भारतात, अमृतसर येथे जन्मलेल्या रशीद अत्रे यांना पदार्पणातच आर. सी. बोराल, पं. अमरनाथ, झंडेखां, गोिवदराम यांच्यासारख्या मातब्बर व ख्यातनाम संगीतकारांबरोबर काम करण्याचं भाग्य लाभलं.. शिवाय मोहम्मद रफी, शमशाद बेग़म, जोहराबाई अंबालेवाली, राजकुमारी, सुलोचना कदम, माणिकबाई दादरकर, पारुल घोष, कल्याणी, सरोज बोरकर अशा अनेक प्रथितयश गायक-कलावंतांकडून गाणी गाऊन घेण्याचा सुरेल योगही जुळून आला. नियतीच्या मनात मात्र त्यांना भारतात ठेवायचं नव्हतं आणि पाकिस्तानातही फार काळ जगू द्यायचं नव्हतं. प्रसिद्धीच्या ऐन शिखरावर असताना एक बहुआयामी, सृजनशील संगीतकार कायमचा काळाच्या पडद्याआड गेला होता..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगीतकार रशीद अत्रे यांनी पाकिस्तानात राहून सिनेसंगीताच्या माध्यमातून पेश केलेल्या स्वररचना इतक्या बहारदार होत्या की त्यांच्या कर्णमधुर सुरावटींनी देशाच्या सीमारेषा उल्लंघून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या रसिकांवरसुद्धा गारूड केलं. ‘नींद’ (१९५९) या चित्रपटासाठी रशीद अत्रेंना निगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हे मागच्या लेखात आलंच आहे. यातील सर्वाधिक गाजलेल्या ‘अकेली कहीं मत जाना, जमाना नाजुक है..’ या नूरजहाँ-नसीम बेग़मने कोरससह गायलेल्या गीताची बातच और होती.. या गाण्याची चाल अतिशय लोभस आहे. ऑर्केस्ट्रेशनमध्ये मेंडोलिन व अ‍ॅकॉर्डियनसहित निवडक सुषिरवाद्यांचा (कंठवाद्ये किंवा फुंकवाद्ये) केलेला कल्पक उपयोग तसेच ऱ्हिदममध्ये ढोलकचे आकर्षक ‘पॅटर्न्‍स्’ चित्त आकर्षून घेतात.. विशेष बाब म्हणजे या उर्दू गाण्याच्या शेवटच्या अंतऱ्यात चक्क ‘रामनामा’चा उल्लेख आश्चर्याचा सुखद धक्का देऊन जातो.. जणू, िहदुस्थान-पाकिस्तानची ‘गंगा-जमनी’ तह़जीब फाळणीनंतरसुद्धा चिरंतन आहे हेच यातून अधोरेखित होतं..
नैनों के बान भला क्यों ना चलायें
रूप दिया रामने तो काहे छुपाये
कऽहा करेगा जमानाऽ नाऽजुक है
अकेली कही मत जाना जमाना नाजुक है..
सध्या पाकिस्तानी तरुणाईत ‘अकेली कहीं मत जाना..’च्या ‘रिमिक्स’ची प्रचंड ‘धूम’ आहे. नवलाईची बाब म्हणजे हे ‘रिमिक्स व्हर्जन’ रशीद अत्रेंचा नातू जिमी अत्रे गातोय. जिमी, रशीद अत्रेंच्या धाकटय़ा मुलाचा अर्थात जावेद अत्रेंचा सुपुत्र. उत्तम अरेंजर व गिटारिस्ट असलेल्या जावेद अत्रेंनी या गाण्याचं संगीत संयोजन केलंय.
साठच्या दशकात अत्रेंना ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळवून देणारा चित्रपट म्हणून दिग्दर्शक ख़लील क़ैसरच्या ‘शहीद’चा (१९६२) आवर्जून उल्लेख करावा लागेल. यातल्या गाण्यांनी रशीद अत्रेंना तिसऱ्यांदा ‘निगार पुरस्कार’ मिळवून दिला. ‘मेरी नज़्‍ारे हैं तलवार, किसका दिल है रोके वार, तौबा तौबा अस्तक़बार’ आणि ‘उस बेवफ़ा का शहर है, और हम है दोस्तों’ या नसीम बेग़मच्या गाण्यांनी कमाल केली. ‘मैंने कहा आईए आ भी जाईए..’ हे अहमद रश्दी आणि नसीम बेग़मच्या आवाजातलं युगुल गीत तसेच ‘मै आई हूं. ऐ दिलवालो ठहर ठहर के तीर चलेंगे मस्त ऩजर के..’ हे नाहीद नियाज़्‍ाीचं गाणं यामुळे हा चित्रपट नावाजला गेला.
