अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com
कव्हर स्टोरी

अलीकडच्या काळात फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर दिल्यामुळे टिकटॉक या अ‍ॅपचा बराच बोलबाला आहे. खरंतर या अ‍ॅपने जगात एका नव्या संस्कृतीला जन्म दिला आहे. साधारणत २०१० नंतरची परिस्थिती गृहीत धरू. सिनेमा किंवा मालिकांमध्ये चमकणारे सितारे दहीहंडी, गणेश चतुर्थीला सार्वजनिक मंडळात आले की, त्यांना पाहण्यासाठी भलीमोठी गर्दी व्हायची. त्यांच्या जीवनशैलीकडे पाहिल्यानंतर आपण या जगापासून खूप दूर आहोत, असं वाटत राहायचं. त्यांचा भौतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तामझाम पाहून ‘अपने बस की बात नही’, अशाच भावना तरूण वर्गाच्या असायच्या. आपण कधीतरी यांच्यासारखं प्रचंड प्रसिद्ध होऊ, आपलाही भलामोठा चाहतावर्ग असावा, आपणही रुबाबात वावरावं, गाणं म्हणावं, अभिनय करावा, हवी ती फॅशन करावी, हवा तसा धिंगाणा करावा, आपलेही असंख्य फॉलोअर्स असावेत, असं बरंच काही सामान्य युवकाला, खास करून महाविद्यालयीन तरुण वर्गाला वाटायचं. पण, ठराविकच मुलं महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पुढे जात असायची. मात्र, त्यांच्या हातात मोबाईल आला आणि अनेक गोष्टी बदलत गेल्या. याचाच फायदा घेत बिजिंगमधल्या ‘बाईट डान्स’ नावाच्या कंपनीने २०१६ साली ‘टिकटॉक’ नावाचं अ‍ॅप लॉन्च केलं आणि युवा वर्गाच्या सुप्त कलागुणांना प्रचंड वाव मिळाला.

प्रसिद्धी कोणाला आवडत नसते? येथे प्रत्येक जण प्रसिद्धीसाठीच तर धडपडत आहे! हातातल्या स्मार्टफोनने ती सोय करून दिली असेल तर कोणी शांत बसेल का? १५-६० सेकंदाच्या व्हिडीओच्या माध्यमातून कोटय़वधी लोकांपर्यंत पोहोचण्याची मुभा टिकटॉकने मिळवून दिली. आणि मग, केवळ भारतातल्याच नाही तर जगातल्या तरुणांनीच नाही तर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वानी टिकटॉकवर धमाल करण्यास सुरूवात केली. दररोज सोशल मीडियाच्या जगात नवनवीन अ‍ॅप्स येताहेत अन् जाताहेत. मात्र, टिकटॉकचा वेग तुफान आहे. अत्यंत कमी वेळेत टिकटॉकने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवायला सुरूवात केली आहे.

