डोंगरात तुम्ही किती उंचावर पोहोचलात यापेक्षा महत्त्वाचं असतं, ते तुम्ही अनोळखी प्रदेशात किती नव्या वाटांनी डोंगर अनुभवलात.. त्यामुळेच गिर्यारोहणात अत्युच्च शिखराचा वेध घेतलेला नसला तरी अशी भटकंती देखील महत्त्वाची ठरते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्टोबर २०१३ च्या दुसऱ्या आठवडय़ात राजेश गाडगीळचा फोन आला. म्हणाला, शनिवार-रविवार भेटू या, हिमालयन एक्सपिडिशन संदर्भात बोलायचे आहे. ठिकाण, वेळ सांगून त्याने फोन ठेवला.
ठरल्याप्रमाणे शनिवारी भेटायला गेलो. जुजबी बोलणे झाल्यावर म्हणाला. ‘‘पुढच्या वर्षी एक्सपिडिशनला येणार का..? दरवर्षीप्रमाणे हिमालयन क्लबची मोहीम आहे. इस्टर्न काराकोरममध्ये जायचे आहे, साधारण सात हजार मीटर उंचीवर. ही सरधोपट मार्गावरून जाणारी मोहीम नाही. आजवर कोणीही गेलेले नाही, अशा भागात आपल्याला जायचंय.  जुलैमध्ये निघायचं आहे आणि ४५ दिवसांची मोहीम असेल. आत्तापर्यंत आम्ही तिघेच आहोत. दिव्येश, विनिता मुनी आणि मी. होकार दिलास तर तू चौथा. महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या भागात जाणार आहोत तो सगळा प्रदेश प्रतिबंधित क्षेत्र आहे.’’ राजेशने एका दमात मोहिमेची आवाका मांडला.
आजवर चार-पाच वेळा हिमालयात जाणे झाले होते. मोहिमा करणे नवीन नव्हते; पण मोहिमेचा व्याप्ती पाहता दोनच प्रश्न माझ्या डोक्यात आले. मी या मोहिमेकरिता सक्षम आहे का? आणि खर्च किती?
‘‘खर्च अंदाजे प्रत्येकी सव्वा लाख, कदाचित त्यापेक्षा जास्त. आणि सक्षम म्हणशील तर दोन-तीन वर्षे मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि मला वाटतंय, तू करू शकशील. खर्चाचा विचार आत्ता करू नकोस. काही तरी मार्ग नक्की निघेल.’’ इति राजेश.
जायचं तर होतंच, पण आर्थिक बाजूदेखील पाहायला हवी होती. ही संधी हातची जाऊ द्यायची नव्हती, कारण हे तिघंही भारतातील अनुभवी गिर्यारोहक आहेत आणि अशी शोधमोहीम यापूर्वी मी कधीच केली नव्हती; पण आर्थिक आघाडीवर घोडं पेंड खात होतं; पण सात-आठ महिने हातात होते. काही तरी मार्ग निघेल या आशेवर मी होतो.
राजेशला फोन करून होकार कळवला आणि एका अर्थाने मोहिमेला सुरुवात झाली.
माझ्या आजपर्यंत हिमालयात पंधरा-वीस दिवस, फार फार तर तीस दिवस कालावधीच्या मोहिमा झाल्या होत्या; पण अशा प्रकारची शोधमोहीम आणि तीदेखील ४५ दिवस कधीच नाही. आर्थिक, शारीरिक, मानसिक वगैरे बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार होता. माझ्या जवळच्या मित्रांपैकी गिरीश देसाईच्या मदतीने पुढच्या नियोजनाची सुरुवात केली. गिरीश माझा गुरू, फिटनेस ट्रेनर आणि बरेच काही. त्याने माझी तयारी करुन घ्यायला सुरू केली. सह्य़ाद्रीमध्ये सुळके आरोहण सुरूच होतं. एव्हाना नोव्हेंबर संपला.
आमची सर्व कागदपत्रे लवकरात लवकर संरक्षण मंत्रालय आणि इंडियन माऊंटेनीअरिंग फाऊंडेशनकडे (आयएमएफ) पाठवायची होती. फेब्रुवारीमध्ये सारी कागदपत्रे रवाना झाली. आता फक्त परवानगीची वाट पाहणं हाती होतं; पण मधल्या काळात आर्थिक तरतूद करणे महत्त्वाचं होतं. माझ्या एनआरआय आणि भारतीय मित्रमैत्रिणींना मेलामेली सुरू झाली.