रशीद अत्रेंना १९६२ साल चांगलंच लाभदायी ठरलं. ‘शहीद’नंतर अवघ्या पाचच महिन्यांत रिलीज झालेल्या दिग्दर्शक नज़्‍म ऩ़क्वीच्या ‘क़ैदी’ ने रशीद अत्रेंचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं. फ़ै़ज अहमद फ़ै़जच्या ‘मुझसे पहलीसी मुहब्बत मेरे महबूब न माँग..’ ही ‘नज़्‍म’ संगीतबद्ध केल्यामुळे रशीद अत्रेंच्या कर्तृत्वाचा डंका सर्वत्र वाजत होता. त्याचबरोबर नूरजहाँचं ‘याद कर कर के सारी सारी रात मैं रोती रही शबनम के साथ..’, मेहदी हसनबरोबर गायलेलं ‘इक दीवाने का इस दिलने कहा मान लिया..’ हे युगुल गीत तसेच ‘मेरे दिल की अंजुमन में तेरी ग़म से रोशनी है. न भुला सकूंगा तुझको तेरा प्यार िज़्‍ादगी है..’ ही सलीम रज़ाने गायलेली हबीब जालिबची लाजवाब ग़ज़्‍ाल यामुळे ‘क़ैदी’तून रशीद अत्रेंच्या चतुरस्र प्रतिभेची झलक दिसली.
‘क़ैदी’नंतर जेमतेम महिनाभरातच रशीद अत्रेंची स्वत:ची निर्मिती असलेला ‘मौसीक़ार’ हा संगीतप्रधान चित्रपट प्रदर्शित झाला. यात शास्त्रीय संगीतावर आधारित एकापेक्षा एक सरस गाणी होती. यातलं नूरजहाँने गायलेलं सर्वाधिक बहारदार गाणं म्हणजे..
गाएगी दुनिया गीत मेरे,
सुरीले अंगमें, निराले रंग में,
भरें हैं अरमानों में..
हे एक लाजवाब ‘अ‍ॅकॉर्डियन साँग’ आहे. नूरजहाँच्या आवाजाइतकंच गाण्यात ‘अ‍ॅकॉर्डियन’सुद्धा भाव खाऊन जातं. मात्र पडद्यावर हे गाणं रस्त्यावर गाणं म्हणणाऱ्या नायिकेच्या (सबिहा ख़ानम) धाकटय़ा भावाच्या हातात हार्मोनियम देऊन चित्रित करण्यात आलंय. चित्रपट पाहताना ‘हार्मोनियम’च्या पाश्र्वभूमीवर ‘अ‍ॅकॉर्डियन’चे पीसेस खटकतात. रशीद अत्रेंसारख्या मातब्बर व अनुभवी संगीतकाराला म्युझिक अरेंज करताना ‘हार्मोनियम’चा वापर करणं सहजशक्य होतं. याच चित्रपटातलं नूरजहाँनेच गायलेलं ‘जा जा मैं तोसे नाही बोलूं..’ हे कर्णमधुर गीत शास्त्रोक्त बंदिशीवर आधारित आहे. यातलं ‘तुम जुग जुग जियो महाराज रेऽ हम तेरी नगरिया में आये..’ हे सलीम रज़ाने गायलेलं क्लासिकल गाणं मंत्रमुग्ध करणारं आहे. नूरजहाँनेसुद्धा ते गायलं आहे. पण सलीम रज़ाने या गाण्यात जीव ओतला आहे. नूरजहाँने गायलेली ‘रसिले मोरे रतिया नजरिया मिला’ ही एक अप्रतिम बंदिश आहे. यात नूरजहाँच्या आवाजात गमकयुक्त आलापी आणि तानांचा केलेला प्रभावी वापर तसेच कोरसचं केलेलं कल्पक नियोजन अफलातून आहे. रागरागिण्यांचा मुक्त वापर असलेल्या या चित्रपटात तब्बल १५ गाणी रशीद अत्रे यांनी कंपोझ केली होती. रशीद अत्रेंच्या सुमधुर संगीतामुळे हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला.
