फेस्टिव्हल्स ऑफ इंडिया
तिबेटियन कॅलेंडरच्या पाचव्या महिन्याच्या नवव्या आणि दहाव्या दिवशी हेमिस गुंफेत गुरू पद्मसंभवा यांच्या जयंतीनिमित्ताने हेमिस फेस्टिव्हल साजरा केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लडाख प्रांतात प्रवेश करताच बौद्ध धर्माच्या खुणा जागोजागी दिसायला सुरुवात होते. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारे स्तूप, प्रेइंग व्हिल्स आणि कमानी हे जणू इथल्या गुंफांचे प्रतिनिधीच असावेत. श्रीनगरहून आल्यास वाटेत लागणारी लामायुरू गुंफा, नंतरची आल्ची गुंफा, खुद्द लेह शहराजवळ असणारी थीकसे गुंफा, तिकडे लडाखमध्ये गुंफा म्हणजे बौद्धांचा मठ. दूरवर असणारी फ्यांग गुंफा, स्पितूक गुंफा, डिस्किट गुंफा, संकर गुंफा, लिकीर गुंफा आणि या सर्वात श्रीमंत आणि भव्य अशी हेमिस गुंफा. खरं तर या गुंफा हे लडाखचं आध्यात्मिक वैभव. लडाखच्या गुणी जनतेचा हा खरा जीवनाधार. यातल्या हेमिस गुंफेच्या मालमत्तेचा पसारा लडाखभर पसरलेला आहे. १६३० साली स्थापन झालेली ही गुंफा त्या वेळच्या सिंग्ये नामग्याल या राजाने तिबेटहून आमंत्रित केलेल्या स्टॅगसंग रास्पा नवांग ग्यात्सो यांनी स्थापन केली आणि राजाने सर्व धार्मिक मालमत्ता त्यांच्या अधीन ठेवली. नंतरच्या काळात अनेक शेतकरी कुटुंबांनी आपल्या मालकीची काही जमीन या गुंफेला दान दिली. अशा प्रकारे ही गुंफा उत्तरोत्तर श्रीमंत होत गेली.
जगभरातील पर्यटक आणि बौद्ध धर्माचे अनुयायी लडाखची संस्कृती आणि साहस अनुभवण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी लडाखला येतात. हा प्रदेश इथल्या उत्सव आणि जत्रांसाठीही प्रसिद्ध आहे. लडाखचा इतिहास आणि सांस्कृतिक वैभव अशा उत्सवांमधून अनुभवता येतं. लेह शहरापासून ४७ कि.मी. अंतरावर सिंधू नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हेमिस ही गुंफा विराजमान झाली आहे. सभोवताली संरक्षक भिंती बांधाव्यात, अशी नैसर्गिक रचना असलेले डोंगर असल्याने ही गुंफा वैशिष्टय़पूर्ण अशी ठरली आहे. गुंफेच्या अगदी जवळ जाईपर्यंत तिथे एवढी मोठी गुंफा आहे याचा थांगपत्ता लागत नाही. लडाखमधली सर्वात विस्तीर्ण अशी ही गुंफा पाहता क्षणी आपण विस्मित होतो. एकूण तीन दालनांत इथल्या मूर्ती आणि प्रार्थना मंडप असून पाहण्यासारखी असून ती प्रसिद्ध आहे. तिबेटियन कॅलेंडरच्या पाचव्या महिन्याच्या नवव्या आणि दहाव्या दिवशी हेमिस गुंफेत गुरू पद्मसंभवा यांच्या जयंतीनिमित्ताने हेमिस फेस्टिव्हल साजरा केला जातो. लडाखच्या उन्हाळ्यात हा उत्सव असल्याने पर्यटकांना इथे उपस्थित व्हायला कोणतीही अडचण येत नाही. या दोन दिवसात या परिसराला जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं. बहुतेक विदेशी पर्यटक आणि अगदी थोडे देशी पर्यटक, सैन्यातले जवान आणि अधिकारी एवढे सोडले तर बाकी सगळे लडाखी लोक या उत्सवात सहभागी झालेले दिसतात. काही माणसं तर शंभर-दोनशे किलोमीटरवरूनही येतात. आपल्याकडे जत्रेत दिसतात तशी अनेक दुकानं असतात. त्यामधून हस्तकला वस्तू, पुरातन वस्तू, अनेक प्रकारचे पदार्थ यांची रेलचेल या दिवसात पाहायला मिळते, पण त्यात उठून दिसतात ती जुन्यापुराण्या वस्तूंची दुकानं, दरवाजाच्या कडय़ा, कुलपं, सोन्या-चांदीचे लडाखी दागिने, प्रार्थनेच्या वेळी वापरायच्या वस्तू, हातातली कडी, रंगीत दगडांचे दागिने.. एक ना हजार वस्तू घेऊन तिथले विक्रेते बसलेले असतात. त्यातल्या सर्वच वस्तू आपलं मन मोहून टाकतात.
