कव्हर स्टोरी
आधी सरकारने डान्स बारची संस्कृती विकसित होऊ दिली, एवढंच नाही तर त्यासाठी पोषक वातावरणही निर्माण होऊ दिलं आणि मग अचानक डान्स बारवर बंदी घालण्यात आली.  त्यासाठी कायदा केला, पण तोही पळवाटा ठेवून.. एखादी व्यवस्था सांस्कृतिकदृष्टय़ा चांगली की वाईट हे सरकारला ठरवायचं असेल तर त्याआधी त्या व्यवस्थेत असलेल्या लोकांचं काय करायचं हे पाहणं, ही स्वत:ला कल्याणकारी म्हणवणाऱ्या सरकारची जबाबदारी नव्हती का?
सरकार ही यंत्रणा एखाद्या प्रश्नावर किती गोंधळ घालू शकते, हे डान्स बारच्या प्रश्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  
स्थळ : मुलुंड (पश्चिम) चेक नाका, (अर्थात मुंबईतील कोणताही नाका असला तरी चालेल); वेळ : सायंकाळी ७ ते ८
माणसांची खच्चून गर्दी, रिक्षांची ये-जा, त्यातच चेक नाक्यावर टोलसाठी थांबलेली वाहने, भरीस भर म्हणून जकातीसाठीच्या वाहनांची रांग. त्यामध्येच एक टॅक्सी करकचून ब्रेक लावून थांबते. भराभर विशी-पंचविशीतील चार-पाच तरुणी उतरतात. ड्रायव्हरला रात्री परत येण्याची वेळ सांगत काहीशा पळतच शेजारच्याच हॉटेलच्या बाजूच्या गल्लीत शिरतात. किमान दहा बारा वेळा तरी हाच प्रकार पाहायला मिळतो. आजूबाजूच्या काही हॉटेलसमोरदेखील हेच सुरू असते. सुमारे तासभर तरी हा सारा प्रकार सुरू असतो. ही हॉटेल्सदेखील नेहमीच्या हॉटेलपेक्षा वेगळीच दिसत असतात. नाइट लव्हर्स, मून लाइट अशी नावे निऑन साइनमध्ये झळकत असतात. (बोर्डाच्या कोपऱ्यात कोठे तरी हॉटेलचे खरे नाव छोटय़ाशा अक्षरात लिहिले असते.) हॉटेलचा दरवाजादेखील असाच झगझगीत, आणि काही ठिकाणी तर संपूर्ण दर्शनी भागच रोषणाईने उजळलेला. दरवाजावरील भारी भक्कम दरवानदेखील एकदम सजून धजून.
रस्त्याने येणार जाणारे कुतूहलाने एक कटाक्ष टाकून, तर काहीजण सूचक अशा नजरेने पाहात पुढे जात. तर काहीजण तिरस्कृत नजरेने नाक मुरडत पुढे जाणारे, तर काही आंबटशौकिन टॅक्सीतून उतरणाऱ्या मुलीकडे हावरेपणाने पाहणारे. या साऱ्या गर्दीत कोणाला ही कळणार नाही अशा पद्धतीने या सर्व घडामोडींवर अगदी बारीक लक्ष असणारा हॉटेल मालकाचा तगडा माणूस. घडय़ाळाचा काटा जसा आठवरून पुढे सरकू लागतो तसा इथला माहोल बदलत जात असे. मुलींची वर्दळ बंद होऊन खासगी गाडय़ांची वर्दळ सुरू होई. वजनदार मालदार लोकांची. मध्येच एखादे तरुण टोळकेदेखील येई. कोणाच्या नजरेत कुतूहल तर कोणाच्या नजरेत हावरट भाव तर कोणी अगदी मुरलेला. अर्थात साऱ्यांचे स्वागत दरवाज्यावरील तो भरभक्कम दरवान अदबीने करत असे. दरवाजा उघडला जात असे मात्र समोर आणखीन एक बंद दरवाजा. डाव्या उजव्या अथवा समोरच्या बाजूस साईबाबांचा भला मोठा फोटो. त्यावर तितकाच भला मोठा हार. या दरवाज्यावर आणखीन एक सुटाबुटातला माणूस आणि एक स्वागताचा शेक हँड. बाहेरचा दरवाजा बंद होई आणि आतला दरवाजा उघडला जाई आणि क्षणात कानठळ्या बसवणारा आवाज तुमच्यावर कोसळत असे.

कुतूहल तर सर्वानाच होते. अगदी मुंबई भेटीवर कधीमधी कामानिमित्त आलेलादेखील डान्स बार म्हणजे काय याबद्दल विचारणा करत असे. समाजाच्या सर्वच स्तरावर  मोठया प्रमाणात चíचला गेलेला विषय असावा कदाचित हा.


२००५ मध्ये महाराष्ट्रातील डान्स बार बंद होण्याआधीचे हे नित्याचे दृश्य. सायंकाळची ती त्या मुलींची टॅक्सीची लगबग, तो दरवान, ती गिऱ्हाइकं, ती झगमगती हॉटेल त्या झगमगत्या दुनियेचे अव्याहत सुरू असणारे चक्र, अर्थात हे फक्त बाहेरून दिसणारे. मुंबईच्या अगदी कानाकोपऱ्यात दिसणारे, घडणारे. ड्राय डेच्या मोजक्या दिवसांनाच काय तो शुकशुकाट. सायंकाळी सात वाजता सुरू होणारे हे चक्र थांबायाचे ते रात्री उशिरा, तर कधी कधी थेट पहाटेच. सूर्योदयाला शांत होणारा हा प्रकार सुरू सूर्यास्ताला सुरू व्हायचा तो पुन्हा रात्र जागवण्यासाठीच. मुंबईचे व्यवच्छेदक लक्षणच बनून राहिले होते हे डान्स बार. मुंबई म्हटले की जी रात्रीची रंगीन मुंबई आठवायची. त्यात डान्स बार हा जणू काही अपरिहार्य घटकच.

मग त्या नोटेची तिच्या लेखी जी काही किंमत असेल, त्याप्रमाणे त्याच्या समोर उभी राहणार, नाचणार, नोटा जेवढय़ा जास्त तेवढा नाच जास्त. नाचता येत नसेल तर उगाच शरीर हलवत काही लाडिक चाळे करत गाण्याच्या ओळीवर उगाच हावभाव करत पुढच्या नोटेची सोय करणार.

कुतूहल तर सर्वानाच होते. अगदी मुंबई भेटीवर कधीमधी कामानिमित्त आलेलादेखील डान्स बार म्हणजे काय याबद्दल विचारणा करत असे. समाजाच्या सर्वच स्तरावर  मोठया प्रमाणात चíचला गेलेला विषय असावा कदाचित हा. नेमक्या या मुली येतात कोठून, डान्स बारमध्ये काय चालते, यावर चालणाऱ्या चर्चा तर इतक्या खमंग असायच्या की लोकल ट्रेनमध्येदेखील त्यावर परिसंवाद घडायचे. २००५ साली सरकारने कायद्यात बदल करून महाराष्ट्रातील डान्स बार बंद करून टाकले. डान्स बारबद्दलची खमंग चर्चा काही काळ थंडावली. काही काळ अशासाठी की नुकताच सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा आदेश चुकीचा असल्याचा निवाडा केला आणि पुन्हा एकदा डान्स बारचा विषय समोर आला. पण नेमके हे डान्स बार होते कसे, काय चालत असे त्यामध्ये, कोठून येत असत या मुली, कोण जात होते डान्स बारमध्ये, डान्स बारमुळे कोणाची घरे बरबाद झाली, डान्स बार पुन्हा सुरू होणार का? गेल्या काही दिवसांत अनेकांच्या चर्चेत येणाऱ्या विषयांनिमित्ताने नेमका हा प्रकार होता तरी काय याचा थोडासा मागोवा घ्यावा लागेल.