दिग्दर्शक अन्वर कमाल पाशाने १९६२ साली रशीद अत्रेंनी संगीतबद्ध केलेला ‘महबूब’ हा चित्रपट प्रदर्शित केला. ‘ऐ सखी क्यूं चली तू पिया की गली..’, ‘दगा दे गयी सूरतिया तिहारी..’ ‘देख देख मोरी बैंया मरोड नहीं हाये..’ (स्वर नसीम बेग़म), ‘सपनोंमें उडी उडी जाऊं..’ (स्वर माला), ‘मेरी बाहोंपें तेरी ज़ुल्फ़ जो लहरायी है मैंने समझा के बयाबाँ में बहार आई है..’ (स्वर नूरजहाँ आणि सलीम ऱजा), ‘तीर पर तीर चलाओ तुम्हे डर किसका है..’ (स्वर सलीम रज़ा) यासारख्या गाण्याने चित्रपटाला स्वरसमृद्ध केलं. तथापि या चित्रपटाला मौलिक परिमाण बहाल करणारं गाणं नूरजहाँने गायलं होतं. भारतातसुद्धा या सदाबहार गाण्याचे पडसाद उमटले..
निगाहें मिलाकर बदल जानेवाले
मुझे तुझसे कोई शिकायत नहीं है
ये दुनिया बडम्ी संगदिल है यहाँ पर
किसीको किसीसे मुहब्बत नहीं है
विख्यात ग़ज़्‍ालगायक मेहदी हसन यांच्या गायन कारकिर्दीची सुरुवात पाकिस्तानात प्रथम रेडिओवरून झाली. तो त्यांच्या संघर्षांचा खडतर काळ होता. चित्रपटसृष्टीत ‘कंवारी बेवा’त (१९५६) चंचुप्रवेश तर झाला होता; पण १९५६ ते १९६१ या काळात त्यांच्या वाटय़ाला फक्त नऊच गाणी आली होती. इनायत हुसेन भट्टी, मुनीर हुसेन व सलीम रज़ा यांच्यासारख्या प्रस्थापित व लोकप्रिय पाश्र्वगायकांशी त्यांचा सामना होता, त्यामुळे मेहदी हसन यांना एका जबरदस्त ‘हिट’ची गरज होती. ५६-५७ च्या आसपास फ़ैज़्‍ा अहमद फ़ैज़्‍ाची ़नितांतसुंदर गज़्‍ाल मेहदीसाहेबांनी रेडिओवरून गायली तेव्हा तिला मिळालेला प्रतिसाद बरा म्हणण्याइतपतच होता, परंतु रशीद अत्रेंनी या गज़्‍ालेला मेहदीसाहेबांच्या स्वरात ‘फ़रंगी’ (१९६४) या चित्रपटातून अशा काही बेहतरीन अंदाजात पेश केलं की ‘फ़ैज़्‍ा’साहेबांची हीच ग़ज़्‍ाल पुढे मेहदी हसन यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख बनली. या अजरामर गज़्‍ालचा ‘मतला’ होता..
गुलों में रंग भरे बादे-नौबहार चले
चले भी आओ के गुलशन का कारोबार चले
फुलात मनभावन रंगाचं इंद्रधनुष्य उलगडावं आणि चित्तवृत्ती पुलकित करणाऱ्या प्रसन्न नव-वसंतांच्या गंधित वाऱ्याची (बादे-नौबहार) हलकेच झुळुक यावी.. नेमकं अशा वेळीच तुझं आगमन व्हावं, जेणेकरून उद्यानाचा (गुलशन) कारभार व्यवस्थित चालेल. दिग्दर्शक हसन तारीक़चा ‘सवाल’ (१९६६) हा रशीद अत्रेंच्या शिरपेचातील तुरा म्हणावा असा कर्णमधुर संगीताने नटलेला सिनेमा होता. यात नूरजहाँने गायलेलं ‘अरे वो बेमुरव्र्वत, अरे वो बेवफ़ा बता दे क्या यही है वफ़ाओं का सिला..’ व ‘लट उलझी सुलझा जा रे बालम मैं न लगाऊंगी हाथ रे..’ या दोन गाण्यांना मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. शिवाय नूरजहाँने गायलेली गज़्‍ालदेखील निव्वळ लाजवाब होती.
