तुम्ही दोन वर्षांपूर्वी घेतलेला टीव्ही आज आऊटडेटेड झालाय आणि नवा टीव्ही घेताना बाजारात इतके पर्याय उपलब्ध आहेत की त्यातला कोणता निवडायचा या प्रश्नाने तुम्ही गोंधळून गेला आहात?

गेल्या भागात आपण टीव्हीचे विविध प्रकार आणि त्यांच्या निवडीतील विविध बाबींबद्दल माहिती जाणून घेतली होती. आता त्यापुढे जाऊन या भागात आपण सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारांतील उत्तम टीव्ही, त्यातील काही महत्त्वाचे फीचर्स आणि दुकानात गेल्यानंतर उपलब्ध टीव्ही संचाला कोणत्या निकषांवर तपासायचे आणि टीव्ही खरेदी करायचा याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
प्रत्यक्ष दुकानात गेल्यावर कोणत्या निकषांवर टीव्ही तपासावा?
चांगला टीव्ही निवडताना त्याच्यातील दोन बाबी उत्तम असणे गरजेचे असते १. त्याची चित्र दाखविण्याची क्षमता २. त्याची साऊंड सिस्टीम क्षमता. या दोन बाबी दुकानात टीव्ही घेण्यासाठी गेल्यावर कशा प्रकारे तपासता येतील ते पाहू-
चित्र दाखविण्याची क्षमता
कॉन्ट्रास्ट : उत्तम कान्ट्रास्ट म्हणजे, पांढरा रंग हा पांढराच वाटायला हवा. यामध्ये इतर कोणत्याही रंगाची सरभेसळ असणे अपेक्षित नसते. बऱ्याचदा हा रंग पांढरा दिसत नाही. त्यात निळा अगर लाल रंग वेगळा पाहता येतो. त्याचप्रमाणे संपूर्ण काळा रंग हा काळाच दिसणे अपेक्षित असते, यामध्ये राखाडी, गडद निळा अशी इतर रंगांची सरभेसळ असता कामा नये. प्लास्मा प्रकारातील टीव्ही उत्तम काळा रंग दाखवितात. म्हणून गेल्या वेळी सांगितल्याप्रमाणे प्लास्मा टीव्हीची चित्र दाखविण्याची क्षमता एलसीडी/ एलईडीपेक्षा थोडी उत्तम समजली जाते.
रंग : उत्तम टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारे रंग हे उठावदार असणे अपेक्षित असते. हे पाहताना एखाद्या रंगाची कडा पाहावी, ती अगदी सरळ स्मूथ असेल तर उत्तम. बऱ्याचदा रंगांची कडा फारशी वेगळी पाहता येत नाही. कडेला आजूबाजूचे रंग एकमेकांत मिसळल्याचा भास होतो. कमीत कमी प्रकाशात रंग जास्तीत जास्त खरे वाटणे अपेक्षित असते. त्यामुळे दुकानात टीव्ही निवडताना कमीत कमी प्रकाशातील एखादे चित्र निवडावे व रंगाचा पोत पहावा.
इतर बारीकसारीक बारकावे : आपल्याला स्क्रीनवर दिसणारे चित्र किती स्पष्ट दिसते आहे यालाही तितकेच महत्त्व आहे, म्हणजे स्क्रीनवर सर्वसाधारण अंतरावर असणारे हिरव्या रंगाचे झाड आपल्याला हिरवा गोळा दिसतो की त्यातील सगळे बारकावे, त्यातील पानन् पान आपणास वेगळे पाहता येतात हे आपण तपासू शकतो.