सत्प्रवृत्तीचा दुष्ट प्रवृत्तीवर होणाऱ्या विजयाचं प्रतीक म्हणून हेमिस फेस्टिव्हल साजरा केला जातो. रंगीबेरंगी कपडे परिधान केलेले अनेक लोक या मंगलसमयी हेमिस गुंफेत हजर असतात. हेमिस गुंफेचे मुख्य लामा या उत्सवाचं नेतृत्व करतात. गुरू पद्मसंभवानी त्यांच्या अनुयायांना दुष्ट लोकांपासून युद्ध करून वाचवलं त्याची आठवण करून देणारे अनेक प्रसंग या समयी सादर केले जातात. गुंफेत असलेल्या भव्य पटांगणावर मोठमोठे चित्रविचित्र मुखवटे घालून कलाकार लामांचं वाद्यांच्या तालावर नृत्य चालू असतं. ते नाचत असले तरी त्यांच्या हालचाली संथ असतात. लडाखमधले सर्वच नृत्यप्रकार संथ असतात, कारण या प्रदेशाची समुद्रसपाटीपासून असलेली उंची. लडाखच्या विरळ हवेत जोरदार हालचाली केल्या तर त्रास होईल याची जाणीव ठेवून हळुवार हालचाली करून एक एक कथानक उलगडून दाखवलं जातं. वेगवेगळे मुखवटे धारण करून करावयाचे नृत्य प्रकार हे या उत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. या उत्सवाआधी किती तरी दिवस तेथील लामा नृत्याचा सराव करतात. या नृत्यादरम्यान वाजवण्यात येणारं संगीत किती तरी दिवस कानात गुंजत राहतं. ड्रम्स, शिंग, पिपाणी अशी अनेक वाद्यं वाजत असतात आणि त्या तालावर नाचणारे आणि पाहणारे गुंग होऊन जातात.
हेमिस फेस्टिव्हलदरम्यान अख्खं लडाख मुखवटय़ांनी सजलेलं असतं. लेहच्या बाजारात अनेक प्रकारचे मुखवटे पाहायला मिळतात. झाडझाडोऱ्याने केलेली रंगांची उधळण इथे नसली तरी हे मुखवटे आणि कपडे भरून काढण्याचा प्रयत्न करतात. हे रंगच पुन्हा एकदा आयुष्यात उत्साह भरतात.
त्या उत्सवात आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे तिथल्या डहा आणि नू या खेडय़ांमधून आलेले आर्यन्स्. त्या खेडय़ात अजूनही पुरातन आर्य संस्कृतीचे लोक राहतात. हे लोक सहज ओळखता येतात, कारण त्यांच्या डोक्यात सदैव फुलं माळलेली असतात. पुरुषांच्या फेटय़ात आणि बायकांच्या केसात ताजी फुलं आणि त्यावर नाणी चिकटवलेली असतात. हेमिस गुंफेच्या तीन उंच इमारतीच्या एका भागावर थंका सोडला जातो. थंका हा कलाकुसर केलेला पडदा असतो आणि त्यावर विविध चित्रांचं विणकाम किंवा रंगकाम केलेलं असतं. हस्तकलेचा सुंदर नमुना असलेला एवढा मोठा पडदा वर्षांतून या दोन दिवसांतच पाहायला मिळतो. उत्सव संपल्यावर पुन्हा तो गुंडाळून ठेवला जातो. पुरातन कला आणि संस्कृती हे लोक अजूनही टिकवून आहेत.
लडाखचं निसर्गसौंदर्य आणि उत्सव यांचा लाभ एकाच वेळी घ्यायचा असेल तर हेमिस फेस्टिव्हलसारखी वेळ साधलेली बरी. भारताच्या सांस्कृतिक पर्यटनात हेमिस फेस्टिव्हलचा मोलाचा वाटा आहे.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel special
First published on: 08-08-2014 at 01:19 IST