05 August 2020

News Flash

कुरघोडी करण्यात, घरचेच लोक जोरात

मालिकांमध्ये खलनायक किंवा खलनायिका हवीच हा टीव्हीचा अलिखित नियम. पण, सध्या मालिकांमध्ये ही खलभूमिका करणारे दुसरे-तिसरे कोणीही नसून नायक-नायिकांच्या घरचेच लोक आहेत. या नव्या खलनायकांचा

| July 3, 2015 01:14 am

lp56मालिकांमध्ये खलनायक किंवा खलनायिका हवीच हा टीव्हीचा अलिखित नियम. पण, सध्या मालिकांमध्ये ही खलभूमिका करणारे दुसरे-तिसरे कोणीही नसून नायक-नायिकांच्या घरचेच लोक आहेत. या नव्या खलनायकांचा ट्रेंड मालिकांमध्ये रुजू होताना दिसतोय.

मोठा बंगला, अगदीच बंगला नसेल तर चकचकीत फ्लॅट, गाडी, बिझनेस असं सगळं हिंदी मालिकेत लागतंच. हिंदी मालिकांच्या या मागण्या मराठीकडे वळून काळ लोटला. अगदी सरसकट सगळ्याच मालिकांमध्ये नाही पण, काही मालिकांमध्ये अशी भव्यता नक्कीच बघायला मिळते. बरं, हे झालं ‘दिसण्या’बाबत. आता ‘असण्या’बाबत बोलू या. तर, मालिकेत एक सोज्वळ, सर्वगुणसंपन्न, हुशार, सगळ्या संकटांवर मात करणारी, नेहमी खरं बोलणारी अशी नायिका हवीच. ती गरीब असली तरी चालते किंबहुना ती तशीच असावी म्हणजे प्रेक्षकांच्या सहानुभूतीला आयतं कारण मिळतं. दुसरीकडे बायकोचंच म्हणजे नायिकेचंच ऐकणारा, देखणा, ऑफीसला जाऊन विशेष काही काम न करणारा असा नायक लागतो. दोघं लग्न करून आपल्या सुखी संसारात नांदू लागतात. सगळंच गुडी-गुडी दाखवलं तर प्रेक्षकांना मधुमेह होईल, या काळजीने चॅनलवाले एक उपाय काढतात. त्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकणारी एक तरी व्यक्ती मालिकेत आणतात. खलनायक किंवा खलनायिका. इथे मालिकेची चौकट पूर्ण होते. पण, यात आता थोडेफार बदल होऊ लागलेत. खलनायिका आणि खलनायक हे काही मालिकांमध्ये त्यांच्या जवळचे लोक, नातेवाईक, बिझनेस प्रतिस्पर्धी किंवा मित्रपरिवारांपैकीच एक आहेत. पण, काही मालिकांनी हा ट्रेंड मोडून काढलाय. नायक-नायिकांच्या आयुष्यात कटकारस्थानं करणाऱ्या व्यक्ती दुसऱ्या-तिसऱ्या कोणीही नसून त्यांचे आई, बाबा, आजी इतक्या जवळचे लोक आहेत. अशांमध्ये मराठी मालिकांचाही समावेश आहे.
या ट्रेंडमध्ये सगळ्यात पहिला क्रमांक लागेल तो मिस्टर दाभोळकरांचा अर्थात झी मराठीच्या ‘का रे दुरावा’ या मालिकेतल्या नायिकेच्या, अदितीच्या वडिलांचा. अदिती आणि जयच्या लग्नाला विरोध असणारे दाभोळकर संधी मिळेल तिथे जयचा अपमान करतात. देव टूरकडे असलेलं त्यांचं प्रोजेक्ट जय सांभाळत असतो. पण, नंतर त्याला त्याच्याच ऑफिसमधल्या रजनीने साथ करावी असं ते सुचवतात आणि ठरवून जय-अदितीमध्ये वादाची ठिणगी टाकतात. जयपेक्षा अदिती किती श्रेष्ठ, अदितीमुळे जयला सगळं मिळतंय असं सारखं टोचत बोलून दोघांमध्ये भेदभावाची भावना निर्माण करतात. मुलीच्याच आयुष्यात कारस्थान करणारे वडील प्रेक्षकांमध्ये असलेल्या समस्त बापवर्गाला दुखावतात. ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकेतल्या कलाने तर कहरच केला आहे. मुलीचा संसार मोडण्याइतपत तिची मजल गेली. आता या कलाला टक्कर द्यायला याच मालिकेतली आणखी एक व्यक्ती तयार झाली आहे. ती म्हणजे बेबी आत्या. कलाच्या पुढची पायरी तिने गाठली. श्रीचा घटस्फोट होण्याआधीच तिने त्याच्या दुसऱ्या लग्नाची जमवाजमव करायला घेतली. खलनायिकाविरहित मालिका असं या मालिकेला संबोधण्याला आता काही वाव नाही, असं दिसून येतंय.
