साहित्य:lp43
पाव किलो पडवळ (कोवळं)
१ वाटी बेसन
पाव वाटी कोथिंबीर, बारीक चिरून
१/४ चमचा हळद
१/४ चमचा हिंग
एक चमचा लाल तिखट
१/२ चमचा ओवा
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) बेसनात हळद, हिंग आणि लाल तिखट घालून मिक्स करावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. त्यात ओवा, कोथिंबीर आणि मीठही घालावे. पिठाची चव पाहून गरजेनुसार मीठ किंवा तिखट घालावे.
२) पडवळाच्या आतील बिया आणि भुसभुशीत भाग चमच्याच्या मागील बाजूने कोरून काढावा. पडवळाच्या पातळ चकत्या कराव्यात.
३) पडवळाच्या चकत्या अर्धवट वाफवून घ्याव्यात. (मी मायक्रोवेव्हमध्ये, पाण्याचा हबका मारून दीड मिनिट झाकण ठेवून वाफवल्या. वाफवून झाल्यावर झाकण लगेच काढावे.)
४) तेल गरम करावे व नंतर मध्यम आचेवर ठेवावे. वाफवलेल्या चकत्या पिठात घालून तेलात सोडाव्यात. सोनेरी रंगावर भजी तळाव्यात.

टिपा:
१) पडवळ कोवळेच हवे. जुन्या पडवळाला आत दोरे असतात ज्यामुळे भजी कचकचीत लागेल. तसेच जाड चकत्या करू नयेत.
२) बटाटा भजीप्रमाणे पडवळ थेट तळल्यास पूर्ण शिजत नाही, किंचित कच्चे राहतेच. म्हणून आधीच थोडेसे वाफवलेले चांगले.

पावभाजी पराठा

साहित्य:lp44
१/२ कप पावभाजी (उरलेली)
अंदाजे १/२ कप गव्हाचे पीठ (थोडे कमी-जास्त होऊ शकेल)
१/२ टिस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ

कृती:
१) पावभाजी हाताने थोडी कुस्करून घ्या. त्यात कणीक, लाल तिखट आणि मीठ घालावे. पाणी अजिबात घालू नये. जेवढी मावेल इतकीच कणिक घालायची आहे. मळून गोळा तयार करावा.
२) मोठय़ा लिंबाएवढे गोळे करून त्याचे पराठे लाटावे. तव्यावर शेकताना थोडे तेल किंवा बटर सोडावे. आच मध्यम ठेवावी. पराठा खरपूस भाजून घ्यावा.
सव्‍‌र्ह करताना पराठा प्लेटमध्ये काढून त्यावर किसलेले चीज घालून सजावट करावी.
टीप:
१) लहान मुलांसाठी बनवताना लाल तिखट घालू नये.

चीजी स्प्रिंग ओनिअन पराठा

lp45साहित्य:
५ पातीकांद्याच्या मोठय़ा काडय़ा (चिरल्यावर साधारण ३/४ ते १ कप) (कांदा आणि पात दोन्ही वापरावे)
सव्वा कप गव्हाचे पीठ
२ चमचे तेल
१/२ चमचा ओवा
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
२ चिमटी गरम मसाला
दीड वाटी किसलेले चीज
चवीपुरते मीठ
तूप पराठे भाजण्यासाठी

कृती:
१) पातीकांदा स्वच्छ धुवून बारीक चिरावा. त्यात मीठ घालून मिक्स करून ठेवावे. ५ मिनिटांनी तेल, हिरवी मिरची, गरम मसाला आणि गव्हाचे पीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून भिजवावे.
२) तवा गरम करावा. भिजवलेल्या पिठाचे ६ समान भाग करावे. थोडे कोरडे पीठ ३ इंच लाटावा. मधोमध २ चमचे चीज घालावे. कडा एकत्र जुळवून बंद करावे. नंतर हलक्या हाताने कोरडय़ा पिठावर पराठा लाटावा. मध्यम आचेवर पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावा. भाजताना थोडे तूप सोडावे. गरमागरम पराठा लोणच्याबरोबर किंवा रायत्याबरोबर सव्‍‌र्ह करावे.

टिपा:
१) हा पराठा चीजशिवायही छान लागतो
२) गव्हाच्या पिठाऐवजी दुसरी पिठे घालूनही पराठे छान होतात.
३) शक्यतो पीठ मळून लगेच पराठे बनवावे. कारण पातीकांद्याला पाणी सुटते आणि मळलेले पीठ पातळ होते.
वैदेही भावे