मानवाने अफाट प्रगती केली आहे. पण अद्यापि मानवी भावभावनांवर काबू मिळवता आलेला नाही. असे कोणतेही यंत्र नाही की ज्याची कळ दाबली की मनुष्याला आनंद वाटेल, अथवा तो संतापेल नाही तर भयभीत होईल. केशवने असे यंत्र शोधलं पण..

संपूर्ण वर्गात भीषण शांतता पसरली होती. आधीच गणिताचा पेपर आणि तो असा कठीण होता की हुशार मुलांचीदेखील बोबडी वळली होती. पण भिंतीवरच्या एका झरोक्यातून पाहणारे दोघे जण मात्र अगदी खूश झाले होते. वर्गातील सर्व मुले अतिशय भयभीत झालेली आहेत हे त्यांना पाहावयाचे होते. हेच दृश्य पाहण्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली होती. कठीण पेपर पाहून घाबरलेल्या मुलांना दिलासा देण्यात आला. थोडय़ाच वेळात मुलांना चुकीचा पेपर दिलेला असल्याचे सांगून दुसरा पेपर देण्यात आला.
त्या दोघांनी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना भेटून मोठय़ा मिनतवारीने फक्त दोन मिनिटांसाठी पाचवीच्या वर्गाला सहावीचा पेपर द्यावयास सांगितले होते. बाजूचा वर्ग रिकामा ठेवलेला होता. दोन्ही वर्गाच्या मधल्या भिंतीमध्ये वरच्या छताजवळ एक छोटे चौकोनी भोक होते. त्यामध्ये कॅमेऱ्यासारखे एक उपकरण ठेवलेले आणि त्याला बऱ्याच वायर्स जोडलेले एक अवजड यंत्र खाली जमिनीवर ठेवलेले होते. वर्गातील मुलांनी जेव्हा तो अति कठीण पेपर पाहिला तेव्हा सामुदायिकरीत्या जी तीव्र भीतीची लहर उठली होती त्या क्षणाचे त्यांनी त्या विचित्र यंत्रावर नोंद केली.
या प्रकरणाची सुरुवात दोन मित्रांच्या गप्पांमधून झाली होती. डॉ. सागर आणि त्यांचा परम मित्र केशव या दोघांचा नेहमीप्रमाणे सकाळी चहापानाचा कार्यक्रम चालला होता. सागर हा मानवी मेंदू या विषयाचा प्रख्यात तज्ज्ञ होता तर केशव हा विद्युतवहन या क्षेत्रातील गाजलेला इंजिनीअर होता. मानवाने अफाट प्रगती केली आहे. अनेक दुर्धर रोगांवर मात, सूर्यमालेतील ग्रहांवर स्वारी, टीव्ही चॅनेल्स, स्वनातीत विमाने, महाप्रचंड यंत्रे निर्माण केली आहेत, पण अद्यापि मानवी भावभावनांवर काबू मिळवता आलेला नाही, असे केशव ठासून सांगत होता. असे कोणतेही यंत्र नाही की ज्याची कळ दाबली की मनुष्याला आनंद वाटेल, अथवा तो संतापेल नाही तर भयभीत होईल.
जरी सागरला हे मान्य असले तरी त्याच्या मते भविष्यात तेही शक्य होणार आहे, कारण मानवी संवेदना यासुद्धा मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या विद्युत लहरी आहेत. मानवी मेंदूमधील न्युरोन्स हा घटक विद्युत लहरींच्या स्वरूपात माहिती पाठवू शकतो. अधिक स्पष्ट करायचे तर अक्सोन हा न्युरोन्समधील भाग तंतूसारखा लांबलचक असतो. हा कधी कधी एक मीटर इतकासुद्धा लांब असू शकतो. अक्सोन विद्युतलहरी वाहून नेण्यास व प्रक्षेपित करण्यास सक्षम असतो. एका पेशीमधील अक्सोनचे दुसरे टोक दुसऱ्या पेशीतील अक्सोनच्या जवळ परंतु स्पर्श न करता असते व अक्सोन संदेश प्रक्षेपित करतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील विजेच्या तारांना जसे विद्युतरोधक प्लास्टिकचे आवरण असते तसे मेंदूतील काही अक्सोनभोवती मायलीन नावाच्या विद्युतरोधक पदार्थाचे आवरण असते. त्यामुळे त्यातून विद्युतप्रवाह अधिक वेगाने जाऊ शकतो.
