गेल्या वर्षांतील अखेरचा महिना अर्थात डिसेंबर हा मानवाच्या काळ्या इतिहासात लक्षात राहणारा ठरला. पेशावरमध्ये शाळकरी मुलांवर दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण, भ्याड आणि क्रूर हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच. धार्मिक भावना पराकोटीला पोहोचली की, धर्माच्या नावावर कोणतीही गोष्ट करताना नियंत्रण कसे सुटत जाते आणि कोणत्याच गोष्टीचा विधिनिषेध कसा राहत नाही, याचेच प्रत्यंतर त्या वेळेस आले. त्यावर जगभरात प्रतिक्रिया उमटणे खूप साहजिकच होते. त्याच वेळेस भारतात ‘घरवापसी’चे टिळे लावले जात होते. प्रत्येक जण आपापल्या रंगाचा टिळा लावण्यात आता गर्क आहे. कुणाचा टिळा भगवा आहे तर कुणाचा निळा एवढाच काय तो फरक. या घरवापसीला राजकीय रंग तर होताच, आता त्यात वेगवेगळ्या रंगांची भर पडते आहे. ‘सहा हजार ओबीसींची बौद्ध धर्मात घरवापसी’, ‘आता १० हजार मुस्लिमांची घरवापसी’ अशा बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. बदलत काय होते तर टिळ्याचा रंग आणि घरवापसीचे आकडे. दोनच दिवसांपूर्वी ओवेसीनेही त्यात हिरव्या रंगाची भर घातली. आता प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार विविधरंगी टिळे बाजारात उपलब्ध होतील. साहजिकच ही परिस्थिती पाहून व्यथित झालेले गुलजार यांच्यासारखे संवेदनशील व्यक्तिमत्त्व विचारपूर्वक बोलले.. धर्म हा एक्स्पायरी डेट उलटलेल्या औषधासारखा आहे! प्रत्येक औषधाला त्याच्या निर्मितीच्या वेळेस एक एक्स्पायरी डेट दिलेली असते. त्यापूर्वी म्हणजेच ते औषध वेळेत घेतले तरच ते काम करते. अन्यथा एक्स्पायरी डेट उलटलेले औषध एक तर कामच करीत नाही किंवा मग ते विष होऊन अधिक घातक ठरते. सध्या आपल्या धर्म नावाच्या औषधाची ती मर्यादा ओलांडून गेल्याने ते घातक ठरते आहे, असे गुलजारजींना सुचवायचे होते. पण आताशा एखादी गोष्ट पूर्ण किंवा व्यवस्थित ऐकून घेण्याचे भानही प्रसिद्धीमाध्यमांना ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात राहिलेले नाही. ‘त्यामुळे धर्म म्हणजे एक्स्पायरी डेट उलटलेले औषध’ हे एकच वाक्य वर्तमानपत्रांतून वापरले गेले आणि गुलजारजींचे पुढचे वाक्य तसेच राहिले. याच वाक्याला जोडून ते पुढे म्हणाले होते.. धर्म हे तुमच्या वैयक्तिक कपडय़ासारखे ते स्वच्छ ठेवा! त्यातला हा दुसरा तेवढाच महत्त्वाचा भाग मात्र वगळण्यात आला. या दुसऱ्या भागामध्ये गुलजारजींनी सामान्य माणसाची वैयक्तिक निकड सांगितली आणि त्याचे भान व मर्यादाही तेवढय़ाच ताकदीने सांगून टाकली. त्यातील ‘ते स्वच्छ ठेवा!’ यालाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पण अनेकदा केवळ एकांगीच विचार करण्याची सवय अनेकांना असते. त्यातही धर्माचा पगडा अधिक असेल तर मग त्या एकांगी विचारांचे परिवर्तन एकांगी भूमिकेत केव्हा होते हे कळतही नाही. मग त्यातूनच इतरांना, इतर धर्माना तुच्छ लेखण्याची वृत्ती वाढीस लागते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका बाजूला यावर प्रत्यक्ष समाजात, मीडियामधून आणि सरकारदरबारीही