कलावंत असलो तरी सर्वप्रथम आपण समाजाचा एक घटक आहोत, अशी जाण असणारा अभिनेता म्हणजे सदाशिव अमरापूरकर. सामाजिक संवेदना जपून त्यासंबंधी काम करण्याचा सदाशिवने जणू पायंडाच पाडला. आपण समाजाचं काही देणं लागतो याचं भान त्याला नेहमी असायचं. केवळ सिनेमा, नाटकांतून सामाजिक भूमिका करून विषय सोडून देणाऱ्यांपैकी तो नव्हता. त्याच्या मनावर अशा सिनेमांच्या विषयांचा खोलवर परिणाम होत असे. ती गोष्ट त्या सिनेमा-नाटकांपुरतीच मर्यादित नसायची, तर ती गोष्ट त्याच्या जगण्यातलीच होऊन जायची. त्या प्रत्येक गोष्टीचा तो सखोल विचार करत असे. समाजातलं सुख-दु:खं, आकलन, समस्या, अडचणी समजून त्यावर काही काम करता येईल का, याचा तो सतत विचार करत असे. खरं तर एखादी व्यक्ती मोठी कलावंत झाली, की त्याला दुसरं कशाचंच भान उरत नाही; पण सदाशिव हा त्याला अपवाद होता. उलटपक्षी कलावंत म्हणून आपली आणखी जबाबदारी वाढली याचा सतत तो विचार करायचा. एक कलाकार, अभिनेता म्हणून तो लोकप्रिय होताच; पण एक उत्तम माणूस म्हणूनही त्याची विशेष ओळख होती. त्याची सामाजिक बांधीलकी इतकी होती की, समाजासाठी एखादवेळेस धावून काही मदत करण्याची वेळ आल्यास तो त्यासाठीही तत्पर असायचा. असं एका कलावंताला वाटणं ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे, असं मला वाटतं. 

मला एक किस्सा आठवतो. चार-पाच वर्षांपूर्वीचा. एका सिनेमाच्या चर्चेसाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. दलित कथेवर आधारित सिनेमा होता. त्यात त्याने भूमिका करावी असं मला वाटतं होतं. म्हणून त्या चर्चेसाठी आम्ही भेटलो. त्यात अत्याचार करणाऱ्याची भूमिका त्याची होती. कथा वाचल्यावर त्याच्या डोळ्यांतली अस्वस्थता मला जाणवली. तो म्हणाला, ‘‘हा विषय समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचावा असं मला वाटतं. मी तयार आहे सिनेमा करायला.’’ पुढे गमतीत तो असं म्हणाला की, ‘‘माझ्या मेकअपरुमच्या गाडीसह यायला मी तयार आहे. पुढचं पुढे बघू आपण.’’ दुर्दैवाने तो सिनेमा झाला नाही; पण सांगण्याचा मुद्दा हा की, केवळ स्वत:चा विचार न करता समाजाच्या चांगल्यासाठीचा विचार सातत्याने त्याच्या डोक्यात चालायचा. कुठल्याही मुद्दय़ावर आपलं परखड मत व्यक्त करण्याचा हा आणखी एक महत्त्वाचा गुण त्याच्यात होता. सर्वसाधारणपणे कलाकार आपले मुद्दे, मत मांडताना हात आखडता घेतात; पण सदाशिवचा स्पष्टवक्तेपणा त्याला स्वस्थ बसू देईना. याचं कारण म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता.
सदाशिव स्पष्ट बोलणारा असला तरी त्याचा हा स्पष्टपणा कोणालाही खुपणारा नव्हता. त्यातही स्वत:चा मुद्दा मांडताना समोरच्याचे वाभाडे काढणं हा हेतू अजिबात नसायचा. मुद्दा हा मुद्दय़ाच्या पद्धतीनेच मांडायचा. तो कोणावरही वार नसायचा, तर मुद्दय़ावर असायचा. हे असं तेव्हाच वागता येतं जेव्हा एक प्रकारचा निर्लेपपणा, अलिप्तपणा माणसात असतो. एखादी गोष्ट पटली, तर का पटली आणि नाही पटली, तर का नाही या दोन्हीची कारणं देऊन तो होकार, नकार द्यायचा. अनेक सामाजिक कामांमध्ये तो सहभागी असायचा; पण त्याचा कधीच त्याने देखावा केला नाही. त्याला कधी त्याची गरजच भासली नाही. एखाद्या व्यक्तीला काही गोष्टींविषयी कळकळ असली की, त्याचा देखावा करायचं त्याच्या ध्यानातही येत नाही. तसंच सदाशिवचं होतं. सामाजिक कामांमधलं त्याचं योगदान मोठं आहे. त्यामुळे एका कलावंताबरोबरच तो माणूस म्हणूनही खूप मोठा आहे. कला क्षेत्रात अशा पद्धतीच्या विचारसरणीचे कलाकार मोजके. सदाशिव त्यापैकी एक. वेगवेगळ्या विषयांच्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करून समाजासाठी काय करू शकतो याची जाण असणारा चतुरस्र अभिनेता, उत्तम माणूस म्हणजे सदाशिव अमरापूरकर..!
(शब्दांकन : चैताली जोशी)