एव्हाना मार्च उजाडला. मोहिमेची रूपरेषा ठरवण्यासाठी सर्व मोहीम सदस्यांची मीटिंग ठरली. आम्हा चौघांबरोबर बेस कॅम्पपर्यंत राजेंद्र वाणी, रत्नेश झवेरी, डॉ. कमल व नंदीनी लिमडी, डॉ. कल्पेश व सोनल जैन असे सहा जण ट्रेकसाठी येणार होते. मीटिंगमध्ये १५ जुलै -३०ऑगस्ट असा साधारण कालावधी पकडून संपूर्ण मोहिमेचं दिवसागणिक वेळापत्रक, तांत्रिक साधनसामग्री, शिधा, वाहतूक नियोजन, वैयक्तिक साधनं, वैद्यकीय मदत हे सारं कागदावर मांडायला सुरुवात झाली.  
दरम्यान माझ्या ऑस्ट्रेलियातील मैत्रिणीने आर्थिक मदत पाठवल्यामुळे माझी आर्थिक काळजी काही प्रमाणात तरी मिटली होती. एप्रिल आणि अर्धा मे महिना सामान गोळा करण्यात गेला.  राजेशच्या घरात सामान एकत्र करायला सुरुवात केली. १८ आणि २५ मेच्या रविवारी आम्ही जवळपास ३५० किलो सामानाचं पॅकिंग करून २६ मे रोजी रोड ट्रान्सपोर्टने लेहला पाठवून दिलं.
नंतरच्या टप्प्यात पुन्हा एकदा सर्व गोष्टींचा आढावा घेतला आणि ज्या वस्तू आधी मिळाल्या नाहीत त्या आणि अति उंचावर वापरण्याचे अन्नपदार्थ दुसऱ्या फेरीत पाठवायचं ठरलं. जूनअखेरीस पुन्हा एकदा सामानाची जमवाजमव सुरू झाली. या वेळी सर्वात जास्त धावपळ उडाली ती अदिती (राजेशची पत्नी) आणि विनिताची. जवळपास ६० किलोचे अन्नपदार्थ तयार करायचे होते आणि तेच डिहायड्रेट करून आम्हाला मोहिमेत अतिउंचावर असताना वापरायचे होते. दुसऱ्या टप्प्यातील जवळपास १५० किलो  सामान पुन्हा रोड ट्रान्सपोर्टने पुढे पाठवून दिले. जूनच्या अखेरीस आणखी चार-पाच मित्रांनी आर्थिक मदत दिल्यामुळे तूर्तास काळजी मिटली होती.
जुलै सुरू झाला. शरीराने घरी आणि मनाने हिमालयात अशीच अवस्था प्रत्येकाची झाली होती. आणि दिव्येशचा ई-मेल आला, ज्या हिमशिखराच्या आरोहणाची परवानगी मागितली होती ती संरक्षण मंत्रालयाने नाकारली. आता काय? असं काही घडू शकतं याची पूर्वकल्पना होतीच. त्यामुळे आधीच तयार ठेवलेला प्लॅन बी पेपरवर आला. रस्सा ग्लेशिअरमध्ये शोधमोहीम करायची. त्या दृष्टीने प्राथमिक चाचपणीदेखील केली होती. आता तेच प्रत्यक्षात आणायचं होतं.
१५ जुलै. लवकरच घरातून निघालो, कारण नेहमीचा अनुभव. मोहिमेला निघताना मुंबईत जोरदार पाऊस हवाच. त्याप्रमाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचताना जोरदार पावसाने सलामी दिली. आता खरी मोहिमेला सुरुवात झाली होती.
दिल्लीत पोहोचल्यावर आयएमएफमध्ये जाऊन कागदपत्रांची पूर्तता केली. १७ जुलैला सकाळच्या विमानाने चार आरोहण सदस्य, सहा ट्रेकिंग सदस्य आणि दोन इतर असे  १२ जण लेहला उतरलो. समुद्रसपाटीपासून थेट दहा हजार फूटापेक्षा जास्त उंचीवर. थोडे दिवस हालचाल हळुवार करा, धावू नका अशा सूचना आल्या. चार दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी (ूंू’्रें३्र९ं३्रल्ल) लेहमध्ये घालविले. तेव्हादेखील बरीच कामं होती. शेर्पा, कुक, सहकारी वर्ग एकत्र करणं, स्थानिक खरेदी वगैरे. मानवी वस्तीपासून दूर गेलो की काहीही मिळणार नव्हते. दिव्येश सातत्यानं सर्वाच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन होता.
लेहमधून नुब्रा खोऱ्यात जाण्याकरता खारदुंग ला आणि वारी ला (ला म्हणजे खिंड) अशा दोन रस्त्यांनी जाता येते. आतापर्यंत बऱ्याच वेळी खारदुंगला पार केला असल्यामुळे या वेळी वारी ला मार्गे हुंदरला मुक्काम करुन नुब्रा खोऱ्यात तिगूर गावी पोहोचलो. (लेहपासून १५० किमी). इथून जवळच असलेल्या तिरीत गावापासून आमची डोंगरातील वाटचाल सुरू होणार होती. शेर्पा, पोर्टर्स, कुक, घोडे एकत्र आले होते.
