01gauriयुरोप-अमेरिका, सिंगापूर-बँकॉक-पट्टायासारखं वलय म्यानमारला नसेलही, पण म्यानमारमध्ये जे पहायला मिळतं ते इतरत्र कुठंच आढळणार नाही..

विमानाने सकाळी यांगान सोडलं आणि मँडले येथे आलो. मँडलेचे मंडाले झाले तरीही युवा पिढी मँडलेच संबोधते. मँडले हा म्यानमारचा मध्यवर्ती भाग. ही बर्माची एकेकाळची राजधानी. शिवाय आशिया खंडातील सर्वात मोठा पठारी प्रदेश. म्यानमारच्या वरच्या भागामध्ये जंगलं, मधल्या भागात पठारावर नदीनाले व रत्नांच्या खाणी, तर खालच्या भागात नदीकाठी सुपीक शेतजमीन. विमानतळावरून शहरापर्यंतच्या प्रवासात ताडगोळे, अॅलोव्हिरा, अननस, ड्रॅगन फ्रुट, नारळ अशा विभिन्न फळबागा नजरेस पडतात. लोकमान्य टिळक जेथे कारावासात होते ती जागा पाहायची होती, पण त्याबाबत कोणालाच माहिती नव्हती.
मँडले येथे जाताना आपण त्यांच्या अठराव्या शतकातला राजा ब्वाडप्पाच्या राजधानीतून प्रवेश करतो. येथून मँडले हे अवघ्या सात कि.मी. अंतरावर आहे. पुढील शतकात मिंडॉन राजाने राजधानी मँडले येथे हलवली. ताँगथम्मन लेकवर एका तीरावरून पलीकडे गावात जाण्यासाठी दोन कि.मी. लांबीचा सागवानी लाकडाचा उबेन पूल आहे. त्याच्या लांबीवरून या तलावाच्या विस्ताराचा अंदाज येतो. दोनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाचे एक हजार सागवानी खांब अजूनही मजबूत आहेत. वाऱ्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याला मधेमधे लहानशी वळणे ठेवली आहेत. पुरामुळे थोडी पडझड झाल्याने मध्येच १०-१२ सिमेंटचे खांब आहेत. पुलावरून माणसांबरोबरच सायकल, मोटरबाइकची वर्दळ असते. शिवाय काही फेरीवाले, भिक्षुक यांचीदेखील हजेरी आहेच. नदीत होडीतून फेरफटका मारण्याची सोय आहे.
lp07
नदीच्या तीरावर बाराव्या शतकातला पॅगोडा आहे. भूकंप व पुरामुळे त्याची पडझड झाली आहे. जवळच मिंडॉन राजाने बनवलेली अस्सल तांब्याची १०० टन वजनाची घंटा ठेवलेली आहे. इंग्रजांनी ती इंग्लंडला नेण्याचा प्रयत्न केला, पण ती बोटीसह इरावाडी नदीत बुडाली. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिकांनी ती बाहेर काढली व या टेंपल कॉम्प्लेक्समध्ये ठेवली. तीन वेळा घंटा वाजवायची ती जवळ ठेवलेल्या जाडजूड सोटय़ाने. मिंडॉन राजाने आपल्या राणीच्या स्मरणार्थ शिन् बून मेरू हा पर्वताप्रमाणे पॅगोडा बांधला. नेहमीपेक्षा या पॅगोडाची बांधणी वेगळीच आहे. जीवनचक्र पार पडल्यानंतर मोक्ष मिळण्यासाठी प्रत्येकाला समुद्ररूपी सात पायऱ्या चढून मेरू पर्वतावर जावे लागते, असे बौद्ध धर्मात सांगितले आहे. येथे वर बुद्धाच्या प्रतिमेकडे जाताना नागमोडी वळणांचे सात मजले चढून जावे लागते. शेकडो वर्षांपूर्वीचे बांधकाम असल्याने पायऱ्या उंच आहेत. पण वर पोहोचल्यावर नदीचा परिसर, आजूबाजूची हिरवळ छानच दिसते. या पॅगोडाला म्यानमारचा ताजमहाल म्हणतात.
