साहित्य :
१०० ग्राम साबुदाणा
दीडशे ग्रॅम वरी तांदूळ
१०० ग्रॅम राजगिरा
१ टीस्पून जिरं
कृती :
१) साबुदाणा, वरी तांदूळ आणि राजगिरा गुलाबी रंग येईस्तोवर मंद आचेवर वेगवेगळे भाजावे.
२) भाजलेले सर्व जिन्नस एकत्र करावे. त्यात जिरे न भाजताच घालावे.
३) मिक्सरमध्ये एकदम बारीक करावे किंवा गिरणीतून बारीक दळून आणावे.
टिपा :
साबुदाणा भाजण्यापूर्वी त्याला १ टीस्पून तूप लावून घ्यावे म्हणजे भाजताना कढईला चिकटणार नाही.
साबुदाणा, वरी, राजगिरा खूप जास्त रंग बदलेस्तोवर भाजू नये. त्यामुळे भाजणीचा रंग डार्क येतो आणि चवही चांगली नाही.
जिरे भाजू नये. कच्चेच घालून भाजणी दळावी.
आवडीनुसार साबुदाणा, वरी, राजगिरा यांचे प्रमाण कमीजास्त करू शकतो. बऱ्याच जणांना साबुदाण्याचा त्रास होतो. त्यांनी साबुदाणा कमी करून वरी किंवा राजगिरा यांचे प्रमाण वाढवावे.

रताळ्याचे चाट

साहित्य :
१/२ किलो रताळी
१/२ वाटी हिरवी चटणी
१/२ वाटी चिंचेची आंबट-गोड चटणी
१ चमचा तूप
१ ते २ चमचे जिरेपूड
१ वाटी दही, (चमचाभर साखर घालावी)
१ वाटी बटाटा शेव किंवा बटाटा सळी
चवीपुरते मीठ किंवा काळं मीठ
१ चमचा लाल तिखट
बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

कृती :
१) रताळी सोलून घ्यावीत आणि त्याचे दीड-दोन इंचाचे फिंगर चिप्ससारखे तुकडे करावेत. तुकडे खूप पातळ किंवा खूप जाड नसावेत, तसेच सर्व तुकडे साधारण एकसारख्या आकाराचे आणि जाडीचे असावेत.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये १ चमचा तूप गरम करावे. त्यात रताळ्याचे तुकडे घालावे. चिमूटभर मीठ पेरावे आणि झाकण ठेवून ४-५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे. रताळी एकदम मऊ होईस्तोवर शिजवू नये. आतपर्यंत शिजली पाहिजेत आणि आकारात अख्खीही राहिली पाहिजेत. शक्यतो २ बॅचेसमध्ये रताळी शिजवावीत.
३) रताळी शिजली की प्रत्येक सवर्ि्हग प्लेटमध्ये साधारण १/२ वाटी अशी वाढावीत. त्यावर एकेक चमचा हिरवी आणि गोड चटणी घालावी. वरती थोडे मीठ आणि जिरेपूड पेरावी. त्यावर दही घालावे. प्लेटच्या कडेने अजून थोडी हिरवी चटणी आणि गोड चटणी घालावी. वरून शोभेला लाल तिखट पेरावे. थोडी बटाटा शेव किंवा बटाटा सळी घालावी. कोथिंबिरीने सजवावे. लगेच सव्‍‌र्ह करावे.

दुधी थालीपीठ

साहित्य :
१ वाटी सोलून किसलेला दुधी भोपळा
दोन वाटय़ा उपवासाची भाजणी किंवा गरजेनुसार
३ हिरव्या मिरच्या, ठेचून
१/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
चवीनुसार मीठ
तूप किंवा शेंगदाण्याचे तेल थालीपीठ भाजताना

कृती :
१) किसलेल्या दुधीमध्ये हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचे कूट, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरजेनुसार भाजणी घालून कणकेला भिजवतो तेवढे घट्ट भिजवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाचे टेनिसच्या बॉलएवढे गोळे करून घ्यावे.
२) नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्यावे. हाताला चिकटू नये म्हणून हातालाही थोडेसे तूप लावावे. हाताने एकसारखे थालीपिठ थापावे. मध्यभागी तेल सोडायला बोटाने छिद्र करावे.
३) मध्यम आचेवर झाकण ठेवून थालीपीठ शिजू द्यावे. मिनिटभराने झाकण काढून कडेने तूप सोडावे. झाकून एक बाजू नीट शिजू द्यवी. कालथ्याने उलथून, झाकण ठेवून दुसरी बाजूही शिजवावी.
गरमगरम थालीपीठ वाढताना दही आणि लिंबाचे गोड लोणचे बरोबर खायला द्यावे.
टिपा :
४ दुधी बिनबियांचा आणि कोवळा असावा, म्हणजे किसायला सोपा जातो.
४ थालीपिठ शिजायला वेळ लागतो. जास्त थालीपीठं बनवताना वेळ वाचवण्यासाठी दोन शेगडय़ांवर दोन तवे वापरून थालीपीठं बनवावी.
४ काहीजण दुधी भोपळा उपवासाला खात नाहीत. म्हणून दुधीऐवजी काकडी किसून घालावी.
वैदेही भावे