अपेक्षा नसताना मिळालेल्या कशाचाही आनंद वेगळाच असतो. मग ते यश असो, भेटवस्तू असो, पैसा असो वा आणखी काही. तो आनंद आयुष्यभर साथ देतो. म्हणूनच तुम्हीसुद्धा आठवा तुमच्या आयुष्यातल्या अशा अचानक घडलेल्या गोष्टी..!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परवाच पेपरमधले शब्दकोडे सोडवत बसले होते. मध्येच ‘अचानक’ शब्द आला. कोडे भरून झाले. पण अचानक शब्द पाठ सोडीत नव्हता. त्या शब्दाने डोक्यात घर केले. अकस्मात ध्यानीमनी नसताना एखादी गोष्ट घडते आणि आपण म्हणतो अचानकच असे घडले. आपल्या रोजच्या जीवनातही चांगल्या-वाईट अशा अनेक गोष्टी अचानकपणे घडत असतात.
काही अचानक गोष्टी मनाचे स्वास्थ्य हरवून बसतात, तर एखादी अचानक घडलेली गोष्ट मनाला परम आनंद देऊन जाते. कधी एखादी दु:खद घटना कानावर येते आणि दु:खाच्या खाईत लोटून दिले जाते. अर्थात अशा सुखदु:खाच्या गोष्टी म्हणजेच आपले जीवन.
सर्वसामान्य जीवन आखीव-रेखीव असते. प्रत्येक गोष्ट ठरवून, योजना आखून केली जाते. कारण प्रत्येक वेळेस पैसा आणि वेळेचा प्रश्न असतो. अशा माणसांच्या आयुष्यात अचानक घडणारी दु:खद घटना म्हणजे जवळच्या आप्ताचा अचानक मृत्यू. कधी अचानक घरावर एखादे संकट येते. चोरी होऊन मोठे नुकसान होते, कधी ध्यानीमनी नसताना एखादा प्रचंड खर्च उभा राहतो. तर कधी मुलांना अपेक्षेपेक्षा घवघवीत यश मिळते. तर कधी घेतलेल्या कष्टाचे चीज होऊन ऑफिसमध्ये प्रमोशन मिळते. अशा छोटय़ा-मोठय़ा आनंद देणाऱ्या घटना घडतच असतात. एखाद्या दिवशी भलत्याच वेळी दारावरची बेल वाजते. दार उघडू जावे तर दारात जिला भेटायला आपले मन उत्सुक असते अशी अगदी जिवाभावाची व्यक्ती उभी असते. विस्मयाने, आनंदाने आपला चेहरा प्रफुल्लित होतो आणि ‘‘अरे.. तुम्ही? या ना..’ असे म्हणून आपण त्या व्यक्तीचे स्वागत करतो. रस्त्यात कधीतरी एखादी बालमैत्रीण खूप वर्षांनी भेटते. गप्पा मारता मारता शालेय जीवन नजरेपुढे येते. एवढय़ा वर्षांच्या गप्पा मारताना तास- दोन तास कसे निघून जातात समजतही नाही. अचानक भेटलेल्या मैत्रिणीकडून पुन्हा भेटण्याचे वचन घेऊनच गप्पा संपविल्या जातात. कधी एखादी व्यक्ती आठवणीने आवडता पदार्थ घेऊन येते. आयुष्यातल्या खास दिवसाची आठवण ठेवून एखादी व्यक्ती आवर्जून फोन करते. अशा छोटय़ा छोटय़ा पण नकळत, ध्यानीमनी नसताना घडलेल्या गोष्टी आनंद देऊन जातात.
बसल्या बसल्या मी माझ्या आयुष्यात अचानक आनंद देणाऱ्या घटना आठवू लागले. पण फारसे काही आठवेना. नाही म्हणायला अपघातात वहिनीचे झालेले निधन ही घटना धक्कादायक होती. सेवानिवृत्ती घेतल्यानंतरही कितीतरी वर्षांनी माझा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यासाठी माझी व्यवसाय मैत्रीण साडी आणि नारळाच्या वडय़ा घेऊन आली तो दिवस कधीही न विसरण्याजोगाच होता. नाही म्हणायला मुले आपापल्या संसारात रमल्यावर वेळ जाण्यासाठी लेखन करू लागले. पाठविलेला लेख छापून आला नाही की निराश होते. मग कधीतरी अचानक लेख छापून येतो. कोणीतरी जवळची व्यक्ती फोन करून कौतुक करते. मग आनंद होतो. कधी कुरिअरने एखादे पत्र येते आणि लेखाला बक्षीस मिळाल्याचे कळते. एकदा असेच एक पत्र कुरिअरने आले. मला नवल वाटले. पण पत्रासोबत एक पुस्तकही होते. या पुस्तकात लेख छापल्याचा उल्लेख पत्रात होता. पुस्तक पाहिल्यावर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.
आता मनात असाही विचार येतो की, आपण असा अचानक आनंद कोणाला देऊ शकतो का? मग वाटते अरेच्चा हे तर कितीतरी सोप्पे आहे. पत्र लिहिणे हा प्रकार आता बाद झाला आहे. पण कोणाला शाबासकी देण्यासाठी, कौतुक करण्यासाठी तर कधी धीर देण्यासाठी पत्र लिहिले तर? किंवा आजकाल एकेकटे राहाणारे वृद्ध खूप आहेत. अचानक जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करू. त्यांच्याशी गप्पा मारू. त्यांच्या नकळत त्यांना आवडणारी भेट वाढदिवसाला देऊ. हॉस्पिटलमध्ये पेशंटजवळ बसायला कोणी नसेल तर बसून घरच्यांचा भार हलका करू आणि वेगळा अनुभव घेऊन त्यांना आनंद देऊ. अपेक्षा नसताना मिळालेल्या कशाचाही आनंद वेगळाच असतो. मग ते यश असो, भेटवस्तू असो, पैसा असो वा आणखी काही. तो आनंद आयुष्यभर साथ देतो.
म्हणूनच तुम्हीसुद्धा आठवा बरं तुमच्या आयुष्यातल्या अशा अचानक घडलेल्या गोष्टी. आणि विचार करा असा अचानक आनंद तुम्ही दुसऱ्यांना कोणत्या पद्धतीने देऊ शकाल..!

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudddenly
First published on: 02-05-2014 at 01:23 IST