lp08
मिंडॉन राजाने अमरापुरा येथून राजधानी मँडले येथे आणली. तेथे मध्यवर्ती ठिकाणी सभोवार ६० मी. रुंद खंदक ठेवून दोन मजली उंच, दोन कि.मी. लांबीच्या तटबंदीमध्ये प्रशस्त राजवाडा बांधला. १९व्या शतकात मिंग राजवटीतल्या मिंडॉन व थीबो या दोन राजांचे येथे वास्तव्य होते. पुढे इंग्रज काळात सैन्य व रसद ठेवण्यासाठी याचा उपयोग करण्यात आला. मिंडॉन राजाने आपल्या भव्य, विशाल प्रासादातून कुठूनही दिसावी या उद्देशाने बांधलेली मोनेस्ट्री म्हणजे गोल्डन मोनेस्ट्री. ही मोनेस्ट्री तेथील लँडमार्कच आहे. सागवानी लाकडावरील कोरीव काम, आतील सजावट व बुद्धाचा संगमरवरी पुतळा यासाठी ही मोनेस्ट्री प्रसिद्ध lp02आहे. महामुनी पाया, क्युथोडो येथे बौद्ध साहित्याचे ७२९ संगमरवरी पानांचे पुस्तक आहे. प्रत्येक पान वेगळे असून त्यांना स्वतंत्र मंदिर आहे. मुख्य मंदिरात बुद्धाचा १३ फूट उंच ब्राँझचा पुतळा आहे. या ठिकाणी चेहरा सोडून पुतळ्याला सर्वच ठिकाणी सोन्याचं पान लावता येतं. पानं चिकटवून त्याची जाडी १५ सें.मी. एवढी झाली आहे. रोजच पुतळ्याला अभिषेक केला जातो आणि तो स्वच्छ पुसला जातो. त्यामुळे त्याचा चेहरा भलताच चकचकीत झाला आहे व त्यात आजूबाजूच्या सोन्याचे प्रतिबिंब पडून सोनेरीच दिसतो.
तिथून जवळच असलेल्या सेगाय हिल्स येथे केव्ह मॉनेस्ट्रीत बुद्धाचे वेगवेगळे ३१ पुतळे कमानींच्या मंदिरात स्थानापन्न आहेत. पूर्वी येथे गुहा होत्या, ते स्थानिकांचे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस व तेथील दंगलीच्या वेळेस आश्रयस्थान होते. पूर्वी येथे विजेची सोय नव्हती, त्यामुळे आजही लामा क्वचितच दिवा लावतात, एरवी येथे मेणबत्तीचाच वापर होतो. या गावात शंकर, ऐरावत अशी हिंदू देवालयं आहेत. रात्री कमानींमधून दिव्यांचा प्रकाश पाहावयाला छानच वाटते. कित्येक वर्षांपूर्वी आलेले भारतीय तिथले स्थानिक आहेत. इथे भारतीय धाबेदेखील आहेत. सागवानी झाडांची जंगले असल्याने सढळ हाताने वापर झालेला दिसतो. बोटॅनिकल गार्डन कॅफेमध्ये चार बाय बारा फुटांचे, एकाच झाडाच्या खोडापासून बनवलेले डायनिंग टेबल पाहूनच याची कल्पना येते.
मँडले येथून बगान येथे रस्त्याने किंवा इरावडी नदीतून एक्स्प्रेस बोट सव्र्हिसने जाता येते. रस्त्याने जायचे तर दोन ते अडीच दिवस लागतात. त्यामुळे एक्स्प्रेस बोटीचा पर्याय निवडला जातो. आम्ही पहाटे नदीवरून सूर्योदय, नदीच्या पात्रातून सोने काढणारे, तसेच उदरनिर्वाहासाठी मच्छीमारी करणारे कोळी अशी विलोभनीय दृश्ये पाहत संध्याकाळी बगान येथे पोहोचलो. बगान हे ११ ते १३व्या शतकापर्यंत सुवर्णकाळ अनुभवणारे, राजा अनवरथा प्रशासित भरभराटीचे केंद्र होते. त्या काळात ही राजधानी होती. तेथे तेरा हजार पॅगोडे बांधले गेले. त्यातील काही स्तूप, देवालये, मॉनेस्ट्रीज ऑर्डिनेशन इमारती होत्या. त्यामुळे बगान हे ‘लँड ऑफ पॅगोडाज’ म्हणून ओळखले जाते. भूकंपाच्या पट्टय़ात असल्याने बरेच पॅगोडा जमीनदोस्त झाले, आता फक्त हजारभरच आहेत.