महिला आणि बार
डान्स बार हे त्यातील पशांचा पाऊस आणि तेथील एकूणच चहलपहल यामुळे प्रसिद्ध झाले. पण महिला आणि बार हे गणित केवळ डान्स बारपुरतेच मर्यादित नव्हते. डान्स बार येण्यापूर्वीच महिला वेटर असणारे अनेक बार मुंबई आणि परिसरात सुरू झाले होते. ठाण्यात तर १९७७ साली सुरूझालेला महिला वेटर बार आजही सुरू आहे. हे बार लेडीज सíव्हस बार म्हणून ओळखले जातात. यामध्ये पुरुषांच्या ऐवजी महिला वेटर असत. यामध्ये मराठी महिलांचे प्रमाण किमान ५०% तरी आहे. पुरुष वेटरची सर्व कामे त्या करीत. त्या बदल्यात ग्राहकाकडून वाढीव दर आकारला जात असे व वाढीव टीपदेखील मिळत असे. त्या ग्राहकाशी गप्पा मारतील, पण त्यापुढे या बारमध्ये फारसे काही घडत नसे. पण काही ठिकाणी हेच बार वेश्याव्यवसायाचे प्रवेशद्वारदेखील बनले आहेत. काही काळाने मात्र या लेडीज सíव्हस बारमध्ये आणखी एका किळसवाण्या प्रकाराने शिरकाव केला, तो म्हणजे फ्री सíव्हस बार. मिट्ट अंधारातील या बारमध्ये महिला वेटरशी चाळे करण्याची मुभा मिळत असे. असे बार तर त्या काळात वाढलेच पण आजही सुरू असल्याची चर्चा आहे. १९८३ मध्ये डान्स बार सुरू झाल्यावर डान्स बारच्या जोडीने सुरू झालेला दुसरा प्रकार म्हणजे पीक अप पॉइंट. डान्स बारच्या नावाखाली सुरू झालेल्या या बारमधून आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या मुलींना बाहेर नेता यायचे. असे अनेक बार निर्माण झाले. आणि हे प्रकार मुख्यत: मुंबईच्या बाहेर ठाणे आणि रायगड जिल्हय़ात खूप मोठय़ा प्रमाणात सुरू झाले होते. तर त्या सर्वावर कडी करणारा प्रकार होता, तो डिस्को बारचा. पनवेल, मीरा रोड भायंदर, घोडबंदर, खोपोली, कल्याण-शीळ फाटा रोड या परिसरात अशा बारचे पेवच फुटले होते. हा प्रकार म्हणजे वेश्याव्यवसायाचे शोभिवंत रूप होते. येथे सरळ सरळ वेश्याव्यवसाय होत असे. (पनवेल परिसरातील एका हॉटेलमध्ये २००३ च्या दरम्यान १००० रुपये घेतले जात असत.) साधारणपणे या बारची रचना ही डान्स बारप्रमाणेच असे. पण येथे नृत्य अभिप्रेत नसल्यामुळे डान्स फ्लोअर अथवा घागरा-चोळी घातलेल्या बारबाला नसत. येथील बारमध्येच लॉजिंगची सोय केलेली असायची. महत्त्वाची बाब म्हणजे लेडीज सíव्हस बार आणि डान्स बार या दोनच प्रकरणांना राज्य सरकारकडून परवानगी होती, पण त्याच्या आड अशा बारच्या अनेक प्रकारांनी त्यांची एक वेगळीच व्यवस्था उभी केली. महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतांश बारना अशा प्रकारच्या व्यवस्थेबद्दल कोणताही परवाना नसायचा. म्हणजेच हे बार सरळ सरळ अनधिकृत होते.


झगमगत्या दुनियेच्या अंतरंगात

सुरुवातीस वर्णन केल्याप्रमाणे त्या झगमगत्या हॉटेलमध्ये म्हणजेच डान्स बारमध्ये प्रवेश केल्यावर तुमचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटून जायचा, किंबहुना आतमधला आवाज आणि वातावरणात तुमचा तुमच्याशी देखील संपर्क तुटतो की काय अशी परिस्थिती असायची. दुसऱ्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर समोर असायचा तो एक मोठा हॉल. ज्याच्या मधोमध साधारण अर्धा फूट उंचीचा आणि सात आठ फूट लांबी रुंदीचा चौथरा असायचा (याला डान्स बारच्या भाषेत फ्लोअर अथवा स्टेज म्हटले जायचे). अर्थात हेदेखील त्या साऱ्या वातावरणाला साजेसे रंगीबेरंगी. कोठे कोठे तर त्यामध्ये देखील रोषणाई केली जायची. त्याच्या चहूबाजूंनी बठक व्यवस्था, दाटीवाटीने दोन किंवा तीन रांगेत. छोटी छोटी आडवी टेबले. सगळीकडे मद्याचे प्याले भरलेले. सर्व हॉलमध्ये इतका प्रकाश असायचा, की त्यावर १०-१५ घरे तरी उजळू शकतील. आतील सर्व पिलरदेखील रोषणाईने झगमगीत. सगळे वातावरण एकदम झगमगाट. काही क्षण तरी तुम्हाला त्या आवाजात नेमके काय चालू आहे हेच कळू नये. पहिल्या फटक्यात तुमचा ताबा घेणारे वातावरण. आणि या संपूर्ण वातावरणात वेगळा रंग भरणाऱ्या मधल्या फ्लोअरवर उभ्या असणाऱ्या दहा-पंधरा तरी बार बाला. तंग घागरा चोळी, शक्य तेवढे मादक हावभाव, भरपूर मेकअप, केस मोकळे सोडलेले आणि हातात नोटांची चळत.

गब्बर माणूस ज्या मुलीवर पसे उधळत असे तिच्यावरच डमीदेखील पसे उधळत राही. गब्बर ग्राहक ईर्षेपोटी आणखीन पसे उडवत राही. डमीकडचे पसे काही संपत नसत आणि गब्बर मात्र कंगाल होत असे.