वादाला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यात आता पक्षीय राजकारणाचा व्यवस्थित शिरकाव झाला आहे. यावर नौबती झडत असतानाच दुसरीकडे वर्षांच्या सुरुवातीला सालाबादप्रमाणे भारतीय सायन्स काँग्रेसला मुंबईत सुरुवात झाली. एरवी साहित्य संमेलन असे म्हटले की, त्यासोबत समीकरण म्हणून वादही सोबत येतोच. पण आजवर भारतीय सायन्स काँग्रेसचे अधिवेशन मात्र तसे दूर राहिले होते. ते ज्या शहरांत असायचे त्या शहरापुरतेच त्याचे कौतुक अनेकदा मर्यादित राहायचे. मात्र यंदाचे अधिवेशन त्याला अपवाद ठरले. सायन्स काँग्रेसमध्ये उडालेल्या पुराणातील विमानांनी नवा वादंग ओढवला. त्यावर ‘नासा’मधील एका तरुण संशोधकाने तीव्र आक्षेप घेतला आणि सायन्स काँग्रेसमध्ये अशा प्रकारच्या विषयांना स्थान देऊ नये, यासाठी त्याने ऑनलाइन याचिकाच निर्माण केली. त्यालाही विज्ञानवाद्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्षात विद्यापीठात झालेल्या त्या परिसंवादावरून वादाचे एक मोहोळच उठले. भारताच्या प्राचीन समृद्धीचे दाखले असे त्याचे असलेले स्वरूप आता विज्ञानाचेही हिंदुत्ववादी पुनर्लेखन इथपर्यंत येऊन पोहोचले आणि मग वादाचेच विमान भिरभिरू लागले. रविवारी सकाळी झालेल्या परिसंवादाची चर्चा नंतरचे दोन दिवस सुरू होती. इथेही पुन्हा धर्म विरुद्ध विज्ञान अशाच प्रकारे त्याकडे पाहण्यास सुरुवात झाली.

विज्ञान आपल्याला तारतम्य देते आणि काय स्वीकारायचे व काय नाही याचे भानही देते. म्हणूनच एकविसाव्या शतकातील मंत्र हा विज्ञानमेव जयते हाच असायला हवा!

एक महत्त्वाची बाब आपण एकविसाव्या शतकात लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे साहित्य या प्रकाराकडे साहित्यिकांच्या कल्पकतेची झेप किंवा त्यांची साहित्यिक झेप म्हणून पाहिले जाते, किंबहुना म्हणूनच त्याकडे आपण ‘जो न देखे रवी, वो देखे कवी’ असे म्हणून पाहतो. आधुनिक विज्ञानाला पुरावे लागतात. एखादी गोष्ट किंवा कोणताही दावा हा वैज्ञानिक निकषावर खरा ठरावा लागतो, तरच जग त्याचा स्वीकार करते. आयुर्वेदाच्या बाबतीतही असाच एक वाद नेहमी खेळवला जातो. यात वाद घालणारे आणि वाद खेळवणारे असे दोन्ही समाविष्ट आहेत. भारतीयांचे म्हणणे आहे की, आयुर्वेद हे विज्ञान आहे, त्याच्याशी संबंधित ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत. तज्ज्ञांनी ते लिहिलेले आहेत, त्या उपचार पद्धतीचा वापर करून बरे झालेल्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. ते आपले म्हणजे भारतीयांचे पारंपरिक ज्ञान आहे. त्यासाठी आम्हाला इतर कोणत्याही तज्ज्ञाची किंवा विदेशातून कुणी येऊन सांगण्याची गरज नाही. या गोष्टी खऱ्याही आहेत. पण ज्या वेळेस ते जगाने स्वीकारावे, असे आपले म्हणणे असते तेव्हा ते आपल्याला सिद्ध करावे लागते. आज संपूर्ण जगाने अॅलोपथीचा स्वीकार केला आहे. कारण त्यात प्रमाणीकरण आहे. ते वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध होऊन आले आहे, म्हणून ते स्वीकारले गेले. असेच प्रमाणीकरण वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध होऊन आल्यास तेही जग