lp06
इथे आनंदा व मनुहा टेंपल, धम्मान्जयी, सुलेमनी, तिलोमनी, प्याथाडा या त्या काळातल्या सुंदर इमारती पाहण्यासारख्या आहेत. आनंदा टेंपलची सांगितली जाणारी कथा अशी. १३व्या शतकात राजा किंझाता याने अलौकिक देऊळ बांधण्यासाठी कलाकार बोलावले होते. त्यांच्याकडून हे देऊळ बांधून घेतले व त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्या कलाकारांना मारून टाकले. असे म्हणतात की, ते कलाकार भारतातून गेले होते. त्यामुळे देवळाची बांधणी आपल्याकडील देवळांसारखी आहे. देवळाचा घुमट घंटेच्या आकाराचा नसून ओरिसा, पुरी ठिकाणच्या देवळांसारखा आहे, पण शिखरावर छत्री आहे. आत मध्ये चार दिशांना नऊ मीटर उंचीचे वेगवेगळ्या अवतारांतले बुद्धाचे चार पुतळे आहेत. आम जनतेच्या दर्शनासाठी एक विभाग, राजघराण्यांसाठी एक विभाग व मूर्तीजवळचा भिक्षूंसाठी तिसरा विभाग करण्यात आला आहे. सभोवार कॉरिडॉरमध्ये गौतम बुद्धाचे आयुष्य टेराकोटा दगडांवर कोरलेले आहेत.
बगानमध्ये राजा अनवरथाने मॉन राजा थोतन याला कैदेत ठेवले होते. त्याने देऊळ बांधताना त्याच्या उद्विग्न, त्रासिक अवस्थेचे भाव बुद्धाच्या चेहऱ्यावर चितारले आहेत. प्रवेश केल्याबरोबर आपल्याला भलेमोठे भिक्षापात्र दिसते. त्यात भिक्षा घालण्यासाठी शिडीच्या आठ-दहा पायऱ्या चढाव्या लागतात. आत बुद्धाचे तीन पुतळे आहेत, तर मागील बाजूस या जाचातून सुटका म्हणून उत्तरेकडे डोके ठेवून स्मितहास्य मुद्रेने महानिर्वाणासाठी निघालेली १०० फूट लांबीची आडवी मूर्ती आहे. सुलामनी हे बगानमधील सर्वात मोठे व अजूनही सुस्थितीतले देवालय. इथल्या मूर्ती फार मोठय़ा नाहीत, पण प्रवेशावरील मूर्ती संगमरवरी आहे. प्रशस्त कॉरिडोरमध्ये भिंतीवर चित्रे व लहानमोठय़ा मूर्ती आहेत.
lp03
राजा नरुता याने आपले वडील व भाऊ यांचा वध करून राज्य बळकावले होते. त्याला आनंदापेक्षा सरस धम्मानजयी, देऊळ बनवायचे होते. त्याकरिता त्याने शेजारच्या देशांतून, गावातून मजूर मागवले होते. देऊळ बांधताना त्याची देखरेख असेच. भिंत बांधताना दोन विटांमधून सुईदेखील जाता कामा नये अशी त्याची अट असे. जो मजूर चुकेल त्याला देहदंडाची शिक्षा होती. त्याच्या विक्षिप्तपणामुळे मजुरांनी त्याची हत्या केली व काम अर्धवट सोडून दिले. म्हणून त्याला अनफिनिश्ड पॅगोडा म्हटले जाते. हे काम पूर्ण झाले असते तर ती बगानमधील सर्वोत्कृष्ट कलाकृती असली असती असं म्हटलं जातं. सर्वच देवळांच्या प्रवेशद्वारावर व दर्शनी भिंतींवर माती चुना किंवा टेराकोटा दगड वापरून सुबक कलाकृती कोरण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी अडीच हजार वर्षांपूर्वीचे रंगकाम अजून तग धरून आहे, पण जिथे भूकंपामुळे पडझड झाली तिथे तसेच रंगकाम केले आहे.
lp05
‘इन ले लेक’ म्हणजे ‘व्हेनिस ऑफ म्यानमार’. मँडले येथून हेहो विमानतळावर उतरल्यावर शान माउंटनच्या परिसरात पोहोचताना लहानलहान तळी दिसली, ती बघताना म्हटलं ‘याला तलाव म्हणतात हे लोक? मग आमच्या काश्मीरला या, तुम्हाला दाखवतो तलाव म्हणजे काय ते.’ पण चार प्रवाशांसाठी खुच्र्या ठेवलेल्या लांबलचक मोटरबोटीतून हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत दीड तासाच्या प्रवासात आमचाच पचका झाला. कमळं व वॉटर लिलीजची गर्दी असल्याने या तलावांचं आकारमान लक्षात आल नव्हतं. ४५ चौरस मैल परिसरात पसरलेला हा तलाव समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर होता. त्यातच बांबूवर बांधलेली घरं होती. त्यातील रहिवाशांना इन्था म्हणतात. इथून तिथून आपल्या लहानशा पडावातून वल्हवत जाणारे स्थानिक किंवा मोटरबोटीतून ये-जा करणारी पर्यटक मंडळी दिसत होती. तलाव १२ फुटांपेक्षा खोल नाही, पण त्यातील वॉटर लिलीजमुळे समोरचं दिसत नाही. त्यामुळे मच्छीमारांना उभ्याने काम करावं लागतं. प्रथम एका पायाने वल्हे मारून मासे पकडण्याची पद्धत पाहून आश्चर्यच वाटलं.