नोटांचा पाऊस
कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात गाणी सुरू असायची आणि जोडीला मद्याचा प्याला व बारबालांचा नाच. एखादा रंगात आलेला गडी टेबलावर (बारच्या काउंटरवरून सुट्टे करून घेतलेल्या) दहाच्या नोटांची चळत ठेवायचा. हळूच एखादी नोट काढून त्याला हव्या असणाऱ्या बारबालेला इशारा करायचा मग तीदेखील शक्य तेवढे लटके झटके घेत त्याच्याकडे येणार. मग त्या नोटेची तिच्या लेखी जी काही किंमत असेल, त्याप्रमाणे त्याच्या समोर उभी राहणार, नाचणार, नोटा जेवढय़ा जास्त तेवढा नाच जास्त. नाचता येत नसेल तर उगाच शरीर हलवत काही लाडिक चाळे करत गाण्याच्या ओळीवर उगाच हावभाव करत पुढच्या नोटेची सोय करणार. असामी अतीच रंगेल आणि मालदार असेल तर मात्र हाच खेळ किती वेळ चालेल याचा काहीच नेम नाही. पशाचा अगदीच माज असेल तर मग त्या बारबालेवर नोटांची बरसात होणार. डाव्या हातात नोटांची चळत ठेवून उजव्या हाताच्या तर्जनीने नोटांचा जणू पाऊसच पाडला जायचा (ही डान्स बारची खूण म्हणून मुंबईकरांमध्ये एकदम फेमस झाली होती आणि पुढे चांदणी बार चित्रपटातून साऱ्या देशभर पोहचली). मग नोटा कोणाच्या पायाखाली गेल्या तरी कोणाला कसली फिकीर नसायची. आजूबाजूचे सारे वेटर पटापट सर्व नोटा गोळा करून त्या मुलीच्या हातात देणार. नोटा हातात मावेनाशा झाल्या की मग बाजूच्या िभतीवर अथवा खांबावरील आपापल्या नंबरच्या लॉकरमध्ये ढकलायच्या (काही बारमध्ये तर हे बॉक्स जागे अभावी चक्क डान्स फ्लोअरच्या खालीच असायचे.). पुन्हा हात रिकामा. तोच ग्राहक अजून जोशात असेल तर त्याच्याकडे कटाक्ष, नसेल तर पुन्हा दुसरे गिऱ्हाइक. अख्खी रात्र हाच प्रकार. बॉक्समधील सर्व पशांचा हिशोब बार बंद झाल्यावर मॅनेजर करणार आणि मग ठरलेल्या प्रमाणानुसार वाटे करणार. येथे आणखीन एक खास गोष्ट मुद्दाम नमूद करायला लागेल. बारमध्ये आलेले एखादे गिऱ्हाइक जर खरेच गब्बर असेल तर त्याला चिथवून त्याच्याकडून आणखीन दौलतजादा कशी करता येईल यासाठी बार मालक खास युक्ती करत. आपलाच एक माणूस बारमालकचे पसे घेऊन डमी ग्राहक बनून या गब्बर माणसाच्या बाजूला बसे. तो गब्बर माणूस ज्या मुलीवर पसे उधळत असे तिच्यावरच हा डमीदेखील पसे उधळत राही. त्यांचे दहा उडवले की हा वीस उडवणार. बरं यामध्ये नुकसान कोणाचे नसायचे. पण गब्बर ग्राहक ईर्षेपोटी आणखीन पसे उडवत राही. डमीकडचे पसे काही संपत नसत आणि गब्बर मात्र कंगाल होत असे.

बारमधील ग्राहक
या बारमध्ये कोण जातं याबद्दल बऱ्याच जणांना कायमच कुतूहल असायचे. येथील ग्राहकांमध्ये साधारण चार प्रकार आढळायचे. कुतूहल म्हणून एकदा तरी डान्स बार पाहावा या भावनेने आलेली व्यक्ती. ती हमखास पूर्वी कधीतरी बारमध्ये जाऊन आलेल्या व्यक्तीच्या मागे लागून जात असे.
मुंबईत फिरण्यासाठी अथवा कामासाठी आलेली व्यक्ती. स्वत:ची कुवत असेल तर स्वत:च्या पशाने आणि नसेल तर काम करून ज्याच्यावर उपकार करणार त्याच्या पशाने.
अधूनमधून मज्जा लुटायला जाणारे ग्राहक. यामध्येदेखील वरीलप्रमाणे दोन प्रकार पडत.
सराईत, ज्यांचे डान्स बार हेच नेहमीचे विरंगुळ्याचे अथवा मौजमस्ती, चन करण्याचे ठिकाण. यात व्यापारी, सरकारी अधिकारी, गुन्हेगार सारेच येतात.
या सवार्र्मध्ये एक महत्त्वाचे सूत्र लक्षात येते ते म्हणजे येथे येणाऱ्या व्यक्तीमध्ये कायमच दोन प्रकार दिसून येत. एक स्वत:च्या पशाने आणि दुसरे, दुसऱ्याच्या पशाने येणारे. हे जे दुसऱ्याच्या पशावर मौजमस्ती करत त्यामध्ये बराच भरणा हा सरकारी अधिकाऱ्यांचा असे. यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील एक अधिकारी आधीच भरपूर काळी माया गोळा करून येथे जात असत पण जवळचे पसे संपले की थेट आपल्या कंत्राटदाराला फोन लावत आणि पसे घेऊन बोलावत. खच्चून काळा पसा गोळा करणारे सरकारी अधिकारी हे डान्स बारचे अगदी खात्रीशीर ग्राहक असायचे.

‘सलाम-ए-इश्क’ सारखी गाणी त्या दोघांमधील संवादाचे साधन बनत आणि मग त्यातून पुन्हा नोटा उधळल्या जात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे कोणतेच गाणे वज्र्य नसायचे. अगदी ‘मी हाय कोळी’पासून, ते ‘एकवीरा आई तू डोंगरावरी’, ‘मुंगळा’ ते अगदी ‘आधा है चंद्रमा’देखील येथे वाजत असे.

बारमधील गाणी
बारमधील गाणी हा कायमच औत्सुक्याचा आणि चच्रेचा विषय बनून राहिली होती. धांगडिधगा असणारी उडत्या चालीतील गाणी ही खरे तर येथील गरज. पण त्याचबरोबर बहुतांश गाण्यामध्ये आणखी एक सूत्र हमखास जाणवायचे, ते म्हणजे संवादाचे. गाण्यामध्ये बारबालेला आणि दौलतजादा करणाऱ्या व्यक्तीला जोडणारे काही ना काही तरी असायचे. अशी गाणी फर्माईश करून वाजवली जायची. ‘सलाम-ए-इश्क’ सारखी गाणी त्या दोघांमधील संवादाचे साधन बनत आणि मग त्यातून पुन्हा नोटा उधळल्या जात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथे कोणतेच गाणे वज्र्य नसायचे. अगदी ‘मी हाय कोळी’पासून, ते ‘एकवीरा आई तू डोंगरावरी’, ‘मुंगळा’ ते अगदी ‘आधा है चंद्रमा’देखील येथे वाजत असे. अर्थात आपल्या आवडीचे गाणे वाजविण्यासाठी प्रत्येक गाण्याला गाणे वाजविणाऱ्याला दहा वीस रुपये टीप द्यावी लागे आणि आपल्या गाण्याचा नंबर येण्याची वाट पाहावी लागे.
त्याकाळी हिंदी चित्रपटांतील काही गाणी डान्स बारमध्ये  जास्तीत जास्त वाजतील अशीच बनवली जात असत, तर काही गाणी तर डान्स बारमुळेच तयार झाली. िहदी चित्रपटातील आयटम साँंग हे त्याचीच तर परिणती आहे. बार बंद होण्यापूर्वी काही काळ अशीदेखील पद्धत आली होती की एखादे चित्रपटातील गाणे आधी काही ठरावीक बारमध्ये वाजवून लोकप्रिय केले जाई आणि मग बाहेर मार्केटमध्ये आणले जाई.