२४ जुलै. आमचा लवाजमा निघाला. साधारण तीन दिवसांनी आम्ही बेसकॅम्पसाठी ठरवलेल्या जागी म्हणजेच अर्गनग्लास व्हॅलीत पोहोचणार होतो. दोन दिवस भरपूर तंगडतोड करुन झाली. तिसरा दिवस अंतर कमी होते, पण फुनांग्मा ग्लेशिअरपासून सुरू होणाऱ्या ‘तिरीत फू’ नदीने आमचा रस्ता अडवला होता. त्यामुळे नदीपल्याड न जाता अलीकडेच कॅम्प लावावा लागला. एरवी सहज पार करता येण्यासारखी ही नदी या वेळी मात्र अचानक वाढलेल्या पाण्यामुळे पार करता येत नव्हती.
नदी पार करायचा जवळचा मार्ग आम्हाला सापडत नव्हता. दुसऱ्या दिवशी राजेश आणि दिव्येश नदीच्या उगमापर्यंत चालत गेले आणि नदी कुठे ओलांडता येईल याची चाचपणी करून आले. नदीच्या उगमाशी असलेले अर्गनग्लास ग्लेशिअर ओलांडून नदीच्या पलिकडे बेसकॅम्पच्या नियोजित जागी पोहोचायचे ठरले. या वाटेने घोडे येऊ शकणार नव्हते त्यामुळे घोडे आणि सर्व सामानाबरोबर राजेश अलीकडेच थांबला आणि आम्ही डोंगरवाटांनी साधारण २०० मीटर खाली-वर तंगडतोड करत सहा तासांनी नदीपल्याडच्या नियोजित बेसकॅम्पच्या जागी पोहोचलो.
आता सर्वात महत्त्वाचं होतं ते सर्व सामान सुरक्षितपणे नदीपल्याड आणायचं. दोन्ही तीरावरील कॅम्पच्यामध्ये भरभक्कम दोर बांधण्यात आला. सारं सामान आणि राजेश पलीकडे आले. या साऱ्या सव्यापसव्यात तीन दिवस वाया गेले.  डोंगरात फिरताना असं बऱ्याच वेळा होतं. अपेक्षा न केलेल्या अडचणी समोर येतात. त्यातच जर कसलीच माहिती नसलेल्या भागात मोहीम असेल तर हीच शक्यता कैक पटीने जास्त असते. अर्थात आम्ही हे सारं गृहीत धरलंच होतं. अखेरीस सारे बेसकॅम्पला स्थिरस्थावर झाले. छोटे मंदिर स्थापून नारळ फोडून पूजा, प्रार्थना झाली. बेसकॅम्प सेट झाला आणि आम्ही पुढच्या लक्ष्याकडे वळलो.
दुपारी आम्ही अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्पसाठी (एबीसी) जागा आणि रस्ता शोधायला निघालो. या गोष्टी माझ्याकरिता नवीन होत्या. कारण आजवर ज्या मोहिमा केल्या त्या माहीत असलेल्या जागी. त्यात कॅम्पच्या जागा, वाटा, इतर माहिती जाऊन आलेल्या लोकांकडून मिळायची आणि त्यानुसार सारं काही ठरलेलं असायचं. फोटोतून सारा परिसर पाहिलेला असायचा. पुढे काय असणार हे माहीत असायचं. येथे संपूर्ण प्रदेशात फक्त आम्हीच होतो. पुढे काय आहे हे सांगण्यासाठी हातातील नकाशा हाच काय तो एकमेव आधार होता. त्यामुळे या संपूर्ण मोहिमेत पुढे काय, हाच सततचा प्रश्न होता.
असो, रस्ता आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळत पुढे जात होतो. अचानक आमची चाहूल लागताच साधारण ७५-१०० भरल (हिमालयातील हरणांची जात) आमच्यापासून दूर जाताना दिसले. मोहिमेत दिसलेला पहिला वन्यजीव. पुढील परिसर नजरेच्या टप्प्यात आल्यावर आमच्या पुढील कॅम्पला जाण्याचा मार्ग निश्चित करून माघारी फिरलो. बेसकॅम्पमध्ये पुढील रूपरेषा ठरवली गेली. दोन टीम केल्या गेल्या. वातावरणाशी समरस होण्याकरीता जास्तीतजास्त उंचीवर जायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे आम्ही ५३०० मीटपर्यंत चढाई केली. पुढील दोन दिवस आम्ही सारेच जण एबीसीसाठी लोड फेऱ्या करण्यात मग्न होतो.
१ ऑगस्ट, ट्रेकिंग टीमची परत निघण्याची तयारी चालू झाली आणि आमच्या चौघांच्या टीमची एबीसीला जाण्याची. २ ऑगस्ट सकाळी लवकर ट्रेकिंग टीमनं परतीच्या प्रवासासाठी कॅम्प सोडला आणि आम्ही वरच्या कॅम्पसाठी कूच केले.
