संमेलन विशेष
द प्लेजर ऑफ रीडिंग या अँटोनिया फ्रेजर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात जगभरातल्या चाळीस लेखकांनी आपल्या वाचनानंदावर लिखाण केलंय. या चाळीस लेखांसाठी चाळीस चित्रकारांनी चित्रंही काढली आहेत.
मातृभाषा ही निसर्गत: आणि जन्मत: मानवप्राण्याला मिळते. त्यामुळे ती बोलायला शिकण्यासाठी फारसे काही प्रयत्न करावे लागत नाहीत. लहान मूल इतरांचे शब्द ऐकत ऐकत बोलायला शिकतं. पण भाषा लिहायला मात्र रीतसर शिकावी लागते. त्यासाठी अक्षरांची ओळख करून घ्यावी लागते. आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तर आणखी रीतसर प्रयत्न करावे लागतात. असंच वाचनाचं असतं. भाषा बोलायला-लिहायला यायला लागली की वाचताही येतं. त्यामुळे वाचन ही गोष्टही आपल्याला निसर्गत: मिळालेली गोष्ट असावी असा अनेकांचा समज होतो. पण लिखित भाषेवर चांगलं प्रभुत्व मिळवण्यासाठी जसं मार्गदर्शन, अभ्यास, शिस्त आणि काटेकोर नियोजन करावं लागतं, तसंच वाचनाच्या बाबतीतही करावं लागतं. त्याशिवाय चांगला वाचक होता येत नाही.  पण अर्थार्जनासाठी रीतसर शिक्षण घ्यावं लागतं, तसंच वाचक म्हणून प्रगल्भावस्था गाठण्यासाठीही रीतसर मार्गदर्शन घेण्याची गरज असते, हे अनेकांच्या गावीही नसतं. त्यामुळे बहुतेक जण आयुष्यभर मिळेल ते वाचत राहतात. काय वाचावं हेच अनेकांना आयुष्यभर कळत नाही. त्यासाठी कुणा चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा असंही त्यांना वाटत नाही. परिणामी ही माणसं कायम कविता-कथा-कादंबऱ्याच वाचत राहतात. वय आणि वाचन यांची सांगड तर अनेकांना घालता येत नाही.
वाचनाच्या बाबतीत प्रगल्भावस्था गाठावयाची असेल तर मार्गदर्शन, शिस्त आणि काटेकोर नियोजन गरजेचं असतं. तरच त्या वाचनाचा फायदा होतो. बालपण, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढपण आणि वृद्धावस्था हे आपल्या आयुष्याचे टप्पे. यानुसार आपलं वाचन बदलायला हवं. कविता-गोष्टी, कथा-कादंबऱ्या, चरित्र-आत्मचरित्र, वैचारिक साहित्य आणि तत्त्वज्ञानात्मक साहित्य अशा चढत्या क्रमानं वाचनाचा प्रवास झाला तर त्या वाचनाला एक निश्चित दिशा आहे असं म्हटलं जातं.
त्यामुळे चांगलं वाचन करण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. असे मार्गदर्शक आई-बाबा, शिक्षक, मित्र हे जसे असू शकतात, तसेच चांगल्या लेखकांनी आपल्या वाचनाविषयी लिहिलेले लेख वा पुस्तकंही असू शकतात. मराठीमध्ये ज्याला ‘बुक ऑन बुक्स’ म्हणतात अशा प्रकारची पुस्तकं फारशी नसली तरी इंग्रजीमध्ये मात्र अशा प्रकारच्या पुस्तकांचं समृद्ध असं दालन आहे. ‘द प्लेजर ऑफ रीडिंग’ (एडिटेड बाय अँटोनिया फ्रेझर, ब्लूम्सबरी, लंडन, पाने : २५२, किंमत : १७.९९ पौंड.) हे पुस्तक त्यापैकीच एक. रॉयल आकाराचं आर्टपेपरवर छापलेलं आणि संपूर्ण रंगीत असलेलं हे पुस्तक फारच सुंदर आहे.
हे पुस्तक संपादित केलं आहे अँटोनिया फ्रेझर यांनी. ऐतिहासिक चरित्रकार, रहस्यकथा लेखक आणि लंडनमधील पेन या संस्थेच्या माजी अध्यक्ष असलेल्या फ्रेझर यांना नामवंत साहित्यिक-कलांवत कुठली पुस्तकं वाचतात याविषयी अतोनात कुतूहल आहे. म्हणून त्यांनी या पुस्तकासाठी इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या जगभरातल्या ४० नामवंत साहित्यिकांना त्यांच्या वाचनाविषयी लिहायला सांगितलं. त्यानुसार स्टिफन स्पेंडर, मायकेल फूट, डोरिस लेसिंग, जॉन मार्टिमर, रुथ रेंडेल, सायमन ग्रे, मार्गारेट अ‍ॅटवुड, मेल्विन ग्रेग, गीतचा मेहता, वेंडी कोप यांसारख्या लेखकांनी सुरुवातीला केलेलं वाचन, आपल्या वाचनावर झालेला घरचा – आजूबाजूच्या वातावरणाचा, सहवासातल्या लोकांचा-शिक्षकांचा परिणाम, मनावर परिणाम करून गेलेली पुस्तकं, प्रभावित केलेली पुस्तकं याविषयी समरसून लिहिलं आहे. शिवाय प्रत्येकानं लेखाच्या शेवटी ‘माझी आवडती पुस्तकं’ म्हणून दहा पुस्तकांची यादी दिली आहे. काहींनी तीच का आवडली याची कारणमीमांसा केली आहे, तर काहींनी आवडती दहा पुस्तकं सांगणं कठीण आहे, तरीही फार विचार करून ही दहा नावं देत आहे, असा अभिप्राय दिला आहे.
 मायकेल फूट या ब्रिटिश पत्रकार आणि मार्क्‍सवादी खासदाराचे वडील उत्तम वाचक होते, त्यामुळे घरात भरपूर पुस्तकं होती. तरीही तो वाचनाकडे जरा उशिराच वळला. बट्र्राड रसेल त्याला शिकवायला होते. त्यामुळे रसेलचे ‘द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस’ हे फूटचे आवडते पुस्तक. याशिवाय अनरेल्ड बेनेटच्या ‘हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे’ आणि ‘लिटररी टेस्ट -हाऊ टू फॉर्म इट’ या दोन छोटय़ा पुस्तकांविषयी लिहिलं आहे. ‘हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे’ या पुस्तकानं माझं आयुष्य बदलवलं असं फूटनं म्हटलंय. फूट लंडनचा पंतप्रधान होता होता राहिले.