‘‘काय सांगतोस? संदेश मेंदूमधून प्रक्षेपित होतात?’’ केशवने आश्चर्याने विचारले.
‘‘होय, हे अगदी खरे आहे. आणि राव नावाच्या वॉशिंग्टन येथील शास्त्रज्ञाने एका प्रयोगात त्यांचा मेंदू एका मशीनद्वारे त्याचे सहकारी आंद्रे स्तोक्को यांच्या मेंदूशी जोडला. नंतर राव यांच्या मेंदूतील विचाराप्रमाणे त्याच्या सहकाऱ्याची बोटे संगणकाच्या कळफलकावर काम करू लागली.
परंतु हा प्रयोग अतिशय अवघड आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने करण्यात आलेला होता. यामध्ये मानवी मेंदूच्या प्राथमिक स्वरूपाच्या आदेशांचे जोडलेल्या यंत्रांच्या मदतीने प्रक्षेपण करण्यात आले होते. एका संशोधकाने कुठल्याही यंत्राचे साहाय्य न घेता वा प्रत्यक्ष काहीही जोडणी न करता भावनांचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करून दाखविले आहे,’’ सागर.
‘‘छे, भावनांचे प्रक्षेपण! आणि तेसुद्धा कसलीही जोडणी न करता, केवळ अशक्य.’’ केशवने अगदी ठामपणे आपले मत सांगितले.
‘‘थांब, तुला मी त्याचा प्रयोग समजावून सांगतो..’’ सागर.
त्या शास्त्रज्ञाने पुठ्ठय़ाच्या लहान आकाराच्या पेटय़ा तयार केल्या आणि प्रत्येक पेटीवर इंग्रजी ‘ए’पासून ‘झेड’पर्यंतचे एकेक अक्षर चिकटवले. नंतर प्रत्येक पेटीमध्ये दोन-दोन लहान किडे ठेवले.

(प्राथमिक संच – प्रत्येक पेटीमध्ये दोन किडे)
या प्राथमिक संचामधील हे सर्व किडे त्यांना व्यवस्थित खाणे देऊन वाढविले. प्रत्येक जोडीचे पूर्ण आयुष्य त्यांच्या पेटीमध्ये एकत्र गेलेले होते. प्राथमिक संचातील किडे त्या त्या अक्षराच्या पेटीमध्ये त्यांच्या जन्मापासून जोडी जोडीने राहत होते. साहजिकच प्रत्येक जोडीमध्ये एक घट्ट असा ऋणानुबंध निर्माण झालेला होता.
त्यानंतर त्याने पुठ्ठय़ाच्या पेटय़ांचे इंग्रजी ‘ए’ पासून ‘झेड’पर्यंत अक्षरे चिकटवलेले दोन नवीन संच तयार केले. आता ‘ए’ अक्षराच्या दोन पेटय़ा, ‘बी’ अक्षराच्या दोन पेटय़ा, याप्रमाणे प्रत्येक अक्षराच्या दोन-दोन नवीन पेटय़ा तयार झाल्या. या पेटय़ांना आपण पहिला संच ‘ए-१’ ते ‘झेड-१’ आणि दुसरा संच ‘ए-२’ ते ‘झेड-२’ अशी नावे देऊ. आतापर्यंत प्राथमिक संचामधील ‘ए’ अक्षराच्या पेटीमध्ये एकत्र वाढविलेल्या दोन किडय़ांपैकी एक किडा ‘ए-१’ अक्षराच्या पेटीमध्ये तर दुसरा किडा ‘ए-२’ अक्षराच्या पेटीमध्ये अशा दोन पेटय़ांमध्ये वेगळे ठेवले. ‘ए’ अक्षराच्या प्राथमिक संचातील पेटीमध्ये आयुष्यभर एकत्र राहिलेले दोन किडे ‘ए-१’ आणि ‘ए-२’ अक्षराच्या दोन पेटय़ांमध्ये वेगळे वेगळे राहू लागले.

