sbचला, आता पुढचे तीन महिने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आम्हा नाटक, सिनेमावाल्यांसाठी अत्यंत खडतर काळ. कारण का माहिती आहे? अहो, दहावी आणि बारावीच्या परीक्षा आल्या आहेत ना. त्यात वर्ल्ड कप आणि आयपीएल. झालं धंद्याचं कल्याण. मला काय वाटतं, एक वेळेस धंद्याचा तीन महिन्यांचा सीझन गेला तरी चालेल हो, पण त्या परीक्षांच्या टेंशनमध्ये माझ्या सगळ्या मित्रांच्या आयुष्याचा सीझन खराब होईल त्याचं काय? दहावी आणि बारावीमध्ये तुम्हाला यश मिळालं तरच जगण्याला काही अर्थ आहे, अन्यथा तुम्ही जगायला नालायक आहात अशीच समजूत व्हावी असं वातावरण आहे आजूबाजूला. मग ज्यांना इतरांच्या मते यश मिळतं ते पुढे जातात. जे नापास होतात ते मागे राहतात आणि जे यशापशायच्या मध्येच अडकले आहेत त्यांना कळतंच नाही आता काय करावं? मग त्यातील काही बाजारात जे हजारो प्रकारची विविध शिक्षणाची दुकानं उघडली आहेत त्यात प्रवेश घेतात आणि मार्ग शोधायचा प्रयत्न करतात आणि कित्येक तर याहून सोपा मार्ग निवडतात तो म्हणजे ‘आत्महत्या’. झालं, संपलं आयुष्य. ते टेंशन नको, ती स्पर्धा नको, ते सतत स्वत:ला सिद्ध करणं नको आणि काहीच नको. किती सोपा उपाय आहे ना हा? खरंच मला त्या सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतात ज्यांनी आधीपासून लांब जायचा इतका सोपा मार्ग आम्हाला दाखवला आणि त्यांचेही ज्यांच्यामुळे हा मार्ग आत्महत्या करणाऱ्यांना मिळाला. 

अशा गोष्टी बोलायला परीक्षेच्या आधीची वेळ खूप चुकीची आहे मला माहिती आहे. खरं तर आता त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत, मस्त मार्क्स मिळव असं सांगितलं पाहिजे, खूप मोठा हो, आई-बापाचं नाव राख वगैरे वगैरे वगैरे सांगितलं पाहिजे. पण, आता त्यांना हेही सांगितलं पाहिजे की, मित्रांनो, तुमचा जीव खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या असण्याने अनेक गोष्टींना अर्थ आहे. निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला केवळ तुम्ही आहात म्हणून अर्थ आहे. पण, तुम्हीच जर स्वत:ची राख केलीत तर कशातच काही अर्थ नाही. हे आयुष्य तुम्हाला एकदाच मिळतं ते इतकं सोप्या पद्धतीने संपवू नका. तुम्ही कोण आहात, कसे आहात हे तुमचे परीक्षेतले मार्क्स नाही ठरवत, तुम्ही स्वत: ठरवता. परीक्षेत भले तुम्हाला ३५ किंवा ८० टक्के मार्क्स पडोत पण, आयुष्य तुम्हाला १०० टक्के मिळालंय आणि ज्यांना खूप मार्क्स मिळालेत त्यांचा आणि ज्यांना कमी मार्क्स मिळालेत त्यांचंही आयुष्य रोज एक दिवसाने कमी होत असतं. निसर्ग कोणाशीच भेदभाव करत नाही. ९८ टक्के मार्क्स मिळवून दोन दिवस जगण्याचा बोनस नाही मिळत. जगण्याच्या पातळीवर तुम्ही सगळेच सारखे आहात. मग स्वत:चं जीवन संपवून त्या निसर्गाचा आणि स्वत:चाही अपमान का करता?
मित्रांनो, असा काही विचार तुमच्या डोक्यात आला तर एक कराल? एकदा फक्त एकदा स्वत:शी बोला. मनमोकळेपणाने. कारण इतरांनी तुम्हाला समजून घेतलं तरी तुम्ही स्वत:ला नक्की समजून घ्याल. स्वत:शी बोलताना मात्र कुठलाही आडपडदा ठेवू नका, खोटेपणा ठेवू नका, पारदर्शीपणे सगळं बोला. जे जे मनात आहे ते सांगून टाका, कारण आपण जितके स्वत:ला ओळखतो तेवढे दुसरं कुणीच नाही. स्वत:ला बिनधास्त प्रश्न विचारा; मी इथे का आहे? मला नेमकं काय करायचंय? माझ्या असण्याचं नेमकं प्रयोजन काय? आतमध्ये खूप ढवळाढवळ होईल, नको नको ते आतून ऐकावं लागेल, विश्वास बसणार नाही अशा तुमच्याच काही गोष्टी तुमच्यासमोर मांडण्यात येतील, अक्षरश: चिरफाड करेल तो ‘तुमचं आतलं’ आणि मग आतलं सगळं शांत झालं की तुम्हाला खरं उत्तर मिळेल. आणि मग; मग? पुढे मी सांगण्याची गरज आहे का?
विश्वास ठेवा.. स्वत:वर, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांच्यावर.
आता मी तुम्हाला परीक्षेच्या शुभेच्छा देत नाही. पण, हो.. आयुष्याच्या परीक्षेसाठी मात्र खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला खरंच हवे आहात.
जियो और लढो..!
सुबोध भावे