मदिरा आणि नर्तिका
खरे तर हे दोन्ही घटक आपल्याकडे अनंत काळापासून चालत आलेले आहेत. बदल इतकाच आहे की त्या त्या काळानुसार यातील नामाभिधान बदलले असायचे. पूर्वी मदिरा आणि नíतका म्हटले जायचे. आता थेट दारू आणि बारबाला म्हटले जाते इतकेच. त्यामुळे डान्स बार, बारबाला हे काही आज अचानक उद्भवलेले प्रश्न नाही. बारमध्ये जाणारे आणि न जाणारे अशा सर्वाचाच बारबाला हा सदैव कुतूहलाचा विषय राहिला आहे. सर्वानाच उत्सुकता असायची ती या येतात कोठून. यासंदर्भात बारबालांची संस्था चालविणाऱ्या वर्षां काळे सांगतात, ‘‘यातील बहुतांश मुली या मुंबई बाहेरून यायच्या. मुख्यत: उत्तर भारतातून. तेथील नट, बेडिया, डेरेदार, गंधर्व, किताब अशा अनेक घराण्यात नृत्याची, मुजऱ्याची परंपरा होती. त्यातीलच अनेकजणी डान्स बार सुरू होण्यापूर्वीच्या काळात मुंबईत काँग्रेस हाऊस व अशा ठिकाणी मुजरा सादर करायच्या. कालौघात मुजऱ्याला असलेला सरदार उमरावांचा आश्रय संपला, इतर पाश्चात्त्य प्रकारची गाणी, डिस्को सुरू झाले आणि मुजरा बंद झाला. अर्थात अशा प्रकारे नृत्य करून पुरुषांना रिझवणे ही कला असणाऱ्या या मुली मधल्या काळात आखातातदेखील गेल्या. त्याच वेळी मुंबईत सुरू असणाऱ्या ऑर्केस्ट्राबारपेक्षा पुढचे पाऊल उचलले जात होते. त्यांना नवीन काही तरी हवे होतेच. त्याच बरोबर या मुलींनादेखील काही तरी पसे कमवण्याचे नवे साधन याआधीच्या आखातातील फेरीतून सापडले होते. या सर्वाचा मेळ बसला आणि डान्स बार सुरू झाले. मग महाराष्ट्र शासनानेच एका अध्यादेशाद्वारे नृत्य बार असा परवाना दिला आणि या मुली येथे नाचू लागल्या.’’
मुंबईत अशा प्रकारे काम करणाऱ्या मुली तशा कमीच होत्या. पण अशी उत्पन्नाची संधी उपलब्ध झाल्यावर मात्र त्याचा ओघ वाढला. अर्थात आपल्या भागातून त्यांनी आपल्या नात्यातील अनेक जणींना येथे आणले. येथे मात्र एका गोष्टीचा विचार करावा लागेल तो म्हणजे असे मद्यपींच्या घोळक्यात नृत्य करणे हे यांना खरेच प्रिय होते का? की पसे मिळतात म्हणून त्या करत होत्या? त्यांना आणखीन काहीच का करता येत नाही. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत ती त्यांच्या घराण्यात.

मी बारबालांच्या भल्यासाठी लढतेय – गीता शेट्टी
‘‘मला आता कोणाचीच कसली भीती नाही. बरेच दिवस आम्ही काही बोलत नव्हतो. आमची ओळख सांगत नव्हतो, पण मी आता पुढे आले आहे. माझ्या सांगण्यामुळे जर बारबालांच्या आयुष्यात काही फरक पडत असेल तर ते चांगलेच आहे.’’
गीता शेट्टी बोलत होती. तिच्या बोलण्यात एक प्रकारचे शल्य होते. सरकारने डान्स बार बंद केल्यामुळे ते आलेले शल्य होते. गीता पाटील मूळची नागपूरची. ९५ साली ती मुंबईत आली. शिक्षण कमी म्हणून कापडय़ाच्या मिलमध्ये नोकरी पकडली. मिल बंद झाल्यावर एके ठिकाणी खासगी नोकरी धरली, पण तेथे वाईट अनुभव आल्यावर तिने ती नोकरी सोडली. त्यातच काही मत्रिणींच्या माध्यमातून तिची डान्स बारशी ओळख झाली आणि ती फ्लोअरवर आली. सरकारने डान्स बार बंद केले आणि तिच्यासह हजारो जणी उघडय़ावर आल्या. गीता सांगते की आमच्या पकी बऱ्याच जणी कमी शिकलेल्या. त्यामुळे इतर कोणतीच नोकरी मिळण्याचा प्रश्न नव्हता. पण मुळातच बारमध्ये आम्ही सरकारी नियमाप्रमाणे काम करत होतो. आमचं शोषण वगरे होत नव्हते. अगदी आम्ही मुंबई सोडून नागपूरसारख्या दुसऱ्या शहरात जात असू तेव्हादेखील आम्हाला चांगली वागणूक मिळत असे. असे असतानादेखील सरकारने अशा प्रकारचा पवित्रा घेणे तिला पटले नव्हते. त्यामुळेच ती सध्या बारबालांच्या संस्थेचे काम पाहात आहे.
बारबाला सदैव पशाच्या राशीत लोळत असे या समजुतीला ती छेद देते. पशाचा वर्षांव काही रोजच नसायचा. कधी कधी तर एखाद्या मुलीला शे-पाचशे रुपयेदेखील मिळायचे नाही. मग अशा वेळी आमचे बारमालक आम्हाला थोडे फार पसे देत असत. पशांची उधळण दिसायची ती ठरावीक प्रसंगीच. म्हणजे एखाद्या मुलीचा वाढदिवस असेल अथवा आलेल्या ग्राहकाचा वाढदिवस असेल किंवा ३१ डिसेंबर वगरेसारख्या दिवशी जल्लोष असायचा. बाकी ठरावीक मुली सोडल्या तर बाकी मुलींना हजार पाच हजार फार फार तर मिळायचे. अर्थात त्यातून खर्चदेखील बरेच असायचे.
गीताने आजवर आशियाना, मूड अशा बारमध्ये काम केले आहे. आमचे संपर्क आणि तेथील व्यवस्था यावर आम्ही बार बदलायचो असे ती सांगते. ती पुढे सांगते की आमच्याबद्दल अनेक गरसमज समाजात पसरले आहेत. आम्ही रात्री-अपरात्री प्रवास करायचो त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालक हे आमचे ओळखीचे असायचे. किंबहुना आमचा त्यांच्यावर विश्वास असायचा. कारण तोच आम्हाला घरून बारमध्ये आणि बारमधून घरी सुखरूप सोडायचा. दहा वष्रे बारमध्ये काम केल्यावर तेथील आवाजाचा आरोग्यावर काही परिणाम झाला का यावर ती सांगते, की सुरुवातीला त्रास झाला, पण नंतर मात्र त्याची सवय झाली.
गीता पुढे सांगते की, ‘‘डान्स बार बंद झाल्यावर मात्र आम्हाला नेमके काय करायचे तेच कळत नव्हते. आमच्यापकी पारंपरिक घराण्यातून आलेल्या ज्या मुली होत्या त्यांना तर नाचण्याशिवाय दुसरे काहीच येत नव्हते. सुरुवातीस आम्ही मग लेडीज सíव्हस बारमध्ये वेटरचे काम करू लागलो. पण तेथेदेखील पोलिसांचा त्रास होत आहे. त्यामुळे सध्या दिवसाच्या खर्चाची तोंडमिळवणी करावी लागतेय. मधल्या काळात मी जमलेल्या पशातून दुकानदेखील सुरू केले, पण त्यात पण नुकसान झाले. बाकी शिक्षण फारसे काही नसल्यामुळे इतर नोकरीदेखील मिळणे कठीण आहे. माझ्या मुलाला मी चांगल्या शाळेत पाठवले होते. मुंबई बाहेर हॉस्टेलमध्ये राहत होता, पण आता परत इकडे आणले आहे. आमच्यापकी काही मुलींची लग्नेदेखील झाली होती. त्यांच्या मुलांना त्यांनी पाचगणी वगरे ठिकाणी शाळेत घातले होते. बार बंद झाल्यानंतर त्यांना परत आणण्यावाचून पर्याय राहिला नाही.’’
२००४ पासून गीता शेट्टी ही वर्षां काळेंनी सुरू केलेल्या बारबालांच्या संस्थेचे काम पाहत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काही तरी सकारात्मक घडेल अशी अपेक्षा तिला आहे.