मोशन : अधिक वेगात असणाऱ्या बाबी स्क्रीनवर कशा दिसतात याला निश्चितच महत्त्व असते. अधिकाधिक वेगातील चित्रे स्क्रीनवर जास्तीत जास्त सुस्पष्ट दिसणे अपेक्षित असते. त्यासाठी दुकानात गेल्यावर वेगाने जाणाऱ्या गोष्टींची फीत अगर व्हिडीओ आपण पहावा, ज्यामुळे या बाबीचा आपणास अंदाज येतो. फास्ट अ‍ॅक्शन स्पोर्टस् पाहता येऊ शकते व त्यावरून याबद्दलची क्षमता तपासता येईल.
बऱ्याच टीव्हीमध्ये विविध मोड्स असतात, जेणेकरून त्या-त्या प्रकारचे चित्र पहाताना आपला टीव्ही स्वत:ला त्या प्रकारचे चित्र दाखविण्यासाठी उत्तम प्रकारे आपोआप अ‍ॅडजेस्ट करून घेतो. ते मोड कोणकोणते आहेत ह्य़ा बाबी तपासता येतात.
साऊंड सिस्टीम क्षमता : खरं तर या बाबीकडे अनेक लोक दुर्लक्ष करताना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे उपलब्ध असणारे एक्स्टर्नल स्पीकर्स, पण आपल्याकडे एक्स्टर्नल स्पीकर्स उपलब्ध नसतील तर आपल्याला आवाजासाठी पूर्णत: टीव्हीच्या स्पीकर्सवर अवलंबून रहावे लागते. अशा वेळी टीव्हीचे स्पीकर्स महत्त्वाची भूमिका बजावतात. ते चेक करताना पुढील बाबींचा विचार करता येऊ शकतो.
बास : एखाद्या गाण्यातील भारदस्तपणा हा बासवर अवलंबून असतो. उत्तम साऊंड क्वॉलिटीमध्ये बास क्षमता ही चांगल्या प्रतीची असावी. त्यामुळे इतर आवाजावर परिणाम होता कामा नये, परंतु बास योग्य वेळी योग्य प्रमाणात वाढायला हवा.
आवाज : आवाज हा मोकळा असायला हवा. पात्रांचे संवाद ऐकताना त्यांचा आवाज एखाद्या बॉक्समधून आल्यासारखा वाटायला नको. एलसीडी, एलईडी टीव्हीमध्ये चित्रक्षमता वाढली असली तरी आवाजाची क्षमता कमी झाली आहे असे जाणवते. त्यात मुख्यत्वे संवाद ऐकू येत नाही. त्यामुळे आपण एलसीडी अगर एलईडी घेत असाल तर हा निकष नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो.
एक उत्तम टीव्ही हा सर्व दिशांना नियोजित व समान आवाज फेकू शकला पाहिजे त्यामुळे टीव्हीसमोर उजव्या व डाव्या बाजूला आवाजाची क्षमता तीव्रता समान असणे अपेक्षित असते.
इतर बाबी : आपण जो टीव्ही खरेदी कराल त्यामध्ये सध्याच्या गरजेनुसार यूएसबी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट आणि ऑडिओ जॅक उपलब्ध असावे जेणेकरून आपले स्मार्टफोन्स, कॅमेरा आपणांस टीव्हीला जोडता येऊ शकतील.
बाजारात सध्या उपलब्ध असणारे विविध रेंज आणि प्रकारांबद्दल-
सीआरटी टीव्ही :
गेल्या वेळी या प्रकाराबद्दल आपण जाणून घेतले होतेच, थोडय़ा जुन्या फॅशनचे म्हणून ओळखले जाणारे या प्रकारातील टीव्ही आता बाजारात फारसे दिसत नाहीत, अगदीच बजेट कमी असेल तरच या प्रकारातील टीव्ही घेण्याचा सल्ला मी आपणास देईन.
कंपनी : या प्रकारातील टीव्ही उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. सध्या बाजारात व्हिडीओकॉन, एलजी, सॅमसंग, फिलिप्स या सध्याच्या या प्रकारात आघाडीच्या कंपन्या आहेत.
