मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रूंच्या वस्तीत २ ऑक्टोबर १९१२ रोजी कैकुश्रु माणेकजी ऊर्फ केकी मूस या अवलियाची ही दुनिया! हा कलायोगी जन्माला आला. लहानपणापासूनच कलेच्या आवडीमुळे परंपरागत ऐश्वर्याचे सारे मार्ग सोडत त्यांनी कलेचा हा ‘भणंग’ मार्ग स्वीकारला. मुंबईच्याच विल्सन कॉलेजमधून कलेची पदवी आणि पुढे लंडनमधून उच्चशिक्षण घेतले. देशोदेशीच्या कला पाहिल्या, कलाकारांना भेटले. या साऱ्या शिदोरीवर १९३८ मध्ये त्यांनी थेट चाळीसगावातील आपले वडिलोपार्जित घर गाठले आणि कलेची आराधना सुरू केली. सारे आयुष्य इथे कलासाधनेत घालवले. पुढची तब्बल ४८ वर्षे एखाददुसरा अपवाद वगळता ते आपल्या घरातून बाहेरदेखील पडले नाही. त्यांनी निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’!
मूस यांना या विश्वात जी जी म्हणून कला आहे, त्या साऱ्यांची आस होती. रंगकाम, चित्रकाम, रेखाचित्र, छायाचित्रण, मूर्तिकला, कातरकाम, काष्ठशिल्प, ओरिगामी, सतारवादन.. यातूनच चाळीसगावातील पाच दशकांच्या वास्तव्यात त्यांनी आशयघन अशा शेकडो कलाकृती निर्माण केल्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातच या सर्व कलाकृतींचे एक संग्रहालय थाटण्यात आले. एका सर्जनशील कलाकाराच्या या स्मृती जतन करण्याचे काम ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’ करत आहे.
रेम्ब्रा रीट्रीट! केकी मूस यांच्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे हे नाव आत शिरताच कलेशी नाते जोडते. विश्वाविख्यात कलाकार रेम्ब्रा हा केकी मूस यांचा आदर्श! कलेच्या प्रांतातील त्याचे अर्धवट कार्य पूर्ण करण्यासाठीच जणू आपला जन्म झाला, ही मूस यांची धारणा होती. आत शिरताच भोवतीने सर्वत्र शिल्पं, चित्रे, छायाचित्रे आदी कलाकृती दिसू लागतात. चित्र आणि छायाचित्र ही केकी मूस यांची दोन मुख्य अंगे!
चाळीसगावात आल्यावर प्रथम त्यांनी चित्रे रंगवायला घेतली. मूस यांनी उभे केलेले शेक्सपीअर कॉटेज, जहांगीर- नूरजहॉँ, उमर खय्याम, वादळवारा असे हे एकेक देखावे आजही पाहताना गुंतवून टाकतात. छायाचित्रण तर मूस यांचा जणू श्वासच! या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट, दृश्य आणि भाव त्यांनी आपल्या छायाचित्रांमधून जिवंत केले. यातही व्यक्तिचित्र, कल्पनाचित्र, प्राण्यांचे भावविश्व हे त्यांचे खास विषय.
कल्पनाचित्रांचा खेळ असलेली ‘टेबल टॉप फोटोग्राफी’ हा त्यांचा एक अफलातून प्रकार! मनातले एखादे चित्र उपलब्ध वस्तूंच्या साहाय्याने उभे करावे, त्याला प्रकाशयोजना, त्रिमितीची उत्तम जोड द्यावी आणि या साऱ्या दृश्याचे छायाचित्र काढत अवघ्या विश्वाला फसवावे!