आता मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. आम्ही चार आरोहक, तीन शेर्पा आणि एक कुक. ५२५० मीटरवर आम्ही एबीसी सेट केला होता. आता या संपूर्ण परिसरात पुढील २५ दिवस केवळ आमचाच वावर असणार होता. या भागाची काहीच माहिती नव्हती. कारण यापूर्वी इथे कोणीच आलेले नव्हते. आमच्यासमोर संपूर्ण रस्सा ग्लेशिअर आडवंतिडवं पसरलं होतं. तब्बल २५० चौरस किलोमीटर पसरलेल्या रस्सा ग्लेशिअरचा मुख्य भाग आमच्या उत्तरेकडे होता. ग्लेशिअरच्या दक्षिणेकडील मुखाशी असलेले बर्फाचे सरळसोट उंच कडे आमची वाट अडवून उभे होते. बर्फ वितळून उघडय़ा पडलेल्या दगडमातीच्या ढिसाळांनी (मोरेन) आमचा मार्ग अधिकच खडतर केला होता. या ग्लेशिअरचं सर्वेक्षण करून त्यातून चढाईचा मार्ग शोधणं हे आमच्या पुढचं खरं आव्हान होतं. ह्य़ा हिमनदीचा संपूर्ण आवाका लक्षात यावा त्यासाठी त्यातल्या त्यात उंच जागी गेलो. जेणेकरून आम्हाला पुढची दिशा ठरवता येणार होती. हाताच्या पंजाच्या बोटांप्रमाणं पाच उपशाखा फुटलेलं ग्लेशिअर आम्हाला खुणावत होतं. पण आमच्या हाताच्या पंज्यावर पसरलेल्या नकाशाखेरीज समोर पसरलेल्या ग्लेशिअरमध्ये काय आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. आमच्या सोयीसाठी आम्ही त्या उपशाखांना एक ते पाच क्रमांक दिले. पुढचे २५ दिवस आम्ही त्या हिमालयाच्या पंज्यावर मनसोक्त हुंदडणार होतो.
पुन्हा एकदा वेळापत्रकाचा, सामानाचा आणि रेशनचा आढावा घेतला आणि वरचा कॅम्प सेट करायचं ठरविलं. आधी ग्लेशिअर-१ मध्ये भटकायचं होतं. पुढील कॅम्पकरिता लोड फेऱ्या चालू झाल्या. इथून पुढे सारी भटकंती स्नो आणि आइसमध्ये होणार होती. साधारण ५६०० मीटपर्यंत जाऊन पुढील कॅम्पची जागा निश्चित केली. हिमभेगा / हिमविवरांचा (ू१ी५ं२२ी२) भाग चालू झाला होता. जागोजागी आडवे येणाऱ्या हिमभेगा ही वाटेतील सर्वात मोठी अडचण होती. त्यातील काही छुप्या तर काही उघड. त्यामुळे त्यांच्या रुंदीप्रमाणे कधी उडय़ा मारून तर कधी वळसे घेऊन आम्हाला त्या काळजीपूर्वक पार कराव्या लागत होत्या. असा जवळजवळ दीड किलोमीटरचा टप्पा पार केल्यानंतर एका सुरक्षित जागी आम्ही आमचा कॅम्प ५७८० मीटरवर लावला.
आता आम्ही ग्लेशिअर एकच्या मधोमध होतो. चारही बाजूला बर्फाचे साम्राज्य पसरले होते. त्यातीलच एका शिखरावर आमची नजर होती. नकाशात याची नोंद ढ्रल्ल३ 6219 ेी३ी१ अशी केली होती. नकाशात नोंदी करताना एखाद्या शिखराचे नाव नसेल तर त्याच्या उंचीवरून त्याची नोंद करण्याची पद्धत आहे. या शिखरावर चढाई केल्यावर आजूबाजूची शिखरं आणि त्यांची ग्रेड लक्षात येणार होती. ८ ऑगस्टला ६२१९ मीटर शिखरावर आम्ही चढाई निश्चित केली.
८ ऑगस्टला लवकरच कॅम्प सोडला, हळूहळू चढाई चालू होती. जवळपास १५० मीटरचा रोप फिक्स झाला आणि निसर्गानं आमचं आरोहण थांबवलं. हवामान खराब झालं आणि आम्ही परतीचा निर्णय घेतला. ९ ऑगस्टला हवामान थोडंसं स्वच्छ झाल्यावर आम्ही बाजूच्या दुसऱ्या शिखराची (६३१५ मीटर) पाहणी केली. पण पुन्हा हवामान बिघडल्यामुळे  कॅम्पवर परत येण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. दरम्यान, विनिताची तब्येत बिघडल्याने तिला एबीसीला जावं लागलं.