२१-२९ इंच आकारातील हे टीव्ही, एक्सडी पिक्चर, गोल्डन आय टेक्नॉलॉजी या फीचर्ससह उपलब्ध आहेत. यामध्ये एलजी कंपनीचे २१ इंचातीलोव4फॅए3-4 हे मॉडेल उत्तम वाटते. याची साऊंड क्वालिटी, पिक्चर क्वालिटी कशाच्याच बाबतीत कमतरता जाणवत नाही.
याशिवाय व्हिडीओकॉन आणि फिलिप्स या कंपन्यांचेही चांगले पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
एलसीडी टीव्ही
एलसीडी टीव्ही या प्रकारचे टीव्ही साधारण २० इंच आकारापासून ते ५०-६० इंच आकारापर्यंत उपलब्ध आहेत.
कंपनी : या प्रकारात अनेक कंपन्या टीव्हीचे उत्पादन करीत असल्या तरी सध्याच्या घडीला व्हिडीओकॉन, सॅमसंग, एलजी, सोनी या कंपन्या आघाडीवर आहेत. या प्रकारात अनेक टीव्ही संच उपलब्ध आहेत तरी त्यातील काही निवडक संच पाहिल्यावर त्यातील काही निवडक टीव्हीची नावे सुचवीत आहोत.
या प्रकारात ३२ इंच आकारात व्हिडीओकॉन कंपनीचा श्आ32ाकइअ हे मॉडेल सर्व बाबतीत उत्तम वाटते. तसेच सोनी ब्राव्हियाचे ङछश्32उ420 हे मॉडेलही उत्तम आहे. यांच्याखेरीज तोडीस तोड आणि जरा वेगळ्या फीचर्सची सॅमसंग आणि एलजी कंपनींचे टीव्ही आपण वरील निकषांनुसार निवडू शकता.
या प्रकारात ४० इंच आकारात सॅमसंग कंपनीचा फुल एचडी आणि डॉल्बी सिस्टम साऊंड असणारे छअ40ऊ503ा7फ हे मॉडेल चांगले वाटते, परंतु जर आपण ४० इंच टीव्ही घेत असाल तर एलसीडीपेक्षा एलईडीचा विचार करावा असा सल्ला मी आपणास देईन.
२२ इंच आकारातही वर नमूद केलेल्या कंपन्यांचे चांगले मॉडेल्स उपलब्ध आहेत. याखेरीज नवीन आलेल्या मायक्रोमॅक्स कंपनीनेही या आकारात स्वस्तामध्ये चांगल्या सुविधा देणारे मॉडेल बाजारात आणले आहे.
एलईडी टीव्ही
एलईडी प्रकार हा सध्या बाजारातील सर्वात चालणारा प्रकार आहे. अगदी १९ इंचापासून ते ७० इंचापर्यंत टीव्ही या प्रकारात उपलब्ध आहेत.
कंपनी : सॅमसंग, एलजी, सोनी, पॅनसोनिक, व्हिडीओकॉन या कंपन्या या प्रकारचे टीव्ही बनविण्यासाठी सर्वात आघाडीवर आहेत.
सॅमसंग आणि एलजी यांच्या टीव्ही संचाची किंमत ही जरा चढी आहे. तेच फीचर्स असणारे टीव्ही संच व्हिडीओकॉन आणि सोनी या कंपन्या उपलब्ध करून देत आहेत.
२१ इंच आकारात व्हिडीओकॉन या कंपनीचे विविध मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. साधारण १७ हजार किमतीपर्यंत उपलब्ध असणारे मॉडेल्स कमी-अधिक सुविधांसह साधारणत: समान आणि चांगल्या प्रतीचे आहेत. फक्त आवाजाची क्षमता तपासून मग व्हिडीओकॉनचा टीव्ही घरी नेण्यास हरकत नाही.
