शहरातील गोंधळ आणि गजबजाटापासून दूर चारएक किलोमीटर अंतरावर असलेला परमपूज्य सर्वसाक्षी स्वामी सच्चिदानंदांच्या मठाचा उल्लेख मानवजातीच्या उद्धारासाठी झटणारं विद्यापीठ असाच केला जायचा. स्वामीजींच्या अगदी नजीकच्या आणि मोजक्या ज्येष्ठ शिष्यगणांच्या नेतृत्वाखाली स्वार्थ आणि परमार्थाची सांगड घालण्याच्या दृष्टीने तेथे आलेल्या भाविकांसाठी अनेकविध कार्यक्रम हाती घेतले जात. सुरुवातीला एक एकरापेक्षा कमी परिसरात जन्माला आलेल्या स्वामीजींच्या मठाने बघताबघता दीडएकशे एकराचा परिसर व्यापून टाकला. मुळच्या शांत रम्य व काहीशा गूढ वातावरणाला जराही धक्का न लावता फाइव्ह स्टार हॉटेलातील सुखसोयींशी बरोबरी साधतील अशा स्वरूपाच्या विविध प्रकारच्या सदनिका, कार्यालये, सभामंडप, बेलभंडारा, हॉस्पिटल, प्रार्थना मंदिर, वाचनालय, ध्यानमंदिर अशा विविध वास्तूंमुळे त्या निसर्गरम्य परिसराला व मठाला अधुनिकतेचा आणि समृद्धीचा साज चढविण्यात स्वामीजी, त्यांचे असंख्य भक्तगण आणि चाहते यशस्वी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरवर पाहता मिळकतीचे काहीही साधन नसतानाही मठाचा अफाट पसारा आर्थिकदृष्टय़ा आश्रमाला आणि पर्यायाने स्वामीजींना कसा परवडतो याचा विचार बहुधा सर्वसामान्य भक्तगण करीत नसावेत. कारण कोणीही साधक अथवा अपार श्रद्धेपोटी येणारा माणूस या विषयावर चर्चा करताना आढळत नसे. एखाद्या फारच चौकस माणसाने अडचणीत टाकणारे प्रश्न उपस्थित केलेच तर त्याची ठरावीक उत्तरे स्वामीजींचे कार्यकर्ते देत.
‘प्रत्येक साधक आपापल्या परीने आश्रमाला आर्थिक साह्य़ न सांगता करतो.’
‘ऊपरवाला है.’
‘बाहर के लोग भी यथाशक्ती दानपेटी में चंदा छोडम्ते है.’
वगैरे वगैरे..
तरीसुद्धा कोणाही सुज्ञ माणसाला ही उत्तरं पटण्यासारखी नव्हती. कदाचित परदेशातून बऱ्याच मोठय़ा प्रमाणावर पैशाचा स्रोत येत असावा असा काहींचा अंदाज. पण थोडक्यात आश्रमाच्या एकंदर उलाढालीत आर्थिक बाबतीत लागणारी पारदर्शकता अभावानेच जाणवायची. ‘श्रद्धा’ , ‘भक्ती’ अशा गूढ आणि गोंडस शब्दांनी आर्थिक पारदर्शकतेच्या आवश्यकतेवर पांघरूण घातल्याचे स्पष्ट जाणवत होतं. शिवाय तेथे येणाऱ्या असंख्य भाविकांना असे प्रश्न निर्थक वाटत. काहींच्या मते डान्सबार किंवा इतर समाजविघातक काळे धंदे करण्यापेक्षा स्वामीजींचे कार्य निश्चितच समाजसुधारणेला हातभार लावणारे व म्हणूनच रचनात्मक होते.
सामान्य माणसाला, खासकरून विषमता, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा या अवगुणाने बरबटलेल्या आपल्या अक्राळविक्राळ लोकशाहीत, एखादी समस्या फारच हाताबाहेर गेली की, ‘श्रद्धे’शिवाय दुसरा उपाय उरत नाही आणि अशा परिस्थितीत सुज्ञ व सुशिक्षित माणसेही कोणा स्वामींच्या अथवा महाराजांच्या आश्रयाला येतात आणि परिणामी अशा आश्रमात अल्पकाळ का होईना मुक्काम ठोकतात. स्वामी सच्चिदानंदांच्या आश्रमात तर भल्याभल्यांनी येऊन हजेरी लावली असल्यामुळे स्वामीजींना आपोआपच देवत्व लाभलं नसतं तरच नवल होतं. निवडणुकीपूर्वी संत्र्यामंत्र्यांच्या भेटी, नवीन औद्योगिक प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी येणाऱ्या उद्योगपतींची भेट, सुपरस्टार ठरलेल्या नटनटय़ांची व खेळाडूंची भेट इत्यादीमुळे स्वामींचे दर्शन व त्यांच्याकडून मिळालेला प्रसाद याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं. पर्यायाने स्वामीजींनी केलेल्या किंवा न केलेल्या चमत्कारांचे लोक पाढे वाचू लागले. विचार करणाऱ्या माणसाला न पटणाऱ्या अनेक चमत्कारांचे स्वामी धनी झाले. या सर्वामुळे स्वामीजींना, त्यांच्या आश्रमाला व काही प्रमाणात तेथे वास्तव्य करून राहिलेल्या शिष्यगणांना एक आगळेवेगळे महत्त्व येऊ लागले. ‘बाय हुक ऑर क्रुक’ यश मिळालं पाहिजे असे वाटणारे अनेक महाभाग मग साहजिकच स्वामींच्यापुढे नतमस्तक होत. कोणत्याही आर्थिक, कौटुंबिक, राजकीय, औद्योगिक समस्येवर काहीतरी तोडगा या आश्रमात मिळणारच अशी भल्याभल्यांची खात्री झाली. का? कसा, केव्हा इत्यादी प्रश्न महत्त्वाचे नसत.