(प्रत्येक पेटीमध्ये एक-एक किडा.)
याप्रमाणे ‘ए’ पेटीमधील जोडीतला एक किडा ‘ए-१’ पेटीमध्ये आणि दुसरा ‘ए-२’ पेटीमध्ये असे वेगळे झाले. आता संच एक व दोनमधील प्रत्येक अक्षराच्या पेटीमध्ये एक-एक किडा होता. संच एकमधील ‘ए-१’ व संच दोनमधील ‘ए-२’ अक्षराच्या पेटीमधील किडे वेगळे होण्यापूर्वी पूर्वी प्राथमिक संचामधील ‘ए’ अक्षराच्या पेटीमध्ये एकत्र राहत होते. या विभागणीनुसार सर्व ‘ए’पासून ‘झेड’ अक्षरापर्यंत पेटय़ांचे दोन संच तयार झाले.
त्यानंतर ‘ए-१’ ते ‘झेड-१’ अक्षरांचा पहिला संच व ‘ए-२’ ते ‘झेड-२’ अक्षरांचा दुसरा संच वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले. त्या शास्त्रज्ञाने एक छोटी काडी घेऊन पहिल्या संचातील ‘ए-१’ अक्षराच्या किडय़ाला हलकेच टोचली. त्या बरोबर तो किडा वेदनेने वळवळायला लागला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बरोबर त्याच वेळी दुसऱ्या संचामध्ये वेगळा ठेवलेला, पूर्वीच्या त्याच्या सोबतीतला, ‘ए-२’ या अक्षराचा किडासुद्धा वळवळायला लागला. अशा रीतीने त्याने ठरावीक अक्षरांच्या किडय़ांना डिचवून आपल्या नावाची अक्षरे दुसरा संच पाहत असलेल्या व्यक्तीला पाठवली.
पहिल्या संचातील किडय़ाला जी वेदना झाली त्याची सहसंवेदना त्याच्यासोबत पुरे आयुष्य घालविलेल्या दुसऱ्या संचातील किडय़ाला जाणवली. तीही ते दोन किडे प्रत्यक्षात एकमेकांना पाहतसुद्धा नसताना किंवा कुठल्याही प्रकारे त्यांचा काहीही संबंध नसताना. यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की भावना यासुद्धा कोणत्या तरी प्रकारच्या लहरी आहेत व त्या लहरींचे प्रक्षेपणही होऊ शकते.’’
‘‘ही एक फार मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे,’’ केशवने अगदी बिनशर्त मान्यता दिली.
‘‘अरे, प्रयोगाअंती सिद्ध झालेले आहे की मानवी मेंदूमधील डावीकडचा परफ्रोन्टल कोर्टेक्स (’ीऋ३ स्र्१ीऋ१ल्ल३ं’ ू१३ी७) हा विभाग भावनांशी संबंधित आहे एवढेच नव्हे तर या संवेदनांचे परिवलन सूक्ष्म विद्युतलहरींच्या संदेश यंत्रणेमार्फत होते,’’ सागर.
खरे म्हणजे आपल्याला असे काही अनुभव आलेले ऐकिवात आहेत. दूर शहरात राहत असलेल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्यावर त्याच्या आईला त्याच क्षणी त्याची जाणीव झाल्याची घटना मी स्वत: ऐकलेली आहे. जुळ्या मुलांमध्ये एका मुलाला झालेली वेदना अथवा आनंद दूर असलेल्या त्याच्या दुसऱ्या भावाला जाणवते ही गोष्ट सर्वश्रुत आहे.