एके काळी बारबाला असणारी आणि नंतर बारबालांच्या संघटनेचे काम करणारी गीता शेट्टी सांगते, की ‘‘पारंपरिक पद्धतीने वाढवल्या गेलेल्या या मुलींच्या घराण्यात नृत्य हा अविभाज्य घटक आहे. मुजरा परंपरेत त्या वाढल्या होत्या. इतकेच नाही तर मुलींनी कमवायचे आणि घर चालवायचे हीच पद्धत असे. अगदी वयाच्या पन्नाशीतदेखील असेच चालायचे.’’ थोडक्यात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान काही प्रमाणात गुजरात व कोलकाता अशा ठिकाणांहून या मुली येथे आल्या. त्यांना नाचण्याचे प्रशिक्षण घरीच मिळत असे. हे सारे बारमालकांच्या पथ्यावर पडले आणि सरकारच्या कृपेने खिरापत वाटल्यासारखे परवाने मिळू लागल्यावर या बारबालांचा ऊर्फ नíतकांचा ओघदेखील वाढत गेला. बारमालक आणि एका बारबालेच्या मते यातील मराठी मुलींची संख्या मात्र २०-२५% पर्यंतच मर्यादित होती. दुसरे म्हणजे यातील झाडून साऱ्या एक तर अर्धशिक्षित अथवा शाळेतदेखील न गेलेल्या होत्या.
बारबाला जशा येथे आल्या तशा त्यांनी आपल्या कुटुंबीयांनादेखील येथे आणले. चांगल्या उत्पन्नाची हमी मिळत असल्यामुळे अनेक बारबालांच्या कुटुंबाची सारी जबाबदारी त्यांच्यावर आली असायची. वर्षां काळे सांगतात की, अनेक विवाहित मुलींनी आपली मुले चांगल्या इंग्रजी शाळेत दाखल केली होती. मुंबईत आल्यावर बऱ्याच जणी नेहरूनगर, वरळी, सायन कोळीवाडा, चेंबूर, अँटॉप हिल अशा परिसरांत राहत.  तर काही जणी जशी जागा मिळेल तशा थेट अंबरनाथ विरापर्यंतदेखील जात.

बहुतांश या सर्व साधारण गटात मोडणाऱ्या असायच्या. ज्या मोजक्या होत्या त्यांच्याकडेच पाहून सर्वानाच असे वाटते की साऱ्याच बारबाला एका रात्रीत लाखो रुपये कमावत असत, पण खरे तर असे चित्र अजिबात नव्हते.

बारबालांचे  उत्पन्न आणि खर्च
खरे तर याबाबत काही प्रमाणात तरी गरसमज आहेत असेच म्हणावे लागेल. कारण असे आहे की, सगळ्याच बारबाला या नृत्यनिपुण अथवा सौंदर्यवती नसायच्या. त्यामुळे सर्वावर दौलतजादा केली जायची नाही. वर्षां काळे याबाबत अधिक माहिती देताना सांगतात की, ‘‘जे आजवर आपण ऐकले तशा करोडपती बाला या अगदी मोजक्याच होत्या. पण उर्वरित बहुतांश या सर्वसाधारण गटात मोडणाऱ्या असायच्या. ज्या मोजक्या होत्या त्यांच्याकडेच पाहून सर्वानाच असे वाटते की साऱ्याच बारबाला एका रात्रीत लाखो रुपये कमावत असत. पण खरे तर असे चित्र अजिबात नव्हते. दुसरे असे की या मुलींना त्यांचे संसार सांभाळणे देखील भाग होते. त्यांच्या जीवावर अनेक जणांचे पोट अवलंबून असायचे. त्याच बरोबर महत्त्वाचा भाग म्हणजे पसे कमावण्याचा काळ हा अगदीच थोडा म्हणजे जेमतेम दहा वर्षांचा होता. तेवढया काळात अनेकींना आपल्या आयुष्यभराची कमाई करणे गरजेचे होते.’’ वर्षां काळे या मुद्दय़ावर भर देताना सांगतात की नेमके हेच अनेक जणांकडून दुर्लक्षिले जाते. हे सारे करत असताना या बारबालांना स्वत:ची काळजी घेणेदेखील गरजेचे होते. तसेच बारमध्ये स्वत:ला सादर करण्यासाठी जो काही खर्च असायचा तो त्यांनाच करायला लागायचा. नुसता मेकअपचा जरी खर्च विचारात घेतला तरी २००३ मध्ये दिवसाला किमान १५० ते ५०० रुपयांपर्यंत असायचा. त्याचबरोबर त्यांचे खर्चीक कपडे. हे घागरा-चोळी शिवणारे खास िशपी असायचे. ग्रँट रोड परिसरात असे अनेक टेलर होते. कपडय़ाची किंमत आठ हजारांपासून ते अगदी २५-३० हजारांपर्यंत जात असे. भरपूर कमाई करणाऱ्या बारबालांपकी काही तर अगदी खास दुबईहून त्यांचे कपडे शिवून घेत. त्याची किमत तर ५० हजारांपर्यंत देखील जात असे.’’ अर्थात हा सारा त्या रचनेचा एक अपरिहार्य भाग होता. जशी समोरून मागणी होती तसे येथे केले जात होते हेच यातून दिसून येते. हे सारे मिळणारे पसे हे काही पूर्णपणे बारबालेला मिळत नसत. तिच्या कुवतीनुसार बारमालक एक सौदा करत असे. हा सौदा कधी ५०:५० पासून ते ९०:१० पर्यंत होत असे. म्हणजे मिळालेल्या पशातून ९० टक्के मुलीचे १० टक्के बारमालकाचे. जसा बारबालेचा भाव वधारत असे त्या प्रमाणे मालकाचा हिस्सा कमी होत असे.
तर असे हे बारबालांचे डान्स बार २००५ साली बंद झाले..