क़िस्सा-ए-ग़म सुनायेंगे,
आज नहीं तो कल कहीं
लौट के वो भी आएंगे
आज नहीं तो कल कहीं
मेहदी हसन यांच्या भावविभोर स्वरात रशीद अत्रेंनी फैय्याज़्‍ा हाश्मी लिखित एक विलक्षण हळवी व तरल स्वररचना ‘सवाल’साठी उत्कट सुरावटीत सादर केली होती.
रात की बे-सुकूं ख़ामोशी में
रो रहा हूं के सो नहीं सकता
राहतों के महल बनाता है,
दिल जो आबाद हो नहीं सकता
दिग्दर्शक अहमद राहीचा ‘पायल की झंकार’ (१९६६) हा लाहोरमध्ये निर्मित चित्रपट शहरातल्या प्रमुख सिनेमागृहातून झळकला आणि सलीम रज़ाने गायलेल्या बेहतरीन ग़ज़्‍ालेला रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. या ग़ज़्‍ालेच्या सुरात केवळ पाकिस्तानी चाहतेच नव्हेत तर भारतातले करोडो संगीतशौकीनसुद्धा न्हाऊन निघाले. क़तील शिफ़ाई यांच्या शायराना अंदाजातलं शब्दशिल्प रशीद अत्रेंनी लुभावन्या सुरावटीत साकारलं होतं..
हुस्न को चाँद जवानी को कंवल कहतें हैं
उनकी सूरत नज़्‍ार आये तो ग़ज़्‍ाल कहते हैं
उफ् वो मरमर से तराशा हुआ श़फ़्फ़ाफ़ बदन
देखनेवाले उसे ताजमहल कहतें हैं
शब्दप्रधान गायकीला न्याय देण्यासाठी रशीद अत्रेंनी या ग़ज़्‍ालेत माफक वाद्यमेळ वापरला आहे. सतार, बासरीच्या सुरांना तबला-घुंगरांची जोड देऊन नृत्यगीताचा समां बांधला आहे. ‘इंट्रो’मध्ये सतारीचे द्रुत लयीतले पीसेस मोहून टाकतात. पडद्यावर दर्पण नावाच्या अभिनेत्याने सतार वाजविताना चेहऱ्यावर जे बापुडवाणे भाव दर्शविले आहेत, त्यामुळे हिरमोड होतो; परंतु ही कसर लावण्यखणी नीलोने आपल्या नज़ाक़तदार अदाकारीने भरून काढली आहे. नीलोच्या नृत्याला आणि अभिनयाला मर्यादा असल्या तरी तिचे मोहक विभ्रम खिळवून ठेवतात.
रशीद अत्रे यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९१९ साली अमृतसरजवळच्या एका लहानशा खेडय़ात झाला. त्यांचे मूळ नाव अब्दुल रशीद असे होते. पंचक्रोशीत लोकप्रिय गायक व वादक म्हणून नावाजलेले खुशी मोहंमद हे त्यांचे वडील. अत्रे हे आडनाव कसे पडले याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही; परंतु त्यांचा धाकटा मुलगा जावेद अत्रे याने पाकिस्तानातल्या ‘डेली टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत अत्रे परिवाराने शीख धर्मातून मुस्लीम धर्मात प्रवेश केला होता असा गौप्यस्फोट केला होता. यावरून अत्रे किंवा अत्रा हे त्यांचं नाव धर्मांतरापूर्वीचं नाव असावं असा निष्कर्ष निघतो. हे नाव त्यांच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेलं असावं असं अनुमान आहे. अब्दुल रशीद यांनी संगीताची प्रारंभिक दीक्षा आपल्या वडिलांकडूनच ग्रहण केली. तद्नंतर त्यांनी खाँसाहेब अशफ़ाक़ हुसेन यांच्याकडे तबलावादनाचे धडे गिरविले. शिवाय विविध वाद्यांचा अभ्यासही केला.
