय. पिटातल्या प्रेक्षकांपासून ते रिक्लायनिंग चेअरवर बसून चित्रपट बघणाऱ्यांपर्यंत, समीक्षकांपासून ते सामान्य चित्रपट रसिकांपर्यंत सगळ्यांना रणबीर खरा हीरो वाटतो. रॉकिंग स्टार वाटतो. आजच्या तरुणाईचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणाऱ्या अजब रणबीरची ही गजब कपूरनीतीच म्हटली पाहिजे.
रणबीर कपूर हे असे ‘अजब’ रसायन आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना यश पचवण्याची धमक त्याच्यात आहे. व्यावसायिक गणिते जुळवतानाही त्याच्या आहारी न जाण्याचे तारतम्य तो बाळगून आहे. कुठल्याही दबावाखाली काम करणे त्याला मान्य नसते. मुख्य म्हणजे नव्या पिढीची तंतोतंत मानसिकता तो जपून आहे. ती ‘जेन नेक्स्ट’ मानसिकताच त्याला आज सगळ्यांचा लाडका हीरो या बिरुदाकडे नेते आहे.