‘‘असेच जर असेल तर, मला वाटते, जर योग्य अशा तीव्रतेची भावनेची लहर मिळाली तर तिचे वारंवार संवर्धन करून प्रक्षेपण करणे कठीण असले तरी अशक्य नाही,’’ केशवने कबुली दिली.
‘‘मेंदूमधील संबंधित सूक्ष्म भाग उत्तेजित करून एकाच तीव्र अशा भावनेचे आंदोलन निर्माण करण्याचा मी प्रयत्न करू शकतो,’’ सागरने तयारी दर्शविली.
‘‘तसे झाले तर अति सूक्ष्म लहरीचे वर्धीकरण व प्रक्षेपण करण्याचा मी प्रयत्न करीन,’’ केशवने आव्हान स्वीकारले.
अनेक मानवी भावभावनांतील भीती ही भावना आनंद वा दु:ख यांच्यापेक्षा फार तीव्र असते. त्यांनी एखाद्या व्यक्तीला जबरदस्त भीती दाखवून या भावनेचे मुद्रण करण्याचे ठरविले. त्यासाठी केशवने एक अति सूक्ष्म लहरींचा ग्राहक तयार केला. आपल्या प्रयोगासाठी त्यांनी भरपूर पैशाचे आमिष दाखवून एका स्वयंसेवकाला तयार केले. मात्र भीती ही जर अकस्मात व अनपेक्षित असली तर तिचे परिणाम जोरात होतात. त्यासाठी त्यांनी त्या स्वयंसेवकाला प्रयोगाची पूर्ण कल्पना दिली नाही. त्याला एका खुर्चीत बसवून त्याच्या डोक्यावर केशवने तयार केलेला सूक्ष्म लहरी ग्राहक बसविला. आणि अचानक त्याच्या अंगावर एक अक्राळविक्राळ कुत्रा सोडला. अर्थात तो कुत्रा साखळीने आधीच बांधून त्या स्वयंसेवकापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. तो स्वयंसेवक कुत्रा अंगावर आल्याचे पाहून भयंकर घाबरला. परंतु भीतीच्या लहरीची तीव्रता ग्राहकावर नोंद घेण्याइतपत नव्हती. प्रयोग असफल झाला.
पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या भावना जास्त तीव्र असतात. त्यामुळे हाच प्रयोग एका स्त्री-स्वयंसेवकावर करण्याचे ठरविले. मोठय़ा मिनतवारीने एका स्त्रीला प्रयोगासाठी राजी करण्यात आले. परंतु कुत्रा अंगावर आल्यावर तिची भीतीने अगदी गाळण उडाली. ती किंचाळत ओरडत उठली. तिच्या डोक्यावर बसविलेला लहर ग्राहक खाली पडला. नंतर ते प्रकरण निस्तरताना नाकीनऊ आले. परंतु इतके परिश्रम घेऊनसुद्धा अपेक्षित परिणाम lp43काही मिळाला नाही. केशवने त्याचा ग्राहक अधिक संवेदनशील केला. तरी उपयोग झाला नाही. एवढी मेहनत वाया जाणार म्हणून दोघे निराश झाले.
सागरच्या रस्त्यालगतच्या तळमजल्यावरील घराच्या खिडकीपाशी बसून दोघे खिन्न मनाने चहा घेत होते. बाजूला असलेली शाळा नुकतीच सुटलेली असल्यामुळे खिडकीसमोरून मुले गडबड करीत चाललेली होती. त्यांना बघत असताना सागर अचानक उभा राहून ‘सापडले’ म्हणून ओरडला.
‘‘आता तुला आणखी काय सापडले? झाली तेवढी वायफळ मेहनत पुरे झाली,’’ केशव वैतागाने म्हणाला.