आम्ही पुन्हा पूर्वेकडच्या वाटेने ६३१५ मीटर शिखरावर चढाई करता येते का ते चाचपून पाहिलं. पण एकंदरीतच आमच्याकडील साधनसामग्रीचा विचार करता या बाजूने चढाई करता येणं शक्य नव्हतं. आता एकच मार्ग शिल्लक होता तो म्हणजे ६३१५ मीटर शिखराच्या पश्चिम बाजूने चढाई करण्याचा. पण त्यासाठी ६२१९ मीटर शिखरावर चढाई केल्याशिवाय हा मार्ग नेमका कळणार नव्हता. पुन्हा १२ ऑगस्टला ६२१९ मीटर शिखरावर चढाईकरता निघालो. आधीच्या दीडशे मीटर रोपच्या जोडीला आणखी १५० मीटर रोपची जोड दिली. ही सर्व चढाई शिखराच्या दक्षिण दिशेला असलेल्या उभ्या बर्फ कडय़ांवरून होती. मधे येणारे सुट्टय़ा दगडांचे टप्पे चढाईचा ताल बिघडवत होते. उभ्या बर्फाचा हा टप्पा ४५ अंश ते ६० अंश असा चढत्या भाजणीनं शिखर माथ्यावर जात होता. आणि त्यावरील शेवटचा पन्नास मीटरचा अंतिम टप्पा हा ढासळत्या दगडांच्या निरुंद धारेचा होता. अतिशय काळजीपूर्वक चढाई करून अखेरीस सकाळी ११.२० ला रस्सा ग्लेशिअरमधील पहिलं शिखर सर झालं. दिव्येश, राजेश, पेम्बा शेर्पा, फुर्बा, पासांग आणि मी शिखरावर पोहोचलो. नामकरण केलं ‘तुसुम कांगरी’.
कोणत्याही अनामिक शिखराचे नामकरण करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्यामध्ये शिखराचं साधारण वर्णन होणं व ते स्थानिक प्रथांशी, भाषेशी, प्रचलित समजांशी नातं सांगणारं असावं लागतं. आम्ही नुकतंच सर केलेलं ६२१९ मीटरचं शिखर हे ग्लेशिअरच्या एका कोपऱ्यात (लडाखी भाषेत ‘सुम’), आणि आकाराला खांद्याप्रमाणे थोडंसं वर आलेलं  (लडाखी भाषेत ‘तु’) हे वर्णन अचूक लागू पडणारं होतं. साहजिकच आम्ही या शिखराचं नामकरण ‘तुसुम कांगरी’ असं केलं. (कांगरी म्हणजे लडाखी भाषेत शिखर).
इथून ग्लेशिअर-२ चा पूर्ण भाग दिसत होता. त्याचा उपयोग आम्हाला तेथील शिखरं चढाई करताना होणार होता. शिखरमाथ्यावरून आजूबाजूच्या शिखरांवर कशी चढाई करता येईल याचादेखील अभ्यास करता येणार होता. म्हणूनच संपूर्ण परिसराचे ३६० डिग्रीमध्ये फोटो काढले. चहूदिशांना पसरलेल्या ज्ञात-अज्ञात, अजिंक्य-अनामिक अशा अनेक हिमशिखरांचा खजिना हिमालयानं आमच्यासमोर उघडून ठेवला होता. अनंत हस्ते देता कमलाकराने, किती घेता घेशील तू दो करांनी किंवा देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशा अनेक उपमांनी मनात गर्दी केली होती. मात्र घडय़ाळ आणि वातावरण या दोन्हीकडे आमची बारकाईनं नजर होती. भोवतालच्या भूलभुलैयातून स्वत:ला मागे खेचत शिखरावरून काळजीपूर्वक उतरावं लागणार होतं. (बऱ्याचदा हिमालयातील अपघात हे उतरताना होतात). कोणतीही साधनसामग्री शिखरावर न सोडता आम्ही सगळे दुपारी तीन वाजता सुखरूप कॅम्पमध्ये पोहोचलो.
नव्या शिखर चढाईचा आनंद होताच, पण मनात पुढच्या शिखराचे वेध लागले होते. टेंटमध्ये चहा पिताना शिखरावरून काढलेले फोटो पाहिले आणि पुढच्या चढाईच्या  शक्यता तपासल्या. लक्षात आलं की आधी सर्वेक्षण केलेल्या ६३१५ मीटर शिखरावर चढाई या बाजूनंपण शक्य नाही.
आता पुढे काय? अर्थात शोधमोहीमच असल्यामुळे या संपूर्ण मोहिमेत हाच प्रश्न सतत असायचाच.