स्वीकारेल. पण मग त्यासाठी मात्र फार कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. आयुर्वेद हा वैयक्तिक गोष्टी म्हणजे रुग्णाच्या शरीरातील कफ, पित्त व वायू या त्रिदोषांचा व्यक्तिगत पातळीवर विचार करते, असा विचार अॅलोपथीमध्ये नाही. आयुर्वेदात मात्र ऋतुचक्राप्रमाणेच औषधाची मात्राही बदलत जाते. हे सारे जगाने स्वीकारावे, असे वाटत असेल तर ते मग प्रमाणीकरण व वैज्ञानिक संशोधनाची सिद्धता या मार्गाने जावे लागेल. अन्यथा ते आपण भारतात मोठय़ा प्रमाणावर वापरत आहोतच की! त्यासाठी कुणी आपल्याला वेगळे काही सांगण्याची गरज नाही. त्याचा रीतसर अभ्यासक्रमही तयार केलेला आहे, त्याचा संपूर्ण देशाने स्वीकारही केला आहे. आयुर्वेदातील तज्ज्ञांनी एकत्र येऊन त्यावर देशपातळीवर कामही केले आहे. पण जगाने स्वीकारावे, असे आपण म्हणतो त्या वेळेस निकष बदलतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक विज्ञान तुम्हाला पुरावा विचारते. पुराव्यादाखल हाती काही नसेल तर मात्र ती कविकल्पनाच ठरते, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यावर पुराव्यांसाठी काम करण्यास हरकत नाही, पण वैज्ञानिक सिद्धता विज्ञानात सर्वाधिक महत्त्वाची असते, याचे भान सुटून चालणार नाही!
ज्या भारतीय सायन्स काँग्रेसमध्ये हा वाद झाला आणि धर्म व विज्ञान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले त्याच अधिवेशनात गेल्या वर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्या कैलाश सत्यार्थी यांनीही लहान मुलांच्या विज्ञान संमेलनात बालदोस्तांशी संवाद साधला. या संवादात त्यांनीही गुलजारजींप्रमाणेच महत्त्वाचे विचार व्यक्त केले. तेही व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहेत. ते म्हणाले, नैतिकता धर्मामधून येते, पण तिला केवळ आणि केवळ वैज्ञानिक आधार असेल तरच तिचा स्वीकार करा. धार्मिक होऊ नका, त्याऐवजी विज्ञानवादी व्हा! धर्म म्हणजे काय? तर एक विशिष्ट प्रकारचे ते तत्त्वज्ञानच असते. ते तत्त्वज्ञान मानणारा एक गट तयार होतो, त्यांची संख्या वाढत जाते आणि मग कालांतराने त्या तत्त्वज्ञानानुसार वागणारे त्या विशिष्ट धर्माचे होतात. प्रत्येक धर्माने चांगली नैतिकताच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यातील व्यक्तिगतता संपते आणि सर्वानीच तेच मानावे यासाठीची बळजबरी सुरू होते आणि मग त्यासाठी कोणत्याही िहसक थराला जाण्याची मानसिकता निर्माण होते तेव्हा गुलजार म्हणतात तशी त्याची एक्स्पायरी डेट संपलेली असते. म्हणूनच ती संपली आहे की, नाही हे ताडून पाहायचे असेल तर वैज्ञानिक पर्याय आपल्या हाती आहेत म्हणून सत्यार्थी म्हणतात की, त्या धर्मातून येणाऱ्या नैतिकतेला वैज्ञानिक आधार असेल तरच स्वीकारा. कारण हे विज्ञान आपल्याला तारतम्याचे ज्ञान देते आणि काय स्वीकारायचे व काय नाही याचे भानही देते. म्हणूनच एकविसाव्या शतकातील मंत्र हा विज्ञानमेव जयते हाच असायला हवा!

विनायक परब

मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science
First published on: 09-01-2015 at 01:33 IST