नायकाची मैत्रीण, नायिकेची जाऊ, सासू किंवा अन्य कोणी खलनायक-खलनायिका म्हणून मालिकेत दिसायचे. नायकाच्या सो कॉल्ड बिझनेसमधला प्रतिस्पर्धी तर यात नंबर वनवर असायचा. त्यातूनही काही वेगळेपण शोधायचं असेल तर मालिकेची गाडी वळायची ती नायिकेची जाऊ किंवा नणंद. नायिकेला जास्त भाव असल्यामुळे त्या दोघी तिच्यावर खार खाणार आणि मग तिला खोटं, चुकीचं ठरवण्यासाठी एक ना अनेक कारस्थानं करणार, हे ठरलेलं. पण, छोटा पडदा आता यालाही कंटाळलेला दिसतोय. अर्थात हा ट्रेंड संपला आहे असं म्हणता येणार नाही. मात्र त्यात पुन्हा काही नावीन्य शोधण्यासाठी नायक-नायिकांच्या आई-वडिलांनाच खलभूमिकेच्या खुर्चीत बसवलंय. मग कोणाची आई संसार मोडायला निघालीय, कोणाचे वडील दोघांमध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न करताहेत तर कोणाची आजी घरातली मोठी व्यक्ती म्हणून सगळी सूत्रं हातात घेण्याचा प्रयत्न करून नायिकेला शह देतेय.
स्टार प्रवाहच्या ‘रुंजी’ या मालिकेतल्या मोठय़ा आईची अडचण काय आहे ते नेमकं लक्षातच येत नाही. केवळ घरातली मोठी सून म्हणून असलेला रुबाब रुंजीसह सगळ्यांवर हक्क गाजवायला पुरेसा आहे. ऋषी आणि रुंजी या दोघांमध्ये वेळोवेळी गैरसमज कसे होतील याशिवाय मोठय़ा आईला दुसरं काम नाही. ऋषीच्या नजरेतून रुंजी कशी उतरेल आणि घराचा सर्वार्थाने ताबा आपल्याकडे कसा मिळेल याचाच मोठी आई सतत विचार करत असते आणि तशी कारस्थानं तिला सुचत जातात. हिंदीत ‘जमाई राजा’ या मालिकेच्या सुरुवातीला हा ट्रेंड अधिक वेगाने वाहताना दिसत होता. रोशनीची आई सिद्धार्थ आणि रोशनीच्या लग्नाला नकार नेते. विरोध पत्करून लग्न होतं आणि मग त्यांचा संसार संपुष्टात कसा येईल याकडे ती लक्ष ठेवून असते, असं मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांमध्ये दाखवण्यात आलं होतं. पण, आता परिस्थिती बदलल्यामुळे सिद्धार्थची आई दोघांमध्ये आली आहे. सिद्धार्थ आणि रोशनी एकत्र कसे येणार नाहीत याचा ती आटोकाट प्रयत्न करताना दिसते. तर ‘मेरे अंगन में’ ची स्थिती काहीशी ‘रुंजी’सारखी. ‘मेरे अंगने में’मधल्या शांती देवींना म्हणजे नायकाच्या आजीला तिच्या वरचढ गेलेलं कोणी चालत नाही. घरची सून, इशानी मात्र प्रॅक्टिकल. शिवाय नोकरी करून कमवणारी. त्यामुळे आर्थिक बचत करण्याबाबतचं ज्ञान तिला आहे. असं वागून घरात तिला वरचढ होऊ न देण्यासाठी त्या आजीचे प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नांमध्ये अर्थातच नायक-नायिकेत खटके उडतात.