शेवटी ग्लेशिअर-२ आणि ३ मध्ये एक्स्प्लोरेशन आणि शिखर चढाई करायची, असा निर्णय झाला. लगोलग कॅम्प वाइंडअप करून संध्याकाळी पाच वाजता एबीसीकडे प्रस्थान ठेवले.
आता लक्ष्य ग्लेशिअर-२ आणि ३ हे होतं. आम्ही तिघे, दिव्येश, राजेश आणि मी ग्लेशिअर-२ आणि ३ करता रस्ता शोधण्याकरता गेलो. आमचे शेर्पा ग्लेशिअर-१मधील उरलेले सामान आणण्याकरिता गेले. ग्लेशिअर-२ आणि ३ कडे जाणारा मार्ग मोठय़ा एका उभ्या मोरेनवरुन आणि एका ठिकाणी दोन मोरनच्या मधून (ॅ४’’८) जाणारा होता. या ठिकाणी दगड पडण्याची (१ू‘ ऋं’’) भीती होती. एकंदरीत रस्त्याचा अंदाज घेतल्यावर पुन्हा एबीसीला आलो. पुन्हा एकदा हवामान बिघडलं. आता टेंटमध्ये बसण्याशिवाय पर्याय नव्हता. भुरभुरता बर्फ (२ल्ल६ ऋं’’) पडत होता. देवाला एकच प्रार्थना होती की हवामान लवकर सुधारू दे मोरेन आणि गलीमध्ये जो बर्फ  पडला आहे तो लवकर वितळू दे. कारण अशा भुसभुशीत बर्फाने झाकलेल्या मोरेनवरून व गलीमधून जाणे त्रासदायक व त्याहूनही धोकादायक असते.
ग्लेशिअर २ आणि ३ करता लागणाऱ्या सामानाचे पॅकिंग झाले आणि हवामान स्वच्छ झाल्यावर लोडफेऱ्या सुरू झाल्या. नशिबाने गलीमधून जाताना रॉक फॉल झाला नाही. आमचा पुढचा कॅम्प हा ग्लेशिअर २ आणि ३ च्या एकत्रित तोंडावर लावणार होतो. १८ ऑगस्टला कॅम्प-२मध्ये शिफ्ट झालो. जीपीएसने उंची दाखवली ५६३५ मीटर.
संध्याकाळी ग्लेशिअर ३ ची पाहाणी केल्यावर लक्षात आले की हाताशी असणारा वेळ आणि ग्लेशिअर २ मधील शोधमोहीम आणि शिखर चढाईची शक्यता याचा विचार करता, ग्लेशिअर ३ मध्ये जास्त चांगल्या संधी आहेत. त्यामुळे ग्लेशिअर ३ वर सारे लक्ष केंद्रित केलं.  
१९ ऑगस्टला ग्लेशिअर ३ मधील कॅम्पसाठी लोडफेऱ्या सुरू केल्या. या मार्गावर देखील भरपूर हिमभेगा होत्या. ५८१० मीटर उंचीवर कॅम्प सेट केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे २० ऑगस्टला या उंचीवरील कॅम्पमध्ये  शिफ्ट झालो. दुपारी लगेचच पुढची तयारी. कॅम्पच्या बाजूलाच ६२५० मीटरचे शिखर आहे. या शिखरावर चढाई केल्यास ग्लेशिअर ३ आणि ४ चा परिसर नजरेत येणार होता. अजून एक वैशिष्टय़ म्हणजे हे शिखर रस्सा ग्लेशिअरच्या मधोमध आहे आणि जेव्हा आम्ही रस्सा ग्लेशिअरमध्ये आलो तेव्हापासून ते आम्हाला खुणावत होतं.
२१ ऑगस्ट पहाटे पाच वाजता चढाईला सुरुवात करायची होती. पण हाडं गोठवणारी थंडी आणि वारा यामुळे प्रत्यक्षात चढाईला सुरुवात सात वाजता झाली. थंडी आणि जोराचा वारा यामुळे हालचाल मंदावली होती. मजल दरमजल करीत पुढे जात होतो, पण समोर उभ्या ठाकलेल्या २०० मीटरच्या आइस वॉलने आमची गती अजूनच कमी केली. साधारण ६० अंश कोनात असलेल्या या उभ्या बर्फ भिंतीवर आइस स्क्रूच्या साहाय्याने दोर बांधून आम्ही माथ्याकडे जाणाऱ्या शिखरधारेवर पोहोचलो. या पूर्व-पश्चिम धारेवरील वाट जेमतेम एका पावलाच्या रुंदीची होती. दक्षिणेकडचा बराचसा भाग कडय़ाच्याही पलीकडे ओथंबलेल्या (कॉर्निस) भुसभुशीत बर्फाचा होता. तर उत्तरेकडचा उतार हा सरळसोट तुटलेला कडाच होता. त्यात आमच्याकडे असलेला दोर संपला, त्यामुळे आइस वॉलवर बांधलेले दोन दोर काढले आणि पुढील वाटेवर फिक्स केले.