डान्स बार सुरू करण्याची प्रक्रिया
डान्स बार सुरू करण्यासाठी मुळात अशा व्यक्तीकडे हॉटेलचे आणि दारू विक्री करण्याचे परवाने असणे गरजेचे असायचे. अशा बारना महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढून नृत्य बार परवाना देण्याची पद्धत सुरू केली. करमणूक कर, सादरीकरण कर, स्थानिक पोलीस ठाण्याचा कर असे अनेक कर त्यांना भरावे लागत. डान्स बार बंद झाले तेव्हा खालील पद्धतीची कर प्रणाली अस्तित्वात होती.
रु. ६,००,०००/- करमणूक कर प्रति वर्ष प्रति फ्लोअर
रु. १,८५,०००/- स्थानिक पोलीस ठाणे (एसीपी) प्रति वर्ष प्रति फ्लोअर
रु. १५,०००/- पीपीएल सादरीकरण कर प्रति फ्लोअर
प्रत्येक डान्स बारमध्ये किमान दोन ते तीन फ्लोअर असायचे. याचाच अर्थ प्रत्येक महिन्याला किमान दोन ते तीन लाख कर भरावा लागत असे. यात सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे एका बारमध्ये किती मुली नृत्य करतात आणि त्यातून किती पसे मिळतात, याचा मेळ घातला गेला नव्हता. परिणामी, बारमध्ये नाचणाऱ्या मुलींच्या पशातून बारमालक जी २० ते ४० टक्केरक्कम घेत असत, त्याचा हिशोब कोठे आला? अर्थातच हे सारे पसे काळा पसा म्हणूनच जमा होत असत. बारमालकांच्या मते ते ही रक्कम त्यांची टीप म्हणून जमा करत व त्यावर आयकर भरत असत. पण एकंदरीतच या व्यवसायातील व्यवस्था पाहिल्यास इतके सरळपणे सारे काही होत असेल असे दिसत नाही. अर्थात हे सारे झाले ते कायदेशीर परवाने काढून सुरू असणाऱ्या बारबद्दल. पण याच वेळी एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जेव्हा डान्स बार बंद झाले, तेव्हा केवळ ३८०च परवाने दिले होते आणि बार बंद झाले ते १२००. याचाच अर्थ तब्बल ८२० बार हे अनधिकृत होते. मग हे बार सुरू ठेवण्यासाठी कोणा-कोणाला किती पसे जात असतील याचा अंदाज लावायला हरकत नाही.

सरकारी गोंधळ
बार बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाने तो रद्दबातल केला. त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली की बार हवेत की नकोत. या प्रश्नाकडे येण्याआधी आपणास नेमके हे बार कसे सुरू झाले हे पाहणे गरजेचे आहे. कारण डान्स बार सुरू होणे आणि बंद होणे या सर्व प्रक्रियेत सरकारी पातळीवरील अतिशय सावळा गोंधळ होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे राज्य शासनाच्या अध्यादेशाचा आधार याला होताच, पण अशा प्रकारे डान्स बार इतका का लोकप्रिय झाला, जेथे ती मुलगी केवळ नाचणार आहे आणि जोपर्यंत तिच्या मनानुसार ती कोणतेही पुढचे पाऊल उचलणार नाही अशी परिस्थिती आहे तेथे हे इतका पसा आला कसा? यासंदर्भात वर्षां काळे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात, ‘‘मुंबईत स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातदेखील मुजरा, क्लब, डिस्को होते. काही काळ तर कॅबरेदेखील होते. कॅबरे तर आर्ट ऑफ अनड्रेसिंग म्हणून ओळखला जात असे. पण एकंदरीत भारतीय पुरुषांची मानसिकता ही अशा प्रकारे नव्हती. त्यांना मद्य प्राशन आणि नृत्य प्रिय होते, पण त्यांना कॅबरे फारसा रुचला नसावा. ज्या पद्धतीने डान्स बार ही संकल्पना लोकप्रिय झाली त्यातून हे  हमखास जाणवते.’’ अर्थात काही अंशी तरी हे लॉजिक पटण्यासारखेच आहे. अगदी मराठी माणसांचा विचार केला तर आपल्याकडील तमाशा प्रकारचा याबाबत विचार करता येऊ शकतो.

आता थोडेसे १९८३ ते २००५ या काळाकडे पाहूया. डान्स बारची सुरुवात जी झाली त्याला कारण जरी बारमालक असले तरी त्याला पूरक अशी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतल्याचे जाणवते. त्याची कारणमीमांसा थोडक्यात अशी की कॅबरे आणि डान्स बारमधल्या काळात काही प्रमाणात ऑर्केस्ट्रा बार तसेच गझल गायनाचे बारदेखील सुरू होते आणि यांमधून मद्य विक्रीचे प्रमाण हमखास वाढते याची खात्री दोघांनाही झाली होती. राज्य शासनाला मद्य विक्रीतील वाढता महसूल हवा होता. आपले धोरणच तसे होते. तर बारमालकांना आपल्या बारमध्ये जास्त गर्दी हवी होती. या दोहोंच्या संकरातून डान्स बारचा जन्म झाला आहे. हा नवीन फंडा इतका सुपर हिट होत गेला की राज्य शासनाने अगदी खिरापत वाटल्यासारखे बारचे परवाने वाटले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे वाटताना परिसरातील शाळा, मंदिरे, हॉस्पिटल या कशाचाही विचार केला नसल्याचे वर्षां काळे नमूद करतात.

कपडय़ाची किंमत आठ हजारांपासून ते अगदी २५-३० हजारांपर्यंत जात असे. भरपूर कमाई करणाऱ्या बारबालांपकी काही तर अगदी खास दुबईहून त्यांचे कपडे शिवून घेत. त्याची किंमत तर ५० हजारांपर्यंत देखील जात असे.

१९८३ मध्ये केवळ हाताच्या बोटावर असणारी ही संख्या १९९५ -२००० च्या आसपास ७००-८०० पर्यंत पोहोचली होती. या सर्व बारच्या अनुषंगाने एक आíथक रचना तयार झाली होती. त्यामध्ये बारबाला बरोबरच, तेथील वेटर, वाहन व्यवस्था, बारबालांचे मेक-अप आणि कपडेपट करणारी मंडळी आणि बारबालांवर अवलंबून असणारे संसार होते. बार बंदचा कायदा लागू झाल्यावर या व्यवस्थेची एका रात्रीत उलथापालथ झाली. आणि आता पुन्हा बार सुरू होणार म्हटल्यावर अनेक आक्षेप आणि चर्चा सुरू झाली. सरकारने बार बंद करताना जी अनेक कारणे दिली होती त्यापकी दोन कारणांची येथे चर्चा करणे प्रस्तुत ठरू शकते.

तेथे जाणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे माहीत असायचे की स्वत:कडे पसे नसतील तर तेथे मला काहीही किंमत नाही. तेथील मद्याचे दर हे नेहमीच्या हॉटेलपेक्षा अनेक पटीने जास्त असत. तुमचे मद्य संपले असेल आणि पसेदेखील नसतील तर तेथे काही तुम्हाला गाणी आवडतात आणि मुलीचा नाच पाहायला आवडतो म्हणून कोणीही बसू देणार नव्हते.