‘‘तुझ्या ग्राहकावर नोंद करता येईल अशा तीव्र भावनेची लहर निर्माण करण्याचा मार्ग सापडला.’’ सागर नव्या उत्साहाने म्हणाला. ‘‘हे बघ, आपण मोठी माणसे नेहमीच भावनांवर शक्यतो नियंत्रण ठेवत असतो. आपल्याला तशी पहिल्यापासून शिकवणच असते. परंतु लहान मुलांचे तसे नसते. त्यांच्या भावना तीव्र असतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण आतापर्यंत फक्त एका व्यक्तीवर प्रयोग करीत होतो. आपण जर एकाच वेळी सामुदायिकरीत्या पन्नास मुलांना जबरदस्त भीती दाखवली तर नोंद करण्याएवढी तीव्र लहर मिळू शकेल.’’ सागरने त्याची कल्पना सांगितली.
‘‘पण हे जमणार कसे? एकाच व्यक्तीवर प्रयोग करताना हैराण झालो. तर पन्नास मुलांवर प्रयोग कसा करणार?’’ केशवला अजून शंकाच होती.
‘‘ते सर्व मी जमवतो. तू फक्त तुझा ग्राहक जरा अधिक शक्तिशाली करण्याचा विचार कर.’’ सागरने हमी दिली.
मग सागरच्या कल्पनेप्रमाणे ते दोघे शेजारच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटले. ते सागरला ओळखत होतेच. त्यांना या प्रयोगाची थोडक्यात माहिती दिली. मुलांना सर्वात भीती म्हणजे परीक्षेची. तर मुलांना एक अतिशय कठीण अशी प्रश्नपत्रिका फक्त थोडय़ाच वेळासाठी द्यावयास सांगितले. सगळा खर्च द्यावयाची तयारी दर्शविली. अखेर हो-ना करता ते तयार झाले.
आणि शेवटी प्रारंभी सांगितलेली घटना घडवून आणली. अतिशय कठीण अशी प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर वर्गातील सर्व मुलांची पाचावर धारण बसली. वर्गातील सर्वच मुले अतिशय घाबरली. एका क्षणासाठी भीतीची एक सामुदायिक अशी अतिशय तीव्रतम लहर त्या वर्गात निर्माण झाली. केशवला त्याच्या ग्राहकावर ती लहर नोंदवण्यात अखेर यश मिळाले.
यापुढचे काम केशवचे होते. तो स्वत: विद्युतवहन शास्त्रातील जाणकार आणि एक सुप्रसिद्ध संशोधक होता. तो झपाटय़ाने कामाला लागला. रात्रंदिवस तो तहानभूक विसरून जीवतोड मेहनत घेत होता आणि एके दिवशी रात्री दोन वाजता त्याने सागरला गदागदा हलवून जागे केले. अतिश्रमाने त्याचा चेहरा ओढलेला दिसत होता. पण चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते.
‘‘काय झाले? भीतीची जाणीव एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पाठविण्याचे जमले काय?’’ त्याने विचारले.
‘‘अरे, मी त्याच्या पार पुढची पायरी गाठली आहे. माझा ग्राहक आता डोक्यावर बसविण्याची गरज नाही. तो चार फूट अंतरावरून भीतीची लहर नोंदवू शकतो. एवढेच नाही तर माझे नवे यंत्र चार फूट अंतरापर्यंत या लहरी प्रक्षेपितही करू शकते. या यंत्रामुळे जगात नवी क्रांती होणार आहे.’’ केशव उत्साहाने सांगत होता.
‘‘जर एखाद्या व्यक्तीला थोडे घाबरवण्यात यश मिळाले तर त्यामुळे काय जगात उलथापालथ होणार आहे? या अशा गोष्टी फक्त संशोधकासाठी असतात. त्यांना फक्त सैद्धांतिक महत्त्व असते.’’ सागर.