चाळीसच्या दशकात रशीद अत्रे नशीब अजमावण्यासाठी चित्रपटसृष्टीत आले. तो बंगाली संगीतकारांच्या वर्चस्वाचा काळ होता. मास्टर ग़ुलाम हैदरसारखे संगीतकार योग्य संधीची वाट पाहत तिष्ठत होते. परंतु त्यांच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नव्हते. अशा परिस्थितीत रशीद अत्रे यांनी काही काळ चित्रपटसृष्टीचे मातब्बर संगीतकार रायचंद बोराल (आर. सी. बोराल) यांच्याकडे उमेदवारी केली.
‘ममता’ (१९४२) हा इंद्रपुरी प्रॉडक्शन्ससाठी हाफ़िज़्‍ाजींनी दिग्दर्शित केला होता. यात रशीद अत्रेंनी आर. ए. अत्रा (अब्दुल रशीद अत्रा) या नावाने संगीत दिलं होतं. चित्रपटात सहा-सात गाणी होती. िहदुस्तान फिल्म कॉपरेरेशनच्या ‘पर्दानशीन’ (१९४२) साठीही त्यांनी अकरा गाणी आर. ए. अत्रा नावानेच स्वरबद्ध केली होती. माहेश्वरी पिक्चर्सच्या ‘पगली’ (१९४३) चित्रपटात मात्र रशीद अत्रेंनी केवळ एकच युगुलगीत केलेलं आढळतं. बाकीच्या गाण्यावर झंडेखाँ, अमीरअली, गोिवदराम यांची नावे आढळून येतात. १९४४ साली रिलीज झालेल्या ‘पन्ना’त रशीद अत्रेंनी मास्टर ग़ुलाम हैदर यांचा भाचा संगीतकार अमीरअलीबरोबर साहाय्यक संगीतकार म्हणून काम केलं होतं. ‘हर चीज़्‍ा यहाँ की फ़ानी, मेला दो दिन का..’ हे एकमात्र गाणं रशीद अत्रेंनी ‘पन्ना’साठी शमशाद बेगमच्या आवाजात स्वतंत्ररीत्या स्वरबद्ध केलं होतं. यातली मूळ गाणी शमशाद बेग़मने गायली होती. परंतु शमशाद बेग़म ‘जीन-ओ-फोन’ या ग्रामोफोन रेकॉर्ड्स बनविणाऱ्या कंपनीबरोबर करारबद्ध असल्याने एच.एम.व्ही.ने तिच्या आवाजात रेकॉर्ड्स काढायला नकार दिला. सबब ध्वनिमुद्रिका राजकुमारीच्या आवाजात निघाल्या. नवयुग पिक्चर्सच्या १९४६ साली प्रदर्शित ‘रूम नं. ९’ या चित्रपटामुळे रशीद अत्रे हे नाव चर्चेत आलं. हा चित्रपट लोकप्रिय ठरला. यात रफीने गायलेलं
रहे तो कैसे रहे दिल पें इ़िख्तयार मुझे
तुम इस निगाह से देखो न हर बार मुझे
हे ऩख़्शब जारचीनं लिहिलेलं आणि रशीद अत्रेंनी सुरात बांधलेलं गाणं जबरदस्त ‘हिट’ ठरलं. यात ‘मेरा रूठा बालम हो मेरा रूठा साजन..’, ‘जिया मोरा बल बल जाए रे..’, ‘दो दिल मुहब्बत के मज़्‍ो..’, ‘जिसका सहारा कोई नहीं है..’ ही अमीरबाई कर्नाटकीने गायलेली गाणी, ‘गरज गरज कर बरसो..’ हे सरोज बोरकर यांनी गायलेलं व ‘मोरे जुबना ली अंगडाई’ हे नसीम अख़्तरने गायलेलं पारंपरिक गाणं लोकप्रिय ठरलं. म्हणूनच हा चित्रपट रशीद अत्रेंच्या कारकिर्दीतला पहिला ‘यशस्वी चित्रपट’ मानला जातो. या चित्रपटात श्याम नायक, तर गीता निज़ामी नायिकेच्या भूमिकेत होती. के. एन. सिंग, राजा परांजपे व सरोज बोरकरांच्या चित्रपटात भूमिका होत्या.
