X

रुचकर : मेडिटरेनियन पाककृती

मेडिटरेनियन किंवा मिडल ईस्ट हा प्रदेश त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मिडल ईस्टर्न पदार्थात जशी नॉनव्हेज पदार्थाची मोठी यादी आहे तशीच शाकाहारी पदार्थही भरपूर प्रमाणात...

मेडिटरेनियन पाककृती

मेडिटरेनियन किंवा मिडल ईस्ट हा प्रदेश त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मिडल ईस्टर्न पदार्थात जशी नॉनव्हेज पदार्थाची मोठी यादी आहे तशीच शाकाहारी पदार्थही भरपूर प्रमाणात आढळतात. ऑलिव्ह ऑइल, तीळ, पार्सली, पुदिना, खजूर, काबुली चणे इत्यादी घटक मोठय़ा प्रमाणावर वापरले जातात. यांपासून बनवल्या जाणाऱ्या काही प्रचलित शाकाहारी पदार्थाच्या रेसिपीज पुढे देत आहे. नक्की करून पाहा.

फलाफल

काबुली चणे वापरून गोटाभजीच्या जवळचा पदार्थ.

साहित्य

दोन वाटय़ा भरून भिजलेले काबुली चणे (छोले)

२ चमचे बेसन (टीप १)

३ मोठय़ा लसूण पाकळ्या

१ लहान चमचा धनेपूड

१/२ लहान चमचा जिरेपूड

१/२ वाटी पार्सली

२ हिरव्या मिरच्या किंवा १/२ चमचा लाल तिखट

१ लिंबाचा रस

चवीपुरते मीठ

तळण्यासाठी तेल

चिमटीभर खायचा सोडा

कृती

१) भिजलेले काबुली चणे मिक्सरमध्ये घालावेत, पाणी घालू नये. त्यात लसूण, पार्सली, हिरवी मिरची, मीठ आणि लिंबाचा रस घालावा. भरडसर वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण एका वाडग्यात काढावे. त्यात बेसन, खायचा सोडा आणि धने-जिरेपूड घालावी आणि मिक्स करावे. चव पाहून गरज वाटल्यास तिखट, मीठ घालावे. खूप घट्ट वाटल्यास थोडेसेच पाणी शिंपडावे.

२) कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले की आच मध्यम करावी.

३) साधारण दीड टेस्पून मिश्रण घेऊन त्याचा गोळा बांधावा. हा गोळा गरम तेलात घालावा. गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तळावा.

अशा प्रकारे सर्व फलाफल तळून घ्यावे. जनरली, फलाफल त्झात्झीकी सॉसबरोबर (कुकुंबर सॉस) सव्र्ह करतात.

टिपा

१) शक्यतो बेसन न घालता फक्त भिजलेल्या काबुली चण्याचे फलाफल करून पाहावे. एक लहान गोळा गरम तेलात घालून पाहावा. जर गोळा तेलात फुटत असेल तरच बेसन घालावे.

२) फलाफल मध्यम आचेवरच तळावेत. मोठय़ा आचेवर तळल्यास बाहेरून रंग लगेच येईल, पण आतून कच्चे राहतील. तसेच मंद आचेवर तळल्यास फलाफल तेलात फुटू शकतात.

त्झात्झीकी सॉस

घट्ट दही घालून केलेल्या काकडीच्या कोशिंबिरीच्या जवळचा पदार्थ.

साहित्य :

१ मोठी काकडी सोलून, बिया काढून टाकाव्यात आणि मध्यम तुकडे करावेत.

दीड कप घट्ट दही (टीप)

२ लसणीच्या पाकळ्या, बारीक चिरून

१ चमचा फ्रेश डील (शेपू) (टीप)

२ चमचे ऑलिव्ह ऑइल

१ चमचा लिंबाचा रस

चवीपुरते मीठ

कृती

१) दही १ तासभर टांगून ठेवावे. जेणेकरून दही थोडेसे घट्ट होईल.

२) टांगलेले दही, लसूण, शेपू, ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस आणि मीठ ब्लेंडरमध्ये घालून ब्लेंड करावे. नंतर काकडीचे तुकडे घालून भरडसर ब्लेंड करावे. तयार त्झात्झीकी सॉस फलाफलबरोबर सव्र्ह करावा.

टिप्स :

१) पारंपरिक पद्धतीनुसार त्झात्झीकी सॉस ग्रीक योगर्ट (मध्यमसर घट्ट चक्का) पासून बनवतात. जर ग्रीक योगर्ट असेल तर ते तसेच डायरेक्ट वापरावे. नसल्यास दही थोडा वेळ टांगून मग वापरावे.

२) शेपूऐवजी पुदिन्याची पानेही वापरू शकतो.

३) लिंबाचा रस नसल्यास थोडेसे व्हिनेगर वापरले तरीही चालेल.

हम्मस

काबुली चणे आणि तीळ वापरून केलेला चटणीसारखा पदार्थ.

साहित्य

एक वाटी एकदम मऊसर शिजवलेले काबुली चणे

१-२ लसूण पाकळ्या

२ चमचे खमंग भाजलेले तीळ

२ चमचे लिंबाचा रस

थोडेसे पाणी

२-३ चमचे ऑलिव्ह ऑइल

१/४ लहान चमचा मिरपूड

२ चमचे चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

कृती

१) तिळाची आधी पावडर करून घ्यावी. त्यात बाकीचे सर्व पदार्थ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. डब्यात बंद करून फ्रिजमध्ये काही तास थंड करावे.

२) लहान उथळ ताटलीत हम्मस काढून घ्यावे. त्यावर थोडे लाल तिखट आणि ऑलिव्ह ऑइल घालून पिटा ब्रेडबरोबर सव्र्ह करावे.

टीप :

१) पाणी जास्त घालू नये. मिक्सरमध्ये चणे वाटता येतील इतपतच घालावेत. कंसीस्टन्सी दाटसर असावी.

  • Tags: food, recipes, ruchkar,