आता शिखराचा माथा नजरेत आला होता. ती निमुळती बर्फधार पार करून दुपारी २.२० ला राजेश, दिव्येश व विनिता, पेम्बा, फुरबू, पासंग आणि मी शिखरावर पोहचलो. शिखर माथ्यावरही फारशी जागा नव्हती. रस्सा ग्लेशिअरमधील दुसरं अजिंक्य शिखर (उंची ६२५० मीटर) सर झालं. याचे नामकरण आम्ही ‘रस्सा कांगरी’ असं केले. या शिखरावरून सासेर कांगरी, प्लाटू पिक आणि अशी अनेक शिखरं बघायला मिळाली. पुन्हा ३६० अंशात फोटो काढले आणि खाली उतरायला सुरुवात केली. या वेळी शिखर उतरतानाचा धोका लक्षात घेता परत येताना काही तांत्रिक सामग्री मार्गावरच सोडावी लागली. परंतु सर्वजण सुखरूप कॅम्पला आलो.   
आता वेळापत्रकानुसार सर्वेक्षणासाठीचे / चढाईसाठीचे दोनच दिवस आमच्याकडे होते. त्यामुळे आम्ही ग्लेशिअर ३ च्या जास्तीत जास्त आत जाऊन, त्या परिसराची पाहणी करायचं ठरवले. त्यासाठी दिव्येश, राजेश आणि दोन शेर्पानी कूच केलं. जवळपास दोन तास चालल्यानंतर ते ग्लेशिअर ३ च्या टोकाला असलेल्या शुक्पा खिंडीत (उंची ६११० मीटर) पोहचले. या ठिकाणाहून शुक्पा कुन्चांग ग्लेशिअर चालू होते आणि त्यापुढे श्योक नदीचे खोरे. आजूबाजूची शिखरं नक्कीच लक्षवेधक आणि कठीण होती. पण त्यातलं एखादं शिखर चढण्याकरता आवश्यक तो वेळ आमच्याकडे नव्हता. त्यामुळे खालच्या कॅम्पला परतण्याचा निर्णय झाला. पुन्हा एकदा हवामान खराब झालं. त्याच खराब हवामानात आम्ही कॅम्प २ ला परतलो. रात्रभर स्नो फॉल सुरू होता आणि टेंटमध्ये आमची घालमेल.
आता परतीचे देखील वेध लागले होते. शोधमोहीम असल्यामुळे नुब्रामध्ये जाण्याचा दुसरा एखादा मार्ग असेल का आणि असल्यास जाता येईल का याचा विचार करत होतो. २३ ऑगस्ट हा एकच दिवस आमच्याकडे होता. रस्सा ग्लेशिअरच्या पलीकडे सुमुर लेक आहे आणि गावातील लोक तिथे कधीतरी ये-जा करतात एवढंच माहीत होतं. त्यामुळे रस्सा ग्लेशिअर ओलांडायचे व सुमुर लेकमार्गे नुब्रा खोरे गाठायचे ठरले. त्यासाठी ग्लेशिअर ४ किंवा ५ ओलांडून जावे लागणार होते. आम्ही रस्सा कांगरी शिखरावरून ग्लेशिअर चार पाहिल होतं. तिकडून मार्ग असण्याची शक्यता कमी वाटली होती, कारण पूर्ण रीजला कॉर्निस दिसत होते. त्यामुळे आधी ग्लेशिअर पाचमधून जाण्याचा मार्ग शोधायचे ठरले.
परत जाण्यासाठी आमच्याकडे फक्त तीन दिवस होते. त्यामुळे कमीत कमी सामान, जेवण आणि तांत्रिक सामग्री घ्यायचे ठरले. येथून पुढे आम्ही चार मेंबर आणि एक शेर्पा यांनी या वाटेने जायचं ठरले आणि उरलेले दोन शेर्पा या कॅम्पचे सामान आवरून एबीसी मार्गे पतर जातील असे ठरले.
आम्ही ग्लेशिअर पाचमध्ये चालायला सुरुवात केली, आणि बघता बघता सुमुर लेकला जाणारा पास नजरेच्या टप्प्यात येऊ लागला आणि पासच्या टोकाला येऊन ठेपलो. उंची होती ५९३० मीटर. पण ..
आता पुढे काय? पुन्हा तोच प्रश्न.