असं काय आहे टिकटॉक अ‍ॅपमध्ये? त्याचा वापर करून मुलं प्रसिद्धी कशी मिळवत आहेत? तर टिकटॉकवर वापरकर्त्यांला हव्या त्या अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे डायलॉग, गाणी घेऊन १५ सेकंदापासून एक मिनिटांपर्यंत मनोरंजक व्हिडीओ तयार करता येतो. अशा व्हिडिओंना स्पेशल इफेक्ट देण्यासाठी टिकटॉकमध्ये अनेक फिचर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये साऊंड, व्हिडीओ स्पीड, फिल्टर्स, टायमर, फ्लिप, फोटो टेम्पलेट असे पर्याय आहेत. वापरकर्त्यांला व्हिडिओच्या पाठीमागे साऊंडचा इफेक्ट द्यायचा असेल तर ‘प्ले-लिस्ट’ दिलेली आहे. त्यात परफेक्ट पेअर, टिकटॉक फुडी, हिंदी साँग, ताजा डायलॉग्ज, फनी, मराठी सॅड, मराठी साँग, मराठी डायलॉग्ज अशा प्रत्येक पर्यायांमध्ये किमान १२-१५ गाणी किंवा डायलॉग्ज वापरण्याची सोय आहे. आणि ट्रेण्ड लक्षात घेऊन ते अपडेटही होत राहतात. याच्या व्यतिरिक्त ‘ऑल’ नावाच्या पर्यायामध्ये एकदम फ्रेश, टिकटॉक हॉट, टिकटॉक रायजिंग, टिकटॉक रिवाईंड, नचले, लव्ह, एकतर्फा प्यार, इंडिया पॉप, रिमेक सेक्शन, असे भरपूर पर्याय वापरकर्त्यांला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वापरकर्त्यांला इफेक्ट्स वापरायचे असतील तर, ट्रेिण्डग, न्यू, वेडिंग, सेल्फी, फनी, फिल्टर, फॅशन, स्पेशल, फेस्टिव्हल, फॉर पेट्स, असे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून वापरकर्ता रेकॉर्डेड व्हिडीओ आणखी आकर्षक करू शकतो. तसेच वापरकर्ता तयार व्हिडीओवरही अ‍ॅडव्हान्स इफेक्ट अप्लाय करू शकतो. त्यामध्ये व्हिज्युअल्स, स्टिकर, ट्रान्सिशन, स्प्लिट, करेक्टर आणि टाईम, असे पर्याय आहेत. टिकटॉकचा वापर मनोरंजन किंवा माहिती मिळविण्यासाठी करायचा असेल तर डिस्कव्हर नावाच्या पर्यायामध्ये सिलेब, फुड, लाईफ टिप्स, लर्निग, बॉलीवुड, ट्रॅव्हल, मोटिव्हेशन, ब्युटी व स्टाईल, गेमिंग, स्पोर्ट्स, टॉलीवुड, कॉलीवुड, असे टॉपिक्स आहेत. त्या माध्यमातून आजचा तरूण वर्ग  फॅशन, व्यवसाय, लाईफस्टाईल, मौज, मजा, मस्ती, गाणी, डान्स, कॉमेडी, अ‍ॅक्टींग करत आहे. या अ‍ॅपमधून व्हिडीओ तयार करणाऱ्या एकेका तरुणाच्या फॉलोअर्सची संख्या हजार किंवा लाखोंमध्ये नाही तर, चक्क कोटींमध्ये (इतके फॉलोअर्स सिनेतारकांदेखील नाहीत) आहे. हे टिकटॉक स्टार नेमके आहेत तरी कोण?

टिकटॉकवरील आकडय़ांचा विचार केला की, ही पाच नावे अव्वल येतात. मात्र, असे बरेच जण आहेत ज्यांनी आपल्या फॉलोअर्सची संख्या एक कोटींपेक्षा जास्त गाठलेली आहे. त्यामध्ये अवनीत कौर ( एक कोटी ७८ लाख), गरिमा चौरसिया (एक कोटी ७३ लाख), लकी डान्सर (एक कोटी ४७ लाख), समीक्षा सूद (एक कोटी ५२ लाख), मंतुल खट्टर (एक कोटी २९ लाख), अशी काही नावे घेता येतील. मराठी अथवा इतर प्रादेशिक भाषांच्या तुलनेने हिंदी भाषिक व्हिडीओ भारतभर पाहिले जातात. कारण, सर्वाना समजणारी भाषा असल्याने व्हिडीओ पाहणाऱ्यांची आणि यांच्या फॉलोअर्सची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला की, मराठीतही काही स्टार टिकटॉकवर आघाडीवर आहे. त्यामध्ये गायत्री, श्वेता सकपाळ, रियांशू हुमणे, विशाल आयरे यांचा समावेश होतो.