स्वामीजींच्या या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उलाढालीत परोपकाराचा किंवा अध्यात्माचा वाटा खरोखर किती याचा विचार करण्याची आवश्यकता दिवसेंदिवस मावळत चालली आणि कळत-नकळत स्वामीजी आणि त्यांच्या आश्रमाचे बघता बघता करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या एका पारमार्थिक तथा सामाजिक संस्थेत रूपांतर झाले. स्वार्थी सामान्य कुवतीची आणि विधिनिषेधशून्य माणसं ज्या समाजात उच्चपदाला पोहोचतात त्या समाजात आपल्या स्थानाला व देवत्वाला धक्का लागण्याची सुतराम शक्यता नाही हे कदाचित स्वामीजींनी ओळखले असावे. म्हणूनच ‘आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्वामी’ या पदाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली होती. वेगवेगळ्या धातूंच्या चकत्यातून बंदिस्त केलेली स्वामीजींची छबी आता अनेक भक्तगण आपल्या अंगावर मिरवू लागल्याचे ठायी ठायी जाणवत होते. दिवसेन् दिवस आश्रमाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती.
अशाच एका सकाळी स्वामीजींच्या आश्रमात एक वातानुकूलित चारचाकी येऊन थडकली. पांढरा शुभ्र पण इस्त्री नसलेला पायजमा आणि कुर्ता परिधान केलेली एक व्यक्ती आपल्या पत्नी व मुलासह गाडीतून बाहेर आली. साध्या पोशाखातही रुबाबदार आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या त्या गृहस्थाची पत्नीही तितकीच सुस्वरूप होती. पण शारीरिक अपंगत्वामुळे आईवडिलांचा आधार घेऊन चालणाऱ्या त्यांच्या मुलाकडे पाहिल्यावर ‘चंद्रावरही डाग’ असतो असं कोणालाही वाटलं असतं. साहजिक अनेकांच्या नजरा या छोटय़ाशा कुटुंबावर केंद्रित झाल्या. जवळच असलेल्या प्रार्थना मंदिरात काही क्षण व्यतीत केल्यावर आपल्याला स्वामीजींना भेटायचे आहे अशी विनंती तेथील कार्यकर्त्यांना त्या गृहस्थाने केली. त्या व्यक्तीचं नम्र पण डौलदार वागणंबोलणं आणि जोडीला वातानुकूलित चारचाकीमुळे निर्माण झालेलं सांपत्तिक वलय या सर्वामुळे प्रभावित झालेल्या स्वामीजींच्या शिष्यगणांनी स्वामीजींच्या भेटीची व्यवस्था केली नसती तरच नवल होतं.
ध्यानस्थ बसलेल्या स्वामीजींच्या पायावर त्या सर्वानी आळीपाळीने डोकं ठेवलं. आजूबाजूच्या शिष्यगणांनी खुणेने त्या तिघांना थांबायला सांगितलं. काही क्षणानंतर स्वामीजी ध्यानातून बाहेर आले. वेगवेगळ्या कारणांसाठी त्या तिघांकडे स्वामीजीने आपली मधाळ नजर फेकली. स्वामीजींचा आशीर्वाद लाभल्यावर ते कुटुंब परत आपल्या गाडीकडे वळले. मोठय़ा अदबीने त्यांच्या शोफरने गाडीचे दार उघडून त्यांना आत घेतले व काही क्षणातच ती गाडी आश्रमाच्या वेशीतून बाहेर पडली व लगेचच दिसेनाशी झाली.