चांगलं वाचन करण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. असे मार्गदर्शक आई-बाबा, शिक्षक, मित्र हे जसे असू शकतात, तसेच चांगल्या लेखकांनी आपल्या वाचनाविषयी लिहिलेले लेख वा पुस्तकंही असू शकतात.

मार्गारेट अ‍ॅटवुड या प्रसिद्ध कादंबरीकर्तीवर एडगर अ‍ॅलन पोचे ‘ग्रीम्स फेअरी टेल’, मेल्विनची ‘मॉबी डिक’, जेन ऑस्टिनची ‘प्राइड अँड प्रेज्युडिस’, ‘वुदरिंग हाइट्स’, ऑर्वेलची ‘१९८४’, कोत्स्लरची ‘डार्कनेस अ‍ॅट नून’ या कादंबऱ्यांचा प्रभाव पडला असल्याचं ती मान्य करते. उतारवयात मात्र ती वाङ्मयीन मासिकांपासून ते शब्दकोशापर्यंत वेगवेगळे वाचन करते. तिला आपल्या दहा पुस्तकांची यादी द्यायला आवडत नाही. तरीही तिने अलीकडच्या वाचलेल्या पाच कादंबऱ्यांची आणि पाच पुन: पुन्हा वाचलेल्या पाच कॅनडिअन कादंबऱ्यांची नावं दिली आहेत.

सर्वच चित्रकारांनी काढलेली चित्रं इतकी सुंदर आहेत की, बऱ्याचदा आपण मध्येच लेख वाचायचं थांबून चित्रंच पाहू लागतो. काही नुसती पाहून पटकन लक्षात येत नाहीत. मग त्यासाठी लेख वाचायला लागतो.