टिकटॉक स्टार्स आणि त्यांच्या फॉलोअर्सची संख्या पाहिली की, टिकटॉकच्या व्यापाबद्दल विचार करणं महत्त्वाचं ठरतं. जगभरात टिकटॉकवर सक्रिय असणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर गेलेली आहे. या स्पर्धेत टिकटॉकने पिंटरेस्ट, स्नॅपचॅट, िलक्डइन आणि ट्विटरला मागे टाकलेले आहे. गेल्या सहा वर्षांत इन्स्टाग्रामचा वापरकर्त्यांची संख्या मिळविण्याचा जितका वेग होता त्याहून कितीतरी पटीने जास्त वेग टिकटॉकचा आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या जगात सर्वात जास्त डाऊनलोड केलेल्या अ‍ॅप्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर टिकटॉक अ‍ॅप आहे. १५५ देशांमध्ये टिकटॉक उपलब्ध आहे. इतकंच नाही तर ७५ भाषांमध्ये टिकटॉक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये टिकटॉक वापरकर्त्यांची संख्या ७० टक्के वाढलेली आहे. कंबोडिया, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांतील तरुणांनी टिकटॉकला डोक्यावर घेतलेले होते. त्यांचे विनोदी व्हिडीओ फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल होऊ लागले तेव्हा भारतीयांना टिकटॉक अ‍ॅपबद्दल कुतूहल वाढले. त्याच दरम्यान टिकटॉकने भारतात आगमन केले आणि पाहता पाहता ५.२६ अब्ज लोकांनी टिकटॉक आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. म्हणजेच भारतात ४७ टक्के लोक टिकटॉकचा वापर करतात. इतर देशांच्या तुृलनेत भारतातल्या वापरकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे.

टिकटॉकच्या वापरकर्त्यांची संख्या ४७ टक्के असून यांचा वयोगट १६ ते २४ वर्षांचा आहे. त्यामध्ये ५५.६ टक्के वर्ग हा पुरुष असून ४४.४ टक्के वर्ग हा महिलांचा आहे. टिकटॉकवरील ६८ टक्के वापरकर्ते हे इतरांनी अपलोड केलेले व्हिडीओ पाहतात तर, ५५ टक्के वापरकर्ते स्वत व्हिडीओ तयार करून अपलोड करतात. दिवसभरात सुमारे १० लाख लोक टिकटॉक स्टार्सचे व्हिडीओ पाहतात. वरील आकडेवारी पाहिली की, ब्लॅक अ‍ॅण्ड व्हॉईटच्या जमान्यातून आपण रंगीत जगात वावरतो आहे. तेथे वेगवेगळ्या सोयी तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये सातत्याने आधुनिकतेची आणि अद्ययावततेची भर पडत आहे. गरज आहे ती मानसिकता बदलून बदललेल्या परिस्थितीला स्वीकारण्याची. येणारा काळ हा टिकटॉकसारख्या अ‍ॅप्सचा आहे.

टिकटॉकची दुसरी बाजू

एखाद्या गोष्टीला चांगल्या बाजू असतात, तशाच वाईट बाजूदेखील असतात. त्याला टिकटॉकदेखील अपवाद नाही. टिकटॉकवरील वापरकर्त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागले. त्यातून मनोरंजक गोष्टी होत असल्या तरी सामाजिक स्वास्थ बिघडविण्याच्या घटनादेखील घडताहेत. टिकटॉकवर लाखो फॉलोअर्स असणाऱ्या टिकटॉक स्टार्सना त्याचे फटके बसलेले आहे. उदा, फैजल शेख, हसनैन खान, फैज बलोच, अदनान शेख आणि सधन फारुकी यांनी मागील वर्षी तरबेज अन्सारीच्या प्रकरणी भाष्य केले. त्यामुळे त्यांच्यावर खटला भरला गेला. टिकटॉकने त्यांचे अकाऊंट बंद केले. दक्षिण भारतातील एका तरुणाने केवळ मनोरंजनासाठी मुलीचा अभिनय करत टिकटॉकवर व्हिडीओ तयार केला. मात्र, त्याच्या व्हिडिओची चेष्टा इतक्या मोठय़ा प्रमाणात झाली की, शेवटी त्याने आत्महत्या केली. टिकटॉक व्हिडिओवर प्रसिद्ध असणाऱ्या दिल्लीतील मोहीत नावाच्या तरूणावर भर दिवसा गोळ्या झाडून त्याची हत्या केली गेली. अंकित भारती नावाच्या तरूणाने टिकटॉकवर आपल्या शर्टच्या आतून दोन गावठी पिस्तुले बाहेर काढतानाचा व्हिडीओ तयार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. शेवटी, ‘सलाखों के पिछे’ जाण्याची वेळ त्याच्यावर आली. शिर्डीमध्ये काही महिन्यापूर्वी टिकटॉकवर व्हिडीओ करताना सनी पवारकडून गावठी पिस्तुलाने प्रतिक वाडेकरची हत्या झाली. टिकटॉकसाठी वाट्टेल ते, म्हणून वरील घटना तरूणांकडून कळत-नकळत घडल्या जात आहेत. व्हिडीओ तयार करताना तरूणांकडून नकळत अनेक चुका होत आहेत. जसे की, महामार्गावर व्हिडीओ चित्रित करताना भर रस्त्यात नृत्य करत वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, वाढदिवसाला हातात तलवार घेऊन केक कापणे, हातात कोयते-चाकू-सुरी घेऊन गाण्यांच्या ठेक्यावर नाचणे, चालू गाडीवर व्हिडीओ तयार करणे, अशा गोष्टी तरूण मुले करत आहेत.

टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घालावी, अशी याचिका मध्यंतरी मद्रास उच्च न्यायालयात आली होती. टिकटॉकमुळे अश्लिलतेला प्रोत्साहन मिळते आणि टिकटॉकच्या माध्यमातून मुले- मुली लैिगक शोषणाच्या जाळ्यात फसण्याच्या धोका आहे, असा युक्तिवाद त्यासाठी केला गेला होता.  त्यानुसार मद्रास उच्च न्यायालयाने टिकटॉकवर बंदी घातलेली होती. त्यावेळी बाईट डान्स कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपण नियमांच्या चौकटीतच कंपनी चालवत असल्याचे दाखवून दिले. टिकटॉकद्वारे अश्लिलतेला अजिबात प्रोत्साहन मिळत नाही, असा दावाही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत मद्रास उच्च न्यायालयाला काही दिवसांची मुदत दिली. त्या मुदतीतच निर्णय देण्याचे आदेश दिले. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने ठरलेल्या मुदतीत निर्णय न दिल्याने टिकटॉकवरील बंदी उठविण्यात आली.

रियाज अली ( दोन कोटी ७० लाख)

भारतामध्ये टिकटॉक स्टारमध्ये रियाज अली या १६ वर्षांच्या मुलाच्या फॉलोअर्सची संख्या आजमितीला दोन कोटी ७० लाख  कोटींवर गेलेली आहे. टिकटॉकवर त्याच्या प्रोफाईला लाईक करणाऱ्यांची संख्या एक कोटींपेक्षा अधिक आहे. त्याने आतापर्यंत आपल्या प्रोफाईलवर एक हजार १३० व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये रियाजने विविध हिंदी-इंग्रजी गाण्यांवर लिपसिंक, नृत्ये आणि विनोदी व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. तो टिकटॉकवरचा सर्वात विनोदी कलाकार आणि मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्याचे कपडे आणि हेअर स्टाईल फॉलोअर्सना खूप आवडते. त्याने नुकताच प्रसिद्ध गायिका नेहा कक्करबरोबरदेखील टिकटॉक व्हिडीओ शेअर केला आहे.

निशा गुरागेन (दोन कोटी १७ लाख)

टिकटॉकवर प्रभावी ठरणाऱ्या स्टार्सपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे ती निशा गुरागेन. लिपसिंक आणि अ‍ॅक्टिंगवर जास्त भर देणाऱ्या निशाचे टिकटॉक व्हिडीओ इतर सोशल साईट्सवरदेखील मोठय़ा प्रमाणात व्हायरल होताता. निशाच्या फॉलोअर्सची संख्या दोन कोटी १७ लाख आहे. तर तिच्या प्रोफाईल लाईक्सची संख्या पाच कोटी इतकी आहे. तिने एकूण एक हजार ३७८ व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये पंजाबी आणि जुन्या गाण्यांवर तिने जास्त व्हिडीओ केलेले आहेत.