नंतरच्या काही महिन्यांच्या दर पौर्णिमेला बापलेकांची आश्रमाला भेट आता नित्याची बाब झाली होती. आणि प्रत्येक भेटीत पन्नास हजारांचं एक पुडकं दानपेटीत पडायला लागलं. त्याच्या बदल्यात कसल्याही प्रकारची खास सवलत अथवा कृपाप्रसादाची हाव न करता मनोभावे प्रार्थना मंदिरात काही क्षण घालवून आणि न चुकता स्वामींच्या पायावर डोके टेकून हे बापलेक निघून जात. एखाद्या भेटीत पन्नास हजारांच्या दोन पुडक्याबरोबर सर्वाना मेवामिठाई वाटली जायची.
नंतरच्या एका भेटीत एक चमत्कार घडला. नित्याप्रमाणे आश्रमाच्या आवारात त्यांची गाडी येऊन थांबल्यावर गाडीतून बाहेर पडलेला मुलगा वडिलांचा आधार न घेता प्रार्थना मंदिराकडे बाबांच्या सोबत चालत गेला. सर्वाना आश्चर्याचा एक सुखद धक्का देऊन बापलेक स्वामींच्या दर्शनासाठी ध्यानमंदिरात पोहोचले. स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवताना दोघांच्या डोळ्यातील आसवांनी स्वामीजींचे पाय ओले झाले. स्वामींच्या कृपाप्रसादाने काही महिन्यांतच त्या गृहस्थाच्या मुलाचे अपंगत्व नाहीसे झाल्याने स्वामीजींच्या अहंकाराला नकळत फुंकर घातली गेली.
अशाच एका भेटीत सर्व सोपस्कार पार पडल्यावर काहीशा उदास चेहऱ्याने बापलेक आश्रमाच्या आवारातून बाहेर पडले. लागोपाठ एक-दोन वेळा असे घडल्यावर स्वामींच्या शिष्यगणांनी त्या गृहस्थाचा पिच्छा पुरवला. त्यांच्या उदासीनतेचे कारण जाणून घेण्याची तीव्र इच्छा शिष्यगणांनी व्यक्त केली.
‘‘आपके दु:ख का निवारण स्वामीजी कर सकते है.’’ एक शिष्य.
‘‘स्वामीजी को शरण आवो- सबकुछ ठीक होगा.’’ दुसरा.
‘‘आपकी समस्या स्वामीजी यू दूर करेंगे.’’ आणखी एक.
या सर्वावर बापलेकाची एकच प्रतिक्रिया असायची.
‘‘स्वामीजी की हमारे पर ढेर सारी मेहरबानी पहले ही हो चुकी है. मेरा लडम्का चलने लगा- और मुझे कुछ नहीं चाहिये.’’
‘‘फिर भी आप एक बार स्वामीजी को बता दे तो अच्छा होगा.’’ एक शिष्यगण.
‘‘हमारे घरेलु मामले के लिये स्वामीजी जैसे महान संत को तंग करना हमे पसंद नहीं.’’
खूप पिच्छा पुरवल्यावर कळलं की एका मोठय़ा उलाढालीसाठी भराव्या लागणाऱ्या टेंडरची पन्नास लाख एवढी रक्कम उभी करता येणं अशक्य झाल्याने बाप व त्यामुळे मुलगा दोघेही उदास होते. वीस एक लाखाची तरतूद झाली होती व उरलेले तीसएक लाख एखाद महिन्यात उभे करता न आले तर एक मोठी सुवर्णसंधी तो गृहस्थ गमावून बसणार होता.
‘‘फिर भी हमें विश्वास है कि कुछना कुछ रास्ता दिखाई देगा और हमारे मन में आश्रम के लिये और कुछ करने का इरादा है वो भी पुरा होगा.’’ असं सांगून बापलेक निघून गेले. परंतु जाण्यापूर्वी, ‘आपका इरादा तो बताइये.’ या एका शिष्याच्या विनंतीला उत्तर देताना त्या गृहस्थाने सांगितलं, ‘‘मेरी पत्नी आश्रम के लिये एक बरस की सेवा देना चाहती है- और हमें उम्मीद है भगवान हमारी सुनेगा.’’
पुढच्या भेटीला एक लाखाच्या देणगीसह साऱ्या आश्रमाला जेवण देण्यात आलं, कारण पैशाची व्यवस्था झाली होती. सर्वाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. आश्रमात एक सण साजरा होत होता.
त्या शेवटच्या भेटीनंतर आश्रमात परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. तीन-चार लाखांच्या बदल्यात आणि सुस्वरूप पत्नीच्या सेवेचे आमिष या बदल्यात तीस लाखांची कमाई वाईट नव्हती. पण जुळ्यातला आपला एक मुलगा अपंगच होता आणि तो कायम अपंगच राहणार ही खंत वातानुकूलित चारचाकीच्या मालकाला कायम बोचत राहणार होती.
अशोक ग. करंदीकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story
First published on: 26-06-2015 at 01:13 IST