‘‘असे बघ, जर एखाद्या सैन्याकडे जरी अद्ययावत अशी भरपूर शस्त्रे असली तरी जर सैनिक भित्रे आणि पळपुटे असतील तर त्यांना पराभवच स्वीकारावा लागेल. हे तर खरे आहे ना?’’ केशवने विचारणा केली.
‘‘हे अगदी खरे आहे. शेवटी शस्त्रे धरणारे हात महत्त्वाचे.’’ सागर.
‘‘हे माझे यंत्र सध्या तरी फक्त चार फूट अंतरापर्यंत आणि एका वेळी केवळ दोघांवर प्रक्षेपण करू शकते. त्याचा परिणाम त्यांच्यावर एकदशांश सेकंदात होतो. आता त्यामध्ये कितपत यश मिळाले आहे ते प्रत्यक्ष प्रयोगाअंती कळू शकेल. आजमितीला याची कक्षा व ताकद फार लहान आहे, पण या यंत्राची क्षमता अफाट वाढविता येणे शक्य आहे.
आता समज, भारतीय सैन्याची एक छोटी तुकडी आहे आणि त्यांच्याकडे शस्त्रेही फार कमी आहेत. परंतु त्यांच्याकडे मी बनविलेले यंत्र आहे. अशा वेळी जर त्यांच्यावर दहापट मोठे आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असे शत्रुसैन्य चालून आले तर? भारतीय सैन्याने फक्त माझे यंत्र सुरू करावयाचे. शत्रुसैन्याच्या मनात भयंकर भीती निर्माण होऊन ते पळत सुटेल. त्यांच्याकडे लढण्याची हिंमतच राहणार नाही. बंदुकीची एक गोळीसुद्धा झाडण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे हे यंत्र असेल ते सैन्य जगात अजिंक्य ठरेल. आता बोल, हे यंत्र क्रांतिकारी आहे ना?’’ केशव.
‘‘जर हे सर्व शक्य झाले तर खरेच तुझे यंत्र अण्वस्त्रापेक्षाही महाभयानक ठरेल. पण तू आधी या तयार केलेल्या यंत्राची चाचणी घेतली आहेस काय?’’ आता सागरमध्येही उत्साह संचारला.
‘‘नाही, अजून शेवटचा सफाईची हात फिरवायचा आहे. सकाळपर्यंत माझे काम पुरे होईल. महत्त्वाची गोष्ट अशी की हे यंत्र ग्रहण व प्रक्षेपण फक्त भीती या एकाच भावनेचे करीत नसून त्याच वेळी त्या व्यक्तीच्या मनात असलेले विचारही नोंद करून प्रक्षेपित करण्याची क्षमता या यंत्रात आहे. निदान मी तसा प्रयत्न केलेला आहे.’’ केशव परत त्याच्या कामाकडे वळला.
सकाळपर्यंत यंत्र चाचणीसाठी तयार झाले. त्यामधून शाळेच्या वर्गात नोंदविलेली सामुदायिक भीतीची लहर प्रक्षेपित करावयाचे ठरले. केशवचे म्हणणे होते की तो प्रथम यंत्रासमोर उभा राहील आणि सागरने यंत्राची कळ दाबावी. तर सागरचा आग्रह होता की पहिला प्रयोग त्याच्यावर करावा. प्रक्षेपणातून मनात कोणत्या भावना निर्माण होतात हे त्याला अनुभवायचे होते. शेवटी वाटाघाटीनंतर असे ठरले की जर हे यंत्र एकाच वेळी दोघांवर परिणाम करू शकत आहे तर दोघांनीही एकदमच यंत्रासमोर उभे राहावे. ठरल्याप्रमाणे दोघेही यंत्रासमोर चार फुटांच्या आत उभे राहिले. केशवने रिमोटच्या साहाय्याने यंत्र सुरू केले. यंत्रातून मधमाश्यांच्या गुंजारवासारखा आवाज येऊ लागला. दोघांनाही जाणवले की त्याच्या अंगावर विद्युतकणांचा मारा होत आहे आणि क्षणार्धात दोघांच्याही मनात प्रचंड भीती निर्माण झाली. अंग थरथर कापू लागले. तोंडाला कोरड पडली. दोघांनाही घाम फुटला. केशवने चटकन यंत्र बंद केले. अतिशय कठीण अशी प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर मुले घाबरली होती ती भीतीची भावना त्यांनी अनुभवली. प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला होता. भावनांचे प्रक्षेपण होऊ शकले. त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले.