१९४७ साली रशीद अत्रेंचं संगीतदिग्दर्शन लाभलेला बॉम्बे टॉकीजचा ‘नतीजा’ पडद्यावर आला. नज़्‍ाम नक़वींनी दिग्दर्शित केलेला हा मुस्लीम पाश्र्वभूमीवर बेतलेला सामाजिक चित्रपट होता. यात एकूण सहा गाणी होती. ‘उन्हें भी राज़्‍ो-उल्फ़त की न होने दी ख़बर मैंने..’ व ‘हो मोरी बाली उमरियाँ, सांवरियँा, देखो मारो न तिरछी नजरियां..’ ही ज़्‍ाोहराबाई अंबालेवालीने गायलेली गाणी त्या काळात चांगलीच लोकप्रिय झाली होती. शिवाय पारूल घोषने (ख्यातनाम बासरीवादक पन्नालाल घोष यांच्या अर्धागिनी) गायलेलं ‘बिगडम्ी मेरी बना दो ऐ शाहे-मदिना..’ व ‘दुआ दे रहे हैं सज़ा पानेवाले..’ ही दोन गाणीसुद्धा लोकांच्या जिभेवर घोळत होती. ‘उस्तादों के उस्ताद’ (१९६३) या चित्रपटासाठी ‘मिलते ही नज़्‍ार तुमसे, हम हो गये दीवाने..’ ही कव्वाली कंपोझ करताना रवीने ‘बिगडम्ी मेरी बना दो..’च्या चालीचा आसरा घेतल्याचे दिसून येते. नवयुगच्या ‘पारो’ (१९४७) या चित्रपटात रशीद अत्रेंनी ए. असलम, कल्याणी, राजकुमारी व सुलोचना कदम यांच्या आवाजात आठ गाणी केली होती. दोन गाण्यांत त्यांनी स्वत:ही गायन केल्याची नोंद आहे.
नवयुगच्या बॅनरखाली शाहिद लतीफ़द्वारा दिग्दर्शित ‘शिकायत’ (१९४८) हा रशीद अत्रेंचा भारतातला शेवटचा चित्रपट. यात एकूण सात गाणी होती. यातलं सर्वाधिक चर्चित गाणं ‘वो जो हम में तुम में करार था तुम्हे याद हो के न याद हो..’ ही मोमीनखाँ ‘मोमीन’ची ग़ज़्‍ाल कल्याणी व माणिक दादरकर यांनी गायली होती. यातली उर्वरित गाणी फारशी लोकप्रिय होऊ शकली नाही. फाळणीनंतर रशीद अत्रे आपल्या कुटुंबीयांसह पाकिस्तानात निघून गेले. पाकिस्तानात त्यांना यश मिळायला सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागली. ‘शहरी बाबू’ला मिळालेल्या यशानंतर त्यांच्या यशाची व लोकप्रियतेची कमान उत्तरोत्तर चढतच राहिली. नेहमी सुटाबुटात वावरणारे व कायम पाइपचा आस्वाद घेणारे रशीद अत्रे स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभावाचे म्हणून परिचित होते. अभिजात उर्दू शायरी व साहित्याची उत्तम जाण असलेल्या या संगीतकाराचे १८ डिसेंबर १९६७ रोजी पाकिस्तानात लाहोर येथे देहावसान झालं.
मृत्यूपश्चात रशीद अत्रेंचे दोन चित्रपट प्रदíशत झाले. दिग्दर्शक एस. टी. ज़्‍ौदीचा ‘सलामे-मुहब्बत’ (१९७१) व हसन तारीक़चा ‘बहिश्त’ (१९७४)! सलामे-मुहब्बत’ साठी रशीद अत्रे आजारपणामुळे मेहदी हसन यांच्या मृदुमुलायम आवाजात केवळ एकच गाणं कंपोज़्‍ा करू शकले. त्यांच्या पश्चात उर्वरित आठ गाणी ख़्वाजा अहमद परवेज़्‍ा यांनी स्वरबद्ध केली होती. हा एक सुमार दर्जाचा चित्रपट होता. केवळ रशीद अत्रेंच्या एकमात्र ‘हमेशांजवाँ’ वर्षांगीतामुळे तो रसिकांच्या कायमचा स्मरणात राहिला आहे.