जवळपास २०० मीटर बर्फाच्या कडय़ांनी आमचा रस्ता अडविला होता. सुमुर लेक तर दिसत होता, पण आमच्याकडे फक्त ५० मीटर दोर होता. पाठी फिरायचा निर्णय झाला. ग्लेशिअर ४ आणि ५ च्या जंक्शनला कॅम्प टाकायचासुद्धा निर्णय झाला व ग्लेशिअर ४ मधून रस्ता शोधायचे ठरले. पुन्हा हवामान बिघडलं. त्याच खराब हवामानात कॅम्प सेट केला. आजचा दिवस फुकट गेला होता. आता परतीसाठी फक्त २ दिवस आमच्या हातात होते.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ ऑगस्टला ग्लेशिअर चारमधून सकाळी लवकर चालायला सुरुवात केली आणि सकाळी अकरा वाजता ग्लेशिअर चारच्या टोकाला पोहोचलो. उंची सहा हजार मीटर. आता इथून खाली जाता येईल का याची चाचपणी सुरू झाली. १०० मीटरच्या उभ्या बर्फकडय़ांनी आमची पुन्हा वाट अडविली. इथून खाली उतरताना आमची खूप दमछाक झाली आणि वेळही खूप गेला. परंतु सुरक्षित खाली आलो. आता पुन्हा हवामान खराब झालं. स्नोफॉल आणि वारा सुरू झाला, सूर्य ढगाआड दडल्यामुळे आणि ग्लेशिअरवरच्या धुक्यामुळे (व्हाईट आऊट) दृश्यमानता कमी झाली होती. त्यातूनच आम्ही हळूहळू खाली जात होतो. संध्याकाळी पाचच्या सुमारास स्नोफॉल आणि वारा थांबला. आता हिमनदीतील बर्फाचा भाग संपून मोरेन सुरू झालं. आता मात्र घाई करायला लागणार होती कारण दिवस मावळायला आला होता. दगडाधोंडय़ांतून मार्ग काढत अखेर संध्याकाळी सात वाजता ५२३० मीटर उंचीवरच्या सुमुर लेकला पोहोचलो.
२६ ऑगस्टला सुमुर लेकहून लवकरच निघालो. कारण १८ किमी अंतर कापायचं होतं. चालायला सुरुवात केली तोच हवामान खराब व्हायला सुरुवात झाली. आणि पुढचे ३ तास स्नोफॉल आणि वारा यांनी झोडपून काढलं. आता एकच भीती होती ती म्हणजे वाटेत राहायला लागल्यास आमच्याकडे जेवणाचं सामान नव्हतं. होती ती एक वेळच्या चहाची सामग्री आणि काही एनर्जी बार. खराब हवामानामुळे रस्तादेखील कळत नव्हता. पण चालणं भागच होतं. कधी उतार, तर कधी चढाव, कधी वळणं. काराकोरममध्ये आहोत याची पुरती जाणीव करून देणारा भूभाग. आता संपेल, मग संपेल या आशेवर पुढे पुढे चालत होतो. सुमुरचा किल्ला दिसू लागला आणि आम्ही सुमुरच्या जवळ आलो हे समजलं. किल्ल्याजवळ सुमुर गाव दिसू लागलं व सम्स्थालिंग मॉनेस्ट्री दिसू लागली. तिथे आमचं चालणं थांबणार होतं. संध्याकाळी  सात वाजता मॉनेस्ट्रीजवळ सर्व जण सुखरूप पोहोचलो.
२७ ऑगस्टला लगेचच खारदुंग लामार्गे लेहला निघालो. मनात एक  अतीव समाधान होत. परतीच्या प्रवासात नकळत मनातच आजवरच्या हिमालयीन मोहिमा आणि या मोहिमेची तुलना होत होती. आम्ही काय केलं होतं? आम्ही कोणतंही अत्युच्च शिखर आरोहणं केलं नव्हतं की कोणताही विक्रम केला नव्हता. पण ज्या प्रदेशात आजवर कोणीही गेलं नाही त्या प्रदेशात आम्ही मनसोक्त भटकंती केली होती. गरज भासेल तेथे आम्ही माघारदेखील घेतली होती. दोन अजिंक्य शिखरं आमच्या हातून सर झाली होती आणि अस्पर्श हिमनद्यांची भव्यतादेखील मुळातून अनुभवायला मिळाली होती. हिमालयाची शांती आणि त्याचं रौद्र रूप या दोहोंची अनुभूती झाली होती.
शेकडो गिर्यारोहक आणि शेर्पाच्या बरोबरीने एकाच डोंगरावर गर्दीत सामील न होता, हिमालयाच्या अस्पर्श डोंगररांगेतील हे एकांताचे क्षण गाठीशी बांधले होते. किंबहुना गिर्यारोहणातला हाच आनंद आम्हाला मनापासून लुटायचा होता. नेमका तोच अनुभव या डोगंरांनी ४५ दिवसांत पदोपदी दिली होता. अर्थातच ही अनुभूती सुरुवातीला वर्णन केलेल्या आर्थिक जमवाजमवीपुढे कायमच हिमालयाइतकी उत्तुंग ठरणारी आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trekkers blogger
First published on: 04-10-2014 at 10:12 IST