lp04
दुसऱ्या दिवशी बोटीने फिरताना वाटेत सोनेरी वर्खाने सजवलेले हंस पक्षासारखे फिरते देवालय, काराकाव पाहिले. वर्षांतून दोन वेळा सणासुदीला हा सुवर्णहंस तलावाच्या वेगवेगळ्या भागांतून फिरवला जातो, जेणेकरून सर्व रहिवासी देवाचे दर्शन व आशीर्वाद घेऊ शकतात. पाण्यातील वनस्पतींचे देठ व गाळ यांचे थर करून फ्लोटिंग गार्डन्स केली आहेत. त्यावर दुधी, काकडी, फरसबी, भोपळा, टोमॅटो अशा भाज्या, तर गुलाब, कर्दळ, शेवंती, सोनटक्कासारखी फुलांची लागवड केली आहे. स्थानिक लोकांना उदरनिर्वाहासाठी सरकार उत्तेजन देतं व त्याकरिता जमिनीचं वाटप करतं. दर दोन वर्षांनी जमिनीचा पोत बदलण्यासाठी फ्लोटिंग गार्डनचा परिसर नव्याने करावा लागतो. तलावातील कमळाच्या देठांतील कोवळ्या रेषांपासून बनवलेल्या रेशमाची खास वस्त्रं नवरा-नवरीसाठी, सणासुदीकरिता तसेच बुद्धासाठी बनवली जातात. शान डोंगरावर चिरुट बनविण्यासाठीची पाने व तंबाखू भरपूर असल्याने चिरुट बनविण्याचा उद्योग जोरात चालतो.
शान डोंगराच्या पायथ्याशी ११५४ टेंपल्स आहेत. इथले पॅगोडाज हे घंटेसारखे नसून कोनाकृती आहेत. आतील बुद्धाच्या मूर्तीखाली विविध रत्ने पुरण्याची पद्धत होती. ११व्या शतकात शान पंथीयांनी येथे हल्ले करून बरीच नासधूस केली व बैठकीखालील रत्ने लुटली. शत्रूला सहजासहजी आत प्रवेश करता येऊ नये यासाठी प्रवेशद्वार अगदी बुटके असल्याने आपण तिथे जाऊ शकत नाही. भूकंपामुळेही देवळांचे बरेच नुकसान झाले आहे. थोडय़ा अंतरावर परकीय व स्थानिक लोकांच्या देणगीतून बरेच पॅगोडाज बांधले आहेत. आपापल्या ऐपतीप्रमाणे लहानमोठा पॅगोडा, शिखर, त्यावरील छत्री सोन्याचा गिलावा किंवा पत्रे वापरून सजवला जातो.
या देशाची हद्द बांगलादेश, आपल्या पूर्वाचलाशी, हिमालयापासून पुढे शान, तासमारीन डोंगरांनी चीनशी बंगालचा उपसागर, अंदमान सागराबरोबर सागरी हद्द असल्याने संस्कृती, खानपान, राहणीमान यात वैविध्य आहे. फार वर्षे लष्करी राजवटीत असल्याने सुधारणा फारच कमी दिसते. बहुतांश जनता अशिक्षित आहे. लोक हसतमुख. गुन्ह्य़ाचे प्रमाण फारच कमी आहे. शिवाय पर्यटकांनी स्थानिकांबद्दल तक्रार केल्यास स्थानिकांना चांगलीच शिक्षा होत असल्याने सहसा गैरप्रकार होत नाहीत. फक्त रस्त्यावर बरेच खड्डे व उघडी गटारे असल्याने चालताना लक्षपूर्वक चालावे लागते. जवळजवळ घरं, माणसांची व फेरीवाल्यांची गर्दी त्यामुळे दादर-गिरगावसारखाच परिसर वाटतो. येथे आपल्याला कोलकाता, बँकॉकहूनही येता येते.
गौरी बोरकर