खिडकीजवळच बाहेर एक इसम विमनस्क आणि घाबरलेल्या मन:स्थितीत उभा असलेला दिसला. मी ग्राहक यंत्रावर याच्या भावनांची व विचारांची नोंद घेण्याचा प्रयत्न करतो, असे सांगत केशवने यंत्र खिडकीजवळ आणले आणि पहिल्या प्रयत्नातच यंत्रावर काही नोंद झाल्याचे दिसले. आता यंत्रावर त्या खिडकीबाहेर उभा असलेल्या माणसाची भावना तसेच त्याच्या मनातले विचार नोंद झाले होते. प्रक्षेपण यंत्र कसे काम करीत आहे हे बघायचे होते.
‘‘त्या माणसाच्या मनात या वेळी कोणती भावना असेल आणि तो काय विचार करत असेल?’’ केशवला प्रश्न पडला होता.
‘‘त्याच्या एकंदर अवतारावरून तो आनंदी किंवा मजेत असल्याचे वाटत नव्हते.’’ सागरने त्याचा अंदाज सांगितला.
‘‘काही असो, जर माझे यंत्र मनातले विचारसुद्धा नोंदवू शकत असेल तर प्रक्षेपण यंत्र ते विचारही प्रक्षेपित करू शकेल आणि तेच विचार आपल्याही मनात येतील. निदान मी तसे यंत्र बनविण्याचा प्रयत्न केला आहे. आता माझा प्रयत्न कितपत यशस्वी झालेला आहे हे प्रत्यक्ष प्रयोग केल्यानंतरच कळेल. मात्र त्यासाठी यंत्र सुरू करून त्याच्यासमोर उभे राहायला पाहिजे.’’
पुन: दोघेही यंत्रासमोर चार फुटांच्या आत उभे राहिले. यंत्र सुरू केले.
(दुसऱ्या दिवशीच्या स्थानिक वर्तमानपत्रातील दोन बातम्या.)
पहिली बातमी
प्रतिनिधी, मुंबई, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. सागर आणि संशोधक डॉ. केशव यांची मैत्री सर्वपरिचित आहे. काल सकाळी हे दोघेही डॉ. सागर यांच्या निवासस्थानी मृत अवस्थेमध्ये आढळले. वैद्यकीय दाखल्याप्रमाणे या दोघांनीही आत्महत्या केलेली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी काहीही लिहून ठेवलेले सापडले नाही. पोलिसांना डॉ. सागर यांच्या निवासस्थानी काही अपरिचित अशी यंत्रे सापडली. परंतु या यंत्रांचा विद्युतप्रवाह दोघांच्या मृत्यूनंतर बराच काळ चालू राहिल्यामुळे ही यंत्रे जळलेल्या अवस्थेत आहेत. पोलीस तपास चालू आहे.

(दुसरी बातमी)
मुंबई, काल सकाळी गंगाधर धोके नावाच्या इसमाने धावत्या ट्रकसमोर उडी मारून आत्महत्या केली. सदर इसमाने दीर्घकाळाचा आजार व बेकारी यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे कळते. सदर घटना डॉ. सागर यांच्या निवासस्थानासमोरच घडली. योगायोगाची गोष्ट अशी डॉ. सागर व डॉ. केशव यांच्या गूढ आत्महत्या त्याच सुमारास झालेल्या आहेत. पोलीस तपास चालू आहे.
रवींद्र पावसकर