बारमधील लंगिक शोषण
सरकारच्या मते बारमालक आणि बारमधील ग्राहक हे या बारबालांचे लंगिक शोषण करत असतात. याचा प्रतिवाद अनेक प्रकारे केला गेला तर काही उदाहरणे दाखवून याची बाजूदेखील मांडली गेली. खरे तर हे सर्व वादविवाद करण्याआधी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे पुन्हा लक्ष द्यावे लागेल. डान्स बार सुरू झाले ते सरकारी नियमानुसार. मग हे नियम पाळले जात आहेत की नाहीत हे पाहायचे काम कोणाचे होते? सुरू झाल्यापासून २३ वर्षांनंतर काय एकदम सरकारला जाग आली का? बारमधील फ्लोअर किती मोठा असावा, आतमध्ये किती ग्राहक असावेत, बारबाला किती असाव्यात अशा मूलभूत गोष्टींचा अंतर्भाव सरकारी नियमात नव्हता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा बार बंद झाले ते १२०० आणि तेव्हा परवानगी होती ती ३८३ बारनाच. या विरोधाभासाकडे आहार या हॉटेलमालक संघटनेचे कायदेशीर सल्लागार अनिल गायकवाड लक्ष वेधतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सारे बार सुरू असताना सरकारशी संलग्न अनेक घटक हे बारवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत होते, ज्यामध्ये पोलीस, महसूल आणि एक्साइज खात्यांचा समावेश होतो. विरोधाभास असा की यांतील बहुतांश मंडळी या बारमधून राजरोस पाहुणचार झोडत. मग त्यांच्या डोळ्यांवर पट्टय़ा बांधल्या होत्या की त्यांनी पशाच्या पट्टय़ा बांधून घेतल्या होत्या? खरे तर सरकारला नियमच लावायचे असते तर अनेक बेकायदा गोष्टी पूर्वीच बंद झाल्या असत्या. वर उल्लेख केलेला विनापरवाना बारचा मुद्दा यात प्रामुख्याने विचारात घ्यावा लागेल. इतके सारे बार हे काही प्रशासनाच्या कृपाप्रसादाशिवाय आणि राजकीय वरदहस्ताशिवाय सुरू राहणार नाहीत हे शेंबडय़ा मुलालादेखील समजू शकणारे सत्य सरकारला कळले नाही म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरू शकेल. बरे परवानाधारक बारदेखील वेळेची मर्यादा ओलांडून रात्र रात्रभर पहाटेपर्यंत सुरू असत. मग अशा बारचे काय केले जायचे. त्याचबरोबर येथील अंतर्गत व्यवस्थेबाबत सरकारची नियमावली अगदीच तकलादू होती. डान्स फ्लोअर आणि ग्राहकाचे टेबल यात ठरावीक अंतर हवे वगरे स्वरूपातील काही नियम सरकारने केले. पण मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करणारी अशी नियमावली सरकारने कोणाच्या सोयीसाठी केली होती. या सर्वातून बारबालांचे शोषण होते असा सरकारी दावा असेल तर मग वरील सर्व घटकांतून गर कायदा घटना घडतात म्हणून सरकारवरदेखील खटला दाखल करायला हवा होता. दुसरे असे की येथे हे बार सुरू होते ते नृत्य बार परवान्यावर. पण मग डिस्को बार अथवा फ्री सíव्हस बारवर सरकारने काय कारवाई केली? डान्स बारच्या जमान्यात तर हे चालूच होते आणि आता बंदीच्या काळातदेखील सुरू आहेत.
सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे असा युक्तिवाद सरकारने केला होता. याबाबतदेखील सरकारी गोंधळ दिसून येतो. सामाजिक स्वास्थ्याची व्याख्या सरकार नेमके कशी करते हेच मोठे कोडे आहे. कारण डान्स बार हे चार िभतीच्या आत चालत होते. रस्त्यावर नाही. तेथे जाणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे माहीत असायचे की स्वत:कडे पसे नसतील तर तेथे मला काहीही किंमत नाही. तेथील मद्याचे दर हे नेहमीच्या हॉटेलपेक्षा अनेक पटीने जास्त असत. तुमचे मद्य संपले असेल आणि पसेदेखील नसतील तर तेथे काही तुम्हाला गाणी आवडतात आणि मुलीचा नाच पाहायला आवडतो म्हणून कोणीही बसू देणार नव्हते. मग अशा वेळेस ज्याला थोडी जरी सारासारबुद्धी आहे अशी व्यक्ती आपली लायकी बघूनच आत जाईल की नाही? तेथे असणारे मद्य हे काही वैद्यकीय औषध नाही. त्याने शरीरावर अपाय होतो हे जगजाहीर आहे. हे सारे माहीत असून जरी कोणी तेथे जात असेल तर तो दोष बारचा नाही तर त्या व्यक्तीचा आहे. बारबाला समाजाला बिघडवतात, असा आरोप केला गेला. ते जर खरे मानले तर तिथे जाणाऱ्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेचे काय? बारबाला तिचा व्यवसाय म्हणून नाचते आहे, बारमध्ये जाणाऱ्याने तिला पसे दिल्यावर ते सगळे सोडून ती त्याच्याबरोबर आयुष्य काढणार नाही. सरकारने दिलेल्या परवान्यानुसार नृत्य बारमध्ये ती नाचत आहे आणि तिला त्याबद्दल ग्राहकाकडून टीप मिळत आहे. ग्राहकाने किती पसे उडवायचे आणि किती नाही हा सर्वस्वी त्याचा प्रश्न होता. मग तो बारबालेच्या मागे धावत असेल तर तो दोष कोणाचा?
समाजातील एकंदरीत डान्स बारची क्रेझ पाहून बारमालकांनी याचा फायदा घेत पसे उधळण्याची पद्धत सुरू झाली. त्यातून अनिष्ट प्रथा सुरू झाल्या. बार बंद होण्यापूर्वी काही काळ सरकारने अशा प्रकारे पसे उडवण्यावर बंदी घातली. डान्स फ्लोअर आणि ग्राहकातील अंतर ठरवून दिले.
सामाजिक स्वास्थ्याचाच विषय घ्यायचा तर रस्त्यारस्त्यांवर सहज उपलब्ध होणाऱ्या पोनरेग्राफिच्या सीडीचे रॅकेट सरकार तोडू शकले नाही. ठाण्यासारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशन समोर अगदी खुलेआम या सीडी विकल्या जात असताना सरकार काय झोपलेले असते का? त्यामुळेच हा जो डान्स बार बंदीचा तमाशा सरकारने केला त्यामागे सरकारचे कसलेही ठोस धोरण नव्हते. कारण कायदेशीर लढाई करताना सरकारने उगाचच नतिक पोलीसगिरीचा आव आणला आणि तोच सरकारला नडला. इतकेच नाही तर सरकारने डान्स बार बंद करताना जो काही तथाकथित अभ्यास केला तोदेखील गोंधळात टाकणारा होता. महिला आयोगाने जेव्हा बारबालांच्या प्रश्नाचा अभ्यास करताना ज्या दहा बारबालांशी चर्चा केली त्या डान्स बारमध्ये काम करत नसून त्या लेडीज सíव्हस बारमध्ये काम करणाऱ्या वेटर होत्या. मग अशा अभ्यासावर सरकारने निर्णय कसा घेतला असा सवाल वर्षां काळे विचारतात. सरकारने हा निर्णय घेतला पण त्यातील कायदेशीर बाबींची योग्य पूर्तता न करता नतिकतेच आव आणला. हा सगळा सावळागोंधळच होता.

बार हवेत की नकोत
२३ वष्रे सुरू असणारे डान्सबार २००५ साली बंद झाले आणि आता पुन्हा ते सुरू होणार आहेत. सध्या समाजात या विषयावरून अनेक प्रकारची उलटसुलट चर्चा सुरू आहे. डान्स बारमुळे तरुण पिढी बिघडत आहे, सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे अशा प्रकारे आरडाओरड होताना दिसत आहे. पण मुळात या बारमध्ये कोण जाते आणि काय करते हे माहीत नसणारेच अनेक जण याबद्दल आरडाओरड करताना दिसतात. दुसरा मुद्दा वारंवार उठवला जातो तो नतिकतेचा.

सरकारने दिलेल्या परवान्यानुसार नृत्य बारमध्ये ती नाचत आहे आणि तिला त्याबद्दल ग्राहकाकडून टीप मिळत आहे. ग्राहकाने किती पसे उडवायचे आणि किती नाही हा सर्वस्वी त्याचा प्रश्न होता. मग तो बारबालेच्या मागे धावत असेल तर तो दोष कोणाचा?