मेल्विन ब्रॅग या ब्रिटिश कादंबरीकाराने ‘टेल्व्ह बुक्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड’ हे पुस्तक लिहिलं असून इंग्रजी भाषेचं चरित्र सांगणारं ‘द अ‍ॅडव्हेंचर ऑफ इंग्लिश’ हे पुस्तकही लिहिलं आहे. ब्रॅगनं वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत केशकर्तनालयात बसून अनेक पुस्तकं वाचली. तरुणपणी तो बेडवर पडून वाचू लागला. रॉबिनहूडच्या पुस्तकांचं त्याला काही काळ व्यसनच लागलं होतं. ब्रॅगला जेन ऑस्टिन किंवा ई.एम. फोर्स्टर, पुश्किन, हॉथॉर्न यांची पुस्तकं प्रौढवयात पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात. ब्रॅगलाही आपली दहा पुस्तकं सांगताना बरेच प्रयास करावे लागले. शेवटी त्यानं टॉलस्टॉय, डी.एच. लॉरेन्स, चेखॉव्ह, चार्ल्स डिकन्स, विल्यम फॉकनर यांच्या पुस्तकांची नावं दिली आहेत. त्यानं म्हटलंय की, चांगलं लेखन करण्यासाठी तुम्हाला वाचावंच लागतं.
 ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्या कन्या, लेखक-पत्रकार आणि लघुपट दिग्दर्शिका असलेल्या गीता मेहतांना शिक्षणासाठी बोर्डिगमध्ये राहावं लागल्यानं पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असताना, घराची खूप आठवण येत असताना त्यांना पुस्तकांनी सोबत केली. घरी गेल्यावर तर किती तरी पुस्तकं त्यांची कायम वाट पाहात असायची. एके काळी त्यांनी वाचनालयातून अधाशासारखी पुस्तकं वाचली. आता त्या हवी ती पुस्तकं विकत घेऊ शकतात. भारतातली वाचनालयं आणि रस्त्यावरील पुस्तक विक्रेते यांच्याविषयी त्यांनी ममत्वानं लिहिलं आहे. विमान चुकल्यावर आपल्याला रहस्यमय कादंबऱ्या वाचायला आवडतात असं त्या म्हणतात.
हरमायनी ली या ब्रिटिश समीक्षिकेला नातेसंबंधांची गुंतागुंत उलगडून दाखवणाऱ्या कादंबऱ्या वाचायला आवडतात. त्यातल्या दोन कादंबऱ्या- ज्या तिला आजही आवडतात आणि ज्यांचा खूप प्रभाव पडला-त्या म्हणजे एलिझाबेथ बोवेन्सची ‘टु द नॉर्थ’ आणि सोसमंड लेहमनची ‘द वेदर इन द स्ट्रीट्स’.

ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांच्या कन्या, लेखक-पत्रकार आणि लघुपट दिग्दर्शिका असलेल्या गीता मेहतांना शिक्षणासाठी बोर्डिगमध्ये राहावं लागल्यानं पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असताना, घराची खूप आठवण येत असताना त्यांना पुस्तकांनी सोबत केली.

या चाळीस लेखांसाठी तब्बल चाळीस चित्रकारांनी चित्रं काढली आहेत. प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला एक पानभर चित्र आणि लेखामध्ये तीन-चार छोटी छोटी चित्रं असं त्यांचं स्वरूप आहे. म्हणजे चाळीस भिन्न स्वभावधर्माचे, निरनिराळ्या सामाजिक-कौटुंबिक परिस्थितीतले लेखक आणि तसेच चाळीस चित्रकार यांचा समसमायोग या पुस्तकाच्या निमित्तानं जुळून आला. सर्वच चित्रकारांनी काढलेली चित्रं इतकी सुंदर आहेत की, बऱ्याचदा आपण मध्येच लेख वाचायचं थांबून चित्रंच पाहू लागतो. काही नुसती पाहून पटकन लक्षात येत नाहीत. मग त्यासाठी लेख वाचायला लागतो. आधी सर्व लेखच वाचावेत आणि मग सगळी चित्रं पाहावीत असंही ठरवता येत नाही आणि आधी सर्व चित्रंच पाहावीत आणि मग सगळे लेख वाचावेत असंही करता येत नाही. या चाळीस चित्रकारांनी पुस्तकांचे उपयोग, त्यांचे महत्त्व, ते वाचत असताना वाचकाची होणारी अवस्था, त्याच्या मनात येणारे विचार यातून पुस्तकांची जी दुनिया उभी केली आहे, ती केवळ प्रेक्षणीयच नाही तर उत्फुल्ल करणारी आहे. त्याविषयी स्वतंत्रपणे सविस्तर लेखच लिहायला हवा.
असो. वाचनानंदाची खुमारी सांगणारं हे पुस्तक वाचनीय आणि प्रेक्षणीय तर आहेच, पण ते फँटसीसारखं आपल्यावर गारूड करतं, भारावून टाकतं. ‘बुक ऑन बुक्स’ या वाङ्मय प्रकारातील हे एक नितांतसुंदर पुस्तक आहे. ज्याला चांगलं वाचन करायचं आहे त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर ज्याला वाचनाला सुरुवात करायची आहे त्याच्यासाठीही एक चांगला मार्गदर्शक ठरेल असं.