क्यूं हमसे ख़फ़ा हो गये ऐ जाने-तमन्ना
भीगे हुए मौसम का मज़ा क्यूं नहीं लेते
ये रात ये बरसात, ये सावन का महीना
ऐसे में तो शोलों को भी आता है पसीना
इस रुत में ग़रीबोंकी दुआ क्यूं नहीं लेते
भीगे हुए मौसम का मज़ा क्यूं नहीं लेते
देखो तो ज़्‍ारा झाँक के बाहर की फ़ज़ा में
बरसात ने इक आग लगा दी है हवा में
इस आग को सीने में बसा क्यूं नहीं लेते
भीगे हुए मौसम का मज़ा क्यूं नहीं लेते
क्यूं हमसे ख़फ़ा हो गये..
मेहदी हसनचा किनखापी आवाज, संपूर्ण गाण्याच्या पाश्र्वभूमीवर मनपटलावर रेंगाळणारे रशीद अत्रेंच्या फेव्हरिट ‘अ‍ॅकॉíडयन’चे पीसेस आणि अत्यंत मनभावन शब्दकळा यामुळे मेहदी हसन आणि रशीद अत्रे यांचं हे ‘सुपरहिट’ गाणं चार दशके उलटून गेल्यानंतरही सदाबहार राहिलं आहे.
‘बहिश्त’ हा रशीद अत्रे यांच्या सांगीतिक वाटचालीतला शेवटचा चित्रपट! त्यांच्या निधनानंतर बरीच वर्षे तो रखडला. शेवटी दिग्दर्शक हसन तारिक़ने चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ए. हमीद यांच्यावर सोपविली. ‘बहिश्त’ १९७४ साली प्रदर्शित झाला. यात रशीद अत्रेंनी संगीतबद्ध केलेल्या व मेहदी हसन यांनी गायलेल्या ‘क्यूं पूछते हो क्या तुमसे कहूं मैं किस लिए जीता हूं, शायद के कभी मिल जाओ कहीं मैं इसलिए जीता हूं..’ ही अवीट गोडीची ‘सोलो’ स्वररचना, तर नूरजहाँबरोबर गायलेलं ‘है रात रात भर की, काटें न क्यूं खुशी से, ये रात क़ज़्र्‍ा हमने माँगी है ज़िंदगी से’ हे युगुलगीत रसिकांना खूपच भावलं. तथापि यातली सर्वाधिक लोकप्रिय स्वररचना मेहदी हसन यांच्या मधाळ स्वरात रशीद अत्रेंनी कंपोझ केलीय. रियाज़्‍ा शाहिदच्या लेखणीतून उतरलेल्या रुमानी (रोमँटिक) व अजरामर गीताचे बोल आहेत.
मैं जो शायर कभी होता तेरा सेहरा कहता
चाँद को चाँद न कहता तेरा चेहरा कहता
खुशनसीबी से मुझे अपने ही लगता है ये डर
मेरी खुशियों को न डस ले किसी दुश्मन की नज़्‍ार
चश्मेबद्दूर न कहता तो भला क्या कहता
रशीद अत्रेंना आपली कला पूर्ण क्षमतेने सादर करण्यासाठी नियतीने पुरेसा अवसर दिला नाही. त्यांच्याकडे अनमोल चालींचा समृद्ध ख़ज़ाना व कर्णमधुर चाली देण्याची बहुआयामी प्रतिभा असूनही ‘मलकुल मौत’ने वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षीच त्यांना बुलावा धाडला..
रशीद अत्रेंच्या गाजलेल्या स्वररचना नव्या पिढीनेसुद्धा समरसून गायल्या. यात बेंजामीन सिस्टर्स, नाहिद अख़्तर, ताहिरा सईद (मल्लिका पुखराजची सुकन्या), आसिफ मेहदी (मेहदी हसन यांचे सुपुत्र) व नातू जिमी अत्रे यांचा समावेश होतो. रशीद अत्रेंना बहुधा हे माहीत असावं; म्हणूनच नूरजहाँकडून त्यांनी गाऊन घेतलं होतं..
गाएगी दुनिया गीत मेरे,
सुरीले अंग में, निराले रंग में..

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashid attre
First published on: 01-08-2014 at 01:10 IST