खटला कसा जिंकला
‘आहार’चे कायदा सल्लागार अनिल गायकवाड आणि बारबाला संघटनेच्या वर्षां काळे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की आम्ही तीन मुद्दय़ांवर याबाबत न्यायालयात आमची बाजू मांडली. सरकारच्या बंदी आदेशात थ्री स्टार हॉटेल्स आणि जिम, क्लब यांना वगळले असून प्रथम दर्जा बारमध्ये नृत्य परवाना देण्यावर बंधने आणली होती. कायद्यासमोर सारे समान असताना असा भेदभाव का हा मुद्दा आम्ही मांडला. तसेच महिलावर्गाच्या कामाची वेळ हा मुद्दादेखील महत्त्वाचा होता. आपल्या देशातदेखील सर्वत्र चोवीस तास कामांमध्ये महिलावर्गाचा समावेश आहे. हॉटेल्स, विमानतळ, कॉल सेंटर अशा ठिकाणीदेखील महिला चोवीस तास कार्यरत आहेत. मग येथेच बंदी का? तिसरा मुद्दा होता तो रोजगाराचा. सरकारी नियमानुसार आम्ही बार सुरू केले होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात या मुली महाराष्ट्रात आल्या होत्या. सरकारच्या एका आदेशामुळे त्यांचा रोजगार काढून घेतला गेला. त्यांची कुटुंबेदेखील येथे आली होती. अशा परिस्थितीत कोणाच्या रोजगाराचा आधार काढून घेताना सरकारला काय अधिकार आहे?
सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा बंदी उठविण्याचा निर्णय कायम ठेवताना आपल्या निर्णयात म्हटले आहे की, हॉटेलांची आणि प्रेक्षकांची गरीब-श्रीमंत वर्गवारी करून नाचावर सरसकट बंदी घालणे घटनाबाह्य़ आहे. सरसकट बंदी घालावी लागणे म्हणजे पोलिस व अन्य यंत्रणांचे अपयश असून अश्लील चाळे, बीभत्स नृत्य व गैरप्रकार रोखण्यासाठी कायद्यात पुरेसे अधिकार आहेत.  स्टेजची उंची, रेलिंग घालणे, गिऱ्हाईकांपासून अंतर, पैसे उधळण्यास मनाई आदी अटी परवाना देताना घालता येतील. डान्स बार हे गुन्हेगारांच्या भेटीगाठीचे अड्डे आणि वेश्याव्यवसायासाठी पिकअप पॉइंट याचा एकही पुरावा सरकारने दिलेला नाही.

या सर्व बाबतीत वर्षां काळे आपली भूमिका मांडताना सांगतात की, ह्लबारबाला एका दिवसात पन्नास हजार मिळवते म्हणून जर हा पोटशूळ असेल किंवा हा चंगळवाद म्हणून हेटाळणी केली जात असेल तर मग दोन कोटी घेउन एखाद्या अभिनेत्रीने चित्रपटात केलेले अंगप्रदर्शन कसे चालते?

मुद्दा पुनर्वसनाचा
२००५ मध्ये डान्स बार बंदी लागू झाल्यावर त्याचे अनेक पडसाद उमटले. त्यावर बारबालांच्या संघटनेने बारबालांनी आता कोठे जायचे, काय करायचे, सरकार त्यांचे पुनर्वसन करणार का असे अनेक प्रश्न उपस्थित केले.
पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बारबाला नेमक्या किती आहेत. कोठे आहेत यांबाबत काहीच नोंद नव्हती. वर्षां काळे यांच्या संस्थेकडे पाच हजार बारबालांच्या नोंदी होत्या. पण पूर्ण संकलन कोणाकडेच नव्हते आणि आजदेखील नाही. त्याचे कारण म्हणजे बारमध्ये नाचणाऱ्या मुली या तेथे कामाला नसत. त्यामुळे बारमालकाकडे इतर पगारी कर्मचाऱ्यांसारखे बारबालांच्या नोकरीचे तपशीलच उपलब्ध नाहीत. बारबाला तेथे यायच्या आणि नाच करायच्या त्यातून जे काही मिळायचे त्याचा हिशोब त्या त्या दिवशीच होऊन जायचा. डान्स बारबंदीमुळे ७५ हजार बारबालांचा रोजगार गेला असे सांगितले जाते तेदेखील कितपत खरे आहे याची खात्री देता येत नाही. कारण डान्स बार बंद झाले तेव्हा जर त्यांची संख्या १२५० होती तर मग इतक्या मोठय़ा प्रमाणात बारबालांना तेथे काम करणे शक्य होते का?  सरकारकडे तर कसलीच आकडेवारी नाही.
पुनर्वसनासंदर्भात वर्षां काळे सांगतात की, ‘‘गेल्या सात वर्षांत सरकारने पुनर्वसनासंदर्भात काही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. या बारबालांचे शिक्षण कमी त्यामुळे त्यांना नेमके काय शिक्षण आणि कसे द्यावे याचा योग्य तोडगाच कधी निघाला नाही. दुसरे म्हणजे आजवर बारबालांनी बक्कळ पसा मिळवला आहे, त्यांना पुनर्वसनाची गरज काय अशी प्रशासनातील अनेकांची मानसिकता आहे. परिणामी आजवर कोणतेच ठोस पुनर्वसन होऊ शकले नाही. मधल्या काळात ज्यांना शक्य होते त्या बारबाला आखाती देशात निघून गेल्या. तर ज्यांना अन्य काही करणे जमत नव्हते आणि बार हाच पर्याय होता त्या ऑर्केस्ट्रा बारमध्ये कामाला जाऊ लागल्या. ज्यांना यातले काहीच जमले नाही त्या वेश्याव्यवसायात ढकलल्या गेल्या तर काहींनी आत्महत्यादेखील केल्या.’’

डान्स बार असावेत की नसावेत, त्यामध्ये जावे की न जावे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण २३ वर्षे सरकारने परवानगी दिलेला एक व्यवसाय सुरू होता. त्याला पूरक असे वातावरण सरकारनेच तयार केले होते. त्यातून एक भली मोठी व्यवस्था उभी राहिली होती. आणि अचानक हे सारे बंद केले.

खर तर डान्स बार असावेत की नसावेत, त्यामध्ये जावे की न जावे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण २३ वर्षे सरकारने परवानगी दिलेला एक व्यवसाय सुरू होता. त्याला पूरक असे वातावरण सरकारनेच तयार केले होते. त्यातून एक भली मोठी व्यवस्था उभी राहिली होती आणि अचानक हे सारे बंद केले. ही बंदी घालताना पुन्हा त्यात कायदेशीर त्रुटी राहिल्या. सरकारने आपणच तयार केलेली व्यवस्था बंद करताना तिच्या भविष्याचा मात्र कसलाच विचार केला नाही. आता सरकार पंचतारांकित हॉटेलसह सर्वच ठिकाणच्या नृत्य बार परवान्यांवर बंदी घालायचा विचार करत आहे. एकीकडे महसुलासाठी दारूचा पूर वाहू द्यायचा आणि दुसरीकडे सांस्कृतिक पोलीसगिरी करत डान्स बार बंद करायचे हा खरं तर दुटप्पीपणा झाला. डान्स बार असावेत की नसावेत, तिथे स्त्रियांनी नाच करावा की करू नये, हे प्रश्न तर बाजूलाच राहिले, त्यासंदर्भातली प्रक्रिया करताना सरकारने जी कसरत केली आहे आणि यापुढच्या काळात त्यासंदर्भात काय करायचं याबद्दल जी मुक्ताफळं उधळली जात आहेत, ती पाहता, ‘कालचा गोंधळ बरा होता..’ असंच म्हणायची वेळ आली आहे.