आवेझ दरबार (दोन कोटी सहा लाख)

मूळचा नर्तक असलेला आवेझ यूटय़ूब तसंच इन्स्टाग्राम स्टार म्हणूनही प्रसिद्ध आहे. आवेझ दरबार नावाच्या त्याच्या यूटय़ूब चॅनेलच्या सबस्क्रायबरचा आकडा २० लाखांपर्यंत गेला आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या अ‍ॅपवर आवेझ आपल्या नृत्याचे व्हिडीओ अपलोड करतो. आणि आता टिकटॉकवर नृत्याबरोबर लिपसिंग आणि अभिनयाचेही व्हिडीओ अपलोड करतो. आवेझने २२०० व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केलेले आहेत. त्याची स्वतची एक प्रॉडक्शन कंपनी आहे. फॅशन, केसांची स्टाईल आणि नृत्यामुळे त्याला सर्वात जास्त तरुण फॉलोअर्स लाभलेले आहेत. आवेझ दरबारला टिकटॉकवर दोन कोटी सहा लाख लोक फॉलो करतात. आणि सात कोटींपेक्षा जास्त लोकांनी आवेझचे टिकटॉक प्रोफाईल लाईक केलेली आहे.

अरिष्फा खान (दोन कोटी ५० लाख)

अरिष्फा खान ही २०१२ पासून बालकलाकार म्हणून सिनेमात काम करते आहे. तिचे युटय़ूब चॅनेल असून त्यावरून ती फॅशन तसेच ब्युटी टिप्स देत असते. तिच्या यूटय़ूब सबस्क्रायबरची संख्या सुमारे नऊ लाखांवर आहे. सोशल मीडियावरील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरिष्फाने टिकटॉकवरदेखील चांगलीच आघाडी घेतली आहे. टिकटॉकवर तिच्या फॉलोअर्सची संख्या दोन कोटी पाच लाख आहे. तर, तिची प्रोफाईल लाईक्स करणाऱ्यांची सात कोटींपेक्षा जास्त आहे. अरिष्फा खान ही उर्दु शायरी आणि विविध हिंदी गाण्यावर लिपसिंक करते.

अपडेटेड टिकटॉक

टिकटॉक येण्यापूर्वी सोशल मीडियावर यूटय़ूब हा पर्याय होता. त्यावर व्हिडीओ एडिटींग, व्हिडीओ अपलोड करता येत होते. मात्र, त्यासाठी बऱ्याच किचकट गोष्टी कराव्या लागत असत. आजही बऱ्याच लोकांना आपले यूटय़ूब चॅनेल काढता येते, त्यावर शूट करून व्हिडीओ अपलोड करता येतात, हे माहीतच नाही. त्यामुळे यूटय़ूबवरील इतर व्हिडीओ पाहण्याच्या पलिकडे लोक गेलेले नाहीत. नंतर फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप आले. पण, त्यावर व्हिडीओ अपलोड करण्यापलिकडे जाता येत नव्हते. स्नॅपचॅट, हेलो, लाईक, शेअरचॅट, फोर फन, व्हिगो, बिगो लाईव्ह, असे अनेक अ‍ॅप्स सोशल मीडियाच्या विश्वात आले. मात्र, त्यांना टिकटॉक हे अ‍ॅप पुरून उरले. कारण, प्रत्येक अ‍ॅपमध्ये काही मर्यादा होत्या. टिकटॉक प्रत्येकवेळी स्वतला अपडेट करत गेले. त्यामुळे सध्याच्या टिकटॉक अ‍ॅपवर वरील सर्व अ‍ॅप्समधील फिचर्स उपलब्ध झाले. सहाजिकच, इतके फिचर्स असणारे आणि हाताळायलाही सहज सोपे असणारे टिकटॉक तरूणांनी डोक्यावर उचलून धरले. टिकटॉकमधून अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला घरबसल्या व्यक्त व्हायची संधी मिळाली, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले.