केवळ मीठ, भुसा, कापूस, वाळलेल्या काडय़ा यातून त्यांनी तो गोठवणारा हिवाळा उभा केला. या दृश्यावर एक धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतले. झाले, भल्याभल्यांना या चित्रातून जागोजागीचा ‘विंटर’ दिसू लागला. यात खुद्द पंडित नेहरूदेखील होते. हे चित्र पाहिल्यावर नेहरू एवढेच म्हणाले, ‘धिस इज माय नेटिव्ह प्लेस. मि. मूस, टेल मी व्हेन यू हॅव व्हिजिटेड काश्मीर?’ ‘ऑफ डय़ूटी’ आणि ‘अ वेटिंग देअर टर्न विथ टेरर’ ही दोन छायाचित्रेही अशीच मूस यांच्यातील सर्जनशील मन दाखवणारी. ‘ऑफ डय़ूटी’मध्ये जवानाचा एक बूट दाखवला असून, त्याच्यात एक हसरी बाहुली खोचलेली आहे. बाहुलीतून जणू तो बूटच हसत आहे. दिवसभर त्या जवानाबरोबर ‘डय़ूटी’ करणाऱ्या त्या बुटालाही थोडा वेळ विश्रांती मिळाली की हायसे वाटते, आनंद होतो. पहिल्यात हा आनंद, तर दुसऱ्यात ती भीती! ‘मृत्यूचे भय’ दाखवणारे हे छायाचित्र! आजारी आईला मोसंबीचा ज्यूस देताना मूस यांना ही जाणीव स्पर्शून गेली. एक मोसंबी कापून त्याचा ज्यूस (अंत) होत असताना बाजूच्या मोसंब्यांच्या मनात काय भाव उमटत असतील, याचेच भय त्यांनी या फळांवर चित्रित केले. ..क्षुल्लक फळांमधून चराचरांतील प्रत्येकाच्या जीवन-मरणाचे दर्शन घडविणाऱ्या या छायाचित्राने मूस यांना पुढे जागतिक कीर्ती मिळवून दिली.
गेली २५ वर्षे ‘मूस आर्ट गॅलरी’ ही संस्था तुटपुंज्या उत्पन्नावर या साऱ्या ठेव्याचा सांभाळ करत आहेत. त्यांना ना शासनाची मदत ना कुठला आर्थिक हातभार. अडचणी अनंत आहेत आणि आव्हाने रोजची आहेत. संग्रहालयाची इमारत असलेले मूस यांचे ब्रिटिशकालीन घर १०५ वर्षांचे वृद्ध झालेले आहे. छत गळते आहे, भिंतींना तडे गेले आहेत आणि या स्थितीत दालनांतील कलाकृती जणू अंग चोरून उभ्या आहेत. मोठा पाऊस सुरू झाला, की सगळय़ा विश्वस्तांचा मुक्काम संग्रहालयात हलतो. मूस यांच्या घराचे स्मारक आणि संग्रहालयासाठी अद्ययावत इमारतीची उभारणी हे या संस्थेचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न आहे. थकलेली इमारत, अपुरी जागा, अशास्त्रीय मांडणी, अन्य यंत्रणा-सुविधांचा अभाव या साऱ्यांतूनही हे कलादालन रोज उघडते आणि देश-विदेशातून असंख्य कलाकारही रोज चाळीसगावचा पत्ता शोधत येतात.
येथील शेकडो दुर्मीळ कलाकृतींचे जतन करण्याचे काम ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’तर्फे गेली पंचवीस वर्षे निरलसतेने सुरू आहे; परंतु अपुरा निधी आणि संग्रहालयाच्या थकलेल्या इमारतीमुळे संस्थेपुढे सध्या मोठे संकट निर्माण झाले आहे. या कलाकृतींना ऊर्जितावस्था देण्यासाठी संस्थेला समाजाकडून मदतीची अपेक्षा आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?
कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान ही संस्था जळगाव जिल्हय़ातील चाळीसगाव शहरातील रेल्वेस्थानकाच्या पश्चिम बाजूलगत आहे.

Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
gangster mukhtar ansari family
स्वातंत्र्यसैनिक ते कुख्यात गुंड; एका कुटुंबाचा सुरस व चमत्कारिक प्रवास