टीव्हीच्या ‘टीआरपीसाठी वाट्टेल ते’ या अलिखित नियमाचं तंतोतंत पालन करणारे चॅनल्स वेगवेगळ्या कल्पना शोधून काढतात. मालिका म्हटली की सोज्वळ नायिका, हँडसम नायक आला. त्यांची प्रेमकथा आली. मग घरातला ड्रामाही आलाच. सततच्या ‘गुडी-गुडी’ चित्राला प्रेक्षकवर्ग कंटाळतो हे चॅनल्सना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे अर्थातच मालिकेत जास्तीत जास्त ड्रामा, थ्रिल, अ‍ॅक्शन दाखवली जाईल याकडे जास्त लक्ष असतं. म्हणूनच खलनायक किंवा खलनायिका हा हुकमी एक्का चॅनल्स बाहेर काढतात. मग सुरू होतो चांगल्या-वाईटाचा खेळ. खलनायकांच्या कुरघोडी, त्यावर नायक-नायिकांनी केलली मात, त्यांनी शिकवलेला धडा वगैरे वगैरे सत्र सुरूच राहतं. या खेळात नायक-नायिकांच्या आई-वडिलांनीच उडी मारल्यामुळे धडा शिकवण्याचा विडा मात्र आता त्यांना उचलता येत नाही. त्यामुळे मालिकांच्या आधीच्या धोरणांमधली धडा शिकवण्याची पायरी आता वगळली जातेय. पण, प्रेक्षकांना मालिका बघताना थोडा बदल मिळतोय हेही नसे थोडके.
खरं तर आई, वडिलांची खल-प्रतिमा प्रेक्षकांकडून स्वीकारली जाऊ शकते का हा प्रश्न आहे. पण, नाव ठेवत का होईना प्रेक्षक अशा मालिकांना प्रतिसाद देताहेत. म्हणूनच ‘होणार सून..’, ‘रुंजी’, ‘जमाई राजा’, ‘मेरे अंगन मे’, ‘रंगरेज’ अशा काही मालिकांना चांगला प्रेक्षकवर्ग लाभला आहे. ‘रंगरेज’मधली भवरी देवी ही घरातील मुख्य व्यक्ती. घरातले सगळे निर्णय तिचे असतात. तिच्या विरोधात कुणीही जाऊ शकत नाही. त्यामुळे तिचा मुलगा आणि त्याला आवडणारी मुलगी यांच्यात कुरघोडी करण्याचं कामंही ती समर्थपणे पार पाडते. ‘डोली अरमानों की’ मध्ये तर अजबच प्रकार बघायला मिळतो. ऊर्मीचं दुसरं लग्न झालंय ते इशानशी. ऊर्मी आणि इशानचं नातं तसं खूप प्रेमाचं, जिव्हाळ्याचं. दोघेही त्यांचा संसार कसा सुखाचा होईल याचा प्रयत्न करताहेत. पण, इशानच्या आईला काही स्वस्थ बसवेना. दोघांचा संसार कसा मोडेल आणि दोघे एकमेकांपासून कसे वेगळे होतील सतत या प्रयत्नात आहेत. याशिवाय ‘शास्त्री सिस्टर’मध्ये रजतची आई मिंटी ही रजत आणि अनुष्कामध्ये, ‘स्वरागिनी’मधली दादी लक्ष्य-स्वरा-रागिनी यांच्यात तर ‘मेरी आशिकी तुमसे ही’मधली रणवीरची आई रणवीर आणि इशानीमध्ये कारस्थानं करण्यात पटाईत आहेत.
छोटय़ा पडद्यावर नाटय़ हे हवंच. मग तो रिअ‍ॅलिटी शो असला तरी त्यात नाटय़ हवंच. हे नाटय़ दिसतं ते खलभूमिकांमुळेच. त्यामुळे त्यासाठी मालिकांचे वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. त्यातलाच हा नवा प्रयोग म्हणता येईल. नाटय़ निर्माण करणाऱ्या घरातल्या सासू, सासरे, जाऊ, नणंद, दीर अशा सगळ्यांची जागा आता नायक-नायिकांच्याच आई, वडील किंवा आजी यांनी घेतली आहे. हा नवा ट्रेंड टीव्हीवर सध्या लोकप्रिय होताना दिसतोय.
चैताली जोशी response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2015 1:14 am

Web Title: tv serials 4
Next Stories
1 ‘इडियट बॉक्स’वर मेजवानी…
2 दाजींचा ‘अस्मिता’ला बाय-बाय
3 विनोदाचा होतोय इनोद!
Just Now!
X