जाहिरातीतून कमाई

वस्तूंची खरेदी करताना ग्राहकाच्या मनावर प्रसार माध्यमांतील जाहिरातींचा पगडा असतो.  या जाहिरातींसाठी संबंधित कंपन्यांना भरपूर पैसे मोजावे लागतात. उदा. फेसवॉशची जाहिरात करायची असल्यास एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याला कोटय़वधी रुपये द्यावे लागतात. त्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये ती जाहिरात प्रसारित करण्यासाठी पुन्हा लाखो रुपये मोजावे लागतात. आता विविध कंपन्या जाहिरातीसाठी सोशल मीडियासारखा पर्याय जवळ करत आहेत. त्यामुळे बाजारात आलेल्या नवनव्या अ‍ॅप्सवर लाखो-करोडो फॉलोअर्स असणाऱ्या तरुणांशी कंपन्या संपर्क साधून त्यांच्याकरवी प्रॉडक्टची किंवा ब्रॅण्डची जाहिरात करतात. त्यातून टिकटॉकवरील स्टार्सना पैसा मिळतो. कपडे, शूज, गॉगल, बॅग, पुस्तके, जेवण, हॉटेल, सहल, प्रवास, अशा लाईफ स्टाईलशी संबंधित असणाऱ्या हजारो वस्तूंची जाहिरात करण्यासाठी वेगवेगळ्या ब्रॅण्डेड कंपन्या या सोशल मीडियावरील प्रसिद्ध तरुणांना आपल्या जाहिरातीसाठी जोडून घेत आहेत. अशा संधी तरुणांना उपलब्ध करून देण्यामध्ये टिकटॉकचा मोठा वाटा आहे. टिकटॉकवर प्रभावी असणाऱ्या तरुणांना वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आमंत्रणे मिळतात, त्यातून त्यांना पैसे मिळतात. मात्र, हे सर्व करण्यासाठी टिकटॉकवर चाहता वर्ग मोठय़ा संख्येने तयार करणं महत्त्वाचं ठरतं.

जन्नत जुबेर (दोन कोटी)

जन्नत जुबेर ही २००९ पासून सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत आहे. तिने ‘हिचकी’ या चित्रपटात तसेच ‘फुलवा’ या मालिकेत काम केलेले आहे. मात्र, इतर सिनेतारकांच्या तुलनेत टिकटॉकच्या वापरकर्त्यांमध्ये तिचं नाव आघाडीवर आहे. जन्नत जुबेर ही टिकटॉकवर जास्त करून नृत्य आणि लिपसिंकचे व्हिडीओ अपलोड करते. तिचे फॉलअर्स दोन कोटी दोन लाख इतके आहेत. तर, तिचे प्रोफाईल लाईक करणाऱ्यांची संख्या साडेचार कोटीपेक्षा जास्त आहे.

सेलिब्रिटींचे टिकटॉक

दीपिका पदुकोन, काजोल, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, शिल्पा शेट्टी, रितेश देशमुख, जेनेलिया डिझुजा, राजपाल यादव, नेहा कक्कर अशा अनेक सेलिब्रिटींनी या नवीन वर्षी टिकटॉकवर मौज-मजा-मस्ती-धमाल सुरू केली आहे. टिकटॉकसारखा नवा प्लॅटफॉर्म अजमावत चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रितेश आणि जेनेलियाचं शेतातलं नृत्य, घरातल्या लहानग्यांबरोबर केलेली मस्ती, सेटवरील इतर कलाकारांसोबत धिंगाणा, अशा अनेक व्हिडिओंना प्रेक्षकांनी भरभरून लाइक्स दिलेल्या आहेत. तर, ‘छपाक’च्या निमित्ताने लक्ष्मी आगरवालने वेगवेगळ्या गाण्यांवर लिपसिंग आणि डान्स करत लाखोंचा चाहतावर्ग आपल्याकडे खेचला आहे. तिच्याबरोबर दीपिका पदुकोननेही टिकटॉकवर आपली उपस्थिती नोंदवली आहे. वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य करत दीपिका टिकटॉकवर चाहत्यांना ठेका धरायला भाग पाडत आहे. काजोलनेही ‘तान्हाजी’च्या निमित्ताने टिकटॉक आपलंसं केलं आहे. अनुपम खेर आणि राजपाल यादव यांनी टिकटॉकच्या प्रेक्षकांना हसवण्याचा विडाच उचलला असावा. शिल्पा शेट्टीचे लंडनमधील, सेटवरील किंवा घरातील वेगवेगळे व्हिडीओ लोकांच्या पंसतीस उतरत आहेत.