३२ इंच आकारात एलजी आणि सॅमसंगचे चांगले पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. जरा बजेट वाढविले तर २६-२७ हजारांत सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी असणारा उत्तम संच आपणास या कंपन्यांकडून उपलब्ध होऊ शकेल. त्यामध्ये 32छइ554अ हे एलजी कंपनीचे मॉडेल मला सर्वोत्तम आणि पैसा वसूल वाटते. एलजीने खास भारतीय बाजारासाठी नवीन मॉडेल्स डिझाइन केले आहेत आणि ती सगळीच रेंज उत्तम आहे. सॅमसंगचीही जोय प्लस सीरिज या प्रकारातील उत्तम सीरिज आहे. आणि आपले बजेट कमी असल्यास व्हिडीओकॉन कंपनीवर विश्वास ठेवावा.
४० इंच व त्यावर आकारातही पुन्हा एलजी, सॅमसंग, सोनी या परदेशी कंपन्या चांगल्याच आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्यामुळे या कंपन्यांचे जवळपास सर्वच मॉडेल्स कमी-अधिक फरकाने उत्तम आहेत. शक्यतो एलजीची पिक्चर क्वालिटी उत्तम जाणवते, परंतु जर आपण ४० इंच टीव्हीसाठी फक्त मोठा आकार म्हणून इन्व्हेस्ट करीत असाल तर त्याच बजेटमध्ये सॅमसंगची ३२ इंचची स्मार्ट टीव्हीची सीरिज आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे हा विचार करावयास हरकत नाही. ज्यामुळे आपल्याला टीव्हीसोबतच स्मार्ट डिव्हाइस उपलब्ध होईल, जे आपल्या स्मार्टफोनप्रमाणे आपल्या विविध गरजा पूर्ण करू शकेल. तसेच ३डी टीव्ही हादेखील पर्याय उपलब्ध होऊ शकतो, परंतु लगेच थ्रीडी टीव्ही घेणे हे घाईचे ठरेल. कारण खरोखर भारतीय सिनेमांत अजूनपर्यंत थ्रीडी तंत्रज्ञान पुरेसे रुजलेले नाही, त्यामुळे खरोखर थ्रीडी व्हिडीओ फार पाहता येणार नसतील तर थ्रीडी टीव्हीचा फारसा उपयोग होऊ शकत नाही. आणि फक्त भविष्यासाठी टीव्हीमध्ये इन्व्हेस्ट करू नये असे मला वाटते.
ओएलईडी आणि कव्‍‌र्ह टीव्ही : गेल्या वेळी पाहिल्याप्रमाणे ओएलईडी म्हणजे प्लास्मा आणि एलईडीचे संकरित रूप ओएलईडी टीव्ही ही नुकतीच आलेली टेक्नॉलॉजी आहे. यामुळे फक्त एलजी कंपनीने या प्रकारातील सर्वाधिक टीव्ही बाजारात आणले आहेत. अत्यंत महागडे असणारे हे संच उत्तम टीव्ही एक्सपिरिअन्स आपणास उपलब्ध करून देऊ शकतात. यांसारखेच नवीन तंत्रज्ञान सध्या टीव्ही क्षेत्रात उपलब्ध आहे- कव्‍‌र्ह टीव्ही. सगळे पिक्सेल्स एका पातळीवर येऊन उत्तम चित्र पाहण्याचा अनुभव या तंत्रज्ञानामुळे आपणास उपलब्ध होऊ शकतो, परंतु यामध्ये एक छोटीशी उणीव आहे ती म्हणजे एका ठरावीक अंतरावर आपण बसलो तरच हा अनुभव आपणास अनुभवता येऊ शकतो.
एकूणच अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत, फक्त त्यातून आपल्या बजेटनुसार आणि गरजेनुसार आपणास निवडता यायला हवे, त्यासाठी वरील माहितीचा आपणास नक्कीच उपयोग होऊ शकेल.. हॅप्पी शॉपिंग..
प्रशांत जोशी